वैभव मांगले
‘‘पर्यटन आणि प्रवास फक्त मनोरंजनासाठी नसावा…नव्या ठिकाणी फिरताना तिथला माणूस, संस्कृती जाणून घ्यावीशी वाटत नसेल, शेकडो वर्षांपूर्वीची एखादी कलाकृती, बांधकाम पाहताना ‘तेव्हा माणसाला असं का करावंसं वाटलं असेल?’ हा प्रश्न मनात येत नसेल, तर ते पर्यटन अधुरं राहिल्यासारखं आहे. मनाच्या या प्रश्नोत्तरांमधून नवीन ज्ञान मिळाल्याचा, ते आपल्या संस्कृतीशी पडताळून पाहण्याचा जो आनंद असतो, तो अवर्णनीयच. अशी अनेक पर्यटनं मला करायला मिळाली. काही देशा-परदेशातली, तर काही माझ्या गावाच्या रस्त्यावरचीच! पण त्यांनी दिलेल्या स्मृती कायम ताज्या राहतील.’’ सांगताहेत अभिनेते वैभव मांगले.
मला वाटतं, की पर्यटन आणि प्रवास यांत फरक आहे. प्रवास आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात, एका गावातून दुसऱ्या गावात, एका देशातून दुसऱ्या देशात करतो. त्यामुळे काही कारणानं प्रवास होतच असतो. पर्यटन करताना मात्र आपण मुद्दाम ठरवून प्रवासाला निघतो. त्यामागे काही तरी योजना असते, त्या योजनेला काही उद्दिष्ट असतं. आपला वैविध्यपूर्ण देश आपण पाहायला हवा; ऐतिहासिक, प्राचीन, निसर्गरम्य ठिकाणं पाहायला हवीत, परदेशातली संस्कृती बघायला हवी, यासाठी केलेला हा प्रवास.
रंजन हा उद्देश त्यात प्रथम आहेच; पण पुष्कळदा आपण ‘आपलं आणि त्यांचं’ अशी तुलनाही मनातल्या मनात करत असतो. आपली आणि त्यांची संस्कृती, पेहराव, खानपान, देवदेवता, बांधकामं, तिथले लोक जीवनाकडे, धर्माकडे कसे पाहतात, असा विचार मनात चाललेला असतो. खूप ठिकाणांबद्दल शालेय वयात वाचलेलं असतं, त्याबद्दल उत्सुकता असते. अनेकदा जे पर्यटनाला जाऊन येतात अशा मंडळींकडून काही तरी नवं कळतं आणि कुतूहल जागं होतं. अमुक वर्षांपूर्वी अमुक ठिकाणच्या लोकांना असं का करावंसं वाटलं असावं? या प्रश्नाचा शोध आपण घेत असतो.
एक प्रकारे आपलाच- मानवसंस्कृतीचाच हा शोध आहे! माणसाला नेहमी प्रश्न पडत आले आहेत आणि त्या प्रक्रियेमध्येच तो उत्क्रांत होत गेला आहे. प्रश्न पडण्यातूनच देव, धर्माची निर्मिती झाली असावी. पुढे अमरत्व, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक या संकल्पना, देवालयं, चर्च, मशिदी, हे सगळं निर्माण झालं असावं. त्यामुळे पर्यटनात बांधकामं, रंगसंगती, सौंदर्य, हे पाहण्यात आनंद आहेच; पण त्यापलीकडचा शोध मनात सुरू होणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं.
मी जेव्हा हंपी, बदामी या शहरांना भेटी दिल्या, तेव्हा मला हाच प्रश्न पडला होता, की हे सर्व का निर्माण करावंसं वाटलं असेल? किती सुंदर स्थापत्यरचना! वेरूळचं अखंड दगडात कोरलेलं कैलास मंदिर, अजिंठाची भित्तिचित्रं, बौद्धकालीन मूर्ती, कोरीवकाम, हे सर्व का करावंसं वाटलं असावं, या विचारानं स्तिमित झालो. कोणार्कचं सूर्यमंदिर पाहतानाही असाच विस्मयचकित झालो होतो. खजुराहोची मिथुन शिल्पं पाहताना त्या काळचा माणूस किती प्रगत विचार करत होता, असं वाटून गेलं. त्या काळात माणूस कला आणि सौंदर्यशास्त्राचा किती विचार करत होता.. खरं तर काळाच्या किती पुढचा विचार करत होता! हे निर्माण करून ठेवायला हवं, हे अनेक पिढय़ा टिकून राहील, ही गरज तेव्हाच्या माणसाला वाटत होती. तो संस्कृतीचा, स्वत:च्या अस्तित्वाचा काय विचार करत होता?.. असं मनात घोळवत राहिलो. प्रत्येक नवीन ठिकाणी गेलो, की हे चक्र मनात सुरू होतं.
आपल्या देशात पर्यटनाचा एक ‘पॅटर्न’ मी खूप ठिकाणी पाहिलाय. गटानं नवीन ठिकाणी जायचं, फोटो, ‘सेल्फ्या’ काढायच्या, पाटर्य़ा करायच्या आणि कित्येकदा तिथेच खाण्याची पाकिटं आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्या टाकून कचरा करायचा! परदेशातले लोक मात्र खूपदा एकेकटे, जोडप्यानं, पाठीवर सॅक अडकवून पायपीट करताना दिसतात. अगदी भारतातसुद्धा ते असे एकेकटय़ाने फिरायला येतात. मनमुराद त्या त्या स्थळाचा आनंद लुटतात. अजिंठा-वेरूळला एकेका चित्रा-शिल्पाकडे दहा-पंधरा मिनिटं एकटक पाहात राहणारी परदेशी पर्यटक मंडळी खूपदा दिसली. ते सगळे एवढं काय बघत होते?.. असं, केवळ ‘बघणं’ नव्हे, तर त्यानं चित्तवृत्ती प्रफुल्लित होऊन आत काही तरी झिरपणं, काही तरी आत्मसात करणं होत असणार आणि तेच मला महत्त्वाचं वाटतं. लेण्या-मंदिरंच नव्हे. मला तर सह्याद्री पर्वत पाहतानाही असंच झालं होतं! निसर्गाची ही केवढी मोठी कलाकृती आहे! बेसॉल्टचे एकावर एक रचलेले खडक, अनेक दुर्लभ वनस्पती.. या पर्वतरांगांत फिरताना एक अद्भुत, गूढ भावना जाणवत राहते. असं काही आताची मानवनिर्मित ‘आश्र्चय’ बघताना नाही जाणवत. रंजन होतं, पण त्यापलीकडे अधिक काही जे मिळायला हवं, ते मिळत नाही; पण विविध ठिकाणची संस्कृती कशी निर्माण झाली, हे जाणून घेणं माणूस म्हणून प्रगल्भ करतं. माझ्या मते हे खरं पर्यटन. जग जाणून घेतल्याशिवाय मानवी संस्कृती किती प्राचीन आहे, किती समृद्ध आहे, हे कळत नाही. अजून मी इजिप्तचे पिरॅमिडस् बघायला जाऊ शकलेलो नाही; पण ते निश्चित माझ्या या ‘संस्कृतीशोधा’च्या यादीत आहे.
मी खूपदा कोकणात माझ्या गावी जातो. प्रवासात लागणारी ठिकाणं तीच असतात; नेहमी भेटणारी; पण दर वेळी काही तरी नवा संवाद साधतात माझ्याशी! काही जुन्या, पुसट आठवणी जोडलेल्या असतात त्या-त्या ठिकाणांशी. एक आठवण पुन:पुन्हा ताजी होत असते. मी पहिल्यांदा सेकंडहँड गाडी घेतली होती. तेव्हा मला गाडी तितकीशी चांगली चालवता येत नव्हती. भावाला, विनायकला नीट चालवता येत असल्यानं त्याच्याबरोबर कोकणात निघालो. कशेडी घाट सुरू होतानाच्या वळणावर झाडाखाली आम्ही थांबलो. तो म्हणाला, ‘‘दादा, आता तू चालवून पाहा.’’ पहिली गाडी आणि ते पहिल्यांदा आत्मविश्वासानं केलेलं ड्रायिव्हग अजूनही लक्षात आहे. अजूनही देवरूखला जातो, तेव्हा ते झाड दिसतं आणि तो अनुभव ताजा होतो. मग असं वाटतं, की हे झाड कधी इथून जाऊ नये, कायम राहावं!
अगदी लहानपणीही मला प्रवास भारी आवडत असे, असं आई सांगायची. बसच्या, ट्रेनच्या खिडकीतून मी टकामका, अगदी डोळय़ांतून पाणी येईपर्यंत बाहेर पाहात बसायचो. पळणारी झाडं, गाडय़ा, मागे जाणाऱ्या वस्त्या बघायला मला अजूनही आवडतं. आंबा घाटातून जाताना कासार-कोळवणचे डोंगर दिसतात. तिथे मी क्षणभर तरी थांबतोच.
माझे वडील वीज खात्यात मीटर रीडिंगचं काम करत. कधी ते आजारी पडले, तर मला त्या कामाला पाठवत. एकदा त्याकामी मी कुचांबे-पाचांबे गावात गेलो होतो. (आता ते धरणाखाली गेलं असावं.) कोकणातली अशी गावं, जिथे दिवसातून फक्त एकदाच एसटी जाते.. शिवाय एसटीच्या थांब्यापासून गाव आणखी आत दोन-तीन किलोमीटरवर, अगदी सह्याद्रीच्या कुशीत.. तो माझा तसा पहिलाच अनुभव. कुचांबेला दिवसभर मीटर रीडिंग करायचं आणि रात्री वस्तीला राहून दुसऱ्या दिवशी पाचांबेचं मीटर रीडिंग! मी ही गावं, टुमदार घरं, नदी बघताना अगदी हरखून गेलो होतो. घरं तर इतकी सुंदर, की एखाद्या घरात पाच मिनिटं बसावंसं वाटे. मग मी त्यांच्याकडे पाणी मागायचो. कुणी तरी चहासुद्धा आणून द्यायचं. तेवढा वेळ तिथं असणंही खूप आनंददायी होतं. तिथे जी गिरणी होती, त्याचे मालक वडिलांचे मित्र होते. त्यांच्याकडे रात्री सुक्या मच्छीचं कालवण केलं होतं. ते जेवून झोपलो. आयुष्यभराच्या सोबती होतात या आठवणी! सुवासाशी काही आठवणी बांधलेल्या असतात. आजही कॉफीचा वास आला, की न्यूयॉर्कचं विमानतळच आठवतं, सोनेरी सूर्यप्रकाश दिसल्यावर लॉस एंजेलिस आठवतं..
आम्ही कॉलेजमध्ये होतो, तेव्हा माझ्या वडिलांनी कुटुंबाची एक मोठी सहल आखली होती. देवरुखातून सांगली, तिथून हैदराबाद, मग विशाखापट्टणम्, विजयनगर,ओदिशा, पश्चिम बंगाल, तिथे कोलकाता, नंतर सिलिगुडी, दार्जिलिंग, काशी-विश्वेश्वर, बुद्धगया, भोपाळ, जबलपूर-भेडाघाट, असा सगळा प्रवास करून आम्ही दीड-दोन महिन्यांनी देवरुखला परतलो होतो. त्या वेळी पर्यटन सुखावह नसे. शिवाय सगळा प्रवास बसमधून; पण त्यातल्या कित्येक स्मृती अजून जागत्या आहेत. विविध प्रदेशांचा, माणसांचा अनुभव जेवढा तयार होईल, तेवढे आपण वृिद्धगत होत जातो. माणूस म्हणून आणि कलाकार म्हणूनही! त्यासाठी फक्त परदेशात किंवा फक्त प्रसिद्ध पर्यटनस्थळांनाच जायला हवं असं मुळीच नाही. अगदी लहान गावांमध्येही दोन-दोन दिवसांच्या सहलींना जातो, तो प्रवासही मोहकच असतो. सहलीला निघाल्यापासून इच्छित स्थळी पोहोचण्याच्या मधला जो प्रवास असतो, तोच कित्येक गोष्टी शिकवतो. फक्त सर्व इंद्रियं जागी ठेवून, मन स्पंजसारखं ठेवून त्याकडे पाहायला हवं.
मला असंही वाटतं, की जो माणूस खूप प्रवास करतो, तो तडजोडी करायला नेहमी तयार असतो. तो मनानंही संतुलित राहू शकतो, सहसा कुठली अतिरेकी भूमिका घेत नाही. ज्यानं प्रवासातल्या अडीअडचणींना तोंड देत डोळसपणे प्रवास केलाय, माणसं, त्यांची संस्कृती बघितलीय, ती व्यक्ती आपसूकच विवेकाकडे जाते, असं माझं मत आहे. जिथे संकटांना तोंड देत समायोजन करावं लागतं, अशा ठिकाणी ही व्यक्ती उत्तमरीत्या जुळवून घेऊ शकते. असं पर्यटन आणि त्यासाठीचा प्रवास मला अपेक्षित असतो आणि शक्य तेव्हा मी तो करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच माझ्या अनेक प्रवासांनी रंजनाच्या बरंच पुढे जाऊन माझ्यात भर घातली. वारंवार आठवाव्यात अशा अनेक चांगल्या आठवणी मला दिल्या. असे प्रवास यापुढेही आयुष्यभर आणि पुन:पुन्हा घडत राहावेत!
नाटकाच्या निमित्तानं तर राज्यापासून परदेशापर्यंत अनेक ठिकाणी फिरणं होतं. तिथे जे पाहण्याजोगं असेल, ते आवर्जून पाहून घेतो. विशेषत: मला वस्तुसंग्रहालयं पाहायला फार आवडतात. कोल्हापूर, इंदौर, बडोद्याची वस्तुसंग्रहालयं मनाला खाद्य पुरवतात. अगदी मुंबईहून पुण्याला जरी चाललो असलो, तरी प्रत्येक वेळचा प्रवास वेगळा असतो, माणसं वेगळी असतात. नाटकांचे दौरे तर वेगवेगळय़ा मोसमांत असतात आणि ऋतूनुसार ती ती शहरं फार वेगळी दिसतात. निसर्ग वेगळा दिसतो. कोल्हापूर, सातारा, तिथे जाताना दुतर्फा दिसणारी सुपीक शेतं, ऊसशेती, औरंगाबाद, हे प्रवास हवेहवेसे वाटतात नेहमी..
हम्पीचं मंदिर, मीनाक्षी मंदिर, सूर्यमंदिर, ही ठिकाणं बघून आल्यावर खूप काळ मनात रुंजी घालत राहतात. मी अमेरिकेला गेलो होतो. तिथे नायगरा धबधबा बघितल्यावर वाटलं होतं, की बास! याहून भव्य काय असू शकतं?.. अगदी साधं उदाहरण.. आमच्या संगमेश्वर-देवरुख इथे कर्णेश्वरचं मंदिर आहे. तिथे गेल्यावर वाटतं, की काळ थांबलाय इथे! जेव्हा ते मंदिर बांधलं गेलं होतं, त्या काळात आपण आपसूक प्रवेश करतो. वर्तमानातून भूतकाळात, तिथून पुढे इथे आणखी काय घडेल हा भविष्याचा वेध, असा एक समांतर प्रवास मनात सुरू होतो. हे मला खूप आकर्षक वाटतं; पण हे सर्व कधी अनुभवास येईल? जेव्हा पर्यटनाला निघताना तुम्ही स्वत:ला तसं बजावून बाहेर पडाल तेव्हा! रोजच्या प्रपंचातून बाहेर आल्याशिवाय हे अनुभव येणार नाहीत. मग भले तुम्ही पर्यटनावर कितीही पैसे खर्च करा! ‘उद्या ऑफिसला जायचंय’ हाच विचार जर मनात असेल, तर समोरच्या समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्याचा आनंद घेता तरी येईल का?..
मनात असं एक विश्व निर्माण करणारं पर्यटन खरं! ते जेव्हा आणि जिथे जमेल तिथे जरूर करावं. त्यातून निखळ आनंद आणि खूप दिवस पुरणारं विचारांचं खाद्य मिळेल!
vaibhavmangale@gmail.com