दोन्ही हात नसलेल्या लक्ष्मी या मुलीबद्दल ‘अपूर्णाक’ या सदरात ‘लक्ष्मीची सक्षम पावले’ हा ४ ऑगस्टला प्रसिद्ध झालेला लेख वाचला. खरे तर आभार तिच्या माता-पित्यांचे मानायला हवेत, की मुलीला दोन्ही हात नाहीत हे माहीत असतानाही कोणतीही भीती न बाळगता त्यांनी तिला वाढविले, आणि तिच्या जन्मत:च छाटल्या गेलेल्या पंखांना बळ दिले. आणि आज ती लक्ष्मी एवढी सक्षम आहे की परीक्षेला कोणत्याही राइटरची मदत न घेता आपल्या पायांच्या साहाय्याने पेपर लिहून उत्तीर्ण होते आणि तेही उत्तम गुणांनी. आणि तिचे स्वप्न पुढे प्रशासकीय सेवेत जाण्याचे आहे, हेदेखील विशेष. खरं तर ही मुलगी अशा तरुणवर्गासाठी प्रेरणादायी आहे ज्यांच्या मनात सतत एकच प्रश्न डोक्यात घोंगावत आहे, तो म्हणजे ‘स्पर्धा’ हा होय. जेव्हा जेव्हा तुमच्या-आमच्यासारखे तरुण/तरुणी स्पर्धेविषयी (निव्वळ न्यूनगंडाचा) विचार करतील तेव्हा तेव्हा लक्ष्मीसारख्या मुलीच्या परिस्थितीकडे नजर टाकायला हवी. लक्ष्मीसारख्या मुली आज आपल्याकडे काय नाही याचा विचार न करता काय आहे याचा विचार करून पुढे काय करता येईल हे बघतात आणि आपल्या अपंग अवयवांवर अगदी सक्षमपणे ताठ मानेने उभ्या राहतात. अशा मुलींचा अभिमान बाळगावा तितका थोडाच. – आकाश सानप, सायखेडा (नाशिक)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा