‘सत्यम शिवम सुंदरा’, ‘भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली’ असो, की बहिणाबाईंची – ‘माझी माय सरसोती’, ‘अरे संसार संसार’, ‘खोप्यामध्ये खोपा’ अशी असंख्य गाणी गाणाऱ्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर. शास्त्रीय गायनाबरोबरच सुगम संगीत आणि लोकगीतातही आपली छाप पाडणाऱ्या उत्तरा केळकर यांना त्यांच्या व्यक्तिगत आणि सांगीतिक प्रवासात अनेक थोरामोठय़ांचे आशीर्वाद लाभले, अनेक बरे-वाईट अनुभव येत गेले आणि त्यातूनच त्या घडत गेल्या. त्या घडण्यातले हे अनुभव दर पंधरवडय़ाने.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
उत्तरा केळकर यांचे आई बाबा – रामचंद्र फडके आणि शकुंतला फडके

प्रिय वाचक हो! मला या लेखिकेच्या भूमिकेत बघून आश्चर्य वाटलं ना? साहजिकच आहे! कारण मी लेखिका नाही आणि हे माझं आत्मचरित्रही नाही. आत्मचरित्र लिहिण्याइतकी मी मोठी नाही किंवा आत्मचरित्रात आढळणारे मोठे संघर्ष किंवा चढउतार माझ्या आयुष्यात नाहीत; पण लहानपणापासून, आतापर्यंतच्या जीवनप्रवासात आणि संगीतप्रवासात मला जे जे अनुभव आले किंवा जे जे प्रसंग मी अनुभवले, ते ते साध्या सोप्या भाषेत शब्दबद्ध करीत आहे. हे अनुभव कधी सुखकारक, क्लेशकारक, धडा शिकवणारे, आश्चर्यकारक आणि समृद्ध करणारेही आहेत.
अनुभवांची ही अत्तरकुपी तुमच्यासमोर ठेवताना अत्यंत आनंद होत आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यात सुखदु:खाचे क्षण येत असतात. तसेच ते माझ्याही आयुष्यात आले; पण एकूण आयुष्याचा जर हिशेब मांडला, तर आत्तापर्यंत देवाने पदरात सुखाचंच माप अधिक टाकलं असं वाटतंय. कलावंत म्हणून वाटय़ाला अधिक अलौकिक क्षण आले. त्या क्षणांनी मला आनंद तर दिलाच, पण मला वाढवलंही. थोरामोठय़ांच्या गाठीभेटी, कधी त्यांचा सहवास, त्यामुळे जीवनाचं अगदी सार्थक झाल्यासारखं वाटतं.
नुसत्या संगीतप्रवासातच नाही, तर लहानपणापासूनच्या जीवनप्रवासातली अशी काही दृश्यं मला आजही दिसतात, की त्यामुळे मन हेलावून जातं आणि अशी माणसं मला आयुष्यात दिल्याबद्दल देवाप्रति माझं मन कृतज्ञ होतं. कधी झोपेत, कधी अचानक जाग आल्यावर, तर कधी एकटीच बसलेली असताना ही दृश्यं माझ्या हृदयाच्या कुपीत, अगदी सुगंधी अत्तरासारखी जपून ठेवली आहेत. तीच ही ‘अत्तरकुपी’.

दृश्य १
रात्रीचे दहा वाजून गेलेत, सर्व कामं आटोपून आई थकलीय; पण तरीही दार बंद करून ती मला उत्साहाने गाणं शिकवत्येय. माझं वय असेल ८/१० वर्षांचं. आई स्वत: गाणं शिकलीये, पण आता गाणं शिकवत्येय ते मला चांगलं गाता यावं म्हणून! वेगवेगळ्या स्पर्धेत मला भाग घ्यायला लावत्येय! ५०/५५ वर्षांपूर्वी टेपरेकॉर्डर, मोबाइल, व्हिडीओ, टॅब असलं काहीच नव्हतं. रेडिओही अगदी क्वचितच कोणाकडे असे. रेडिओवर आईला पाहिजे असलेलं गाणं लागलं, की ज्यांच्याकडे रेडिओ आहे, ते लोक आईला जोरात हाक मारतात. आईची वही, पेन तयारच असे. आई धावत जाऊन भराभर गाणं लिहायला लागते. उरलेले शब्द तिला पुढच्या वेळी मिळतात. अशी रेडिओवरची गाणी लिहून आत्मसात करून ती दर वेळी मला नवीन नवीन गाणी शिकवते. इच्छा एकच- माझ्या मुलीला चमकण्यासाठी नाही, तर चांगलं गाता येण्यासाठी गाणं शिकायलाच हवं! तिची ही माझ्यासाठी चाललेली धडपड बघून आजही मन गहिवरतं!

दृश्य २
सुट्टीतले दोन महिने आमचं वास्तव्य, वडिलांनी बांधलेल्या लोणावळ्याच्या बंगल्यात आहे. संध्याकाळची सात-साडेसातची वेळ. सी.ए. असलेले माझे वडील सुट्टीत रोजच मुंबईला अप-डाऊन करतात. तसेच ते आताही मुंबईहून आले आहेत. आम्ही तिघं भावंडं, शेजारपाजारची लहान मुलं, आमच्या व्हरांडय़ात बसलोय. वडील आरामखुर्चीत बसून आमच्याकडून रामरक्षा, पाढे, इतर संस्कृत श्लोक पाठ करवून घेत आहेत. खूप कंटाळा येतो याचा! पण आज मोठं झाल्यावर वेगवेगळ्या भाषेतली गाणी गाताना त्या स्पष्ट उचारांचा केवढा उपयोग होतो! या पाठांतरामुळेच तर लहानपणीच जिभेला चांगलं वळण लागलं, असं टाहो फोडून वडिलांना सांगावंसं वाटतं, पण माझा आवाज आता वर त्यांच्यापर्यंत कसा पोहोचणार?

दृश्य ३
प्रसंग लोणावळ्यातल्या बंगल्यातलाच! माझं पहिलंच गाणं रेडिओवर ‘युववाणी’ या कार्यक्रमात लागणार आहे. संध्याकाळपासून घरात सर्वाची लगबग चालू आहे. रात्र व्हायला लागलीय. सर्व जण रेडिओच्या भोवताली बसलेत. आई, वडील, आजी, आजोबा, भावंडं, शेजारची मुलं! सर्व जण कोंडाळं करून, कधी एकदा माझं गाणं सुरू होतंय, याची प्रतीक्षा करताहेत. गाणं सुरू होतं, माझं नाव सांगितलं जातं! मनात गुदगुल्या होतात.. आईच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहायला लागतात! माझ्या मनात मात्र काही तरी जिंकल्याचा आनंद आहे. पुढं, आपल्याला गायिकाच बनायचंय, हा निश्चय ठाम होऊ लागलाय..

दृश्य ४
२० व्या वर्षीच मी लग्न होऊन सासरी आलीय. सासू-सासऱ्यांनी आम्हाला वेगळा फ्लॅट घेऊन दिलाय. दोघेच मजेत राहतोय. गुरुजींकडे (फिरोज दस्तूर) मस्त गाणं शिकावं, घरी स्वयंपाक करावा, रियाज करावा, मधूनच चित्रपट बघावा, बाहेर हॉटेलात खावं, असं मजेत आयुष्य चाललंय आम्हा दोघांचं! विश्रामने (नवऱ्याने) नुकतीच प्रॅक्टिस सुरू केलीय. मी तर काहीच कमवत नाहीए. फारसे पैसे हातात नसतानासुद्धा आम्ही मजेत, आनंदात आहोत. मी गाण्यात करियर करावं, असं विश्रामला मनापासून वाटतंय आणि अचानक (७६ साली) एके दिवशी मला गुरुजींचा फोन येतो. ‘भूमिका’ या चित्रपटासाठी, दिग्दर्शक शाम बेनेगल यांनी उस्तादाच्या भूमिकेसाठी प्लेबॅक देण्यासाठी गुरुजींना विचारलं आहे. स्मिता पाटील उस्तादांकडे शास्त्रीय गाणं शिकते आहे, असं एक दृश्य होतं. त्या दीड मिनिटांच्या शुद्ध कल्याणच्या शास्त्रीय गायनाच्या तुकडय़ासाठी शाम बेनेगलना, गुरुजींनी माझं नाव सुचवलं आहे. चित्रपटात गायला मिळणार, या कल्पनेनेच मी हवेत आहे. रेकॉर्डिगचा दिवस उजाडतो. गाणं गाऊन संपतं. गुरुजी आणि मी टेक ओ.के. करतो. बेनेगलजीसुद्धा समाधानी आहेत. गुरुजींना नमस्कार करून मी निघते. तेवढय़ात कुणी तरी माझ्या हातात पैशाचं पाकीट ठेवतं. एवढंसं गायचे पैसे? मी नम्रपणे नाकारते. पैशांपेक्षा रेकॉर्डिग ओ.के. झाल्याच्या आनंदात मी आहे. तरीही समोरचा माणूस माझ्या हातात पाकीट कोंबतोच. गायला संधी आणि वर पैसे! पाकीट पर्समध्ये ठेवून मी आनंदात घरी येते. आल्या आल्या पाकीट उघडण्याचा मला मोह होतो. पाकीट उघडते. बघते तर, आतमध्ये शंभराच्या पंधरा नोटा म्हणजे पंधराशे रुपये असतात. बाप रे! एवढे पैसे कशाला? मन आनंदून जातं! माझ्या आयुष्यातली ही चित्रपटामधली पहिली कमाई आणि तीही एवढी! एवढे पैसे मी आयुष्यात पाहिलेले नसतात. पटकन त्या पंधरा नोटा घेऊन मी बेडवर पसरवते आणि त्याच्याकडे बघत बसते! आयुष्यात पुढे भरपूर गाणी गायली, सगळी मोठी, मोठी सुखं मिळाली, मिळताहेत, पण हे पहिल्या कमाईचं दृश्य मात्र मला आजही दिसत राहतं!..

दृश्य ५
हळूहळू माझं नाव होत आहे. रेकॉर्डिग्ज, कार्यक्रम वाढताएत. आता मला एक छान गुटगुटीत मुलगी आहे. तिचं कोडकौतुक करण्यात दिवस कापरासारखे उडताएत. कार्यक्रम बाहेरगावचा असेल तर मुलीची जबाबदारी सासू-सासऱ्यांनी आनंदाने आपल्यावर घेतल्येय. ते पंधरा-वीस मिनिटांच्या अंतरावरच राहतात. त्यांच्याकडे मुलीला सोपवून मी निर्धास्तपणे बाहेरगावी कार्यक्रमाला गेले आहे. आल्यावर वाटेत मुलीला घेऊन घरी जावं या विचाराने मी सासरी जाते. बघते तो, सासूबाई मुलीला डायनिंग टेबलावर, काही तरी ताजं, गरमगरम खायला वाढताएत आणि सासरे मुलीचा अभ्यास घेताएत! हे दृश्य बघून मी अगदी सुखावते! माझी मुलगी किती सुरक्षित हातात आहे, हे बघून बरं तर वाटतंच, पण असंही वाटतं की, एखाद्याची करियर घडण्यासाठी किती लोकांचा हातभार लागतो!

(उर्वरित ‘अत्तरकुपी’ १६ जानेवारीच्या अंकात)
संपर्क -९८२१०७४१७३
uttarakelkar63@gmail.com