२९ सप्टेंबरची ‘वर्धापन दिन विशेष’ पुरवणी म्हणून खरोखरच विशेष भावली. कारण समग्र भारतीय स्त्रीवादी लेखिकांचे अंतरंग आणि त्यांनी लेखन केलेल्या साहित्यातील समकालीन समाजजीवनातील स्त्रियांचे आयुष्य व त्यांची सामाजिक मानसिक फरफट याचे दर्शन या पुरवणीतून प्रत्ययास आले.

महाराष्ट्रातील सिद्धहस्त लेखिका मीना वैशंपायन, प्रभा गणोरकर, विनया खडपेकर, राधा जोगळेकर, डॉ. अरुणा ढेरे, प्रतिभा रानडे, नीरजा, मीना गोखले, डॉ. वसुधा सहस्रबुद्धे, मीनाक्षी दादरावाला यांचे खरोखरच आभार मानावे तितके थोडे आहे. या सर्वानी समष्टीमधील स्त्रियांची वेदना ही कालातीत असून काळ कितीही बदलला आणि पुरोगामित्वाच्या, कितीही वल्गना केल्या तरी स्त्रीची वेदना ही एक आदिम सत्य असून एका समान धाग्यात गुंफली गेली आहे व तो धागा तिच्या शोषणाचा आहे हे अधोरेखित केले आहे. सदर पुरवणी संग्राह्य असून स्त्रीवादी लेखिकांच्या साहित्याचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना एक मौलिक ठेवा आहे असे नमूद करावे वाटते.

– प्रवीण रा. मोरे, नाशिक

संग्राह्य़ पुरवणी

वर्धापन दिन विशेष पुरवणीमध्ये ज्या १० बंडखोर स्त्रियांची ओळख वाचकांना दिली, त्यात डॉ. प्रतिभा राय या जास्त उजव्या वाटतात, कारण त्यांचे व्यक्तित्व संयत आहे. प्रतिभाताईंना स्त्री जन्माबद्दल घृणा नाही तर कमला दास काही प्रमाणात बेफाम होऊ पाहत मनस्वी जीवन जगू पाहतात. राय यांच्यावरील लेखाचे ‘मानवतावादी कार्य’ हे शीर्षक सार्थ आहे. त्याचप्रमाणे विभावरी शिरुरकर यांचे कार्य समाजसुधारण्याविषयक होते. मुख्य म्हणजे, प्रतिभाताईंचे कार्य पाहून सामान्य स्त्री वाचकाला अनुकरण करावेसे वाटेल. ‘याज्ञसेनी’, ‘महामोह’ इत्यादी डॉ. प्रतिभाताईंची मराठीतील अनुवादित पुस्तकांविषयी ती कुठे मिळतील

या विषयीची माहितीही लोकसत्ताने प्रसिद्ध करावी. एकंदरच संपूर्ण पुरवणी संग्राह्य़ ठेवावी अशीच आहे.

– श्रीकांत महाजन, मुंबई</strong>

मानसिकता बदलायला हवी!

‘गणेशभक्तीला कोंदण पर्यावरण जतनाचे’ हा १५ सप्टेंबरला प्रसिद्ध झालेला लेख वाचला. पर्यावरण जतनासाठी झटणाऱ्या सर्व संबंधितांचे कार्य कौतुकास्पद आहे. अवघ्या जगाला ज्या समस्येने ग्रासले आहे ती म्हणजे पर्यावरणाची दिवसेंदिवस होणारी हानी आणि प्रदूषण. पर्यावरणाच्या जतनासाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून गेल्या सलग तीन वर्षांपासून गणपती विसर्जनाच्या दिवशी निफाड तालुक्यातील सायखेडा गावातील ‘कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय’ आणि याच महाविद्यालयात शिक्षण घेतलेला आमचा २० मित्रांचा ‘दोस्ती ग्रुप’ महाविद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली ‘निर्माल्य दान उपक्रम’ राबवत आहे. खरं तर ग्रामीण स्तरावर आणि सायखेडा गावसारख्या ग्रामीण भागात असा उपक्रम सुरू करणारे हे महाविद्यालय आणि आमचा ग्रुप पहिलेच ठरले. तसेच मागील वर्षांपासून गणेश मूर्ती दान घेण्याचेही नव्याने कार्य हाती घेतले. आता सांगायचा उद्देश असा की हे उपक्रम राबवताना अनेक कटू-गोड अनुभव आले. या बाबतीत भाविकांची भावना आणि मानसिकताही बदलायलाच हवी. ग्रामीण स्तरावर याचा विचार होणे हे महत्त्वाचे आहे.

– आकाश सानप, नाशिक

Story img Loader