मृणालिनी चितळे

बाया कर्वे यांनी १९४६ मध्ये लिहिलेले ‘माझे पुराण’ हे आत्मचरित्र म्हणजे जुन्या काळाची नव्या जगाशी घातलेली सांगड. बायांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे भाबडेपणा आणि कणखरपणा यांचे अजब रसायन होते, त्यातूनच त्यांची नि:स्पृह वृत्ती, धाडस आणि कर्तव्यनिष्ठा यासंबंधीचे एकेक प्रसंग आजच्या काळातही स्तिमित करणारे आहेत. बाया कर्वे यांचे आयुष्य, इतरांसाठी केलेले कष्ट, काही वेळा परंपरेच्या, रीतिरिवाजांच्या पलीकडे जाऊन केलेल्या गोष्टी आजही महत्त्वाच्या. म्हणूनच हे पुस्तक वाचायलाच हवे असे. 

saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…

आत्मचरित्र लिहिणे म्हणजे आपले आयुष्य आहे तसे शब्दांकित करणे. त्यासाठी लिहिणाऱ्याच्या आयुष्यात सर्वसामान्यांच्या आयुष्यापेक्षा वेगळे काही घडले असणे अपेक्षित असते आणि जे काही घडले-बिघडले आहे ते प्रांजळपणे आणि तटस्थपणे उलगडून दाखवणेही. यातील बहुतांश अपेक्षा बाया ऊर्फ आनंदीबाई कर्वे यांनी लिहिलेले ‘माझे पुराण’ हे आत्मचरित्र पूर्ण करते.

बाया म्हणजे स्त्रीशिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते भारतरत्न महर्षी धोंडो केशव म्हणजे अण्णा कर्वे यांच्या द्वितीय पत्नी. १८७०चा त्यांचा जन्म. आपल्या आत्मचरित्रात शे-सव्वाशे वर्षांपूर्वीचे समाजजीवन आणि अण्णांबरोबरचे सहजीवन त्यांनी चित्रित केले आहे. त्या काळाशी तुलना करता केशवपनासारख्या जाचक रूढीपरंपरा आज कालबाह्य ठरल्या आहेत. विधवा- विवाहसारख्या संकल्पना जनमानसात रुळल्या आहेत. स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व निदान कागदोपत्री मान्य झाले आहे. असे सकारात्मक बदल घडले असूनही स्त्रियांच्या समस्या संपल्या आहेत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. काळानुरूप स्त्रियांच्या समस्यांचे स्वरूप बदलले आहे. त्यांना भिडण्याची पद्धत बदलली आहे, परंतु त्या समजून घेऊन त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची मानसिकता, या दोन्हींची आजही गरज आहे. अशा प्रकारची दृष्टी आणि मानसिकता ‘माझे पुराण’मधील पानापानांतून जाणवते. त्यामुळे १९४६ मध्ये लिहिलेले हे पुस्तक पुन:पुन्हा वाचावेसे वाटते. त्यातील मोजक्या घटनांचा आढावा घेतानाही बाया आणि अण्णा यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते.

    त्या काळच्या प्रथेप्रमाणे वयाच्या आठव्या वर्षी बाया यांचा विवाह झाला. दुर्दैवाने लग्नानंतर ३/४ महिन्यांत त्या विधवा झाल्या. त्यांचे वडील सुधारक विचारांचे असल्याने त्यांना शिक्षणासाठी पंडिता रमाबाईंच्या ‘शारदासदना’त दाखल केले. शिकत असताना अण्णासाहेब कर्वे यांच्याशी बायांचा विवाह ठरला. लग्न करण्याचे उभयपक्षी मान्य झाल्यावर बायांचे केस वाढेपर्यंत थांबणे क्रमप्राप्त होते. ही गोष्ट बायांच्या कानावर गेल्यावर त्यांनी अण्णांना हळूच सांगितले, की ‘शारदासदना’त आल्यापासून त्यांनी केस वाढवायला सुरुवात केली होती. फक्त कुणाला कळू नये म्हणून डोक्यावरचा पदर हनुवटीखाली सेफ्टी पिन लावून त्या घट्ट बसवत. ज्या चालीरीती बायांना पटत नव्हत्या त्यांच्या विरोधात, भले त्या आवाज उठवू शकत नसल्या, तरी त्याविरुद्ध वागण्याची हिंमत त्यांच्यामध्ये होती. त्यांचे लग्न निश्चित करतानाचा आणखी एक प्रसंग आवर्जून सांगण्यासारखा आहे. किरकोळ प्रकृतीच्या अण्णांकडे पाहून ते वर्षभर तरी जगतील की नाही अशी शंका रमाबाईंना आली. त्यांनी बायांच्या नावाने तीन हजार रुपयांची विम्याची पॉलिसी करायची अट अण्णांना घातली. १८९७ मध्ये तीन हजार रुपयांचे मूल्य किती असेल याची कल्पना आपण करू शकतो. बाया यांच्या काळजीपोटी अशी अट घालणाऱ्या रमाबाई आणि कोणत्याही प्रकारचा ‘पुरुषी अहंकार’ मध्ये न आणता ती मान्य करणारे अण्णा दोघंही धन्य होत. (किरकोळ प्रकृतीचे अण्णा १०६ वर्षे जगले ही गोष्ट नोंदवाविशी वाटते.)

लग्नानंतर बायांच्या नावामागे सौभाग्याचे बिरुद लागले, पण हातात मात्र सतीचे वाण आले. स्त्री शिक्षणाच्या ध्येयाने झपाटलेल्या अण्णांचा घरात पाय ठरत नसे. त्यामुळे छोटय़ा गोष्टी समस्या बनून जात. लग्नानंतर बाया गरोदर राहिल्या तेव्हा बाळंतपण रुग्णालयात करायचे ठरले, परंतु रात्रीअपरात्री कळा सुरू झाल्या तर तिथंवर पोचायचे कसे, असा पेच बायांना पडला. बायांनी तो त्यांच्या पद्धतीने सोडवला. टांग्याने जाणे परवडत नसल्याने रोज रात्री त्या चालत चालत रुग्णालयात झोपायला जायच्या आणि पहाटे उठून घरी यायच्या. बाळंत होईपर्यंत वीस दिवस त्या रुग्णालयाच्या फेऱ्या करत राहिल्या. कोणत्याही प्रश्नाचा बाऊ केला नाही की पर्याय सुचतात, परंतु पर्याय सुचले तरी ते अमलात आणण्यासाठी शरीरमनाची भक्कम साथ लागते; जी बायांना लाभली होती. लग्नानंतर त्यांना पैशांची चणचण सदैव जाणवे. पैसे मिळवण्यासाठी आपण शिकले पाहिजे, असे बायांना वाटू लागले. नागपूरला जाऊन डफरीन रुग्णालयाचा सुईणीच्या कामाचा डिप्लोमा मिळविण्याचे त्यांनी ठरवले. त्या काळात पुणे-नागपूर प्रवास सोपा नव्हता. आपल्या दोन-अडीच वर्षांच्या मुलासह वर्षभर वसतिगृहात राहून त्यांनी सर्टिफिकेट मिळवले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जाण्याची संधी चालून आली. अण्णांनी हरकत घेतली नाही. फक्त मुलाचे हाल होतील म्हणून त्याला पुण्यात ठेवून जायला सांगितले. बायांना ते पटले नाही. पत्नीला शिक्षणाची संधी देण्याचा आणि त्यासंबंधीच्या निर्णयाचा अधिकार देण्याचा मोठेपणा अण्णांपाशी होता, तर त्यांच्या मोठेपणाचे दडपण येऊ न देता स्वत:ला योग्य वाटेल असा निर्णय घेण्याची क्षमता बायांपाशी होती. संपन्न सहजीवनाचा हाच तर पाया असतो.

अण्णांसारख्या हाडाच्या कार्यकर्त्यांबरोबर संसार करताना वैयक्तिक सुखदु:खांना थारा देऊन चालणार नाही हे बाया समजून होत्या; परंतु काही प्रसंग मात्र असे घडत, की मनावर कायमचे ओरखडे उठवून जात. पुनर्विवाह केला म्हणून समाजाने कितीही घाव घातले तरी निदान आपल्या नवऱ्याने काढलेल्या संस्थेत आपल्याला अशी वागणूक मिळू नये अशी त्यांची किमान अपेक्षा होती, परंतु तिथे बायांना अस्पृश्य असल्यासारखी वागणूक मिळे. त्यांची पंगत वेगळी असे. त्यांना पाण्याला शिवू देत नसत. समाजाने अण्णांचा पुनर्विवाह स्वीकारला होता; परंतु एका स्त्रीने पुनर्विवाह करणे समाजाच्या पचनी पडले नव्हते. हा प्रसंग वाचताना अनेक प्रश्न मनात उभे राहतात. छोटय़ामोठय़ा प्रसंगी कुणाचीही कानउघाडणी करणाऱ्या बायांनी हा अपमान का सहन केला असेल? समस्त स्त्री जातीचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणाऱ्या अण्णांना आपल्या पत्नीवर होणारा अन्याय दिसला नसेल? परंतु समाजपरिवर्तन करायचे असेल तर वैयक्तिक मानापमानाचा विचार एका ठरावीक मर्यादेबाहेर करून चालत नाही हे दोघांनीही समजून घेतले असावे. अशा सामंजस्यासाठी एक आध्यात्मिक बैठक लागते. आत्मिक बळ लागते, जे दोघांपाशी होते. या प्रसंगाविषयी बायांनी लिहिले आहे, ‘मागच्या गोष्टी आठवल्या की थोडा राग येतो, थोडेसे वाईट वाटते, पण अर्थात त्या वेळची धार नाही हे मात्र खरे.’ अशा प्रकारची परिपक्वता असल्यामुळे अण्णांच्या ‘अनाथ बालिकाश्रम ते महिला विद्यापीठ’ एवढय़ा महान कार्यात त्या अण्णांना साथ देऊ शकल्या. बायांनी अण्णांच्या कार्यात तर साथ दिलीच; पण त्यांच्यामध्येही कार्यकर्तीचे रक्त होते. आयुष्यभर त्यांनी प्रचंड कष्ट झेलले. घरातील दळणकांडणापासून सर्व कामे त्यांना एकटीला करावी लागत, पण त्यांचा कामाचा उरक दांडगा होता. तक्रार करण्याचा स्वभाव नव्हता. उलट अडल्यापडलेल्याला त्या सढळ हाताने मदत करत. कोणत्याही गोष्टीचा अपव्यय होणे त्यांना खपत नसे. लग्नमुंजीला गेले की अक्षतारूपाने खाली सांडलेले तांदूळ गोळा करून त्याचा भात करताना त्यांना संकोच वाटत नसे. त्यांच्या घरी आश्रयाला येणाऱ्यांमध्ये दीनदुबळे, अपंग असत. बालविधवा, परित्यक्ता स्त्रिया संख्येने जास्त असत. पदरी मूल असल्याने ज्या स्त्रियांना तातडीने अर्थार्जनाची गरज असे, त्यांना परिचारिकेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्यासाठी बाया धडपडत. अनैतिक शरीरसंबंधांमुळे किंवा शारीरिक जबरदस्तीमुळे ज्या विधवा गरोदर राहिल्या असतील त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी बाया परिश्रम घेत. त्या स्वत: बालविधवेचे जिणे जगत असताना स्त्रीची विटंबना करण्यासाठी पुरुष कसे टपलेले असतात, याविषयीचे वैयक्तिक अनुभव त्यांनी मोकळेपणाने लिहिले आहेत. बायांच्या ओळखीच्या एका स्त्रीच्या मनात तमाम पुरुष जातीविषयी घृणा भरून राहिली होती. तिने बायांकडून वचन घेतले होते, की ती मेल्यावर कुणाही पुरुषाचा हात तिच्या देहाला बाया लावू देणार नाहीत. ती गेल्यावर बाया यांनी तिचे शव एकटीने छकडय़ातून वाहून नेऊन तिला अग्नी दिला. बायांची नि:स्पृह वृत्ती, धाडस आणि कर्तव्यनिष्ठा यासंबधीचे एकेक प्रसंग आजच्या काळातही स्तिमित करणारे आहेत.

बायांनी आपले आत्मचरित्र लिहिले तेव्हा अण्णा हयात होते. ते लिहिताना अण्णांच्या कर्तृत्वाचे दडपण त्यांच्यावर आले नसल्याचे जाणवते. अण्णांच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे अत्यंत मोकळेपणाने त्यांनी उघड करून दाखवले आहेत. अण्णांचा सडेतोडपणा, एककल्लीपणा, हिशोबीपणा, एका बाजूने आत्यंतिक भिडस्तपणा तर दुसरीकडे टोकाचा आग्रह याची अनेक उदाहरणे देत मनुष्यस्वभावातील संगती आणि विसंगती बायांनी एखाद्या साहित्यिकाच्या नजरेने टिपली आहे. अण्णांच्या स्वभावामुळे त्यांचे व मुलांचे कसे नुकसान व्हायचे हे त्यांनी जितक्या परखडपणे सांगितले आहे, तितक्यात ममत्वाने अण्णांनी दिलेल्या पूर्ण स्वातंत्र्यामुळे आयुष्यात नानाविध गोष्टी त्या करू शकल्या यांची जाणीव त्यांना आहे. आयुष्यातील बराच काळ त्या दोघांना एकमेकांपासून लांब राहून व्यतीत करायला लागला होता. मुलांचे शिक्षण, पाहुण्यांची जबाबदारी यामुळे बाया गावातील घरात राहात, तर अण्णा संस्थेमध्ये. कुणी कितीही कान भरले तरी परस्परांवरील विश्वासामुळे दूर राहूनही त्यांच्या नात्यात दरी पडली नाही. आयुष्याच्या संधिकाली अण्णा आजारी पडल्यावर ते लॉ कॉलेजवरील त्यांच्या मुलाकडे राहायला आले, तर बायांनी हिंगण्याला आपल्या झोपडीत एकटीने राहणे पसंत केले. अण्णांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या निर्णयाला विरोध केला नाही. ते रोज हिंगण्याला येऊन बायांना भेटून जात. याबद्दल बायांनी म्हटले आहे, ‘माझ्या घरातील घडय़ाळाला किल्ली देण्याचे काम मी त्यांच्याकडे दिले होते. त्यामुळे त्यांना रोज यावे लागे.’ बायांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे भाबडेपणा आणि कणखरपणा यांचे अजब रसायन होते. कोणतीही समस्या, मग ती लहान असो वा मोठी, आयुष्य व्यापून राहील इतकी गहन त्यांनी कधी मानली नाही. त्याकडे व्यवहारी आणि खेळकर वृत्तीने पाहण्याची विलक्षण हातोटी त्यांच्यापाशी होती. म्हणूनच अण्णांच्या तक्रारी सांगतानाही त्यामध्ये कडवटपणाचा सूर उमटत नाही; उलट अथक समजूतदारपणाचा प्रत्यय येतो.

बायांच्या सेवाभावी वृत्तीचे आणि कष्टाळू स्वभावाचे अण्णांनाही कौतुक होते. त्यांची समंजस साथ लाभल्यामुळे आपण आपले काम निश्चिंत मनाने करू शकलो याची जाणीव होती. आपल्या पाठीमागे त्यांना कोणावर अवलंबून राहायला नको म्हणून ते त्यांना खर्चासाठी दरमहा १५ रुपये देत. परंतु बाया यांच्या जेव्हा लक्षात आले की लहानमोठी कामे करून त्यांनी गुंतवलेल्या ठेवींवरील व्याज पुरेसे आहे, तेव्हा त्यांनी दरमहा पैसे घेणे बंद करून टाकले. वयाच्या ८१ वर्षी बायांची जीवनज्योती मालवली. आश्रमाच्या परिसरात त्यांना अग्नी देऊन तिथे तुळशीवृंदावन बांधण्यात आले. त्यानंतर अण्णा जेव्हाजेव्हा हिंगण्याला जात, तेव्हा बायाला भेटून येतो, असे म्हणून तुळशीवृंदावनाचे दर्शन घेत. दोघांच्या नात्यातील कोवळीक दर्शविणारा हा प्रसंग. (हा तपशील ‘अखेर’ या प्रकरणात बायांच्या सूनबाई कावेरी कर्वे यांनी उद्धृत केला आहे.) बाया यांच्या आत्मचरित्रातील कित्येक प्रसंग वाचताना अण्णा आणि त्यांच्या अर्थपूर्ण सहजीवनाची आणि त्याबरोबरच दोघांच्या झळझळीत व्यक्तिमत्त्वांची ओळख होते. दोघेही आग्रही आणि मनस्वी. परंतु आग्रहाचे परिवर्तन दुराग्रहात होऊ नये याचे भान दोघांनाही होते. एकमेकांचे स्वातंत्र्य जपत जगताना, नात्यामध्ये कोरडेपणा न येऊ देण्याचे कसब त्यांनी साधले होते. म्हणूनच एकविसाव्या शतकातही त्यांचे आयुष्य सजग सहजीवनाचा वस्तुपाठ ठरते.

अत्यंत सरळपणे लिहिलेले असे हे बायाचे ‘माझे पुराण’. साहित्यिक निकषांवर तपासायचे ठरवले तर त्यामध्ये घटनांचा विस्कळीतपणा जाणवतो. काही प्रसंगांची पुनरावृत्ती आहे. भाषेचे लालित्य त्यामध्ये नाही. अत्यंत सरधोपटपणे केलेली विधाने आहेत; पण या साऱ्यांना पुरून उरेल असा बायांच्या स्वभावातील प्रामाणिकपणा त्यामध्ये प्रतिबिंबित झाला आहे. स्वत:च्या मनात उठलेली बरी-वाईट आंदोलने मांडण्याचे धारिष्टय़ आहे. अण्णा किडनीच्या विकाराने आजारी पडल्यावर त्यांच्यावर योग्य उपचार होतील की नाही या काळजीने त्या कासावीस होतात, त्याच वेळी या दुखण्यात त्यांचे काही बरेवाईट झाले, तर लग्नाच्या वेळी त्यांच्या नावाने केलेल्या पॉलिसीच्या पैशांचा विनियोग कसा करावा, हा विचार मनात येऊन गेल्याची कबुलीही देतात. हे सगळे लिहिण्यासाठी मनाचा जो पारदर्शीपणा लागतो तो बायांपाशी होता. म्हणूनच त्या जगल्या तितक्याच उत्कटतेने कागदावर उतरवू शकल्या. त्यांच्या लिखाणामागे मुद्दाम काही सांगण्याचा अभिनिवेश नाही. काही पटवण्याचा अट्टहास नाही. आपली कैफियत मांडण्याचा इरादा नाही. म्हणूनच मराठी साहित्यातील आत्मवृत्तांच्या दालनात त्याचे महत्त्व आजही टिकून आहे. आपल्या आत्मचरित्राला ‘माझे पुराण’ असे समर्पक नाव त्यांनी दिले आहे. पुराण म्हणजे ‘पुरा नवं भवति.’  पूर्वीचे असूनही ज्याची नव्याशी सांगड घालता येते, ते म्हणजे पुराण.

आजघडीला स्त्रियांना ज्या नित्यनवीन प्रश्नांना सामोरे जावे लागते ते प्रश्न बायांच्या प्रश्नांपेक्षा खचितच वेगळे आहेत, तर काही जुनेच प्रश्न चेहरा बदलून नव्याने उभे ठाकले आहेत. बायांच्या तुलनेने सहज सोपे आयुष्य आम्हा स्त्रियांच्या वाटय़ाला आले असले तरीही अनेकदा आम्ही अडखळतो, बावरतो, चिडतो, कोसळतो. तेव्हा वाटते, बायाला नजरेसमोर आणावे.  तिचे ‘पुराण’ वाचताना सर्व प्रश्नांना उत्तरे मिळण्याची अपेक्षा नसते; पण ते वाचताना आयुष्य आसासून जगण्याची, सोसण्याची आणि झगडण्याची उमेद वाढते एवढे नक्की.

chitale.mrinalini@gmail.com

Story img Loader