आकाशवाणीतर्फे झालेल्या शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीताच्या तिन्ही स्पर्धात मी पहिली आले आणि बक्षीस म्हणून मला रेडिओवर गायला मिळाले. मग गुरुजींनी शिकवलेले राग नीट घोटवून घेतले, नवीन ठुमऱ्या शिकवल्या. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे फायदा झाला तो म्हणजे सवाई गंधर्व महोत्सवात माझ्यासारख्या नवशिक्या मुलीला ४० मिनिटे शास्त्रीय व ठुमरी गाण्याची संधी मिळाली; पण त्यामुळे दुसरंही घडलं. त्यांच्या माझ्याकडून गाण्याच्या अपेक्षाही वाढू लागल्या.. ते माझे शास्त्रीय संगीताचे गुरू पं. फिरोज दस्तूर! ९ मेच्या त्यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना ही शब्दरूपी श्रद्धांजली..

जो माणूस विवाहित नव्हता, तरी एखाद्या संसारी माणसासारखंच ज्याचं घर होतं; ज्यांच्या घरात गृहिणी नव्हती, पण आल्यागेल्यांच्या पाहुणचारात कुठेच कमतरता नव्हती; जो माणूस अनेक मानसन्मान मिळून हुरळून गेलेला नव्हता, की अनेक संकटांना तोंड देऊन व खचून गेला नव्हता; तो जितका सनातनी होता, तितकाच आधुनिक विचारसरणीचा होता; धर्माने पारशी असूनसुद्धा ज्याला मांसाहार वज्र्य होता; संगीत हाच ज्याचा संसार होता, अनेक शिष्य ही त्याची मुलंबाळं होती; जगात रक्ताच्या नात्याचं फारसं कुणी उरलेलं नव्हतं, पण घरातल्या नोकरचाकरांवर जो जवळच्या नातेवाईकांसारखंच प्रेम करत होता; चेहऱ्यावर, शरीरावर वयाच्या खुणा उमटू लागल्या तरी जो मनाने अतिशय तरुण होता; आयुष्यात अत्यंत एकाकी असूनसुद्धा, कसलाही खेद वा खंत न बाळगता, जीवनातला प्रत्येक क्षण जो आनंदानं जगत होता; अशा शांत, प्रेमळ, समाधानी योग्याचं नाव होतं पं. फिरोज दस्तूर, शास्त्रीय संगीतातले आमचे गुरू!
ग्रँट रोडच्या मौलाना शौकत अली रोडवरच्या, कोपऱ्यावरच्या इमारतीमध्ये, दुसऱ्या मजल्यावर सुरांचं हे मंदिर होतं. तेथे सुरांची पूजा बांधणारा एक पुजारी होता. हा पुजारी अनेक वर्षे भक्तिभावानं आणि निष्ठेनं सुरांचा प्रसाद आल्या-गेल्यांना अखंड वाटत होता. अशा या सुरांच्या साधकाची मी विद्यार्थिनी! जवळजवळ २६/२७ वर्षे मी त्यांच्याकडे शास्त्रीय गाणं शिकायला जात होते. ९ मे २००८ मध्ये गुरुजी हे जग सोडून गेले. त्यांचा या स्मृतिदिनानिमित्त माझी ही शब्दरूपी श्रद्धांजली!
१९६७ चं ते वर्ष होतं. डॉ. अशोक तुळपुळे यांचं (हृदयरोगतज्ज्ञ) लग्न वनिता समाजात होतं. एक लाल लाल गोरा, जोधपुरी कोट घातलेला माणूस डॉक्टरांना शुभेच्छा द्यायला स्टेजवर गेला. तेवढय़ात मला कुणी तरी सांगितलं की, हे गायक पंडित फिरोज दस्तूर! त्या वेळी लहान असल्यामुळे त्यांच्या गाण्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती; पण आश्चर्य वाटलं ते त्यांच्या पोशाखाचं, व्यक्तिमत्त्वाचं आणि इंग्लिशचं! कारण त्या वेळच्या शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात सुटातली, छान इंग्लिश बोलणारी, नीटनेटक्या राहणीतली व्यक्ती मी बघितलेलीच नव्हती; पण योगायोग पाहा! त्यानंतर दोन वर्षांतच मला त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली. मुंबई विद्यापीठानं शास्त्रीय संगीताचा अभ्यासक्रम नुकताच सुरू केला होता. तिथे वेगवेगळ्या घराण्यांची गायकी शिकवली जात होती. सकाळी विल्सन कॉलेजात शिकत असतानाच संध्याकाळी मी या अभ्यासक्रमाला जाऊ लागले आणि तिथे गुरुजींकडे किराणा गायकी शिकू लागले. सोमवार ते शुक्रवार रोज ४ तास पहिले २ तास लेक्चर्स, मग २ तास गाणं! आम्ही चार जण गुरुजींकडे गाणं शिकत होतो. ते तिघे माझ्यापेक्षा वयानं बरेच मोठे होते. प्रत्येकाला रोज अर्धा तास शिकायला मिळे. गुरुजींनी प्रथम यमन राग शिकवायला सुरुवात केली. बाकीच्यांना विलंबित एकतालातली चीज, आलाप, ताना असं सर्व गुरुजी शिकवायला लागले; पण मला मात्र रोज फक्त यमनच्या सुरांचाच रियाज करायला लावला. तेच तेच सूर परत लावायचे, पहिला सूर चांगला लागल्याशिवाय पुढे जायचंच नाही. असं तीन महिने चाललं होतं. घरी आल्यावर मी वैतागून आईला म्हणे, ‘‘हे कसलं गाणं? मी सोडून देते. इतरांना मात्र पूर्ण राग शिकवतात आणि मला मात्र फक्त सूर? हे काय?’’ आई म्हणायची, ‘‘अगं, खरंच तुझे सूर चांगले लागत नसतील! एवढय़ा मोठय़ा व्यक्तीकडे तुला रोज शिकायला मिळतंय आणि तू सोडण्याची भाषा करतेस?’’ धीर एकवटून मी दुसऱ्या दिवशी शिकायला जायचे. मी कंटाळायचे, पण ते कधीच वैतागायचे नाहीत, उलट न चिडता धीर द्यायचे. हळूहळू मला ते सूर जवळचे वाटायला लागले, आपले वाटायला लागले. सच्चा सुरांचा आनंद काय असतो, हे उमगायला लागलं आणि गाण्यात गोडी निर्माण होऊ लागली. वर्षांच्या शेवटी सात-आठ राग १५-२० मिनिटं तरी सुरातालात गाता येतील एवढा आत्मविश्वास गुरुजींनी मला मिळवून दिला. माझ्यासारख्या नवशिक्या मुलीला तो फारच महत्त्वाचा होता. एक वर्षांने गुरुजी मला म्हणाले, ‘‘तीन महिने तुला एकटीलाच सूर लावायला का सांगितले माहित्येय? तुझा आवाज छानच आहे. सुरात गायलीस तर तुझे सूर काळजाला हात घालतात, पण सुरात नाही गायलीस तर ते सूर सुईसारखे टोचत राहतात.’’ गुरुजींचं म्हणणं मला एकदम पटलं. दुसऱ्याच वर्षी अभ्यासक्रमात नसताना गुरुजींनी मला एकटीलाच ठुमरी शिकवायला सुरुवात केली. बाकी शिकणारे नाराज झाले. तेव्हा गुरुजी म्हणाले, ‘‘हिच्या गळ्यातून जे निघतं ना, ते तुमच्या कोणाच्याच गळ्यातून निघत नाही.’’ माझ्या गुणदोषांची किती अचूक पारख होती गुरुजींना! सगळ्यांना शिकवून होईपर्यंत साडेआठ वाजलेले असत. मला शेवटपर्यंत सर्वाचं गाणं ऐकायला लागे. आम्ही दोघेही ग्रँट रोडलाच राहात असल्यामुळे आम्ही एकदमच चर्चगेटला जात असू. मग बऱ्याच वेळा मला ते तिथल्या ‘सत्कार’ हॉटेलमध्ये घेऊन जात. तिथला शिरा व भजी खाऊ घालत. ग्रँट रोड आलं, की आम्ही आपापल्या घरी जात असू. प्रवासात आपल्या मोठेपणाचा दबाव ते माझ्यावर कधीच येऊ द्यायचे नाहीत. एखाद्या मुलीची वडिलांनी जशी काळजी घ्यावी, तशी ते माझी काळजी घ्यायचे.
आकाशवाणीतर्फे तरुणांसाठी भारतभर शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीताच्या स्पर्धा वर्षांनुवर्षे घेतल्या जातात. त्या वेळी गंमत म्हणून मी त्यात भाग घेतला आणि तिन्ही प्रकारांमध्ये पहिली आले. त्या बक्षिसाचा एक भाग म्हणून मला रेडिओवर प्रत्येकी तीन कार्यक्रम गायला मिळाले. आता या कार्यक्रमात गाण्यासाठी मला इतके राग आणि ठुमऱ्या कुठे येत होत्या? मग गुरुजींनी शिकवलेले राग नीट घोटवून घेतले, नवीन ठुमऱ्या शिकवल्या. एक ठुमरी तर त्यांनी फक्त माझ्यासाठी स्वत: रचली. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे मला बराच फायदा झाला. बक्षिसांमुळे माझा दुसराही फायदा झाला. ज्या रंगमंचावर दिग्गज कलावंत हजेरी लावतात, त्या सवाई गंधर्व महोत्सवात माझ्यासारख्या नवशिक्या मुलीला ४० मिनिटे शास्त्रीय व ठुमरी गाण्याची संधी मिळाली. गुरुजींनी दिलेल्या तालमीमुळे आणि प्रोत्साहनामुळेच हे घडू शकलं; पण त्यामुळे दुसरंही घडलं. त्यांच्या माझ्याकडून अपेक्षाही वाढू लागल्या..
त्यांची तालीम आणि माझा रियाझ यामुळे मी शास्त्रीय संगीत हेच माझं क्षेत्र निवडेन, असं त्यांना वाटू लागलं; पण माझा ओढा सुगम संगीताकडेच जास्त होता. त्यांच्या बोलण्यातून त्याबद्दल नाराजीही अधूनमधून व्यक्त व्हायची. शेवटी ते एकदा मला म्हणाले, ‘‘उत्तरा! माझ्या तरुणपणात जर तू गाणं शिकायला आली असतीस, तर मी तुला घरातून घालवूनच दिलं असतं! एवढा मी कडक होतो. एवढं मनापासून शास्त्रीय संगीत शिकवायचं, मेहनत घ्यायची आणि तुम्ही सरळ सुगम संगीताकडे वळायचं म्हणजे काय? पण आता एवढं वय झाल्यावर, विचार केल्यावर पटतं की, आपल्या आवाजाच्या गुणधर्माप्रमाणेच ज्याने त्याने आपल्या गाण्याचं क्षेत्र निवडावं! तुझा आवाज सुगम संगीतासाठी योग्य आहे आणि नशिबाने जर त्यात तुला संधी मिळत असली, त्यात भवितव्य असेल, तर तुला अडवण्याचा मूर्खपणा मी करणार नाही.’’ त्यानंतर ते माझ्यावर कधीच नाराज झाले नाहीत. केवढा हा समजूतदारपणा! दुसऱ्याचा विचार करण्याची वृत्ती.
विद्यापीठाचा अभ्यासक्रम संपल्यावर मी त्यांच्या घरी जाऊन शिकायला लागले. सकाळपासून रात्रीपर्यंत गुरुजी संगीतदानातच रमलेले असायचे. घरात शिरलं की टिपिकल पारशी माणसाच्या घरात गेल्यासारखं वाटायचं. बाहेर रांगोळी काढलेली असायची. प्रशस्त घर, मोठय़ा मोठय़ा खोल्या, जुनं फर्निचर! गेल्या गेल्या हॉलमधल्या टेबलावर पूजेचा दिवा (त्यांच्या भाषेत बत्ती) जळत असायचा. स्वयंपाकघरात शिरलं, की खास पारशी जेवणाचा वास दरवळायचा. आमच्या गुरुजींना इतरांना खाऊ घालण्याचा भारी शौक! घरात राहायचे एकटे, पण ३/४ माणसं सहज जेवून जातील एवढं अन्न घरात शिजवलेलं असायचं. त्यात धनसाक, खिमा पॅटिस वगैरे पारशी डिशेस असतील तर मग विचारायलाच नको! आग्रह करून करून ते इतरांना वाढत असत. याबद्दल त्यांच्याकडे शिकलेल्या कुठच्याच विद्यार्थ्यांचं दुमत असणार नाही. त्यांचे नोकरसुद्धा त्यांच्यासारखेच टेबलखुर्चीवर जेवायला बसायचे. त्यांच्याजवळच्या कुठल्याच माणसात भेदभाव हा नव्हताच! त्यांच्या संगीताच्या खोलीत एक वेगळंच वातावरण जाणवायचं. ओळीने ४ तानपुरे मांडून ठेवलेले असत. भिंतीवर लावलेले त्यांच्या तीन गुरूंचे फोटो, आई, वडील आणि गेलेले चार भाऊ यांच्या तसबिरी गुरुजींच्या एकाकीपणाची जास्तच जाणीव करून देत. जीवनात आलेल्या सर्व दु:खांना ते अत्यंत खंबीरपणे आणि शांतपणे सामोरे गेले. माझ्यासमोरच त्यांच्या घरातली ४/५ माणसं गेली. शेवटी त्यांचा आवडता सख्खा भाऊ गेला. ते अगदी एकटे पडले. शेवटची काही वर्षे दर वर्षी ते पुतण्या-पुतणीकडे अमेरिकेला जात, ते सर्व किल्ल्या, घर नोकरांच्या हवाली करून! मी त्यांना विचारायचे, ‘‘एवढं नोकरांच्या भरवशावर, विश्वासावर तुम्ही तिथे जाता, इथं काही जाईल वगैरे असं तुम्हाला वाटत नाही का?’’ त्यावर ते शांतपणे म्हणायचे, ‘‘अगं, काय जाणार? सगळ्यात मौल्यवान असलेली माझी माणसं गेली, आता इथल्या कवडीमोल वस्तू गेल्या तर काय मोठंसं बिघडणार आहे?’’ जीवनाकडे एवढं अलिप्तपणे बघण्याची त्यांची वृत्ती बघून मी थक्क होऊन जात असे.
त्यांच्या सहृदयतेचा एक किस्सा. एकदा त्यांच्या घरी गेले असता, एका छोटय़ाशा प्लेटमध्ये थोडं थोडं अन्न वाढून ठेवलेलं होतं. मी विचारलं, ‘‘हे कशासाठी?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘मामांसाठी! अगं, उंदीरमामाने एकदा माझे प्राण वाचवले. तेव्हापासून त्या येणाऱ्या उंदरासाठी हे अन्न मी रोज ठेवतो. एकदा माझ्या खोलीत बसलो असता, दुसऱ्या खोलीतून काही तरी पडल्याचा आवाज आला. आवाज झाला म्हणून गेलो तर दिसलं की आग लागायला सुरुवात झालीय. उंदीरमामाने भांडं पाडल्यामुळे मला इथे यायची बुद्धी झाली आणि अनर्थ टळला.’’ उंदराला अन्न वाढणारा हा माणूस प्रत्यक्षात किती गोड स्वभावाचा असेल ते तुम्हीच ठरवा!
काही काही बाबतीत मात्र गुरुजी हे कमालीचे कर्मठ होते. ठरावीक दिवशी देवाची पूजा झालीच पाहिजे, दिवा लागलाच पाहिजे. स्वत:च्या गुरुजींच्या (सवाई गंधर्व) पुण्यतिथीला कुठल्याही परिस्थितीत दर वर्षी पुण्याला जाऊन गायचेच. गाणं शिकवताना आमच्या किराणा घराण्यात या रागाचं चलन असंच झालं पाहिजे किंवा अमुक एक रागात अमुक एक स्वराचा ठहराव इतकाच झाला पाहिजे. या सर्व बाबतीत ते अत्यंत जागरूक होते. किराणा घराण्याची शिस्त आणि परंपरा यांचा त्यांना भयंकर अभिमान होता; पण एवढे सनातनी असलेले गुरुजी, बाकी अनेक बाबतीत मात्र अगदी आधुनिक विचारसरणीचे होते. कधी कधी ते आपल्या शिष्यांबरोबर पत्ते खेळत, बुद्धिबळ खेळत, कधी चित्रपट बघायला जात. गाडी स्वत: चालवायला त्यांना फार आवडायची. गाण्याची तालीम झाल्यावर एखाद्या विद्यार्थ्यांला ते पेग घेणार का, असं विचारायलाही कमी करायचे नाहीत. त्यांची राहणीही अत्यंत व्यवस्थित आणि टापटिपीची! त्यांच्या चेहऱ्यावर आणि कपडय़ांवर मी कधीही सुरकुती बघितली नाही.
गुरुजी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात शिरण्यापूर्वी चित्रपटसृष्टीत होते, हे कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही. १९३२ ते १९४५ पर्यंत त्यांनी हिरोच्या भूमिका करून हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. मग मात्र चित्रपट संन्यास घेऊन ते शास्त्रीय संगीताकडे वळले. गुरुजींच्या गाण्याबद्दल माझ्यासारखी छोटी गायिका काय बोलणार? त्यांच्या व्यक्तिमत्त्वासारखंच त्यांचं गाणं शांत, आल्हाददायक आणि प्रसन्न होतं. सुरांवर प्रेम करणारी त्यांची गायकी होती. सवाई गंधर्व महोत्सवात वर्षांनुवर्षे गाऊनसुद्धा ‘गोपाला करुणा’ हे भजन गायल्याशिवाय लोक त्यांना सोडत नसत.
९ मे २००८ ला गुरुजींनी इहलोकीची यात्रा संपवली. त्यांचं अंत्यदर्शन घ्यायला घरची माणसं कुणीच नव्हती. होती ती सर्व शिष्यमंडळी आणि शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातले लोक! त्यांच्या गळ्यातले सच्चे सूर माझ्या गळ्यात उतरवून त्यांनी मला समृद्ध तर केलंच, पण त्याहीपेक्षा जीवनाकडे बघण्याच्या माझ्या संकुचित दृष्टिकोनाला वेगळे वळण देऊन मला नवी दृष्टीही दिली.
संपर्क -९८२१०७४१७३
uttarakelkar63@gmail.com

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
premachi goshta tejashree pradhan exit and swarda thigale enters in the show
तेजश्री प्रधानची Exit, स्वरदाची एन्ट्री! ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये ‘या’ दिवशी येणार नवीन मुक्ता, सईबरोबरचा भावनिक प्रोमो आला समोर
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Trending video boy from village singing song of nathicha nakhara goosebumps came on people after listing his song viral video
“नथीचा नखरा नऊवारी साडी” शाळकरी मुलाच्या गाण्यानं अख्ख्या महाराष्ट्राला लावलं वेड; सूर असा की अंगावर येतील शहारे, VIDEO पाहाच
Marathi Actress Praises Sangeet Manapman Movie
“तुम्ही South च्या बाहुबलीचं कौतुक असेल तर…”, सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ पाहून मराठी अभिनेत्री भारावली, प्रेक्षकांना म्हणाली…
Story img Loader