२६ मेच्या अंकातील डॉ. रोहिणी पटवर्धन यांचा लेख वाचता वाचता गेल्या ५०-६० वर्षांतील अनेक नाटक व चित्रपट डोळ्यासमोर येऊन गेले. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर ‘नटसम्राट’ सारखे नाटक किंवा ‘मोलकरीण’सारखा चित्रपट. तसेच आजकालच्या काळात वृद्धांचा छळ होतो हे आपल्या पाहण्यात वा ऐकण्यात येते. परंतु वृद्ध मंडळी यातून काही बोध घेत नाही ही फार खेदाची गोष्ट आहे. असे असले तरी लेखिकेच्या मताशी शंभर टक्के सहमत होता येत नाही कारण सर्वच वृद्धांना अशा छळाला सामोरे जावे लागते असे नाही. तसेच अनेक वृद्धांचा स्वभावदोष या परिस्थितीला कारणीभूत असू शकतो. या परिस्थितीवर उपाय काय तर भविष्याचा विचार करून आर्थिक नियोजन करणे! एक गोष्ट आपण गृहीतच धरली पाहिजे की निवृत्तीनंतर शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी राहायचे आहे व त्याकरता व्यायाम, योग्य आहार व आनंदी वृत्ती जोपासणे जरुरी आहे. योग्य वयात मेडिक्लेमसारखी पॉलिसी काढली आहे / चालू आहे याची काळजी घ्यायला हवी. अडचणीच्या काळात पुरेशी रक्कम हाताशी असली पाहिजे.  या सर्व सुचविलेल्या गोष्टींमुळे त्रास होणारच नाही, असे नाही परंतु मार्गदर्शक नक्कीच ठरतील. शेवटी काय तर आपला नटसम्राट होऊ  नये हीच इच्छा!

-नंदू दामले

 

डोळे उघडणारा लेख

संजय सावंत यांचा २६ मे रोजी प्रसिद्ध झालेला ‘न्यूड’ या विषयावरील लेख वाचला. फार अभ्यासपूर्ण व विषयाचा सर्व बाजूंनी मांडलेला विचार सर्वासाठी मार्गदर्शक विचार करायला लावणारा व डोळे उघडणारा आहे. चित्रकार व न्यूड मॉडेल्स यांच्या योगदानाचं मूल्य करणं कठीण आहे. त्यांची कले प्रती समर्पण भावना उच्च पराकोटीची असल्याने चित्रकला प्रवाही व जिवंत आहे. न्यूड चित्रकलेकरिता चित्रकाराचे मन किती परिपक्व असावं लागतं याचं छान उदाहरण लेखात दिले आहे. ‘लोकसत्ता’चंसुद्धा अभिनंदन. समाजाला श्लील-अश्लीलतेच्या पलीकडे नेण्याचं काम अशा लेखांमुळे निश्चित होईल आता सुरुवात झाली आहे.

– आनंद देशपांडे, तासगाव, जि. सांगली</strong>

Story img Loader