– मंगला आठलेकर

अतिशय मनस्वी लेखिका अमृता प्रीतम, नुसत्याच व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी ती आग्रही नव्हती, की आपल्या लग्नबाह्य संबंधांचं समर्थन करणं एवढय़ापुरतंच तिचं स्त्रीस्वातंत्र्य मर्यादित नव्हतं. लग्न असो, प्रेम असो, मातृत्व असो, करिअर असो.. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीला व्यक्ती म्हणून जगण्याचा, निर्णय घेण्याचा अधिकार आहे, या विचाराशी प्रामाणिक राहत हाच स्त्रीस्वातंत्र्याचा विचार ‘रसीदी टिकट’मधून तिनं सर्वांपर्यंत उत्कटपणे पोहोचवला..

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
Nagpur Guardian Minister, Devendra Fadnavis,
नागपूरच्या पालकमंत्रीपदावरून तर्कवितर्क
द्रराजला पत्नी व दोन मुली आहेत. त्याची मोठी मुलगी प्राजक्ताच्या वयाची आहे. तरीही त्याने प्राजक्ताला लग्न करण्याचे आमिष दाखवले.
गवंड्याच्या प्रेमात पडली दहावीची विद्यार्थिनी, पळून जाऊन लग्न केले
keerthy suresh antony thattil wedding
नागा चैतन्य-सोभितानंतर आणखी एक अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंडबरोबर पोहोचली गोव्यात; पत्रिका पाहिलीत का?

अमृता प्रीतमचा जन्म ३१ ऑगस्ट १९१९ चा. जन्मतारखेचा उल्लेख अशासाठी, की तिच्या (लेखिका म्हणून त्या खूप मोठय़ा आहेत, मात्र तरीही तमाम स्त्रियांना जोडणाऱ्या आपलेपणामुळे त्यांना ‘ती’ म्हणावंसं वाटतं.) लेखनातला उदास अंत:स्वर समजून घ्यायचा असेल, तर तिचा जन्म भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी- म्हणजेच फाळणीपूर्वी झालेला आहे आणि फाळणीकाळात झालेले अत्याचार, रक्तपात, संपत्तीची लूट आणि स्वकीयांचे वियोग, या साऱ्या घटनांना ती साक्षी होती हे सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. या साऱ्या दु:खद भोवतालाची गडद छाया अमृता प्रीतमच्या लेखनावर आहे. सभोवताली दाटून आलेला हा भयाचा, दु:खाचा आणि नैराश्याचा अंध:कार तिच्या लेखनाला उदास रंगात लपेटून टाकतो आणि तरी या उदास रंगांच्या आडूनही तिच्या स्वतंत्र विचारांचं तेज ‘रसीदी टिकट’ या तिच्या आत्मचरित्रातून वाचकाच्या मनाला प्रभावित करत राहतं.

एकदा अमृता प्रीतमनं लेखक खुशवंत सिंग यांच्याकडे आत्मचरित्र लिहिण्याची मनीषा बोलून दाखवली, तेव्हा ते तिला म्हणाले होते, ‘‘तुझं आयुष्य ते काय! सांगण्यासारखं तुझ्या आयुष्यात आहे तरी काय? केवळ एखाद्-दुसरा प्रसंग. तुझं आयुष्य रेव्हेन्यू स्टँपच्या पाठीमागेही लिहून होईल.’’ तेव्हाच आत्मचरित्रासाठी अमृताच्या मनात ‘रसीदी टिकट’ हे शीर्षक पक्कं झालं. ‘रसीदी टिकट’ हे अमृता प्रीतमचं खूप गाजलेलं आत्मचरित्र! स्त्रीनं काय करावं आणि काय करू नये हे सूचित करणाऱ्या अनेक लक्ष्मणरेषा आजही तिच्याभोवती आखलेल्या असताना शंभर वर्षांपूर्वी जन्माला आलेली एक अमृता आत्मशक्तीच्या जोरावर या साऱ्या लक्ष्मणरेषा एकेक करत शांतपणे ओलांडत जाते. समाजमान्य नीतिनियमांना झुगारून देत स्वत:च्या इच्छांचा, भावनांचा आदर करणारे निर्णय घेते आणि विशेष म्हणजे अशा निर्णयांनंतर एकाकी न पडता, दडपशाही करणाऱ्या त्याच समाजाचा आदर, मानसन्मानही ती प्राप्त करते. एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून स्वत:च्या जगण्यातून तिनं दाखवलेला हा रस्ता अवघ्या स्त्रीजातीला आजही बळ देणारा आहे.

अमृता अकरा वर्षांची असतानाच तिच्या आईचा मृत्यू झाला, असा उल्लेख तिच्या आत्मचरित्रात येतो. समजायला लागलेल्या वयामध्ये प्रत्येक मुलीसाठी आई ही मैत्रीण असते. अनेक प्रश्न डोक्यात असतानाच्या या अवघड वयात अमृतासोबत तिची आई नाही. मित्रमैत्रिणी नाहीत, देवावर तिचा विश्वास नाही, वडिलांची भावनिक साथ नाही.. अशा वेळी फक्त तिच्या विचारशक्तीनंच तिला तारलेलं आहे, याची कित्येक उदाहरण ‘रसीदी टिकट’मध्ये पाहायला मिळतात. आयुष्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन अतिशय तर्कशुद्ध आहे. ती भावनाशील आहे, हळवी आहे; पण कृतीची अथवा भूमिका मांडण्याची वेळ आली, की ती किती तर्कशुद्धपणे आपला लढा लढत असे हे समजून घेण्यासाठी तिच्या बालवयातला केवळ एक प्रसंग पुरेसा आहे. लहान वयातच अमृतानं पहिलं बंड उभारलं, ते आजीच्या विरोधात. स्वयंपाकघरात आजीची अप्रतिहत सत्ता! स्वयंपाकघरातल्या कोपऱ्यात वेगळे ठेवलेले तीन पेले ती नेहमी बघायची. वडिलांचे कोणी मुसलमान मित्र आले, की त्यांना त्यातून चहा दिला द्यायचा आणि नंतर ते पेले धुऊन परत त्याच जागी ठेवले जायचे. अमृतानं या तीन पेल्यांव्यतिरिक्त अन्य कुठल्याही पेल्यातून चहा, दूध, पाणी काहीसुद्धा पिणार नाही, असा हट्ट धरला आणि तिला उपाशी ठेवणं आजीला शक्य नसल्यानं अमृताचं हे बंड यशस्वी झालं.

तिच्यातल्या स्वतंत्र विचारांची चुणूक दिसते ती या प्रसंगापासूनच! जातिभेद, धर्मभेद, लिंगभेद यापलीकडे माणसाचं जगणं आहे याची शिकवण तिला तिच्या बालवयात कुणीही दिली नाही; पण तीही आपल्यासारखी माणसंच असताना असे भेद का केले जातात, असे प्रश्न तिला लहान वयापासून पडत राहिले. पुढे मोठं होताना याच भेदांमुळे आपल्या अवतीभोवती घडणारा जो जीवनसंघर्ष तिला दिसत होता त्यानं तिच्या मानवतावादी विचारांची वीण अधिक पक्की होत गेली. अमृता प्रीतमनं फाळणीच्या दु:खकळा भोगलेल्या आहेत. तिच्या लेखनात त्याचे पडसाद उमटणं अपरिहार्य होतं. फाळणीचा मूळ आधारच होता धर्म! ज्याचा वृथा अभिमान तर तिला कधी मान्य नव्हताच, पण त्यावरून पाळली जाणारी शिवाशिवही तिला मान्य नव्हती. म्हणूनच तर भारताच्या फाळणीच्या वेळी भयानक परिणाम भोगूनही दोन्ही धर्माच्या लोकांचे जुलूम कुठल्याही भेदाभेदांशिवाय ती लिहू शकली आणि यामागे उभी होती ती ‘माणूस हा धर्माच्याही वर आहे’ ही तिची बालपणापासूनची धारणा! पुढच्या आयुष्यात साहिर ऊर्फ अब्दुलच्या प्रेमात आकंठ बुडून जाताना म्हणूनच धर्माची अडचण तिला वाटत नाही. तिचं धर्मातीत असणं हे उपजत होतं. त्यात कोणताही अभिनिवेश नव्हता, की ते मुद्दाम अंगी बाणवलेलं नव्हतं.

विशेषत: ती ज्या काळात जन्माला आली, त्या काळात स्त्रीला स्वत:चा आवाज नव्हता. मला स्वत:ला ‘माझं’ म्हणून काही हवं आहे, हा विचार स्त्रीच्या मनाला शिवलेलाही नव्हता. धर्मसंबंधात तर लोक अतिशय संवेदनशील होते. अशा वेळी धर्मासंबंधी नुसते प्रगत विचार मांडणाऱ्याच नव्हे, तर परधर्मीयाच्या प्रेमात पडणाऱ्या अमृतासाठी जगणं सोपं नव्हतंच. प्रथेप्रमाणे तिच्यावर काही गोष्टी लादल्या जाणारच होत्या. सोळाव्या वर्षीच तिचं लग्न झालं; पण कविमनाच्या अमृताच्या जगण्याबद्दलच्या कल्पना वेगळय़ा होत्या. हव्याशा वाटणाऱ्या सोबतीबरोबर सुंदर आयुष्य जगण्यासाठी लग्नाची आवश्यकता आहे हेच तिला मान्य नव्हतं. म्हणूनच दोन मुलं झाली असतानाही प्रीतम सिंगबरोबर तिनं घटस्फोट घेतला. एकीकडे साहिर लुधियानवीच्या प्रतिभेच्या प्रेमात वेडी झालेली असतानाही इमरोजबरोबर ती लग्नाशिवाय राहिली. सज्जादचं आणि तिचं नातं तर तिला स्वत:लाही शब्दात बांधता येत नव्हतं.

तिच्या ‘सुनहडे’ या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, तेव्हा पुरस्काराविषयी तिची प्रतिक्रिया जाणून घ्यायला पत्रकार आले. त्यांना तिचा कविता लिहिताना फोटो हवा होता. तिनं सर्व पत्रकारांसमोर कागद समोर ओढला आणि कविता लिहिण्याऐवजी ज्याच्याकरिता ‘सुनहडे’ लिहिलं होतं, त्याचं नाव ती स्वत:च्याही नकळत लिहीत राहिली.. इमरोजबरोबर जवळपास चाळीस वर्ष ती लग्नाशिवाय राहिली. ज्या काळात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हे शब्दसुद्धा लोकांच्या कानावर पडले नव्हते, त्या काळात सर्व सामाजिक बंधनांना झुगारून अमृता प्रीतम इमरोजबरोबर लग्नाशिवाय राहिली. तिच्या दिल्ली येथील हौजखासच्या घरात २००५ मध्ये तिचा मृत्यू होईपर्यंत दोघं एकत्र राहत होती. माझं शरीर आणि माझं मन हे माझं आहे, त्यावर फक्त माझा अधिकार आहे आणि माझ्या मर्जीनुसारच मी जगेन, हा तिचा पिंड होता. आपल्या समाजाला यादरम्यान स्त्रीवादाची नुकती कुठे ओळख होत होती. माझी काही स्वतंत्र ओळख असू शकते, याचं भान स्त्रीला आलेलं नव्हतं. अशा काळात ताठ मानेनं आपल्या अटीत जगणं आणि हे जगणं समाजासमोर ठेवणं हे सोपं नव्हतं. आजही हे धाडस फार कमी स्त्रियांना दाखवता येईल. तिच्या जगण्याच्या कल्पना सामाजिक चौकटीला छेद देणाऱ्या होत्या. स्त्रीनं लग्नानंतर एकाच पुरुषाशी आपलं आयुष्य बांधून घ्यायला नकार देणं, आयुष्यात एकाहून अधिक पुरुषांबद्दल तिच्या मनात प्रेमभावना निर्माण होणं, हे जर समाजाच्या लेखी गुन्हे असतील तर ते गुन्हे तिनं केले आणि नि:संकोचपणे जाहीरही केले. तिच्या जगण्यात आणि लेखनात तिच्या आग्रही विचारांचं प्रतिबिंब स्वच्छ दिसत राहिलं.

कल्पना करा, पुरुषांनी केलेले कायदे लागू असलेल्या आणि पुरुषांच्या मालकीच्या या जगात साठ-सत्तर वर्षांपूर्वी एक स्त्री, तीही घटस्फोटित स्त्री लग्न न करता एका पुरुषाबरोबर दीर्घकाळ राहते, त्याच्याबरोबर राहत असताना दुसऱ्याच पुरुषाच्या प्रेमात मनानं एकरूप होऊन जाते, पत्रकारांसमोर उघडपणे याची कबुली देते, मुलाखतीतून आपल्या मुलाचा चेहरा साहिरसारखा का आहे, याचं प्रांजल स्पष्टीकरण देते. नीती-अनीतीच्या समाजमान्य चौकटीत आपलं आयुष्य अडकवण्याला साफ नकार देते, मनाच्या हाका ऐकत त्याच्याशी प्रामाणिक राहते आणि हे सारं करते ते कोणत्याच विषयावरची आपली मतं आक्रस्ताळेपणानं वा अटीतटीनं न मांडता! याचा त्रास तर तिला झाला असेलच, काही गमवावंही लागलं असेल. म्हणूनच दु:खान्ताचा अर्थही टोकदारपणे स्पष्ट करताना ती म्हणते, ‘आयुष्याच्या प्रवासात सामाजिक बंधनांनी तुमच्या मार्गात काटे पसरावेत आणि तुमच्या पायातून सदैव भळभळ रक्त वाहत राहावं, हा दु:खान्त नसतो.. तुम्ही रक्तबंबाळ पायांनी एका अशा जागी शेवटी येऊन थबकलेले असता, जिथून पुढे चालण्यासाठी कुठलाच रस्ता तुम्हाला आमंत्रण देत नसतो. हा दु:खान्त असतो.. तुम्ही आयुष्यभर आपल्या प्रेमाच्या काकडणाऱ्या शरीराकरिता वस्त्रं विणत राहावी, हा दु:खान्त नसतो. या वस्त्रांना शिवण्याकरिता आवश्यक असलेला विचारांचा धागाच कच्चा निघावा आणि तुमच्या लेखणीरूपी सुईचं नेढं तुटून जावं, हा दु:खान्त असतो..’

‘रसीदी टिकट’मध्ये फक्त तिच्या व्यक्तिगत आयुष्याचीच कथा येत नाही. तिचं लेखन, त्या लेखनावर नापसंतीचं शिक्कामोर्तब करणारे तिचे समकालीन, ज्यांचा तिच्याशी दुरान्वयानंही संबंध नव्हता, अशा काही समकालीन लेखकांनी सहज जाता जाताही तिला दिलेलं दु:ख, त्यांच्या सोबतीला असलेली पंजाबी वर्तमानपत्रं आणि या साऱ्याबरोबर जागतिक प्रश्नांविषयीचं तिचं प्रगल्भ चिंतनही येतं. अमृताला तिच्या समकालीन लेखकांनी नाकारलं. पण हीच अमृता ताश्कंद, हंगेरी, जॉर्जिया, रुमानिया, तेहरान, युगोस्लाव्हिया, झेकोस्लोव्हाकिया, मॉस्को, लंडन, इटली, इजिप्त, बल्गेरिया, फ्रान्स अशा देशविदेशातल्या कवयित्रींबरोबर कवितावाचनाच्या कार्यक्रमात सर्वत्र सामील झाली. तिथं केवढं तरी कौतुक तिच्या वाटय़ाला आलं. पंजाबमधल्या तिच्या समकालीन साहित्यिकांनी तिच्यावर सातत्यानं केलेल्या टीकेला ‘रसीदी टिकट’च्या ‘धर्मयुद्ध’ या भागात अमृतानं उत्तर दिलं आहे. ती म्हणते, ‘हे जे काही मी माझ्या मनातलं कागदावर लिहितेय, ते केवळ त्यांच्याकरिता आहे, जे जगाच्या परंपरांना, अडचणींना आणि औदासीन्याला दरवाजाबाहेर ठेवून मनाच्या सत्याबरोबर जगण्याचं धाडस करतात..’

जगाच्या परंपरांना, अडचणींना दरवाजाबाहेर ठेवणं हा तिच्या वृत्तीचा सर्वात महत्त्वाचा विशेष! जगानं स्त्रीसाठी घालून दिलेल्या अन्यायकारक मूल्यव्यवस्थेला अमृतानं दरवाजाबाहेरची जागा दाखवली. मूल्यांची आणि मूल्यांसाठी दिलेली लढाई कठीणच असते. माणसाच्या अस्तित्वालाच ती आव्हान देते. स्वत:च्या आयुष्याइतकी दीर्घ लढाई अमृता तिच्या समकालीनांशी लढली. तिच्या मित्रमंडळींनी म्हणूनच तिचं आत्मचरित्र तिनं पंजाबीत प्रसिद्ध न करता अन्य कुठल्याही भाषेत प्रसिद्ध करावं असं सुचवलं; पण ‘माझ्या भाषेतल्या सुबुद्ध वाचकांना हे आवडणार नाही. मी कुठल्याही किमतीवर आपल्या भाषेला आणि आपल्या वाचकांना क्षुद्र ठरवू इच्छित नाही. म्हणून मूल्य चुकवायला मी तयार आहे,’ असं उत्तर तिनं दिलं.

‘रसीदी टिकट’मध्ये तिच्या स्वत:च्या बरोबरीनं धर्म, समाज, परंपरांनी दिलेली दु:खं, सत्तेसाठी चालणाऱ्या लढाया, माणसा-माणसांतला द्वेष, परस्पर वैमनस्य, यात जखमी झालेला जगभरातला माणूस आणि त्यातून घडणाऱ्या हिंसेनं घायाळ होणारं तिचं मन  पानापानांवर भेटत राहतं. या पुस्तकात ‘प्रवासाची डायरी’ म्हणून एक प्रकरण आहे. सत्तेच्या अभिलाषेतून जर्मनी, रशिया, व्हिएतनाम, इटली, बेलग्रेड, सायबेरिया, रुमानिया अशा अनेक ठिकाणी झालेले रक्तपात, हिंसा आणि लयाला गेलेली माणुसकी, याकडे तिचं संवेदनाशील मन ज्या पद्धतीनं पाहतं ती वाचकांसाठी एक खिन्न करणारी, वेदनामय अनुभूती आहे. हुकूमशाहीत सर्वात पहिला बळी जातो तो विचारवंताचा, लेखकाचा! ‘अनेक अक्षरं इथं नेहमीकरिता हरवून गेली आहेत. हे हरवणं बहुदा पहिल्यांदा तेव्हा घडलं, जेव्हा ‘डिव्हाइन कॉमेडी’चा डान्टे देशाबाहेर हाकलला गेला. त्याच्याबरोबर ही अक्षरंही हद्दपार झाली.’ अमृताचे हे उद्गार दडपशाहीमुळे कलावंतांच्या झालेल्या मुस्कटदाबीनं तिचं मन कसं विलक्षण व्यथित राहिलं हेच स्पष्ट करतात.

मानवतावाद तिच्या नसानसांत भरून राहिला होता. ती नुसतीच व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी आग्रही नव्हती. आपल्या लग्नबाह्य संबंधांचं समर्थन करणं एवढय़ापुरतंच तिचं स्त्रीस्वातंत्र्य मर्यादित नव्हतं. लग्न असो, प्रेम असो, मातृत्व असो, करिअर असो.. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीला व्यक्ती म्हणून जगण्याचा, निर्णय घेण्याचा अधिकार आहे, या विचाराशी प्रामाणिक राहत हाच स्त्रीस्वातंत्र्याचा विचार ‘रसीदी टिकट’मधून तिनं समाजापर्यंत पोहोचवला. आयुष्याची संध्याकाळ जवळ येते तेव्हा साऱ्यांना सोडून जायचं या विचारानं माणसं कासावीस होतात; पण इथंही अमृताचं वेगळेपण जाणवतंच. ती म्हणते, ‘आता जेव्हा केव्हा सर्वाना सोडून जायचं असेल, तेव्हा मी सहज मनानं जाऊ शकेन. मात्र माझ्या जगण्याशी ज्यांचा काहीही संबंध नव्हता, त्यांचा माझ्या मरणाशीही कसला संबंध येऊ नये, असं मला वाटतं. अशा वेळी ज्यांनी आयुष्यात कधी एका क्षणाचीही सोबत केलेली नसते, ती माणसं अवतीभवती येऊन उभी राहतात. या गर्दीशी माझ्या आयुष्याचा कसलाही संबंध नव्हता. त्या लोकांनी शोकसभेत येऊन काहीही खरंखोटं बोलण्याचे कष्ट घेऊ नयेत. रीतिरिवाजांशी माझं तसंही देणंघेणं नाही.’

जीवनानुभूतीचा एक प्रामणिक उद्गार असलेलं अमृता प्रीतमचं हे ‘रसीदी टिकट’ प्रत्येकासाठी वाचनीय आणि म्हणूनच संग्राह्य ठरेल यात शंका नाही.

mangalaathlekar@gmail.Com

Story img Loader