नीरजा

भारतीय स्त्रीवादाचा पहिला आवाज ठरलेल्या ताराबाई शिंदे यांचं १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेलं आणि परखड शब्दांत स्त्री-पुरुष भेदाच्या अन्यायकारक संस्कृतीचा समाचार घेणारं ‘स्त्रीपुरुष तुलना’ हे छोटंसं ३७ पानी पुस्तक. हे पुस्तक तथाकथित संस्कृतीरक्षकांचं दुटप्पी वागणं उघड करतंच, पण प्रसंगी आपल्या देवादिकांचीही चिकित्सा करायला पुढेमागे पाहत नाही. १४० वर्षांपूर्वी लिहिलेलं हे पुस्तक वाचायलाच हवं कारण त्यामुळे त्या काळाच्या तुलनेत आपण आज कुठे उभे आहोत ते लक्षात येईल. आणि नेमकं कुठे आणि काय बदलायला हवं ते पुन्हा एकदा नव्यानं अभ्यासता येईल.

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Singh : केंब्रिजमध्ये शिक्षण, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते देशाचे पंतप्रधान! अशी होती मनमोहन सिंग यांची कारकीर्द
Sushma Swaraj And Manmohan Sing News
Manmohan Sing : मनमोहन सिंग आणि सुषमा स्वराज यांच्यातल्या शायरीच्या जुगलबंदीने जेव्हा गाजली होती लोकसभा
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”

स्त्रियांची दु:खं जात्यावरच्या ओव्यांपासून संतसाहित्यापर्यंत व्यक्त होत राहिलीच, पण आधुनिक काळात स्त्रिया आपल्यावरील अन्यायाबाबत आणखी स्पष्ट, थेट शब्दांत लिहू लागल्या. एकोणिसाव्या शतकात लिहायला लागलेल्या स्त्रिया आधुनिक काळाची पहिली पावलं बघत होत्या आणि त्याच्याशी परंपरांची सांगड घालत प्रश्न विचारू लागल्या होत्या. तिथपासून आतापर्यंत जगभर अनेक स्त्रियांनी तत्कालीन स्थितीवर भाष्य करत ठोस लिखाण केलं. काळाच्या मर्यादा न पाळणारं, अत्यंत दूरगामी ठरलेलं हे ललित वा ललितेतर साहित्य  वाचकांना विचार करायला भाग पाडत आहे. बदलू पाहणाऱ्या स्त्री-पुरुषांनी ‘वाचायलाच हवीत’ अशी जगभरातील अनेक पुस्तकं आज उपलब्ध आहेत. काळाच्या कसोटीवर उतरलेल्या त्यातल्याच काही महत्वाच्या पुस्तकांना वाचकांपर्यंत पोहोचवणारं हे सदर दर पंधरवडय़ानं.

आधुनिक समजल्या जाणाऱ्या दीडशे वर्षांपूर्वीच्या पुण्या-मुंबईतही ज्या काळात स्त्रिया ठामपणे बोलू लागल्या नव्हत्या, त्या काळात बुलढाणा जिल्ह्यातल्या ताराबाई शिंदे यांनी स्त्री आणि पुरुषांची तुलना करणारा केवळ सदतीस पानांचा लेख लिहून त्या काळातील सनातनी समाजाला जबरदस्त धक्का दिला होता. १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेलं ‘स्त्रीपुरुष तुलना’ हे पुस्तक महात्मा ज्योतीबा फुले यांनी गौरवलं आणि ताराबाई शिंदे भारतीय स्त्रीवादाचा पहिला आवाज झाल्या. १४० वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ताराबाई शिंदे लिहितात, ‘ज्या परमेश्वराने ही आश्चर्यकारक सृष्टी उत्पन्न केली, त्यानेच स्त्रीपुरुष निर्माण केले. तरी सर्व प्रकारचे साहस दुर्गुण स्त्रियांचेच अंगी वसतात किंवा जे अवगुण स्त्रियांचे अंगी आहेत तेच पुरुषांत आहेत किंवा नाहीत हे अगदी स्पष्ट करून दाखवावे याच हेतूने हा लहानसा निबंध मी माझ्या सर्व देशभगिनींचा अभिमान धरून रचिला आहे. यांत अमुकच जाती किंवा कुळ याकडे माझे मुळीच लक्ष नाही. ही स्त्री-पुरुषाची तुलना आहे.’ 

 त्या काळात आणि आजही जातीभेद हे या समाजव्यवस्थेचं वास्तव होतं आणि आहे. पण या सर्व जातींत किंवा जगभरातील सर्व धर्मात लिंगभेदावर आधारित विषमता ही सार्वकालीन होती आणि आजही आहे. आपल्याकडे ब्रिटिश राजवटीत सर्वानाच शिक्षणाची दारं खुली झाली. त्यामुळे महात्मा जोतिबा फुले, महर्षी कर्वे प्रभृतींबरोबरच सावित्रीबाईंच्या प्रयत्नांमुळे, तसंच स्वातंत्र्यानंतरच्या काळात जोमानं सुरू झालेल्या स्त्री-मुक्ती चळवळीमुळे अनेक स्त्रिया आपल्या जगण्याचा विचार करायला लागल्या, आत्मनिर्भर झाल्या. पण असं असलं तरी आजही त्यांची जागा या व्यवस्थेत शेवटच्या पायरीवरच आहे.  ताराबाईंना हे कळत होतं आणि त्याचा त्रासही होत होता. म्हणूनच त्यांनी पहिल्यांदाच लिहिलेल्या या त्यांच्या निबंधाच्या मनोगतात म्हणतात, ‘रोज पुरुषांचे साहस, धाडस व दगाबाजीची नित्य नवी भयंकर उदाहरणे दिसून येत असताही तिकडे कोणीच लक्ष न देता स्त्रियांवरच सर्व दोषांची गोणी लादतात हे पाहून स्त्रीजात्याभिमानाने माझे मन अगदी खळबळून तळतळून गेले त्यामुळे मला निर्भीड होऊन असेच खडखडीत लिहिल्यावाचून राहवेना.’ज्या वर्षी ताराबाईंचा हा लेख प्रसिद्ध झाला, त्याच वर्षी ब्रिटनमध्ये आधुनिक विचारांच्या आणि स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह धरणाऱ्या व्हर्जिनिया वूल्फ या लेखिकेचा जन्म झाला होता. ज्या काळात युरोप-अमेरिकेतील देशांतील स्त्रियाही आपल्या प्रश्नांविषयी फारशा मोकळेपणानं बोलू शकत नव्हत्या, त्या काळात बुलढाण्यासारख्या ठिकाणी जन्माला आलेली ही स्त्री धारदार तलवारीसारखी आपली लेखणी चालवत होती. हा लेख लिहिण्याचा त्यांचा उद्देश हा भारतातील या व्यवस्थेचा फायदा घेणाऱ्या पुरुषांना चार शब्द निर्भीडपणे सुनावणं हा आहेच, पण त्याही पलीकडे जाऊन भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रियांची जी स्थिती आहे त्याकडे समस्त समाजाचं लक्ष वेधणं हाही आहे.

 मनुवादी संस्कृतीतील स्त्रीनं नेमकं कसं असावं, काय करावं, याच्या कहाण्या सांगणारी आपली परंपरा स्त्रीला आजही नैतिकतेचे धडे देत असते. मनुस्मृतीत सांगितल्याप्रमाणे, पती जर परदेशी गेला असेल, तर त्याची वाट पाहण्यात जन्म घालवावा, त्यानं मारलं झोडलं तरी तो परमेश्वर मानून त्याची पूजा करावी, या आणि अशा अनेक कल्पना उराशी बाळगून असलेल्या समाजात जेव्हा स्त्रिया प्रश्न विचारायला लागतात तेव्हा तथाकथित संस्कृतीरक्षकांची संस्कृती बुडाल्याची हाकाटी सुरू होते. एकोणीसाव्या शतकातही तशी हाकाटी सुरू झाली होती. त्या काळात अनेक वर्तमानपत्रांत आपले स्वत:चे असे काही निर्णय घेऊ पाहणाऱ्या स्त्रियांविषयी बातम्या छापून येत होत्या आणि त्यांची निंदाही केली जात होती. गर्भपात करणाऱ्या विधवांच्या चौकशीविषयी बातम्या येत होत्या. त्याच वेळी कोणीतरी पत्र लिहून ‘या दीन विधवांचा कैवार घेऊन त्यांचा पुनर्विवाह करावा’ अशी सरकारला विनंती करत होतं. पण सनातनी लोकांना ते मान्य नव्हतं. स्त्रियांच्या बाजूनं काही कायदे व्हावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या पुरुषांविरोधात आणि ब्रिटिश सरकारविरोधात हे लोक लिहीत होते. ‘इंग्रज सरकारांनी आमचे धर्मसंबंधी कामात लक्ष घालू नये’ अशी ओरड करत होते. त्या सगळय़ाचा संदर्भ या लेखाला आहे. ‘अलीकडे सर्व वर्तमानपत्रांत गरीब अबलांच्या दुष्कृत्याविषयी बरेच छापून येते, तरी हा महाअनर्थ मिटवून टाकण्यास तुम्ही कोणीच पुढे होत नाही याचे कारण काय बरे?’ ताराबाईंच्या  लेखाची सुरुवातच या प्रश्नानं  होते. आणि मग ताराबाई थांबत नाहीत.

या समाजाने स्त्रीधर्म म्हणजे काय सांगितला आहे याचा समाचार घेताना त्या म्हणतात, ‘स्त्रीधर्म म्हणजे काय? निरंतर पतीची आज्ञा पाळणे, त्याचे मर्जीप्रमाणे वागणे, त्यांनी लाथा मारिल्या, शिव्या दिल्या, दुसऱ्या बाया ठेविल्या, नवरूजी दारू पिऊन, जुवा खेळून, कफलक होऊन शंख करीत, चोरी  करून, कोणाचा प्राण घेऊन, फितूर, चहाडी, खजिना लुटून, लांच खाऊन जरी घरी आले तरी स्त्रियांनी आपले हे कोणी महाराज गौळय़ांचे दही दूध चोरून चंद्रावळीला कलंक लावून आलेत; असे समजून परमात्म्यासारखीच यांची मोठय़ा हासतमुखाने देवासारखी पूजा करावी, सेवेत हजर राहावें हा स्त्रीधर्म.’  बायकांनी नवऱ्याला देवाप्रमाणे मानावे असे वाटत असेल तर पुरुषांनी स्वत:ही देवाप्रमाणे वागावे आणि देव जसा भक्ताची काळजी घेतो, त्यांचं दु:ख जाणतो तसं आपल्या पत्नीचं दु:ख पतीनं जाणावं आणि तिच्यावर देवाप्रमाणे ममता करावी असं त्या या पाखंडी समाजाला सुनावतात.

ताराबाई केवळ धारदार शब्द वापरत नाहीत, तर अनेकदा योग्य शब्दांत या तथाकथित संस्कृतीरक्षकांची खिल्लीही उडवतात. स्त्रियांना मारहाण करणारे पुरुष मारहाण केल्यावरही बायकांकडून ज्या अपेक्षा करतात त्याची टर उडवताना एका ठिकाणी त्या लिहितात, ‘पतीने लाथ मारली तर हसून म्हणावे की, नका पतिराया मारूं हो, तुमचे पाय दुखतील असे म्हणून महाराजांचे पाय लागलेच रगडीत बसावे. हातानी बुक्क्या, काठय़ा मारल्या तरी रडू नये. हसावेच नि लागलेच ताजे लोणी, घरी नसले तर शेजारणीचे घरून, नाही तर बाजारांतून विकत आणून स्वामींचे तळहात मारण्यानीं तळहावले असतील म्हणून चोळावे.’ आणि मग त्या गमतीने हेही लिहितात, ‘तळहात चोळण्याऐवजी याचे हात चुलीत जावोत अशी बरीक म्हणते.’

या साऱ्या तत्कालीन उदाहरणांबरोबरच स्त्रियांचे दोष दाखवणाऱ्या जुन्या ग्रंथातील एका ओवीचा व एका श्लोकाचा दाखला देऊन त्यांनी त्याचा समाचार घेतला आहे.

  ओवी –

स्त्री केवळ कुऱ्हाडी । सबळवृक्ष तोडी।।

प्राणी नाडिले लक्षकोडी। मूर्तिमंत भवव्याधि     

कामिनी। जाणपा।। १।।

 श्लोक –

आवर्त: संशयानामविनयभुवनं पत्तनं साहसानां।

दोषाणां सान्निधानं कपटमयतरं क्षेत्रमप्रत्ययानां।।

स्वर्गद्वारस्यविघ्नं नरकपुरमुखं सर्वमायाकरंडं।

स्त्रीयंत्रं केन सृष्टं विषयममृतमयं प्राणिनां

मोहपाश:  ।। २।।  

या ओवीत व श्लोकात स्त्रीला जी दूषणं दिली आहेत त्यातील एक एक शब्द घेऊन ताराबाई या निबंधात स्त्रीपुरुषांची तुलना करतात. आणि ती करताना रामायण, महाभारत आदी विविध ग्रंथांची उदाहरणं आपल्यासमोर ठेवतात. त्यावरून त्यांच्या वाचनाचा आवाका लक्षात येतोच, पण जे वाचलं आहे त्यावर आंधळेपणानं विश्वास न ठेवता त्या अनेक प्रश्न विचारत या ग्रंथातल्या विसंगतींवर नेमकं बोट ठेवतात. या ग्रंथात आणि कथांतील देवांनाही त्यांनी माफ केले नाही. आपल्या देवांची निंदा करू नये असं त्यांनाही वाटतं. पण ते चुकत असतील तर ती करणं भाग आहे, असं त्या म्हणतात. ‘आपल्या शास्त्रात सांगितले आहे की लढाई करते वेळेस बाप, भाऊ जर समरांगणात आपल्याशी लढू लागले तर बेलाशक मारावे, मागे पुढे पाहू नये. म्हणून आता खरे जे समोर आले ते उघडे करून दाखवणे जरूर पडले म्हणून जराशी यांत दोनतीन देवांची निंदा केली, याची मी त्यांचेजवळ माफी मागेन.’

 ताराबाईंचा हा रोखठोकपणा आणि सच्चेपणा आजच्या किती स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्येही उतरला असेल हा खरोखरच प्रश्न आहे. पण ताराबाई लोकांची पर्वा करत नाहीत. कदाचित आजूबाजूचं वास्तव पाहून त्या काळात मनात जो कल्लोळ उठत होता, जी अस्वस्थता भरून येत होती, ती अशा धारदार शब्दांत त्यांनी व्यक्त केली आहे. अर्थात ताराबाई पुरुषाच्या दुटप्पी वागण्याची निंदा करताना स्त्रियांना सारे श्रेय देत नाही. त्या लिहितात, ‘जगातील सर्व स्त्रिया प्रखर सूर्याच्या तेजाप्रमाणे सतेज, अंतर्बाह्य गंगाजलाप्रमाणे निर्मळ आहेत असे मुळीच नाही. पण सर्व पृथ्वीवरील स्त्रिया गोळा केल्या तर तुमच्यासारख्या (पुरुषांसारख्या) संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शेकडा दहा सापडतील. पण तुमच्यात एकदेखील या भोवऱ्यानें वेगळा सांपडणार नाही..’

 या निबंधात ताराबाईंनी एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील स्त्रियांची परिस्थिती मांडली आहे. आज एकशे चाळीस वर्षांनी त्या परिस्थितीत नेमका कोणता बदल झालाय याचा विचार केला, तर लक्षात येतं की आज बदल झालाय, परंतु तो मर्यादित आहे. आजही ‘महिलांना दिलेलं स्वातंत्र्य हेच विविध प्रकारच्या कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांचं मूळ आहे.’ असं वाक्य एकविसाव्या शतकात ‘सीबीएसई’च्या प्रश्नपत्रिकेतल्या उताऱ्यात दिलं जातंय आणि तरुण मुलांच्या मनात संभ्रम निर्माण केला जातोय. आजही ‘बलात्कार होताना आपण काही करू शकत नसू तर त्याचा आनंद घ्यावा’ असं विकृत विधान संसदीय लोकशाहीच्या सभागृहात आमदार करताहेत. आजही स्त्रियांना वडाच्या झाडाभोवती फिरवलं जातंय आणि त्याही फिरताहेत. आजही स्त्रीधर्म म्हणजे काय, याचं ज्ञानामृत कधी पुरुषांकडून तर कधी स्त्रियांकडूनही पाजलं जातंय आणि बाईनं कसं मर्यादेत राहायचं हे सांगितलं जातंय. सीतेला अग्निदिव्य करायला लावणाऱ्या आणि गर्भार असताना सोडणाऱ्या रामाला आपण प्रश्न विचारूच शकत नाही, कारण कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ शकतात. स्त्रिया घराबाहेर पडल्या, शिकल्या त्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढलं, कुटुंबव्यवस्था मोडकळीला आली, अशी विधानंही जबाबदार लोक करताहेत. देशात रोज बलात्कार होताहेत आणि ते झाल्यावर ‘स्त्रिया कुमकुवत आहेत, त्यांचं रक्षण करायला हवं’ असं म्हणणारे लोक पुन्हा एकदा स्त्रीचा रक्षक पुरुषच आहे हा पवित्रा घेताना दिसतात. एकूण स्त्रीला सक्षम करणं म्हणजे या पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या चौकटीतून मुक्त करून स्वतंत्र व्यक्ती म्हणून सन्मान करणं असं नसून तिला सांभाळणारे आम्हीच आहोत, हे चित्र अधोरेखित करण्याचं काम आजही चालू आहे. ‘आम्ही आईचा सन्मान करतो’ म्हणणारे पुरुष बाईचा सन्मान किती करतात हा प्रश्नच आहे.

   ही मानसिकता १४० वर्षांपूर्वीही होती आणि आजही आहे. पुढच्या दीडशे वर्षांत त्यात किती फरक पडेल माहीत नाही. पण स्त्रियांच्या अशा लेखनामुळे त्या काळात अनेक स्त्रीपुरुषांनी स्त्री-पुरुष समानतेसाठी पावलं उचलली. आज ताराबाईंसारखी स्त्रीपुरुष तुलना केली तर लक्षात येतं, फार नसले तरी काही विचारी पुरुष स्त्रीला सन्मानानं आणि आपल्यासारखीच एक व्यक्त्ती म्हणून वागवताहेत. त्या वेळसारख्या सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, फातिमा शेख यांच्यासारख्या स्त्रिया आजही या व्यवस्थेत आपलं अस्तित्व टिकवताना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव टाकून अनेक क्षेत्रांत स्वत:ला सिद्ध करताहेत. त्यांनाही आत्मशोधाचा मार्ग सापडला आहे. आणि त्या आत्मनिर्भरही झाल्या आहेत. या अशा आत्मभान आलेल्या स्त्रीबरोबर राहण्यासाठी पुरुषांनी स्वत:मध्ये बदल करायला हवेत आणि ते करायचे असतील तर आजच्या तरुणाईनं आधुनिकतेचा खरा अर्थ जाणून घ्यायला हवा. संविधान समजून घ्यायला हवं. आणि ज्या संस्कृतीचा आपण अभिमान बाळगतो, त्या संस्कृतीनं स्त्रीला कशा तऱ्हेनं वागवलं आहे हे जाणून घेतानाच आज एवढय़ा वर्षांनंतर आपण आपल्यात नेमका काय बदल केला, किती पुढे आलो, याचा विचार करायला हवा. तो करण्यासाठी १४० वर्षांपूर्वी लिहिलेला हा निबंध वाचायलाच हवा.

कदाचित हा निबंध वाचल्यानंतर आजच्या तरुण मुलींना आपण आंधळेपणानं करत असलेल्या कर्मकांडाचे अर्थ लागतील, प्रश्न पडतील आणि त्या त्यातून स्वत:ची सुटका करून घेऊ शकतील..

nrajan20@gmail.com

Story img Loader