५ मे रोजी प्रसिद्ध झालेला ‘थेंब थेंब रक्तासाठी..’ या लेखात थॅलेसेमिया या आजाराबद्दल माहिती दिल्याबद्दल ‘लोकसत्ता-चतुरंग’चे मन:पूर्वक आभार. तसेच सुजाता चेतन रायकर करत असलेल्या जनजागृतीबद्दल त्यांचे अभिनंदन. मी स्वत: थॅलेसेमिया मायनर आहे. थॅलेसेमिया मायनर व्यक्ती जरी निरोगी असली तरी त्या व्यक्तीला हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे लहानसहान आजार असतात. उदाहरणार्थ पचनशक्ती कमी असणे, प्रतिकारक्षमता कमी असणे, सतत चिडचिड होणे. बऱ्याचदा स्वभावाचा भाग म्हणून अथवा प्रतिकारक्षमताच कमीच आहे असं म्हणून याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळेच थॅलेसेमिया मायनर असलेल्यांनी पण आपलं हिमोग्लोबिन ९-१० ग्रॅम्सच्या खाली जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. हा आजार आनुवंशिक असल्या कारणाने, लग्न करताना मुलाने आणि मुलीने आपल्याला थॅलेसेमिया आहे का हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. लग्न ठरवताना सगळ्या वैद्यकीय चाचण्या करणं आज महत्त्वाचं आहे. मुलीने आणि मुलाने स्वत:हून पुढाकार घेऊन या चाचण्या केल्या पाहिजेत. मुलाचे/मुलीचे आईवडील यांनीही त्यांना साथ दिली पाहिजे. आपला इगो, आमची बाजू मुलाकडची / मुलीकडची, समाज काय म्हणेन या गोष्टी मनातून काढून टाकून सगळ्यांनी यात सहभाग घेतला पाहिजे. आज विज्ञान पुढे गेलं आहे. आपल्याला काही गोष्टी नव्याने कळत आहेत, अशा वेळी आमच्या वेळी असं काही नव्हतं किंवा आतापर्यंत आपल्या घरात कोणालाच काही झालं नाही आहे, असं म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. आपल्यासाठी तसेच पुढच्या पिढीसाठी ही काळजी घेणं गरजेचं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा