आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी माणसे भेटत असतात. खूप काही देऊन जाणारी तर काही आपल्याच कडचं खूप काही घेऊन जाणारी. माझ्या आयुष्यात आलेली ही दोन माणसं, एक माझी जीवाभावाची, लहानपणापासूनची मैत्रीण जिने फक्त प्रेमच दिलं आणि दुसरा, ज्याने प्रत्यक्ष न भेटताही माझ्या आयुष्यातला आनंद हिरावून नेला.. काळ गेला पण आपली किंमत वसूल करूनच..

माझ्या ‘साठी’ निमित्त ४ नोव्हेंबर २०११ ला, माझ्या वाढदिवशी माझ्या मुलीने आणि जावयाने, कोहिनूर हॉटेलमध्ये एक शानदार समारंभ आयोजित केला होता. संगीत क्षेत्रातली बरीच माणसं, म्हणजे गायक, वादक, संगीत दिग्दर्शक , रेकॉर्डिस्ट, अरेंजर्स वगैरे हजर होते. शिवाय घरचे, नातेवाईक, ओळखीचे आणि थोडय़ा फार मैत्रिणीही होत्या. सुरुवातीला तासभर सुधीर गाडगीळांचा कार्यक्रम, नंतर काही निवडक लोकांची भाषणं, मग माझं मनोगत व शेवटी जेवण असा भरगच्च कार्यक्रम होता. माझं मनोगत पूर्ण झाल्यावर माझ्या मुलीने जाहीर केलं की आईला आज मी एक सरप्राइज गिफ्ट देणार आहे. तिची पहिलीपासूनची मैत्रीण, अनेक वर्षांनी तिला भेटायला, खास लांबून आली आहे. तिनं नाव पुकारलं ‘रेखा चौधरी.’ रेखा हळूहळू माझ्या दिशेने येत होती.. मी पाहातच राहिले. ही माझी मैत्रीण रेखा? मग अशी काय दिसत्येय ही?  खूप बदल झाला होता तिच्यात. खूप जाड दिसत होती ती, पण तिचं हास्य मात्र तेच होतं. तिला मिठी मारत म्हटलं. ‘‘रेखा किती आनंद झालाय तुला भेटून.’’ पार्टी संपल्यावर सगळ्यांचा निरोप घेऊन मी घरी आले. पण रेखाचा विचार मात्र मनातून जात नव्हता..

expert answer on career advice questions career advice tips from expert
करीअर मंत्र
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Today is the last day to apply for various courses of Idol Mumbai print news
‘आयडॉल’च्या विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

घरी आल्यावर मी मानसीला म्हटलं, ‘‘खरंच, बरं केलंस तू, रेखाला बोलावलंस ते. पण ती किती वेगळी वाटली मला.’’ त्यावर मानसी म्हणाली, ‘‘अगं, रेखामावशी आता पुण्याच्या तिच्या घरी नाही राहत. लोणावळ्याला तिच्या मुलीकडे सध्या राहत्येय. कर्करोग झालाय तिला. जास्तीत जास्त दोन महिने जगेल, असं डॉक्टर म्हणताहेत. पण तुला भेटायचंच म्हणून एवढी आजारी असताना, येववत नसताना हट्टाने मुलीला घेऊन आली होती ती. केमोथेरपी चालू आहे तिची. विग लावून आली होती ती!’’ ते सर्व ऐकून हबकलेच. माझी जिवाभावाची मैत्रीण मरणाच्या उंबरठय़ावर! लहानपणापासूनचा आठवणींचा अल्बम माझ्या डोळ्यांपुढे उलगडायला लागला..

अगदी पहिलीपासून आम्ही एका वर्गात! मग पाचवीत आम्ही दोघींनी सेंट कोलंबात अ‍ॅडमिशन घेतली. अभ्यासात चांगली गती होती तिला; शिवाय शिवणकाम, हस्तकला, ड्रॉइंगही फार सुरेख यायचं तिला. आम्ही दोघीही मध्यमवर्गीय घरातल्याच होतो. पण तिला नटण्या-मुरडण्याची, छानछोकीची, फॅशनची भयंकर आवड. तिच्या घरची माणसं म्हणायचीसुद्धा, ‘रेखा! किती नटतेस तू! तुझ्या मैत्रिणीकडे बघ जरा, किती साधी आहे ती!’ पण अशा वागण्यामुळे आमच्या मैत्रीत कधीच फरक पडला नाही. कारण मनानं अगदी निर्मळ होती ती. ९/१० वीत असतानाच तिचं प्रेम जमलं ‘सनू’शी. तो तिच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा. त्याची आई अँग्लो इंडियन होती. तिच्या घरातून लग्नाला पूर्ण विरोध होता. पण आई-वडिलांना न जुमानता मोठय़ा भावंडांच्या मदतीने, कॉलेजचं शिक्षण अर्धवट टाकून सनूशी लग्न केलं तिनं! त्या काळात ‘सन अ‍ॅण्ड सॅण्ड हॉटेल’मध्ये लग्न झालं तिचं. सनू आर्मीत होता. देखणा आणि कर्तबगार होता. मला वाटलं, बरं झालं आर्मीतला नवरा मिळाला हिला. आता हिच्या सगळ्या हौशीमौजी, स्वप्न पूर्ण होतील आणि झालंही अगदी तसंच! वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग्ज होत. आर्मी लाइफचं रसभरित वर्णन ती खुशीने मला फोनवर सांगे. किंवा १/२ वर्षांतून एखाद वेळी भेटेसुद्धा! एकदा मुंबईला पोस्टिंग झाल्यावर आम्ही दोघं तिच्या घरी जेवायलासुद्धा गेलो होतो. अशीच मजेत काही र्वष गेली पण काही वर्षांतच सनू गेला!

पुण्यातल्या घरी सुटीवर आला होता तो. तिथून परतताना, त्याची कामाची जागा होती तिथे उत्तर भारतातल्या एका शहरात तो पोहोचला अणि पोहोचल्या पोहचल्या त्याने शेवटचा श्वास घेतला. केवढा मोठा आघात होता रेखावर!  ३८/३९ वय आणि पदरात आठवीतली छोटी रसिका! त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे जाण्याआधी पुण्यातच आर्मीच्याच कॅम्पसमध्ये सनूने स्वत:चा फ्लॅट घेतला होता. त्यामुळे रेखाला स्वत:चं घर होतं. वर्षां-दोन वर्षांतून जेव्हा कधी रेखा माझ्या घरी येई, तेव्हा प्रत्येक वेळी ती करत असलेल्या एखाद्या नव्या व्यवसायाबद्दल मला सांगे. कधी चायनीज बनविण्याचे क्लासेस, तर कधी फुलं बनवण्याचे क्लासेस, कधी चॉकलेट्स किंवा कॉन्टिनेंटल डिशेसचे क्लासेस! या सगळ्या गोष्टी तिला उत्तम येत होत्या. अशीच काही र्वष गेली. रसिकाचं लग्न झालं. रसिकाचा नवरा नेव्हीत होता आणि आता त्याचं पोस्टिंग लोणावळ्यातल्या ‘आयएनएस शिवाजी’ या नेव्हल बेसमध्ये झालं होतं. आता जरा कुठे रेखाच्या आयुष्यात थोडं स्थैर्य आलं होतं! पुण्यात आपल्या घरी आर्मी लाइफमध्ये, म्हणजे तिथल्या पाटर्य़ा, भिशी यात ती मजेत होती! आणि आता काय ऐकत होते मी!

माझा वाढदिवस ४ नोव्हेंबरला झाला. रेखाचा वाढदिवस २६ नोव्हेंबरला होता. रसिकाने ‘आयएनएस शिवाजी’मध्ये रेखासाठी खास पार्टी ठेवली होती. निवडक लोकांना बोलावलं होतं. पण नेमका माझा कार्यक्रम असल्यामुळे मी जाऊ शकले नाही. माझ्या मुलीला, जावयाला मात्र मी आवर्जून पाठवलं. २६ तारखेला सकाळीच कार्यक्रमाच्या ठिकाणाहून रेखाला फोन केला. तिला शुभेच्छा दिल्या! आणि तिला आठ दिवसांतच भेटायला नक्की येते, असं सांगितलं. ४ डिसेंबरलाच तिला मी भेटायला गेले. भेटल्यावर तिच्या आजाराबद्दल काहीच बोलायचं नाही असं ठरवूनच गेले होते. खूप आनंद झाला तिला! मृत्यू जवळ आल्याची तिला जराही जाणीव नव्हती. पण एका महिन्यात तब्येत मात्र पार ढासळली होती. विग काढलेला होता. खुरटलेले केस, अगदी कृश शरीर, अशा अवस्थेत कामवालीने तिला धरून हॉलमध्ये आणलं. केमोथेरपीमुळे मधून मधून तिला उलटय़ा होत होत्या. अशा अवस्थेतही ती पुढचे बेत, पुढची स्वप्नं पाहात होती. हसत म्हणाली, ‘‘एवढय़ा वेळा, पुण्याला कार्यक्रमाला येतेस, पण माझ्या घरी मात्र एकदाही आली नाहीस. काही नाही, आता मी बरी झाल्यावर तुला माझ्या घरी यायलाच लागेल. आमचं आर्मीचं लाइफ पाहा तरी एकदा. माझा पत्त्यांचा क्लब, माझा भिशीचा ग्रुप, माझ्या इंडोअरगेमच्या मैत्रिणी सगळ्यांना भेटवायचंय मला तुला! मी तिच्या सगळ्या  बोलण्याला ‘‘हो, हो, नक्की येईन.’’ असं खोटं आश्वासन देत तिला फसवत होते. भागच होतं तसं करणं, कारण शेवटच्या भेटीत मला तिला आनंदी, स्वप्नात रमलेलीच बघायचं होतं. शेवटी घट्ट मिठी मारून जड अंत:करणाने मी तिचा शेवटचा निरोप घेतला.

४ डिसेंबरला मी रेखाला भेटून आले आणि २३ डिसेंबरला रसिकाचा रेखा गेल्याचा फोन आला. सगळं माहीत होतं, तरी तिचं शेवटचं हास्य मात्र राहून राहून आठवत होतं. दोन दिवसांनी मी रसिकाला फोन केला आणि विचारलं, ‘‘शेवटी काय झालं गं?’’ तिनं सांगितलं, ‘जायच्या दोन दिवस आधी आम्ही तिला ती जाणार असल्याचं सांगितलं. तिनंही ते शांतपणे स्वीकारलं. तिची काही इच्छा आहे का ते विचारलं!’ त्यावर रेखानं उत्तर दिलं, ‘रसिका! माझ्यानंतर सगळं तुझंच आहे, पण माझ्या नातीचं लग्न करशील तेव्हा माझा डायमंडचा सेट मात्र तिला दे.’ म्हणजे अखेरच्या क्षणापर्यंत बिचारी रेखा स्वप्नरंजनच करीत होती. आभासातच जगत होती. कारण स्वप्न पाहणं हा रेखाचा स्वभाव होता, तेच तिचं जग होतं. नव्हे तोच तिच्या जगण्याचा आधार होता!

चूक

शेवटी मी नको नको म्हणत असतानासुद्धा माझ्या नवऱ्याने, विश्रामने काही वर्षांपूर्वी ‘ती’ रायगडमधली जमीन विकत घेतलीच. मला वाटत होतं, मुळात इतकी जमीन घेण्याची गरजच काय? आणि घेतलीच तर ती इतक्या लांब कशाला? त्यावर त्याचं म्हणणं होतं की, तो आर्किटेक्ट असल्याने कधी ना कधी तरी या जमिनीचा त्याला उपयोग होईलच! मी म्हटलं, ‘‘आपल्याला तर जमिनीसंबंधात काहीच कळत नाही, तर कोणाच्या सल्ल्याने ही जमीन घेतोयस?’’ तेव्हा विश्रामने सांगितलं की गोगावले म्हणून एक गृहस्थ आहेत, त्यांना जमिनीच्या व्यवहारातलं खूप कळतं आणि तेही स्वत:साठी तिथे जमीन घेणार आहेत. जेव्हा मी गोगावलेंना बघितलं, तेव्हा मात्र माझं मत त्यांच्याविषयी फारसं चांगलं झालं नाही. उग्र डोळे आणि चेहऱ्यावर अतिआत्मविश्वास! त्यामुळे हा माणूस फसवील की काय अशी भीती वाटते, असे मी विश्रामला म्हटलं. पण विश्रामनं ते हसण्यावारी नेलं. मी अजिजीने त्याला म्हटलं, ‘‘नको तू विकत घेऊस ही जमीन आणि घेणार असशील तर मग मला त्या बाबतीतलं तू काहीच सांगू नकोस!’’ शेवटी गोगावल्यांच्या सल्ल्याने त्याने ती जमीन घेतलीच.

१९९९ मध्ये विश्रामचं अचानक निधन झालं आणि माझ्यावर अनेक  जबाबदाऱ्या येऊन पडल्या. त्याचं ऑफिस बंद करण्याआधी, ते आवरणं आवश्यक होतं. ऑफिस आवरता आवरता मला अचानक त्या जमिनीची खरेदीखतं सापडली. पण त्या सर्व झेरॉक्स कॉपीज होत्या. मग मूळ खरेदीखतं कुठे गेली, असा प्रश्न पडला. घरात, ऑफिसमध्ये, सर्वत्र शोधलं, पण मूळ कागद मला सापडेनात. इतर जबाबदाऱ्या व कामं पार पाडण्यात माझी तीन-चार र्वष गेली. मग मात्र मी या जमिनीच्या प्रकरणात लक्ष घालण्यास सुरुवात केली. रायगडच्या तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊनही जमीन नक्की कुठे आहे, किती आहे याची अचूक माहिती मी मिळवली. मला ओळखत असल्यामुळे ते लोकही मला छान सहकार्य करत होते. तिथले पालकमंत्रीही मार्गदर्शन करत होते. पण मूळ खरेदीखतं गेली कुठे, हा एकच प्रश्न मला सारखा सतावत होता. तिथेच एक व्यक्ती भेटली. ती या जमिनीच्या सौद्याच्या वेळी तिथं हजर होती. त्यांनी मला सांगितलं, ‘‘अहो उत्तराताई, तुमचे पती जायच्या अगोदर पंधरा दिवस, अचानक मला दादरला भेटले. खूप बारीक झाले होते. त्यांनी सांगितलं, ‘माझी खरेदीखतं गोगावलेंकडे आहेत आणि आता ते ती देतच नाहीएत मला!’ शिवाय त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार गोगावलेंनी तिथल्याही काही लोकांना फसवलंय.’’ हे ऐकून तर माझी तळपायाची आग मस्तकात गेली. सालस आणि सरळ स्वभावाच्या माझ्या नवऱ्याला गोगावलेंनी चांगलंच तणावात टाकलं होतं. त्याच्या आजारपणाचाही फायदा त्यानं घेतला होता. अरेरे! म्हणजे माझा नवरा या ताणाने तर गेला नसेल? विश्राम जाऊन सहा र्वष होत आली, तरी ही कागदपत्रं गोगावलेंनी मला देऊ नयेत? स्वत:कडेच  ठेवावीत?  मी या गोष्टीचा छडा लावायचा ठरवलं.

घरी आल्यावर काही दिवसांतच मी गोगावलेंना फोन लावला आणि आमची कागदपत्रं मागितली. त्यावर गोगावले मला म्हणाले, ‘‘अहो काही तरीच काय उत्तराताई! मी कशाला घेऊ तुमची खरेदीखतं? माझ्याकडे नाहीत ती’’! यावर मी म्हटलं ‘‘गोगावले! मला खात्रीपूर्वक कळलं आहे की खरेदीखतं तुमच्याकडेच आहेत आणि दुसऱ्याच्या वस्तू स्वत:कडे ठेवणं ही एक प्रकारची चोरीच आहे!’’ पण माझ्याकडे खरंच खरेदीखतं नाहीत, असं सांगून गोगावलेंनी फोन ठेवला. मी मात्र अत्यंत बेचैन झाले.

नंतर दुसऱ्या दिवशीच गोगावलेंनी माझ्या मुलीला फोन केला. चिडून ते म्हणाले, ‘‘मानसी! काय तुझी आई, मला चोरच ठरवते आहे. मी कशाला घेऊ तुमची खरेदीखतं?’’ मानसी शांतपणे त्यांना म्हणाली, ‘‘काका! नवरा जाण्याचं दु:ख आई आणि बाबा जाण्याचं दु:ख मी भोगत आहोत आणि खरंच, तुम्ही दिलेल्या टेन्शनमुळे तर ते गेले नसतील? ही खरेदीखतं कुठे गेलीत, याचा शोध आई घेईलच, प्रसंगी ती शोधण्यासाठी तिच्या ओळखीचाही वापर ती करेल. तुम्हाला माहितेय का? आई तुम्हाला फोन करण्यापूर्वी क्राइम ब्रांचच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटूनसुद्धा आलीय. त्यांना सर्व सांगितलंय तिने. तेव्हा तुमच्याकडे आमची खरेदीखतं असतील तर खरंच प्लीज आम्हाला ती लगेच देऊन टाका.’’ असं म्हणून मानसीने फोन ठेवला. मी फोन केल्यापासून, तिसऱ्या दिवशीच त्या फसव्या आणि खोटारडय़ा गोगावलेने आपल्याकडे लपवलेली खरेदीखतं मला परत केली. आहे की नाही कमाल!

गोगावलेसाहेब, तुमची ही चूक मला भलतीच महागात पडली हो! एकच खंत सतावते आहे, या जमिनीच्या संदर्भातलं मला काही सांगू नकोस, असं नवऱ्याला सांगून मी ‘चूक’ केली नाही ना?

(गोगावले हे नाव बदललेलं आहे)

उत्तरा केळकर

uttarakelkar4@gmail.com