आमच्या शेजारी दादा गोसावी राहात असत. दुपारी दादा झोपले की आम्ही मुलं त्यांच्या झाडाच्या कैऱ्या पाडायचो. दादांना जरा जरी चाहूल लागली की ते त्यांच्या घरातून काठी आपटायचे. सर्वजण कैऱ्या वेचून धूम ठोकायचे. असा टारगटपणा करत असतानाच आम्हा सर्व मुलांच्या हातून एक चूक घडली..

लहानपणी वार्षिक परीक्षा संपली रे संपली की आम्ही, म्हणजे आम्ही तीन भावंडं, आई, वडील लोणावळ्याला राहायला जात असू. मग अगदी सुट्टी संपेपर्यंत तिथे राहून जूनमध्ये शाळा सुरू होण्याच्या सुमारास मुंबईला जड अंत:करणाने परतत असू. आमच्यासारखे इतरही जण सुट्टीत आसपासच्या बंगल्यांत मुंबईहून येत आणि सर्व ओस असलेले ते बंगले माणसांनी फुलून जात.
आम्ही सर्व मित्रमंडळी मग सुट्टीभर हुंदडत असू. आज सांगायला आनंद वाटतो, की आमचा जो मित्रमैत्रिणींचा ग्रुप होता, ते सर्वजण आज आपापल्या क्षेत्रात अगदी यशस्वी आणि समृद्ध आयुष्य जगत आहेत. माझी बहीण शोभना अमेरिकेत सुखात आहे. मी (पाश्र्वगायिका), माझा धाकटा भाऊ अविनाश (एक यशस्वी चार्टर्ड अकाउंटंट), शेजारचा अजय (‘सिझन मोटेल्स’चा मालक), त्याचा धाकटा भाऊ भरत (अमेरिकेत यशस्वी सी.ए.), अजित केळकर (अभिनेता आणि एकॉनॉमेट्रिक्सचा प्रोफेसर), शाम काळे (हाडांचा डॉक्टर आणि वसईत स्वत:चे हॉस्पिटल), दिलीप दांडेकर (कॅमलिन कंपनीचा संचालक), प्रकाश परांजपे (लुमिना बल्ब कंपनीचा मालक) हा आमचा ग्रुप थोडासा खटय़ाळ, पण अगदी छान होता. थोडय़ाशा चुका आमच्याकडून झाल्या तरी आम्ही कोणीच वाहवत गेलो नाही.
सकाळी करवंदांच्या जाळ्यांमधून करवंदं तोडणं, कधी पेरूची आणि जामची झाडं शोधून तिथून ते तोडून घेऊन येणं, दुपारी कुणाच्या तरी बंगल्यात बसून पत्ते खेळणं, दिलीप दांडेकरच्या रेकॉर्ड प्लेयरवर गाणी ऐकणं, किंवा कंपाउंडमध्येच खेळणं, संध्याकाळी लोणावळा खंडाळ्याच्या पॉइंट्सवर फिरायला जाणं. असा आमचा सुट्टीतला भरगच्च कार्यक्रम असे. फक्त खाण्यापुरतेच काय ते आम्ही आपापल्या घरी जात असू. तसे लहान असल्यामुळे आम्ही सर्वच थोडेफार हळवे अन् भाबडेही होतो. अजय-भरतने पांढऱ्या रंगाची एक कुत्री पाळली होती. ती आम्हा सर्वानाच खूप आवडायची. बऱ्याचदा ती आमच्या घरीही येऊन बसायची. चंपी नाव होतं तिचं! तिला छोटी छोटी पिल्लं झाली, तेव्हा तर आम्ही हरखूनच गेलो. मग त्या पिल्लांना दूध देणं, गोंजारणं, त्यांच्यासाठी मऊ मऊ कापड पसरवून त्यांना झोपवणं असा आमचा कार्यक्रम होता. आम्ही करवंद किंवा जाम तोडायला बाहेर गेलो की चंपीसुद्धा आमच्या मागे मागे सगळीकडे यायची. पण आमच्या परिसरातले मोठे मोठे अल्सेशियन कुत्रे, रस्त्यावरचे भटके कुत्रे तिच्या मागे लागून तिला फार त्रास द्यायचे. मग एकदा अजयकडच्यांनी तिला त्यांच्या गॅरेजमध्ये कोंडून ठेवलं. आतमध्ये तिच्यासाठी खाणं-पाणी ठेवलं. रात्र व्हायला लागली, आणि जवळजवळ आठ-दहा कुत्रे गॅरेजच्या बाहेर ती बाहेर येईल या आशेने ठाण मांडून बसले. दुसऱ्या दिवशी उजाडल्यावर आम्ही चंपीला बघायला गेलो तर हे कुत्रे तसेच सकाळपर्यंत गॅरेजबाहेर तिची वाट बघत बसलेले! शेवटी त्या त्रासातून तिची सुटका करण्यासाठी, तिला पोत्यात घालून, गाडीने जवळजवळ १० मैल लांब सोडण्यात आलं. गाडी वेगात परत आली. पण कसलं काय! दुसऱ्या दिवशी सकाळीच इतक्या लांबून चंपी घरी हजर!
एके दिवशी अचानक ती मेली. आम्हाला तर रडूच कोसळलं. मग आम्ही सर्व लहान मुलांनी तिच्यासाठी माती उकरून खड्डा तयार केला. त्याच्यात तिला पुरली, वरून माती लोटली, वर उदबत्त्या लावल्या आणि फुलं पसरवली. आम्हा सर्वाकडून छोटीशी श्रद्धांजली! काही दिवसांनी त्या जागेवर झाडं उगवायला लागली. मग तिथून जात असताना आम्ही तिच्या आठवणीने त्या झाडांनासुद्धा नमस्कार करायचो.
आमच्या शेजारी, बंगले बांधण्यासाठी आम्ही ज्यांच्याकडून जमिनी घेतल्या ते दादा गोसावी राहात असत. त्यांच्या कंपाउंडच्या बाहेर समोर शंभर पावलांवर एक डेरेदार आंब्याचं झाड होतं. तेही त्यांच्याच मालकीचं होतं. पण त्याला कुंपण नव्हतं. मे महिन्यात त्याला असंख्य कैऱ्या लागत. दुपारी दादा झोपले की आम्ही, शिवाय आसपासची मुलं त्यांच्या झाडाच्या कैऱ्या बॉलने किंवा दगडाने पाडायचो. कैऱ्या टपाटप पडायला लागायच्या. दादांना जरा जरी चाहूल लागली की ते त्यांच्या घरातून मोठय़ांदा काठी आपटायचे. मग सर्वजण कैऱ्या वेचून धूम ठोकायचो. गंमत होती सगळी. असा टारगटपणा करत असतानाच आम्हा सर्व मुलांच्या हातून एक चूक घडली..
एके दिवशी आमच्या कंपाउंडमध्ये खेळता खेळता आमचा बॉल शेजारच्या घराच्या पाठीमागील अंगणात, फणसाच्या झाडाखाली जाऊन पडला. सर्वजण आमच्या कुंपणापर्यंत गेलो. बघतो तर काय, शेजारच्यांच्या फणसाच्या झाडाला मोठे मोठे फणस लागलेले. त्यातले काही तर अगदी हाताच्या अंतरावर होते. त्यातला एक मोठ्ठा फणस काढून घेण्याची (का चोरण्याची) आम्हा सर्वाचीच इच्छा झाली. किती वेडेपणा होता तो! त्या फणसाचे गरे खायला आम्हाला तो थोडाच कापता येणार होता? उत्साहाच्या भरात घरातून गुपचूप एक सुरी आणि वर्तमानपत्र आणलं. आमच्यातले सर्वात लहान असलेले (५/६) वर्षांचे अविनाश आणि भरत यांना कुंपण वाकवून फणसाच्या झाडापर्यंत जायला लावलं. त्यांनी सुरीने एक मोठा फणस कापला. चीक कागदाला पुसला आणि त्यांनी तो फणस कागदात गुंडाळून आमच्या हातात दिला. दुपारची वेळ होती. वडील मुंबईला गेले होते. घरात सर्वत्र सामसूम होती. आम्ही दोघा-तिघांनी तो फणस आमच्या बेडरूममधल्या बेडखाली खोल सारून ठेवला आणि विजय मिळवल्याच्या थाटात परत खेळायला लागलो.
दोन दिवसांनी बेडरूममध्ये फणसाचा वास यायला लागला. वडिलांनी आम्हा भावंडांना विचारलं ‘‘फणसाचा वास कुठून येतोय?’’ आम्ही तिघंही एकमेकांकडे बघत गप्प! आणि थोडेसे घाबरलेले! आता काय करायचं? मग वडील नसताना दुपारच्याच वेळी तो फणस आम्ही अजित आणि शामला (ते जरा लांब राहात असल्याने) त्यांच्या घरी ठेवण्यास सांगितले. मग सायकलवरून फणसाची रवानगी आमच्या घरातून त्यांच्या घरात झाली! आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला. पण कसलं काय! शेजारच्यांकडे व आमच्याकडे काम करणारी बाई एकच होती. दोन दिवसांनी ती माझ्या आई-वडिलांना म्हणाली, ‘अहो शेजारच्या गोसाव्यांच्या अंगणातून एक फणस चोरीला गेला हो! कोणी घेतला कळत नाही! पूर्वी असं कधीच झालं नव्हतं! वडिलांच्या लगेच लक्षात आलं, आम्हा तिघा भावंडांना त्यांनी बोलावलं आणि विचारलं ‘‘खरंच तुम्हीच तो फणस तोडून आणलाय? परवापासून घरात फणसाचा वास येतोय?’’आम्ही तिघांनीही शरमेनं मान खाली घातली. वडील म्हणाले, ‘‘अरे दरवर्षी ते फणस भेट म्हणून पाठवतात आणि तुम्ही त्यांचा फणस चोरलात?’’
आमची चोरी सपशेल उघडी पडली होती. लाजेनं आम्ही म्हणालो ‘‘आम्ही तिघंच नाही, इतरही होते आमच्या बरोबर! पण आता तो फणस आम्ही अजित आणि शामकडे पाठवलाय! वडील यावर रागावून म्हणाले ‘‘अरे एक करो किंवा अनेक करोत, चोरी ती चोरीच! आता मागवा तो फणस इकडे, आणि त्यांना परत करा तो! शिवाय त्यांची माफीही मागा.’’ लाजेनं शरमिंदा होत आम्ही तो फणस परत मागवला. जेवढी मुलं आम्ही जमलो, तेवढी सगळी शेजाऱ्यांकडे गेलो. त्यांचा फणस परत केला आणि त्यांची माफीही मागितली. उत्साहाच्या भरात आम्ही जे कृत्य केलं ते चुकीचंच होतं. खरं तर चोरीच होती ती! मौन राखून, लपवालपवीचा प्रयत्न करून जाणीवपूर्वक केलेली.
पण त्या दिवशी एक मोठा संस्कार माझ्या मनावर कायमचा कोरला गेला. आयुष्यात आजतागायत कुणाच्याच वस्तूला हात लावण्याची माझी हिंमत झाली नाही. एक मोठाच धडा मिळाला आम्हाला!
संपर्क – ९८२१०७४१७३
uttarakelkar63@gmail.com

Story img Loader