मीना वैशंपायन

आपल्या सहजसुंदर लेखनाच्या जोरावर जगप्रसिद्ध झालेल्या कृष्णवर्णीय लेखिका माया अँजेलो यांनी आपलं जीवन-चिंतन आत्मचरित्राच्या सात खंडांमधून मांडलं. त्यातला ‘I know why the caged bird sings’ हा पहिला खंड तर प्रत्येकानं वाचायलाच हवा असा. भीती, टोकाचं दु:ख, अपमान, प्रतिकूल परिस्थिती एकीकडे आणि ‘आपण याला पुरून उरू,’ हा आत्मविश्वास एकीकडे, अशा जगण्याचा पट अतिशय साध्या शब्दांत माया या पुस्तकात समोर ठेवतात.. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय आणि खूपशा सकारात्मकतेसह! तेच त्यांच्या पुस्तकांतून वाचकांनी घेण्याचं सार आहे.

‘‘अमेरिकेत कृष्णवर्णीय मुलगी म्हणून जन्माला येणं, त्यात या गौरवर्णीयांच्या देशात पैसा हेच सर्वस्व आहे, तिथे गरीब घरात जन्माला येणं, तेही रूप अगदी सामान्य असताना, हे सारंच फार कठीण! त्यातही जर तिच्या आईवडिलांना ती नकोशी झाली आणि त्यांनी तिला आपल्याजवळ न ठेवता, इतरत्र कुणाकडे राहायला पाठवलं, तर तिचं जगणं हे अधिकच दु:सह, वेदनादायी होतं. कारण त्यामुळे होणारा, केला जाणारा अपमान, हा विनाकारण केलेला असतो.’’ ४ एप्रिल १९२८ ला जन्मलेल्या माया अँजेलो यांनी आपले स्वानुभवाचे बोल वयाच्या चाळिशीनंतर  ‘I know why the caged bird sings’ (१९६९) या आत्मवृत्तातून जगापुढे ठेवले.

वर्षांनुवर्ष हेच कटू वास्तव वाटय़ाला येणाऱ्या मुलींमधली ती एक होती. मार्गरिट अ‍ॅनी जॉन्सन ऊर्फ माया अँजेलो. आपल्या ८८ वर्षांच्या आयुष्याचा लेखाजोखा आपल्या कविता, काही निबंधवजा लेख आणि आत्मचरित्रांच्या ७ खंडांतून मांडताना माया यांनी ज्या अनेकानेक प्रसंगांचं वर्णन केलं आहे, ते वाचताना कोणाही संवेदनशील मनाच्या माणसाला हे वर्णन अवास्तव, कल्पित वाटू शकतं. पण सत्य हे कल्पिताहून अनेकदा भयानक असतं. त्यामुळे ते जाणून घेणं महत्त्वाचं.

काही वर्षांपूर्वी जेव्हा हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं, तेव्हा सुन्न झाले होते. त्यांच्या कविता, आत्मचरित्र-खंड यथावकाश वाचलेच. गेल्या पाचेक वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्त्रिया आपल्यावरील अत्याचारासंबंधी उघडपणे, नावानिशी बोलण्याचं धाडस दाखवू लागल्या. समाजमाध्यमांवर ‘मी टू’, ‘टाइम्स अप’ या चळवळी सुरू झाल्या. त्या वेळी माया आणि त्यांची आत्मचरित्रं यांची तीव्रतेनं आठवण झाली. कारण अशा प्रकारचं धाडस त्यांनी आपल्या अजाण वयात, आठव्या वर्षी, (तिच्या भावाला मारण्याची धमकी दिलेली असूनही) आपल्या कुटुंबीयांसमोर दाखवलं होतं आणि पहिल्याच आत्मचरित्र खंडातून पन्नास वर्षांपूर्वी लिहिलंही होतं. अमेरिकेतला वर्णविद्वेष, त्यामुळे होणारे तीव्र संघर्ष आपल्याला परिचित आहेतच. अमेरिकी समाजातली गुलामीची प्रथा जरी कायद्यानं नाहीशी केलेली असली, तरी कृष्णवर्णीयांबद्दल इतरेजनांमध्ये उघड-उघड राग आणि तुच्छता असते. विसाव्या शतकाच्या आरंभीची काही दशकं, विशेषत: लहान गावांमध्ये हा वर्णभेद मोठय़ा प्रमाणावर होता. याच काळात वाढलेल्या माया अँजेलो यांनी आपला जीवनप्रवास, जीवनविषयक चिंतन आत्मचरित्राच्या सात खंडांमधून आविष्कृत केलं आहे. सारेच भाग वाचनीय आणि त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी उपयुक्त असले, तरी ‘I know why the caged bird sings’ या त्यांच्या पहिल्या खंडाचा मी इथे विचार केला आहे. कारण त्यांनी वयाच्या सतरा वर्षांपर्यंतचा, आपल्या मानसिक जडणघडणीचा प्रवास यात वर्णन केला आहे.

आपल्या एका आयुष्यात त्या अनेक आयुष्यं जगल्या. त्यांच्या आयुष्यात अतीव दु:खाचे, अपमानाचे प्रसंग आले, तसंच असंख्य मानसन्मान, पुरस्कार यांचाही वर्षांव झाला. विविध सन्मान प्रथमच मिळवण्याचा योग त्यांना लाभला. राष्ट्राध्यक्षांच्या शपथप्रसंगी अमेरिकेसंबंधित कविता करून म्हणण्याचा दुर्मीळ मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन कवयित्री होत्या. चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक असणारी पहिली आफ्रिकन-अमेरिकन स्त्री त्याच होत्या. त्यांच्या कवितांमध्ये विचाराबरोबरच रंगमंचीय आवाहन होतं. ‘The caged bird’ या खंडाचं चांगलं स्वागत झालं. माया या कृष्णवर्णीय समाज आणि स्त्रिया यांच्या मूक वेदनेचा प्रकट शब्द बनल्या. त्यांच्यावरील अत्याचार, त्यांना मिळणारी अपमानकारक वागणूक, याविरुद्ध त्या उभ्या ठाकल्या. त्यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांच्याबरोबर नागरी हक्क चळवळीचं भरीव काम केलं.

‘The caged bird’ ची सुरुवात होते ती माया यांच्या प्रवासाच्या आठवणींनी. त्या म्हणतात, ‘‘आम्ही (मी- वय तीन वर्ष आणि भाऊ बेली- वय पाच) कॅलिफोर्नियातल्या लाँग बीचहून दक्षिणेतील अर्कान्सस राज्यातल्या स्टाम्प्स या मागास खेडय़ात आलो. कारण आमच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला होता आणि आमची रवानगी वडिलांनी आपल्या आईकडे (मोम्माकडे) केली होती. संपूर्ण गाडी कृष्णवर्णीयांनी भरली होती. त्यात आम्ही अगदीच लहान, तरीही एकटय़ानं प्रवास करत होतो.’’ स्टाम्प्स हा वर्णभेदानं पूर्णपणे दुभंगलेला भाग. तिथले डॉक्टर कृष्णवर्णीयांवर उपचार करणार नाहीत, गौरवर्णीय रस्त्यावरून चालत जाताना कृष्णवर्णीयांनी कडेला उभं राहायचं.. भारतातला जातिभेद, अथवा जगभर दिसणारा, जाणवणारा वंशभेद, वर्णभेद यांची उदाहरणं साधारण अशीच. माया यांनी यात वर्णिलेले प्रसंग, त्यांचे स्वानुभव, त्यामुळे मनात साचणारी चीड, हेही आपल्या परिचयाचंच. त्यामुळे जागतिक पटलावरची ही वर्णनं वाचताना आपण साहजिक अस्वस्थ होतो.

स्टाम्प्स गावात आजीला मान होता, तिचा दराराही होता. तिच्यामुळे आपण लोकसंग्रह करायला शिकलो, माणुसकी म्हणजे काय हे कळलं, असं माया यांना वाटे. चार-पाच वर्षांनंतर माया यांचे वडील एक दिवस अचानक आले आणि कॅलिफोर्नियाला- मुलांच्या आईकडे मुलांना सोडून निघून गेले. ते जग पूर्ण वेगळं होतं. आई मिश्र वंशाची, विलक्षण ऐटबाज, करारी, कर्तृत्ववान होती. तिथेच आईच्या मित्रानं माया यांच्यावर बलात्कार केला. त्या वेळी त्यांचं वय पुरं आठ वर्षही नव्हतं. मायांना धक्का बसला व त्या कोलमडल्या. त्या माणसावर न्यायालयात खटला झाला, पण त्याला किरकोळ दंड करून सोडून देण्यात आलं. दुसऱ्या दिवशी त्याचा खून झाला. ते कळल्यावर माया अधिकच घाबरल्या. आईनं त्या दोघांनाही पुन्हा आजीकडे पाठवलं. मायांचं आयुष्यच बदलून गेलं. त्यांनी एकदम मौन स्वीकारलं. आपण साक्ष दिली म्हणून त्या माणसाचा खून झाला. तो वाईट होताच, पण आपले शब्द कुणाचा जीव जायला कारण होऊ शकतात, असं छोटय़ा मायाच्या मनानं घेतलं. या मौनी अवस्थेत माया पाच वर्ष होत्या. केवळ ‘हो’ किंवा ‘नाही’ एवढेच शब्द त्या उच्चारत.

या काळात त्यांच्या आयुष्याची वीणच बदलली. सोबत होती ती एकच- पुस्तकांची. भीतीतून सुटण्याचा तोच एक मार्ग होता. सार्वजनिक वाचनालयं ही त्या लहानगीचा विसावा ठरली. त्या म्हणतात, ‘या ठिकाणी मी प्रथम एका गोऱ्याच्या प्रेमात पडले. तो होता विल्यम शेक्सपिअर! त्याच्या कलाकृतींनी आयुष्याची विविध चित्रं, मानवी स्वभावाचे बहुरंगी पैलू दाखवले.’ याच काळात शाळेतली फ्लॉवर्स ही शिक्षिका त्यांच्या मदतीला आली. तिनं छोटय़ा मायाला हळूहळू मोकळं करण्याचा प्रयत्न केला. माया लिहितात, ‘उच्चारित, उक्त शब्द किती महत्त्वाचा असतो, तो दुधारी शस्त्रासारखा तीक्ष्ण वा फुलासारखा कोमल असू शकतो, तो जखमा करतो आणि त्या हळुवारपणे बऱ्याही करतो, हे त्या शिक्षिकेनं मला सांगितलं. मायांच्या शिक्षिकेचे शब्द त्यांच्या मनात ठसले आणि त्यातूनच स्वतंत्र विचार करताना त्यांना प्रभावी, प्रवाही लेखनाची किल्ली सापडली.

‘I know why the caged bird sings’- ‘पिंजऱ्यातला पक्षी का गातो?’ (पॉल डनबार या त्यांच्या आवडत्या कवीच्या कवितेतली ही शेवटची ओळ.) माणूस मनाच्या आनंदी अवस्थेत गातो, गुणगुणतो या साधारण समजाला छेद देत माया म्हणतात, ‘पक्षी पिंजऱ्यात असताना गातो, कारण तो जर गायला नाही तर त्याच्या व्यथेला वाचा कशी फुटेल? त्याचा आवाज दूरवर कसा जाईल आणि त्याची सुटका कशी होईल? प्रत्येक माणसाला कधी ना कधी आपण पिंजऱ्यात आहोत अशी जाणीव होते. हा पिंजरा वेगवेगळी रूपं घेतो. आपण कधी काळे, तर कधी गोरे असतो. कधी श्रीमंत, कधी गरीब. कधी उच्चशिक्षित, कधी अशिक्षित असतो. जन्मलेल्या प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या पिंजऱ्यात अडकावं लागतं. त्यातून सुटकाच नसते. सर्वाचीच अशी अवस्था असते हे आपण जाणलं पाहिजे आणि त्यातून आपली सुटका करायची, बाहेर पडायची धडपड केलीच पाहिजे.’ स्टाम्प्समधला वर्णभेद विकोपाला जाऊ लागल्यावर, वयात येणाऱ्या आपल्या नातवंडांना आजीनं त्यांच्या आईकडे, कॅलिफोर्नियाला पाठवलं. तिथे माया यांनी नृत्य, संगीत यासाठी शिष्यवृत्ती मिळवून त्यांचंही शिक्षण घेतलं. वडील एकदा थोडय़ा मोठय़ा झालेल्या मायाला आपल्या मित्राच्या घरी घेऊन गेले होते. तेव्हा रात्री मद्याचं अतिसेवन झाल्यानं वडिलांना गाडीत घालून घरी आणण्याचं काम मायांना करावं लागलं. त्यापूर्वी कधीही गाडी चालवलेली नसताना मायांनी ते काम व्यवस्थित केलं. त्यांना स्वत:बद्दल मोठीच खात्री वाटू लागली. जणू माझं आयुष्य मी हाकू शकते, असं वाटून त्यानंतर मायांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. पदवी मिळवून माया स्वतंत्रपणे नोकरी करू लागल्या. मनातला बलात्काराचा अनुभव स्वत:बद्दल अनेक शंका, भीती निर्माण करी. पण यातूनच त्या धाडसानं काम करत राहिल्या. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी ‘गाय’ या आपल्या मुलाला जन्म देत मातृत्वाचाही अनुभव घेतला. नंतरही अपार कष्ट करत राहिल्या.

बायबलमधली वचनं, आफ्रिकन-अमेरिकन लोकसाहित्याची मौखिक परंपरा, इतर लेखकांचे संदर्भ या साऱ्यांचा मुक्त वापर करणारी मायांची कथनशैली, त्यांच्या पुस्तकांची अर्थपूर्ण शीर्षकं वाचकाला खिळवून ठेवतातच, पण त्यापेक्षाही महत्त्वाची आहे ती त्यांची भूमिका! वैऱ्यावरही येऊ नयेत असे प्रसंग त्यांच्यावर अगदी कोवळय़ा वयात आणि नंतरही आले. पण त्यांनी ते प्रसंग कणखरपणे झेलले. मोठमोठय़ा अडचणींमध्येही त्यांनी आईची आर्थिक मदत न घेता आपली जबाबदारी निभावली. त्यांचं म्हणणं होतं, की ‘स्वत:च्या चुका लक्षात घ्या आणि स्वत:ला माफ करत पुढे चला. आत्मविश्वास ढळू देऊ नका. स्वत:ला खऱ्या अर्थी जाणून घेणंच अवघड असतं. ते केलं नाहीत, तर तुमचा विकास होणार नाही. तुम्ही कधी शिकणार नाही आणि दुसऱ्याला कधी काही सांगू-शिकवू शकणार नाही.’

मायांच्या विपुल लेखनात साहित्याचं प्रेम सतत जाणवतं. आपल्याला लिहिता येतं, कविता करता येतात, आपल्याजवळ तशी प्रतिभा आहे, याचा विलक्षण आनंद त्यांना होई. त्यापुढे त्यांना कशाची पर्वा नसे. वंचितांचं किंवा दडपशाही, अत्याचारांचे बळी असणाऱ्यांचं लेखन वाचताना जाणवणारी चीड, हतबलता, मनात धुमसणारा राग, सूडबुद्धी यांची किंचितशीही छटा मायांच्या लेखनात जाणवत नाही. सुखदु:खाच्या हिंदोळय़ांवर हेलकावे घेणाऱ्या त्यांच्या आयुष्याचा विचार करता तशी छटा आली असती तर स्वाभाविकच म्हणता आलं असतं. परंतु त्यांनी कुणालाही दोष दिला नाही की नशिबाला बोल लावला नाही. त्या दैववादीही झाल्या नाहीत आणि हतबलही झाल्या नाहीत. आपल्यावरच्या अत्याचाराचं भांडवल न करता, अतिशय सकारात्मक विचार देत नागरी हक्कांच्या चळवळीत सहभागी झाल्या. त्यांच्या व्यक्तित्वाची ही प्रगल्भता अपूर्वाईची वाटते.

त्या म्हणतात, ‘कृष्णवर्णीय, त्यातही स्त्रीला कोणतंही काम चांगलं करण्यासाठी इतरांपेक्षा दसपट अधिक तयारी करावी लागते. ती करायची. आपल्या बाबतीत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर तुमचं नियंत्रण कसं असणार? पण त्यामुळे आपलं खच्चीकरण होऊ न देणं, हे तर आपल्या हातात असतं की! म्हणूनच पराजय झाले तर होऊ देत, तुम्ही पराभूत होऊ नका.’

‘Caged Bird’ आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा आणि ठाम दृष्टिकोन देतं. आयुष्यात हवं असणारं सारं काही, हवं तसं मिळणं शक्य नसतंच, हे आपण जाणतो. पण म्हणून परिस्थितीशरण न होता, केवळ आला दिवस ढकलत जगायचं कारण नाही. आपल्याला मिळालेल्या परिस्थितीत प्रत्येकाला चांगलंच आयुष्य घालवायचं असतं, तेही काहीएक ध्यास घेऊन, काही गंमत-जंमत करत आणि थोडीशी ऐट करत! मग त्यासाठी आत्मपरीक्षण, प्रामाणिक कष्ट आणि निकोप मन यांची सांगड घालावी लागते. पिंजऱ्यातून सुटण्यासाठी गाणाऱ्या पक्ष्याचं रूपक वापरणाऱ्या मायांचं हे पुस्तक आपल्याला आजच्या उद्विग्नतेच्या, विविध दडपणांच्या काळात प्रेरणा देत राहतं, मदत करतं आणि मग त्या समाजाला – विशेषत: पुरुषांना उद्देशून जे लिहितात, त्या त्यांच्या शब्दांचाच पुनरुच्चार करावासा वाटतो,

‘तुमच्या शब्दांनी तुम्ही मला मारू पाहता,   

विखारी नजरांनी जखमा करता

तुमच्या द्वेषानं मला ठार करू पाहता,

पण तरीही, हवेसारखी मी वरच उठेन

त्या चंद्राप्रमाणे आणि त्या सूर्याप्रमाणे,

उसळणाऱ्या समुद्रलाटांच्या ठामपणाने

वर-वर उंचावणाऱ्या मानवी आशेप्रमाणे, मीही सतत वरच उसळेन, प्रकाशत राहीन’

meenaulhas@gmail.com