इतक्या चांगल्या घरातल्या प्रियंवदाची अशी वाताहत का व्हावी? सगळी गणितं चुकून, फासे उलटेच का पडत जावेत? लोक तिच्याबद्दल काहीही बोलोत, तिला कितीही नाव ठेवोत, मला मात्र ती प्रियच होती, प्रियंवदा! आजही मला ती लख्ख आठवते. आणि आठवते ती काळी रात्रही..
आज सकाळपासूनच पावसानं जोर धरला आहे. सारखा कोसळतो आहे. दुपारचे फक्त चार वाजताहेत तरी सर्वत्र काळोख पसरला आहे. घरातही अंधार पसरलाय तसं नि मनही अंधारून आलंय.. का? अस्वस्थ वाटत आहे.. आणि लखकन् वीज चमकल्यासारखं झालं, आठवलं! बरोबर ५७/५८ वर्षांपूर्वी अशाच एका वादळी पावसाच्या दिवशी ती मला भेटली, ती म्हणजे प्रियंवदा. सकाळीच आमच्या ग्रँटरोडच्या घरी आली होती आणि पावसामुळे स्वत:च्या घरी दादरला जाऊ शकत नव्हती, मग राहिली आमच्याकडे.
आमच्या एका नातेवाईक व्यक्तीची ती बहीण. एकत्र कुटुंब होतं आमचं. प्रियंवदाला मी त्या दिवशी पहिल्यांदा बघितलं. खरं तर मी फक्त चार-पाच वर्षांची आणि ती असेल १४-१५ वर्षांची, पण बघता क्षणी ती मला खूप आवडली. ठेंगणीच, पण चेहऱ्यावर गोडवा. आल्या, आल्या तिनं मला जवळ घेतलं, पापे घेतले! रात्री तर विजांचा चमचमाट, ढगांचा गडगडाट ऐकून घाबरून मी तिच्याजवळच झोपले. तिचा हात होता ना माझ्या अंगावर. खूप सुरक्षित वाटलं मला!
मग अधूनमधून ती आमच्याकडे यायची. दर वेळी माझ्यासाठी काहीबाही खाऊ आणायची, कधी चॉकलेट तर कधी बिस्किटांचा पुडा! तर कधी कधी तर आग्रह करून मला दादरच्या तिच्या घरी घेऊन जायची. मग तर काय लाड, विचारूच नका! बाहेरचं आइसफ्रूट, भेळ, बोरं, ओली बडिशेप, बर्फाचा गोळा सगळं न मागताच घेऊन द्यायची मला. तिच्यामुळेच तर थिएटरमध्ये जाऊन पहिल्यांदा सिनेमा बघता आला मला. तिच्या रूपाने मला तर मजेची एक खाणच गवसली. हे असलं बाहेरचं खाणं, सिनेमा, माझे असले लाड माझ्या घरी कोणी केले असते का?
हळूहळू मी मोठी होऊ लागले. समजूही लागलं होतं. प्रियंवदा तेव्हाही आमच्या घरी अधूनमधून यायची पण आसपासचे लोक तिच्याबद्दल काही चांगलं बोलायचे नाहीत. नटवी, भटकभवानी, चालू अशी काहीबाही विशेषणं तिला चिकटवायला लागले. लोकांचा अगदी राग यायचा मला. पुढे काही दिवसांतच, तिचं लग्न झाल्याचं कळलं. ते कसं झालं, कुठे झालं काही आठवत नाही. पण मग मात्र ती येईनाशी झाली. पुढे तिनं दुसरं लग्न केल्याचं कळलं आणि तेही मोडल्याचं कळलं, मग ती राजरोसपणे वेगवेगळ्या पुरुषांबरोबर फिरते, असंही कळलं.
पुढे माझं लग्न झालं आणि मी दादरला राहायला आले. माझं गाणं, रेकॉर्डिग्जस, कार्यक्रम छान चाललं होते. थोडं फार नावही मिळालं होतं. अशात एके दिवशी दुपारी दारावरची बेल वाजली. दार उघडलं तर दारात प्रियंवदा! माझा डोळ्यांवर विश्वासच बसेना. घट्ट मिठी मारली मी तिला. खूप खराब दिसत होती ती. खोल गेलेले डोळे, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं, जुनाट साडी. एकदम गलबल्यासारखं झालं मला. आधी खायला , चहा दिला. जरा शांत झाल्यावर तिची विचारपूस केली. ती तिची कथा सांगू लागली. ‘‘दोन-तीन लग्न फसल्यावर मला नाही आता लग्न करावंसं वाटत. घरच्यांनीसुद्धा दरवाजे बंद केलेत. कशी तरी जगतेय मी.’’
‘‘अगं, मग एखादी नोकरी का नाही करत?’’ मी विचारलं, ती म्हणाली ‘‘अगं मॅट्रिकसुद्धा नाही मी, कोण देणार मला नोकरी? सात-आठ वेळा मॅट्रिकला बसले, शेवटच्या चार-पाच वेळा पेपरमध्ये चक्क लिहिलं की माझ्यावर दया करा, मला पास करा. पण परीक्षकांना काही माझी दया आली नाही! तुझ्याकडेसुद्धा भीतभीतच आले. म्हटलं, एवढं नाव कमावलंस तू, आता ओळख तरी देशील की नाही.’’ मी म्हटलं, ‘‘अगं वेडे, तुला कशी विसरेन मी. केवढे लाड केलेस तू माझे.’’ जाताना थोडे पैसे आणि माझ्या चांगल्या साडय़ा तिला दिल्या. मी इथे आलेली कोणाला सांगू नकोस हं, असं बजावत ती निघून गेली.
मग दादरमध्ये, कधी समुद्राकडे जाताना, कधी रस्त्यात लांबवर मला ती एखाद्या पुरुषाबरोबर दिसायची. पण लांबूनच नजर टाकून ती निघून जायची. साहजिकच होतं ते! अशीच काही र्वष गेली आणि थेट बातमी कळली ती तिच्या निधनाची! कुठल्याशा धर्मादाय हॉस्पिटलमध्ये किंवा वृद्धाश्रमामध्ये, कर्करोगानं गेली ती. बातमी ऐकली आणि मन सुन्न झालं. इतक्या चांगल्या घरातल्या प्रियंवदाची अशी वाताहत का व्हावी? सगळी गणितं चुकून, फासे उलटेच का पडत जावेत? लोक तिच्याबद्दल काहीही बोलोत, तिला कितीही नावं ठेवोत, मला मात्र ती प्रियच होती, प्रियंवदा! आता तू माझ्यापासून कित्येक योजने दूर गेली आहेस, पण माझ्या हृदयात मात्र तुला अगदी खास जागा आहे!
(प्रियंवदा हे नाव बदलले आहे)

Story img Loader