खूप पूर्वी केलेला जमिनीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी पुण्याच्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये सह्य़ा करायला जायलाच हवं होतं. पण जमीन विकणाऱ्या बाईंना गाठणंच अवघड झालं होतं. खूप प्रयत्नांनंतर त्या सापडल्या आणि यायला तयार झाल्या खऱ्या पण अनेक अटी घालूनच..
कधी कधी जीवनात आपण अशा काही गोष्टी करतो, की त्यामुळे क्षणिक समाधान, आनंद आपल्याला जरूर मिळतो, पण पुढे भविष्यात त्याच गोष्टींमुळे आपल्याला किती मनस्ताप होणार आहे, याची आपल्याला पुसटशीदेखील कल्पना नसते! १९९५ मध्ये मी पुण्याला प्लॉट घेतला. आनंद सोसायटीमध्ये! प्लॉटचीच सोसायटी होती ती. त्यात बहुसंख्य लोक एअर इंडियात काम करणारे होते. एक चांगली गुंतवणूक म्हणून बऱ्याच जणांनी त्यात पैसे गुंतवले होते. सरकार दफ्तरी या ‘आनंद’ सोसायटीची नोंद झाली होती. रामनाथन् नावाच्या बाईंकडून मी त्या सोसायटीतील प्लॉट रीसेलमध्ये घेतला. वकिलानं अॅग्रिमेंट तयार केलं. आमचा एजंट, रामनाथनबाई आमच्या घरी आले. आम्ही दोघींनीही त्या अॅग्रिमेंटवर सह्य़ा केल्या. मी रामनाथनना पूर्ण पैसे दिले. सह्य़ा केल्यानंतर एजंट आणि त्या बाई परत गेल्या. एक चांगली गुंतवणूक केल्याचं मला समाधान लाभलं!
अशीच काही वर्षे गेली. पुण्याच्या हद्दीवर तो प्लॉट होता. १९९५ नंतर तर पुणं झपाटय़ानं वाढत होतं. आपण योग्यच गुंतवणूक केलीय या आनंदात मी होते. साधारण ११ वर्षांनी म्हणजे २००५-०६ मध्ये आनंद सोसायटी एका बिल्डरने आपल्या ताब्यात घ्यायची ठरवली. त्या जमिनीवरती त्याला मोठय़ा इमारती बांधायच्या होत्या. ज्यांना प्लॉट विकून पैसे पाहिजे होते, त्यांना पैसे व ज्यांना त्या इमारतीत फ्लॅट पाहिजे होते, त्यांना पैसे न देता फ्लॅट असं आकर्षक पॅकेज बिल्डरने जाहीर केलं होतं. सोसायटीतल्या लोकांनी भराभर सौदे पुरे केले. पण माझं मात्र घोडं अडलं होतं! बिल्डरच्या वकिलानं मला सांगितलं की, हा प्लॉट तुम्ही रीसेलमध्ये घेतला आहे. तुम्ही दोघींनीही अॅग्रिमेंटवर सह्य़ा केल्या आहेत, पण सरकारदरबारी मात्र त्याची नोंद नाही. फसवाफसवीचे प्रकार वाढल्यावर सरकारने जमिनीच्या प्रत्येक सौद्यामध्ये रजिस्ट्रेशन सरकारी दफ्तरात झालेच पाहिजे असा नियम केला होता. तो आम्हाला एजंटने स्वत:चे कष्ट वाचवण्यासाठी सांगितला नव्हता. त्यामुळे सरकारी दफ्तरी माझ्या प्लॉटची मालकी रामनाथनबाईंकडेच होती. त्यासाठी आम्ही दोघींनाही पुण्याच्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये सह्य़ा करायला जायलाच हवं होतं. बिल्डरचे वकील मला सर्व सहकार्य करत होते, त्यासाठी कागदपत्रे बनवणे, कोर्टात चकरा मारणे ही सर्व कामे ते वकील मला खर्चात न पाडता करत होते. कारण माझ्या प्लॉटच्या प्रश्नामुळे त्यांचं कामं अडलं होतं ना!
मी मिसेस रामनाथनचा शोध घ्यायला सुरुवात केली, पण त्यांनी दिलेला नंबर लागतच नव्हता. त्यांच्या बहिणीला फोन केला. पण त्याही काही सांगायला तयार नव्हत्या. मग आनंद सोसायटीच्या आमच्या सेक्रेटरींना फोन करून त्याबद्दल विचारलं. त्यावर ते म्हणाले की, ‘‘रामनाथनबाई निवृत्त असल्यामुळे सहा महिने अमेरिकेत आपल्या मुलाकडे व सहा महिने दुबईत आपल्या मुलीकडे राहतात!’’ सेक्रेटरी एअर इंडियातच काम करत असल्याने म्हणाले की, ‘‘भारतात जर रामनाथन आल्याचं कळलं तर मी तुम्हाला नक्की त्यांचा नंबर देईन. मी अतिशय निराश झाले. आता कधी त्या भारतात येणार आणि कधी आमची भेट होणार आणि बिल्डरला तर घाई होती. परंतु माझ्या सुदैवाने एक-दीड महिन्यांनी त्या सच्च्या सेकेट्ररीने त्या भारतात आल्याचे सांगितले आणि त्यांचा फोन नंबरही दिला. मोठय़ा आशेने मी रामनाथनना फोन केला व दोघींनीही पुण्याला जाऊन सह्य़ा करणे, कसे गरजेचे आहे ते सांगितले. जोपर्यंत आपल्या दोघींच्या सह्य़ा होत नाहीत, तोपर्यंत प्लॉट माझ्या नावावर होणार नाही, हेही सांगितले. आणि प्लॉट नावावर झाला नाही, तर तो मला बिल्डरला विकताही येणार नाही. पण त्या काहीच ऐकायला तयार नव्हत्या. त्या सांगू लागल्या, की त्याच वेळी एजंटने संगितलं असतं तर केल्या असत्या मी सह्य़ा! पण आता मी अजिबात सह्य़ा करणार नाही. माझी फार पंचाईत झाली. दर दोन दिवसांनी आशेने मी त्यांना फोन करी. त्या धाडकन् फोन ठेवून देत. मला अत्यंत अपमानास्पद वाटे. असे दोन/तीनदा फोन केल्यावर हताश होऊन मी त्यांना म्हटले, ‘‘प्लीज फोन ठेवू नका. पाहिजे तर तुमच्या नातेवाईकांना विचारा की, सह्य़ा करणे ही जमीन विकणाऱ्याचीही तितकीच जबाबदारी आहे की नाही!’’ एके दिवशी सकाळी त्यांचा मला आपणहून फोन आला आणि त्या मला म्हणाल्या, ‘‘मी विचारलं माझ्या नातेवाईकांना. त्यांच्या मते मी तेथे जाऊन सही करणे अगदी आवश्यक आहे. शिवाय माझा नवरा म्हणतोय की केळकरांनी आपले सर्व पैसे तर कधीच दिले आहेत. आपण त्यांना सहकार्य नाही केलं, तर त्यांना त्यांचा प्लॉट कधीच विकता येणार नाही.’’ शेवटी नाइलाजाने का होईना, त्या पुण्याला यायला तयार झाल्या. पण अनेक अटींवर.
अट क्र. १- जायच्या दिवशी मी त्यांना वांद्रय़ाहून गाडीने पुण्याला न्यायचे.
अट क्र. २- त्यांच्या नवऱ्याला मधुमेहाचा त्रास होता. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याच्या सर्व वेळा सांभाळल्या गेल्या पाहिजेत.
अट क्र. ३ – काम संपवून रात्रीच्या आत परत यायला हवे.
अट क्र. ४ – ठरल्या दिवशी काम झाले नाही तर त्या परत पुण्याला येणार नाहीत.
अट क्र. ५ – सही केल्यावर जर काही प्रश्न निर्माण झाला तर त्याला त्या जबाबदार राहणार नाहीत, असा वकिलाकडून कागद बनवून आणा. या सर्व अटी मी आनंदाने मान्य केल्या. त्यांच्या पाहुणचारात कुठलीही कसर राहायला नको याबाबत मी माझ्या ड्रायव्हरला बजावलं! ठरलेल्या दिवशी त्यांना वांद्रे येथून पिकअप केलं. भरपूर खाणे, फळे (मधुमेहाला चालतील अशी) पाणी वगैरे जय्यत तयारी केली. प्रवासात त्या कमी बोलत होत्या. रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये आमचा पहिलाच क्रमांक होता. तेथे गेल्यावर अनेकांनी माझ्या सह्य़ा घेतल्या. मला ओळखत असल्यानं कामही लवकर झालं. आणि काम लवकर झाल्यामुळे बाईंची कळी हळूहळू खुलायला लागली. मग त्यांनी दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला जायची इच्छा व्यक्त केली. तिथेही दर्शनासाठी रांगेत उभे असताना, मंदिरात काम करणाऱ्या पुजाऱ्याने मला रांगेमधून पुढे बोलावून शाल, श्रीफळ, प्रसाद देऊन मान दिला. त्यांचंही छान दर्शन झालं. त्यांना आता महाराष्ट्रीय पद्धतीचं जेवण जेवायचं होतं, म्हणून त्यांना मी ‘श्रेयस’मध्ये घेऊन गेले. तिथेही मॅनेजर, इतर स्टाफ ओळखीचाच होता. आपुलकीने ते माझ्याशी बोलत होते. छान सव्र्हिस देत होते. हे सर्व बघून रामनाथनबाईंनी मला विचारलं की, ‘‘तुम्ही काय करता हो?’’ मी सांगितलं की, ‘‘मी गायिका आहे. चित्रपटासाठी गाते, कार्यक्रमही करते.’’ हे ऐकल्यावर आश्चर्याने त्या उडाल्याच! आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. येताना लोणावळ्याला उतरून कोकम सरबताचा कॅन आणि काजू-बदाम चिक्की घेऊन त्यांच्या हातात ठेवली. वांद्रा आल्यावर मी ड्रायव्हरला म्हटले, ‘‘जा त्यांना अंधेरीला त्यांच्या घरी सोडून ये.’’ हे ऐकल्यावर मात्र अत्यंत संकोचून त्या मला म्हणाल्या, ‘‘मिसेस केळकर, आता आणखी लाजवू नका हं आम्हाला! मी खरंच, तुमची काहीही चूक नसताना, खूप त्रास दिला तुम्हाला. खरं तर प्रत्येक ठिकाणी लोकांचं तुमच्याबद्दलचं प्रेम, आपुलकी पाहून माझी मलाच लाज वाटायला लागली. केवढं केलंत तुम्ही माझ्यासाठी. पण तुम्ही खरंच खूप लकी आहात, कारण वर्षांतून फक्त एकदाच १५ दिवस मी भारतात येते आणि बरोबर त्या वेळातच तुम्ही मला गाठलंत! तुमच्या पाहुणचाराबद्दल खरंच खूप आभार! आता आमचे आम्ही रिक्षाने जाऊ अंधेरीला. असं म्हणत, त्या दक्षिणात्य जोडप्याने माझा निरोप घेतला. आणि मी! देवाचे मनोमन आभार मानत सुटकेचा नि:श्वास टाकला.
शेवटी उशिरा का होईना, सही करण्याची उपरती झाली त्या बाईंना!
(सोसायटीचे नाव व बाईंचे आडनाव बदलले आहे)
-उत्तरा केळकर
uttarakelkar63@gmail.com