मीना वैशंपायन

लेखिकांच्या सीमित अनुभवविश्वाविषयी नेहमी एक हेटाळणीचा सूर लावला जातो. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी जन्मलेल्या माजरेरी किनन रॉलिंग्ज या अमेरिकी लेखिकेनं मात्र बाप-मुलाच्या लोभस नात्यासह फ्लोरिडाच्या जंगलांमधलं कधी मोहक, कधी रौद्र वाटणारं निसर्गविश्वही वाचकांसमोर ठेवलं. अगदी शिकारीच्या थरारक वर्णनांसकट! एका पोराचं पोरपण संपून त्याला जगाच्या कोरडय़ा सत्याची ओळख होण्याचा ‘द यर्लिग’ या कादंबरीत येणारा प्रवास अतिशय प्रत्ययकारी आणि म्हणूनच वाचायलाच हवा असा.  

Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा
Hyena herd tried to attack the lion
‘संकटात सगळ्यांचे नशीब साथ देत नाही…’ तरसाच्या कळपाने केला सिंहावर हल्ला करण्याचा प्रयत्न… पुढे जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप
lion viral video
‘त्याने मृत्यू जवळून पाहिला…’ पिंजऱ्यात गेलेल्या तरुणावर सिंहाने केला हल्ला; VIDEO पाहून फुटेल घाम

‘जंगल तोडून मोकळय़ा केलेल्या वाडीत ज्योडीचं घर होतं. समोर मक्याच्या कोवळय़ा रोपटय़ांच्या ओळीच्या ओळी पसरल्या होत्या. अगदी पुढच्या फाटकाजवळ चायनाबेरीचं झाड होतं. त्याच्याकडे मधमाश्यांची जा-ये चालली होती. निळसर लाल फुलांच्या नाजूक झुपक्यांमध्ये त्या अशा काही अधाशीपणे घुसत होत्या, जणू साऱ्या जंगलात दुसरीकडे कुठे फुलंच फुलली नव्हती. मार्चमध्ये फुलून गेलेल्या पिवळय़ा जाईकडे जणू त्यांचं लक्षच गेलं नव्हतं आणि पुढे मे महिन्यात बे आणि मॅग्नोलिया यांना बहर येणार आहे हे जणू त्यांच्या गावीच नव्हतं. ज्योडीला वाटलं, घाईघाईनं चाललेल्या या काळय़ा नि सोनपिवळय़ा मधमाश्यांच्या रांगेमागून जावं आणि केशरी मधानं ओथंबलेलं त्यांचं पोळं कुठे आहे ते बघावं..’

अशा चित्रमय वर्णनाने मन प्रसन्न करून टाकणारा हा उतारा आहे. The Yearling या कादंबरीतला. अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याच्या अफाट जंगलात घडलेली ही कथा. तिचा काळ साधारण एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकांमधला. माजरेरी किनन रॉलिंग्ज (१८९६-१९५३) या प्रसिद्ध अमेरिकी लेखिकेची ही ‘पुलित्झर’ पुरस्कारप्राप्त कादंबरी. सुमारे ८५ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या या कादंबरीनं अमेरिकी साहित्यातच नव्हे, तर जागतिक कादंबरी वाङ्मयातही महत्त्वाचं स्थान मिळवलं आहे. (प्रा. राम पटवर्धन यांनी या कादंबरीचा ‘पाडस’ या नावानं अतिशय सरस मराठी अनुवाद केला आहे.) 

लहानपणापासून लेखनाची आवड असणारी माजरेरी, लग्न झाल्यावर फ्लॉरिडाला गेली. तेव्हा ती पत्रकार, लेखिका म्हणून धडपडतच होती. १९२८ मध्ये पतीबरोबर क्रॉसक्रीक, फ्लोरिडा येथे आल्यावर तिथल्या निसर्गसौंदर्यानं ती स्तिमितच झाली. तिथल्या वातावरणाशी, लोकांशी समरस झाली. तिचं पुढचं सारं लेखन निसर्गप्रेम, कृषीजीवन यावर आधारलेलं आहे. आपल्या साहित्यातून तिनं अमेरिकेतला तो सारा भाग अजरामर केला आहे. मुलांसाठी लिहावं असा सल्ला माजरेरीला दिला गेला, पण तिला मुलांची गोष्ट लिहायची होती. त्याचाच आविष्कार ‘द यर्लिग’ या कादंबरीच्या रूपानं आपल्यासमोर आला. 

ऋतुचक्राच्या केवळ एका फेऱ्याच्या काळात घडलेल्या घटनांमधून या कादंबरीचं कथानक उलगडतं. एरवी एक वर्ष म्हणजे कितीसा काळ? पण त्या एका वर्षांतही वादळी घटना घडत जातात. त्या एका वर्षांत पेनी आणि ज्योडी यांचं बापलेकाचं नातं, कौटुंबिक परिस्थिती, ऋतूंनुसार जंगलाचा बदलता नूर, या साऱ्या बाबी कसकशी वळणं घेत जातात, हे सांगतानाच माजरेरी रॉलिंग्जनं केवढा तरी मोठा कालातीत आशय कवेत घेतला आहे. 

घनदाट अशा जंगलातला काही भाग साफसूफ करून तिथे आपली छोटी वाडी तयार करत, जमेल तशी थोडीशी शेती करत राहाणारी काही कुटुंबं. बॅक्स्टर कुटुंब हे त्यापैकीच एक. बॅक्स्टर पतीपत्नी- एझरा ऊर्फ पेनी आणि ओरा बॅक्स्टर आणि त्यांचा बारा वर्षांचा मुलगा ज्योडी. ही गोष्ट मुख्यत: ज्योडीची आणि त्या कुटुंबाची आहे. तारुण्याच्या सीमेवर उभा असलेला ज्योडी वयात येतो आहे. तो स्वप्नाळू आहे आणि एकटाही आहे. त्याला केवळ दोनच मित्र आहेत- काही मैल अंतरावरच्या वाडीत राहाणारा अपंग मुलगा फॉडरिवग आणि वडील पेनी- अर्थात ‘पा’. घरी आणि जंगलात पाबरोबर वावरताना पा कितीही मोकळेपणे वागला तरी ज्योडीला सारखं वाटे की, त्या जंगलात, घरात आपला कोणीतरी सोबती असावा. आपण एखाद्या प्राण्याचं पिल्लू पाळावं अशी त्याला तीव्र ओढ वाटू लागली. त्यासाठी तो आईची मनधरणी करत होता. ‘मला कोणीतरी हवंच. जो माझ्या मागून फिरेल, माझा एकटय़ाचा होईल.. कोणीतरी अवलंबून राहावं असं..’

‘द यर्लिग’ ही त्याच्या मोठं होण्याची आणि त्याचवेळी त्याला नकळत आलेलं जीवन व्यवहाराचं, जगण्याच्या रीतीचं भान दाखवून देणारी गोष्ट आहे. आपल्या प्रत्येकाचीच वाटावी इतकी ती आपल्याशी जोडणारी आहे. पेनीनं नदीकाठचं घर, गाव सोडून जंगलात राहाण्याचा निर्णय घेतला. तिथली जागा विकत घेऊन आपली वाडी उभारली. गावापेक्षा जंगलात राहून पोट भरणं हे अतिकष्टाचंच होतं, पण पेनीला ते परवडे. कारण तिथे त्याला स्वतंत्रपणे, मोकळं राहता येई. गावातल्या सामान्य लोकांचे आपापसातील क्षुद्र हेवेदावे, परस्पर स्पर्धा, या साऱ्याचा त्याला वीट येई.

जवळपास कोणत्याही आधुनिक सोयीसुविधा नसताना त्यांचं असं जंगलातलं राहाणं म्हणजे सतत हिंस्र श्वापदांशी गाठ. तसा कोणताही शेजार वगैरे नाहीच. निसर्गाचे लहरी आविष्कार, चांगल्या पाण्याची वानवा, या नित्याच्या बाबी. निसर्गावर मन:पूर्वक प्रेम असल्याशिवाय आणि कष्टांची तयारी, उत्तम तब्येत असल्याशिवाय यातून निभाव लागणं कठीण.

पेनीनं वयाच्या तिशीत लग्न केलं. तेही आपल्यापेक्षा आडमाप आकाराच्या बाईशी. ५-६ मुलं झाली, पण ती इतकी दुबळी, अशक्त की, ती तगच धरू शकली नाहीत. मध्ये ७-८ वर्ष गेल्यावर झाला तो ज्योडी. तो मात्र सशक्त, काटक निघाला. एकापाठोपाठ एक मुलं गेल्यानं कोरडं, काहीसं अलिप्त मन झालेली ओरा आपल्या या शेंडेफळाबाबतीतही काहीशी तटस्थच असे. त्याबद्दल कधीतरी पेनी तिला टोकत असे. पण फारसं न बोलणाऱ्या तिनं एकदाच स्वच्छपणे सांगितलं, ‘मनातलं एवढं दु:ख पचवायला कठोर होण्याशिवाय माझ्यापुढे दुसरा मार्ग तरी काय?’ पेनीचा मात्र आपल्या पोरावर खूप जीव होता. शिवाय त्यात केवळ बापाच्या मायेपेक्षा अधिक काहीतरी होतं. पक्षी आणि प्राणी, फुलं आणि झाडं, वारा आणि पाऊस, सूर्य आणि चंद्र- सृष्टीतल्या या चमत्कारांविषयी पेनीला नेहमीच वाटत आलेलं कुतूहल आणि कौतुक या छोटय़ा मुलाच्या डोळय़ांत उमटलेलं त्याला दिसत होतं. त्यामुळेच ज्योडी आपली ठरावीक कामं चुकवून, आपल्या पोरपणातल्या उद्योगांसाठी इकडं-तिकडं भटकत गेला तरी पेनी त्याला रागावत नसे. कारण भटकंती करण्यासाठी पोराला असं खेचून नेणारी शक्ती किती प्रबळ असते याची जाण त्याला होती. तसंच ते पोरपणाचं कुतूहल फार काळ टिकणारं नसतं, हेही त्याला माहीत होतं. अशा वेळी आईच्या रागापासून पोराला वाचवण्यासाठी तो सहजपणे काहीतरी थाप मारत असे. ज्योडीला तो सांगे, ‘तिला तुझं हे वागणं म्हणजे उनाडपणा वाटतो. बाईमाणूस म्हटलं की हे असंच! पुरुषांना भटकायला का आवडतं हे त्यांना जन्मात कळायचं नाही. म्हणूनच तू शेतात नाहीस किंवा मधाचं पोळं शोधायलाही गेलेला नाहीस असं काही मी तिला सांगितलं नाही. असेल इथेच कुठेतरी, असंच सांगितलं!’

एप्रिलच्या त्या दिवशी ती दुसऱ्या प्रहराची सुखद वेळ ज्योडीच्या तनामनात घुसू लागल्यानं तो पुळणीच्या रस्त्यानं धावत सुटला होता आणि मॅग्नोलिया, बे, डिंक, यांच्या राईतून घळीत, झऱ्याकाठी पोहोचल्यावरच थांबला होता. पाण्यात मनसोक्त खेळत, पाणचक्की बनवत होता, गवतानं भरलेल्या रेताडावर लोळला होता. हे सारं ‘पा’ला कसं कळलं याचं मनोमन आश्चर्य वाटत असतानाच पा रागावला नाही, उलट आपल्या निळय़ा डोळय़ांची मिस्कीलपणे उघडझाप करत त्यानं आपल्याला आईच्या रागापासून वाचवलं, याबद्दल ज्योडी बापाशी कृतज्ञ होता. त्या दोघांमध्ये अशा गोष्टी चालत आणि ‘या आपल्या पुरुषा-पुरुषांच्या गोष्टी आहेत’, असं म्हणून पेनी त्याला आपल्यात सामावून घेत, ओराला बाजूला ठेवे. शिकारीला जाताना पेनी त्याला शिकारीबाबतच्या अनेक क्लृप्त्या सांगे. कोणतं जनावर कुठे सापडेल, त्याचा माग कसा काढायचा, कोणती काळजी घ्यायची, जनावरांच्या पावलांवरून ते जनावर नर आहे की मादी, जंगलातल्या झाडांच्या बहराचं चक्र, अशा सगळय़ा गोष्टी पेनी त्याला सांगे. हेही एक प्रकारचं शिक्षणच होतं. त्यामुळे त्या दोघांमधला बंध अधिकाधिक घट्ट होत जाई.

माजरेरीची ही सारी कादंबरी म्हणजे एका संथ वाहात जाणाऱ्या, नितळ पाण्यानं भरलेल्या नदीसारखी आहे. वाचकाला ती आपल्या आजूबाजूचं विलक्षण, जादूई निसर्गसौंदर्य तर दाखवतेच, पण त्या वर्णनांमध्ये कुठेही अलंकारिकता, कोणत्याही प्रकारची दाखवेगिरी नसते. इतकी विविध प्रकारची झाडं, फुलं, त्यांचे हंगाम, नाना जातींचे प्राणी, त्यांची वैशिष्टय़ं, स्वभावातल्या लकबी, यांसारखे तपशील आपल्याला संपन्न करतात, ते सारं सौंदर्य अगदी चवीचवीनं आस्वादावं, इतक्या सहजपणे येत राहातं. यातली कित्येक फुलं, झाडं, प्राणी, यांची नावंदेखील  शहरीजनांना अपरिचित वाटतील. 

ही सारी मजा लुटताना कोणीतरी सोबती हवा, ही ज्योडीची ओढ दिवसेंदिवस वाढत गेलेली असतानाच एक दिवस असा उगवतो की, ज्योडीचं विश्व बदलतं. अस्वलांची शिकार करण्यासाठी पेनी ज्योडीसह जातो आणि अचानकपणे एक मोठा साप पेनीला दंश करतो. पेनी वेदनांनी विव्हळत असतानाही, त्या सापावर नेम धरून त्याला मारतो. तसाच फरफटत घराकडे निघाला तरी या विषामुळे आपण वाचणार  नाही हे त्याला कळतं. तेवढय़ात झाडीत खुसफुस होते. तिथे एक हरिणी असते. तिला मारून तिचं यकृत खात्रीनं आपलं विष उतरवेल या विश्वासानं त्या अवस्थेतही पेनी तिच्यावर गोळी झाडतो. दंशावर उपाय होऊनही पेनी अत्यवस्थ होतो. शेवटी कसाबसा घरी आणून डॉक्टरांचे काही उपचार होतात आणि तो वाचतो.

या प्रकरणामुळे ज्योडीला पा नसेल तर काय काय होऊ शकतं याची जाणीव होऊन एकदम भीती दाटून येते आणि रात्री त्याच्याजवळ बसून जागरण करताना फार जबाबदारी, हळवेपण वाटू लागतं. त्या वेळी पाच्या खाटेजवळ बसल्यावर आपल्याला खूप सुरक्षित वाटतंय, तो नसताना ज्या गोष्टी अतिभयंकर वाटतात, त्या गोष्टी तो जवळ असला की तशा वाटत नाहीत, हे त्याला उमगतं. हळूहळू आलेली मोठेपणाची जबाबदारी आणि बापाचा आधार यांची तीव्र जाणीव त्याला होते.

ज्या हरिणीला मारलं, तिचं पाडस ज्योडीनं तेव्हाच पाहिलेले असतं आणि तो पाडसाची स्वत:शी तुलना करत तो अस्वस्थ होतो. आता त्या निराधार पाडसाचे आपण अपराधी आहोत, त्याला आपल्याशिवाय कोण? असा विचार तो वडिलांजवळ बोलून दाखवतो. त्याला घरी आणण्याचं धाडस तो पाच्या संमतीनं, आईला मनवून करतो.

पाडस घरी आणल्यावर त्याच्या आनंदाला ना सुमार, ना त्याच्या बरोबरच्या खेळाला काळवेळ! त्याचे लाड करण्यात, आपल्या वाटणीचं दूधही त्याला देण्यात ज्योडी रंगतो. दिवस जातच असतात. त्या वर्षी तिथल्या सगळय़ा भागाला भयानक वादळाचा जबरदस्त तडाखा बसतो. बॅक्स्टरांचं मक्याचं पीक आडवं होतं, रताळी कुजतात, खाण्याचीच ददात पडू लागते. पाऊस तोंड बाहेर काढू देत नाही. जनावरांना चारापाणी नाही. सगळय़ांची दैना होते. दरम्यान, ज्योडीचा हा सोबती- फ्लॅग आता मोठा होत असतो आणि त्याच्या खोडय़ा वाढतात तशीच त्याची भूकही वाढते. फ्लॅगवरून रोज आई रागावते, पण ज्योडी त्याला  सांभाळत राहातो. त्याच्यासाठी वेगळी छपरी बांधतो, पण तो घरात घुसून वस्तूंची नासधूस करू लागल्यावर आई खूपच रागावून त्याला देऊन टाक, सोडून ये, असा धोशा ज्योडीमागे लावते. त्याला आईचा राग समजतो. ‘पा’लाही समजतोच, पण त्याच्या तोंडून ते फारसं व्यक्त होत नाही. त्या पाडसाचा आता झालेला पाडा बेकाबू होऊन एक दिवस घरातल्या टेबलावरच्या अन्नाची नासाडी करतो आणि मग मात्र घरात भांडण होतं. आपल्या सगळय़ांना उपाशी राहावं लागेल असं आई सारखी सांगत राहाते. ज्योडीही आता काहीसा हट्टी होत त्याला पाठीशी घालायचा प्रयत्न करत राहतो. शेवटी आई रागानं घरातली बंदूक घेऊन फ्लॅगवर गोळी झाडते. नेम चुकतो, पण तो चांगलाच जखमी होतो. शेवटी त्याच्या यातना न बघवल्यानं ज्योडीलाच या सोबत्याची त्या यातनांमधून सुटका करावी लागते.

आपल्या सोबत्याचा करावा लागलेला हा विश्वासघात सहन न होऊन ज्योडी रागानं घर सोडून जातो. पण त्याला वाटतं तेवढं घरापासून दूर जाणं सोपं नसतं. चार दिवस त्याचे अतोनात हाल होतात. भुकेसाठी कुत्र्यांबरोबर मारामारी करत त्यांच्याकडचा घास हिसकावून घेण्याएवढी त्याची तयारी होते आणि व्याकुळ करणारी भूक म्हणजे काय, याची खरी जाणीव त्याला होते. तोवर भुकेची जाणीव ही सुखद होती! भुकेमुळे निश्चेष्ट होऊन पडलेल्या ज्योडीला कुणीतरी नदीतून काठावर आणतं आणि तो कसाबसा घरी येतो. येताना त्याला आठवतं की, आताही पुन्हा एप्रिलचेच दिवस आहेत. पुन्हा सगळीकडे वसंताचं राज्य आलंय. आपल्याजवळचं काहीतरी मौलिक हरवलंय, ते आपल्याला सापडेल का? अशक्तपणानं लटपटत चालताना तो मनाशी ठरवतो, माझी पाणचक्की आता गेल्यासारखी वाटतेय, पण मी ती नक्कीच नव्यानं करीन.. आपलं बालपण आणि पाडस दूर कुठेतरी हरवलं याची जाणीव मात्र होतच असते. ज्योडी घरी येतो, तेव्हा पेनी आडवाच झालेला असतो. ज्योडीला पाहून तो म्हणतो, ‘पोरा, माणसांच्या दुनियेत काय चालतं ते तू पाहिलं आहेस. भूक आणि उपासमार म्हणजे काय ते तुला कळलंय. जीवन सुंदर आणि सोपं असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. जीवन सुंदर आहे पोरा.. फार सुंदर आहे, पण ते सोपं मात्र नाही. जीवन एका फटक्यात आपल्याला जमीनदोस्त करतं. निदान तुझं आयुष्य अडचणीचं असू नये अशी माझी धडपड होती. तशी ती प्रत्येक बापाची असते आणि त्याला जमेल तेवढा तो त्याला त्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न करतो हे लक्षात ठेव.’

ज्योडी मोठा होत जातो, तसं त्याचं निसर्गाशी बदलणारं नातं बदलतं हे फार लोभसपणे चित्रित झालं आहे. आरंभी त्याला तिथली दृश्यं कधी रोमांचक, थरारक वाटतात. नंतर अस्वलानं मारलेले प्राणी पाहिल्यावर त्याच दृश्यांची त्याला भीती वाटू लागते. शिकारीच्या वेळी मनात सावधपणा येतो. शेवटी मात्र वेळ आली तर या सगळय़ाशी लढायची त्याची मानसिक तयारी होते. आणखी एक नोंदवावंसं वाटतं-बऱ्याचदा लेखिकांच्या सीमित अनुभवविश्वाबद्दल बोललं जातं. पण या कादंबरीत लेखिकेनं केलेली शिकारीची वा जंगलातली भयानकतेचीही वर्णनं फार वेगळी आहेत. ती प्रत्यक्ष अनुभव घेतल्यासारखा प्रत्यय देतात.

मानवी संस्कृतीतला बदल, हरवलेलं निरागसपण, निसर्ग आणि प्राणिसृष्टी यांचं परस्परावलंबित्व, हे सारं हळुवारपणे चित्रित करत जाणारी, त्याचबरोबर त्या जगातले ‘बळी तो कान पिळी’ यांसारखे अलिखित कायदेकानू, तिथलं वास्तव, या साऱ्यांची जाणीव कलात्मकरीत्या करून देणारी ही कादंबरी आजही आपल्याला मोहवते आणि त्यातल्या व्यक्तिरेखांचं हृद्य नातं मनात ठसतं.

meenaulhas@gmail.com