मी खूप हिंदी चित्रपटात गायले नाही, पण तरीही २०-२२ चित्रपटांमधून नक्कीच गायले. संगीतकार बप्पी लाहिरींकडे त्यातल्या त्यात जास्त गायले. लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आनंद-मिलिंद, राम-लक्ष्मण व काही इतर संगीतकारांकडेही हिंदी चित्रपटांसाठी गाण्याची संधी मिळाली. साधारण १९८४ ते १९९८ पर्यंत मी बप्पीजींच्या हिंदी कार्यक्रमांत गात होते. मला आठवतंय, त्याप्रमाणे त्यांनी मला ‘टारझन’ चित्रपटासाठी प्रथम रेकॉर्डिगला बोलावलं. शब्द होते, ‘मेरे पास आओगे,’ मी ते गाणं फक्त शूटिंगपुरतं गाणार होते. पण ‘टारझन’ चित्रपटाचे निर्माते बी. सुभाष यांना मी गायलेलं ते गाणं आवडलं आणि चित्रपटात त्यांनी माझंच गाणं ठेवलं. त्या चित्रपटातलं दुसरं गाणंही ‘तमाशा बनके आए है’ त्यांनी थेट मलाच दिलं. त्यानंतर ‘डान्स डान्स’मध्ये मी गायलेलं ‘आ गया आ गया हलवावाला आ गया’ हे गाणं लोकप्रिय झालं. नंतर बप्पीजींनीच संगीत दिलेलं ‘फूल बने अंगारे’मधील गाणं ‘गोरी कबसे हुई जवान’ हे गाणं लतादीदींना वेळ नव्हता म्हणून मी शूटिंगपुरतं गायलं, पण माझं हे गाणं चित्रपटाचे निर्माते के. सी. बोकाडिया यांना आवडलं त्यांनी माझंच गाणं चित्रपटात ठेवावं, म्हणून बप्पीजींना विनंती केली. पण बप्पीजींनी लतादीदींना शब्द दिला होता. बप्पीजींचंही बरोबरच होतं. म्हणून मग माझं गाणं चित्रपटात नाही राहिलं, पण बोकाडिया साहेबांनी मी गायलेलं गाणं ‘फूल बने अंगारे’ चित्रपटाच्या रेडिओ पब्लिसिटीसाठी वापरलं, हेही नसे थोडके! पण पुढच्या एका चित्रपटात मात्र (बहुतेक ‘इन्सानियत के देवता’) बोकाडिया साहेबांनी मला एक गाणं गायला आठवणीने, आवर्जून बोलावलं. संगीतकार होते आनंद-मिलिंद! जसजशी मी बप्पीजींच्या कार्यक्रमांत गात गेले, तसतसे ते मला हिंदी चित्रपटांसाठीसुद्धा अधूनमधून थेट रेकॉर्डिगला बोलवायला लागले. देवानंदच्या ‘सौ करोड’, इतर निर्मात्यांच्या ‘घर घर की कहानी’, ‘माँ कसम’, ‘अधिकार’, ‘काली गंगा’ अशा आणखी अनेक चित्रपटांत त्यांनी मला गायला बोलावलं. त्याखेरीज मधूनच ते मला उरिया, बंगाली गाण्यांच्या रेकॉर्डिगलाही बोलावू लागले. एकदा तर त्यांच्या तेलगू चित्रपटात तेलगू गाणं गायल्याचंही आठवतंय.
जेव्हा मी बप्पी लाहिरींच्या कार्यक्रमात गात होते, तेव्हा त्यांची स्वत:ची रेकॉर्डिग्जही खूप जोरात चालली होती. कारण तेव्हा त्यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली होती. त्यांचे कार्यक्रमही खूप भव्य प्रमाणात असत. साधारणपणे जिथे एअरपोर्ट असेल, जिथे फाइव्ह स्टार हॉटेल असेल, तिथेच ते कार्यक्रम करीत. कोलकाताच्या एअरपोर्टवर निर्माते, त्यांच्या स्वागतासाठी हार घेऊन तिष्ठत उभे राहत असत. हॉटेलला पोहोचले की वेगवेगळे निर्माते यांना बंगाली चित्रपटांसाठी करारबद्ध करीत. कार्यक्रम हे फक्त एक निमित्त असे. असे अनेक कार्यक्रम बप्पीदांबरोबर केल्यामुळे, माझा एक असा फायदा झाला की कार्यक्रमांमध्ये कोलकातातील बरेच आयोजक मला त्यांच्या कार्यक्रमांसाठी स्वतंत्रपणे, थेट बोलवायला लागले. ते कोलकातामधला एखादा ऑर्केस्ट्रा बुक करीत. माझी सर्व गाणी बसवून ठेवीत. मग तिथे गेल्यावर मी, कार्यक्रमाआधी वादकांबरोबर प्रॅक्टीस करीत असे. कधी बप्पीजींचा कार्यक्रम मुंबईपासून २-४ तासांच्या अंतरावर असेल, तर बप्पीजींच्या बंगल्यातून ७-८ गाडय़ा निघत. वादक बसमधून आधी जात. त्यानिमित्ताने कधी जर त्यांच्या घरी जाण्याची वेळ आली, तर बप्पीजींच्या पत्नी चित्राणी लाहिरी, बप्पीजींचे आई-वडील यांची भेट होई. त्यांची आई बंसुरी लाहिरी, या बंगालमधल्या यशस्वी गायिका होत्या. तसंच वडील अपरेश लाहिरी हे बंगालमधले प्रसिद्ध संगीतकार होते. ते दोघेही माझ्याशी अत्यंत प्रेमाने वागत. कधी बप्पीजींचे वडील माझ्या नवऱ्याला गमतीत म्हणत, ‘‘दामादजी, आजकल उत्तरा बंगाल में बहुत सारे प्रोग्रॅम्स करने लगी है, हमारे बंगाल में कैसे जाते है आप? अभी तो मैने उत्तरा का नाम ‘उत्तरा कलकत्तेवाली’ ऐसाही रखा है’’. तिथली वर्तमानपत्रं त्यांच्याकडे येत असत. त्यामुळे इतर कार्यक्रमांची त्यांना खबर असे. यावर माझा नवरासुद्धा त्यांना गमतीत उत्तर देई, ‘‘डॅडी! आप लोग तो हमारे महाराष्ट्र में प्रोग्रॅम्स करके रेकॉर्डिग्ज करतेहै, रहते भी है, उत्तरा तो सिर्फ वहां जाकर गा के वापस आती है’ यावर बप्पीजींचे वडील मला हसून म्हणत, ‘‘उत्तरा, बहुत होशियार है तुम्हारा हजबंड!’’
बप्पीजींच्या कार्यक्रमात देशात किंवा परदेशात काय, अभिनेते, अभिनेत्री, मिमिक्री आर्टिस्ट, डान्सर्स नेहमीच असत. त्या त्या वेळचे हीट असलेले कलाकार म्हणजे गोविंदा, अमीर खान, मिथुन, पद्मिनी कोल्हापुरे, श्रीदेवी, जयाप्रदा, मंदाकिनी आदी असत. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी, कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होई. कधी कधी वेस्टर्न स्टाईल गाणी गायलाही एखादी गायिका असे. एकदा कोलकाताला कार्यक्रम होता. सर्व कलाकारांची व्यवस्था सेव्हन स्टार हॉटेलमध्ये होती. पोहोचल्यावर थोडा आराम केला. टीव्ही लावला. टीव्हीवर भारतातल्या कुठच्या तरी राज्यातली पुराची भयानक दृश्ये दाखवली जात होती. कित्येक लोक मृत्युमुखी पडले होते, जे जिवंत राहिले त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात होतं. अन्न-पाणी यासाठी लोकांची तडफड चालली होती. ती व्यथित करणारी दृश्ये बघितल्यावर मी व माझ्या नवऱ्याने अगदी साधं जेवण मागितलं. अन्न जराही फुकट जाणार नाही, एवढंच मागवलं. खात असतानाच कार्यक्रमाचा आयोजक संध्याकाळच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी आमच्या खोलीत आला. आमचं एवढंसंच जेवण बघून तो म्हणाला, ‘‘हे काय? विशेष काही मागवलं नाही तुम्ही?’’ यावर आम्ही म्हटले, ‘‘नाही. टीव्हीवर पुराची दृश्यं बघितल्यावर जास्त जेवण मागवण्याची इच्छा नाही झाली!’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘कमाल आहे! आताच शेजारच्या रूममध्ये गेलो होतो. तिथे आपल्याच कार्यक्रमात गाणारी एम टीव्हीची एक गायिका आहे. तिने एकटीसाठी मेन्यू कार्डात असलेल्या सगळ्या नॉन व्हेज डिश ऑर्डर केल्या आणि प्रत्येक डिशमधलं थोडसं चाखून, बाकी सर्व पदार्थ तसेच फुकट घालवले आणि माझं मात्र हजारो रुपयांचं बिल केलं.’’ आम्ही मनात म्हटलं, धन्य आहे त्या गायिकेची!
एकदा बप्पीजींचा कार्यक्रम परदेशी म्हणजे दोहा कतारला होता. तिथे गेल्यावर आयोजकाने सांगितलं, की इथे स्टेजवर बायका नृत्य करत नाहीत. आमच्या बरोबर त्या वेळी एक नामवंत अभिनेत्री होती. ती नृत्य करणार होती. पण आयोजकांच्या या अटीमुळे स्टेजवर काय करावं असा प्रश्न तिला पडला. बप्पीजींनी तिला, तुझ्या एखाद्या फिल्ममधील प्रसिद्ध डायलॉग बोल किंवा काही किस्से सांग किंवा एखादं गाणं म्हण असं सुचवलं. पण तिला यातील काहीच येत नव्हतं. शेवटी बप्पीजींनी मला स्टेजच्या आतून माईकवर एक गाणं म्हणायला सांगितलं आणि त्या ‘थोर’ नटीने स्टेजवर येऊन बंद असलेल्या माईकसमोर उभं राहून, ओठ हलवीत गाणं म्हणण्याचा फक्त अभिनय केला! काय बोलणार!
एकदा बप्पीजींचा कार्यक्रम परदेशी, बहुतेक मस्कत किंवा बहारीन येथे होता. बरोबर ऑर्केस्ट्रामध्ये गाणारी एक गायिकाही होती. तिचं विशेष नाव नव्हतं. पण बऱ्याच कार्यक्रमांतून ती गात असे. आम्ही मुंबई एअरपोर्टवर जाण्यासाठी जमलो. बोर्डिग पास घेतले. सेक्युरिटी चेक इनमधून जाणार तोच एका कस्टम ऑफिसरने तिला रोखलं. त्या वेळी तरी गल्फ देशांना जाताना आपल्याजवळचे सोन्याचे दागिने हे डिक्लेअर करावे लागत. हिने ते केले नाहीत. तिच्याकडे दागिने सापडताच कस्टम ऑफिसरने तिला प्रश्न केला, ‘‘बाई! इतक्या वेळा गल्फला जाऊन आलात तरी दागिने डिक्लेअर करण्याचा नियम तुम्हाला माहीत नाही?’’ त्यावर तिने ते दागिने खरे नसल्याचे सांगितले. ते दागिने त्यांनी तपासले. पण ते सोन्याचेच होते. यावर ती हे दागिने खोटेच आहेत, असं म्हणत त्यांच्याशी वाद घालू लागली. शेवटी कस्टम ऑफिसरने चिडून तिचा बोर्डिग पास जप्त केला आणि उलट घरी पाठवलं! खरं तर हा खोटेपणा तिने का करावा?
बप्पीजींचा एकदा कोलकातापासून ४-५ तासांच्या अंतरावर एका गावात कार्यक्रम होता. त्या वेळी मंदाकिनीचा ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपट जोरात चालला होता. त्यामुळे ती या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होती. कार्यक्रमाला तुफान गर्दी होती. जवळजवळ ५० हजार लोक मावतील असा मोठा मांडव उभारण्यात आला होता. भव्य स्टेज! लोक दाटीवाटीने बसले होते. आयोजकांनी त्या मांडवाच्या क्षमतेचा विचार न करता पैशांच्या लोभाने भरमसाट तिकीटविक्री केली होती. तिथल्या क्षमतेपेक्षा दुप्पट माणसं आत शिरली होती. स्टेजच्या बाजूला कलावंतांसाठी बंदिस्त जागा होती. स्टेजवर चढण्यासाठी ताफा तयार होता. बप्पीजींनी मला स्टेजवर चढण्यासाठी खूण केली. मी स्टेजवर गेले. गाणं सुरू केलं! पण समोर काही तरी अस्वस्थता जाणवत होती. इतक्यात पाठीमागून खूप रेटारेटी सुरू झाली. खूप गर्दीमुळे पाठीमागील लोक पुढच्यांना ढकलत होते. चेंगराचेंगरीही सुरू झाली. मग आरडाओरडा, गोंधळ! परिस्थिती हाताबाहेर जात्येय हे स्पष्ट दिसायला लागलं, आता कुठल्याही क्षणी दंगल सुरू होईल आणि परिस्थिती आणखी चिघळेल म्हणून बप्पीजींनी मला दुसरा अंतरा संपवून लगेच खाली विंगमध्ये येण्याबद्दल निरोप पाठवला.
तोपर्यंत सर्व अभिनेते, अभिनेत्रींना गाडीने त्यांनी आधीच परत पाठवून दिलं. मला अमुक एका गाडीत बस, ही सूचना करून ते निघाले. कार्यक्रम आता होऊ शकणार नाही हे लोकांना कळून चुकलं. मी व माझे यजमानही लगेच गाडीत बसलो. पण तोपर्यंत लोक सैरावैरा धावायला लागले होते आणि नेमकी माझीच गाडी लोकांच्या गराडय़ात सापडली. जवळजवळ पाच-सहाशे लोकांनी माझ्या गाडीला वेढा घातला. फक्त चार-पाच पोलीस त्या वेढय़ाला कसे काय आवरणार? लोकांनी माझी गाडी अडवली व माझ्या गाडीत मंदाकिनी आहे का असे ते मला विचारू लागले. जेव्हा त्यांना कळलं की माझ्या गाडीत ती नाही, तेव्हा काही अडाणी लोकांनी तुम्हीच मंदाकिनी आहात, असं म्हणायला सुरुवात केली! काय करावं काही सुचेना! शेवटी बाजूलाच कार्यक्रमाचं एक पोस्टर लागलं होतं, त्यावर मंदाकिनीचा फोटो होता, तो मी त्या लोकांना दाखवला. तेव्हा कुठे त्यांचा विश्वास बसला आणि त्यांनी मला गाडी पुढे जाण्यासाठी वाट करून दिली.
तर असे हे हिंदीतल्या झगमगत्या आणि मायावी दुनियेतले किस्से! चौदा र्वष मी बप्पीजींच्या कार्यक्रमात गात होते. नाव, पैसा, प्रसिद्धी सगळं मिळत होतं. पण मन मात्र त्यात रमत नव्हतं! अशा रंगीबेरंगी दुनियेत खरं तर मी अगदीच मिसफिट होते. सर्व काही सुरळीत चाललं होतं. पण मला माझे स्वतंत्र कार्यक्रम करण्यात जास्त रस होता. मला येत असलेलं तोडकं मोडकं गाणं मला इतरांना शिकवायचं होतं. म्हणून ९८ मध्ये मी बप्पीजींना तसं नम्रपणे सांगून त्यांचे कार्यक्रम सोडले. आज मला त्याची जराही खंत वाटत नाही.
(संपर्क क्रमांक -९८२१०७४१७३)
उत्तरा केळकर- uttarakelkar63@gmail.com