‘वळणबिंदू’ हे सदर म्हणजे केवळ तरुणांच्या आई-वडिलांच्या पिढीविषयी तक्रार करणाऱ्या कथा नव्हत्या. पालकांची बाजू आजवर अनेकदा मांडली गेलेली असताना, आताच्या नवीन पिढीचीही काही बाजू असू शकते, ती ‘चूक-बरोबर’च्या फूटपट्टया न लावता पालकांनीही ऐकावी, असा याचा उद्देश. वैचारिक भिन्नतेमुळे पालक आणि तरुण मुलं-मुली एकमेकांकडून वारंवार दुखावले जाण्याचे, त्यांच्यात दरी निर्माण होण्याचे प्रसंग कमी व्हावेत ही अंतिम अपेक्षा होती. कारण एकमेकांनी अंतर्मुख होण्यासाठी आणि ‘दुसरी बाजू’ समजून घेणं महत्त्वाचं.
‘वळणबिंदू’ या लेखमालेची निर्मिती हाच मुळी एक अनपेक्षित वळणबिंदू आहे! अशी लेखमाला लिहिण्याचं मी आधी ठरवलं नव्हतं. परंतु ‘चतुरंग’च्या संपादकांनी, पालकांची बाजू मांडणारं बरंच लेखन ‘चतुरंग’मध्ये आतापर्यंत झालं आहे, पण तरुणांची बाजू पालकांपुढे मांडणारं लिखाण तुलनेनं कमी आहे.. या विषयाला धरून लेखमाला लिहावी, अशी कल्पना सुचवली आणि या लेखमालेचं बीज रुजलं गेलं. सर्वसाधारणपणे जे मानसशास्त्रीय लेख लिहिले जातात, त्यात समस्येचं स्वरूप, त्याचं विश्लेषण, उपाय यांची चिकित्सा असते. ‘वळणबिंदू’ लेखमालेसाठी मात्र रूढ आकृतीबंध न निवडता एक प्रयोग करायचं मी ठरवलं. थेट उपाय न सांगता किंवा उपदेश आणि सल्ल्यांचा भडिमार न करणारा आकृतिबंध मी लेखमालेसाठी निवडला. यासाठी तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारी अनेक पात्रं स्वत:चे मनोव्यापार आणि भावनिक आंदोलनं उलगडून दाखवणारी मनोगतं वाचकांपुढे सादर करतील, अशी लेखरचना केली. या मनोगतांतून अंतर्दृष्टी शोधणं आणि त्याच्या आधारे स्वत:च्या मुलांबरोबरचे संबंध विस्कळीत झाले असतील, तर ते सुधारणं पालकांकडून अपेक्षित होतं.
हेही वाचा : मधल्या पिढीचं ‘लटकणं’!
वरवर पाहता हे लेख म्हणजे त्या पात्रांची गोष्ट किंवा कथा वाटते. पण वास्तविक हे समुपदेशनातील ‘भावनानिष्ठ’ तंत्र आहे. यात मुख्यत: आपल्या भावनिक प्रक्रिया बदलण्यावर भर दिला जातो. समस्याग्रस्ताचा संवाद ज्या व्यक्तीबरोबर तुटलेला आहे, त्या व्यक्तीच्या भूमिकेत समुपदेशक शिरतात आणि ती व्यक्ती स्वत:च्या मनात काय विचार करत असेल, ते बोलून दाखवतात. एरवी आपल्याला स्वत:चीच बाजू बरोबर वाटत असते. दुसरी बाजू समोर आल्यानं, त्याही बाजूत तथ्य आहे, हे लक्षात येतं. आपण काय केलं पाहिजे याबद्दलची वेगळी चर्चा समस्याग्रस्ताशी करण्याची गरजच पडत नाही. दुसऱ्या व्यक्तीच्या स्वगतातच आपण काय करायला पाहिजे, याची उत्तरं दडलेली असतात; फक्त ती अंतर्मुख होऊन शोधावी लागतात. आपल्या सगळयांना रेडीमेड उत्तरांची इतकी सवय लागली आहे, की स्वत: विचार करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात नाही. पण स्वत: शोधलेली उत्तरं ही रेडीमेड उत्तरांपेक्षा जास्त फलदायी असतात आणि बदलाला प्रवृत्त करणारी असतात. हेच तंत्र या लेखमालेत मी वापरलं. मानवी नात्यांतले संबंध इतके गुंतागुंतीचे आणि व्यामिश्र असतात, की एकच एक उत्तर किंवा उपाय सरसकट सगळयांनाच लागू होत नाही. म्हणून थेट उपाय न सांगता पालकांनी आत्मपरीक्षण करून पावलं उचलावीत, हा उद्देश हे सदर लिहिताना होता. अर्थात ‘चतुरंग’चे वाचक अशी सक्रिय पावलं उचलणारे आणि या सदराचा हेतू कळण्याएवढे परिपक्व आहेत, याची खात्री असल्यामुळेच मी हा प्रयोग करू शकले.
हेही वाचा : नवीन वर्षांचे स्वागत करताना.. उद्देश आणि सिद्धांत : युरेका क्षणाचा साक्षात्कार..
लेखमाला लिहिण्यास सुरुवात केली, तेव्हा अनेक आव्हानं सामोरी आली. मुलांची बाजू मांडताना ती एकांगी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागत होती. सर्व व्यक्तिरेखा समतोलपणे उभ्या करणं आवश्यक होतं. पालक जे म्हणत आहेत त्यातही तथ्य आहे, हे दाखवण्याचीही दक्षता घ्यावी लागत होती. वयोगट व्यापक असेल तर अनेक विषय मांडता येतात. परंतु तरुण पिढीच्या पालकांशी असलेल्या परस्परसंबंधांवरचे विषय लेखमालेसाठी निवडायचे असल्यामुळे विषयांचं आकुंचन होईल का किंवा तोचतोचपणा येईल का, अशी साशंकता सुरुवातीला होती. परंतु लेखमाला जसजशी आकाराला गेली, तसतसे तरुण पिढीतले इतके विषय डोळयांसमोर येऊ लागले, की लेखमाला संपली तरी ते पुरे पडले नाहीत.
‘वळणबिंदू’ सुरू झाली आणि पहिल्या लेखापासूनच वाचकांचा उदंड प्रतिसाद आला. असा प्रतिसाद हा लेखकाला संपन्न करणारा असतो आणि त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मन:पूर्वक आभारी आहे. ‘आम्हाला आता दुसरी बाजू लक्षात आली’, ‘आमचा मुलांशी असणारा संवाद आता सुधारेल’, ‘काय बदल करायला हवा हे लक्षात आलं’, अशा आशयाचे पालकांचे अनेक प्रतिसाद आले. आपली बाजू मांडल्याबद्दल आणि आमच्या भावनांना शब्दरूप दिल्याबद्दल अनेक तरुण मुलामुलींचेही प्रतिसाद आले. काही वाचकांनी, ‘तुम्ही आम्हाला उपाय का सांगत नाही?’ अशी पृच्छा केली, तर काहींनी उपाय न सांगता स्वत:च उत्तर शोधण्यास प्रवृत्त केल्याबद्दल आभार मानले. काही लेखांचं ‘ऑडिओ’ रूपात सादरीकरण झालं, तर काही लेख वेगवेगळया मंचावर सादर झाले. ‘सिंगल बाय चॉइस’ या लेखावरून एका वाचकाला कादंबरी लिहिण्याची प्रेरणा मिळाली.
हेही वाचा : शोध आठवणीतल्या चवींचा: विस्मृतीतील पदार्थाच्या चवदार आठवणी!
‘तुमच्या पाहण्यात आलेल्या समस्याग्रस्तांच्या कहाण्या तुम्ही लेखांतून मांडता का?’ अशी विचारणा काहींनी केली, तर काहींना मी माझ्या जीवनातली स्वत:चीच कहाणी मांडली आहे, असा समज करून घेतला. मला हे आवर्जून नमूद करावंसं वाटतं, की ‘वळणबिंदू’साठी निवडलेल्या पात्रांची मनोगतं ही माझी स्वत:ची मनोगतं नाहीत, तर लेखमालेत मांडलेल्या सर्व व्यक्तिरेखा या काल्पनिक असून त्या माझं तरुण पिढीबद्दलचं निरीक्षण, वाचन, मनन यावर आधारलेल्या आहेत. मानसशास्त्रज्ञाला तिसरा डोळा घेऊन पाहावं लागतं. त्यातून पाहताना जे नजरेला पडत जातं, ते पात्रांच्या मनोगतातून व्यक्त झालं आहे. काही वाचकांनी विचारलं, की ‘तुम्ही पालक चूक आहेत हेच का दाखवता?’ अर्थात त्याचं उत्तरं मी पहिल्या लेखात दिलं आहे. ‘वळणबिंदू’चा उद्देश हा कुणावर टीका करणं हा नाही. तर त्या पात्राला जे मनापासून वाटत आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा आहे. तुमची बाजू तुम्हाला माहीतच आहे. ती नव्यानं सांगण्याची गरज नाही. ‘चतुरंग’मध्ये ती अनेकदा मांडली गेली आहे. पण नवीन बाजू कळली, तर सर्वांगीण विचार करता येईल, युवा पिढीशी होणाऱ्या संघर्षांची धार निवळत जाईल, दुराव्याचं अंतर कमी होऊ शकेल, परस्पर-संवाद वाढीला लागेल, आणि हेच ‘वळणबिंदू’चं मुख्य उद्दिष्ट आहे.
हेही वाचा : कलावंतांचे आनंद पर्यटन: सहा हजार वर्षे सोळा दिवस
‘सिंगल बाय चॉइस’, ‘मूल नको गं बाई’, या लेखांतील पात्रांच्या भूमिका न पटणारीही काही पत्रं आली. लेखातील मनोगतं ही तरुण पिढीची स्पंदनं आहेत. ती तुम्हाला आवडो किंवा न आवडो, ती तुमच्या वैयक्तिक मतांशी जुळणारी असोत व नसो, पालक किंवा नागरिक या नात्यानं तुम्हाला त्यांच्याशी आज न उद्या सामना करणं भाग आहे. तरुण पिढीला तसं वाटतंय याचा स्वीकार करायचा की नाही, ते तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्ही त्याच्याकडे डोळेझाक करणार असाल, या समस्या नाहीतच असं म्हणणार असाल किंवा ‘चूक-बरोबर’च्या फूटपट्टया लावून त्यांना वाटतंय ते कसं चूक आहे, असं ‘जजमेंट’ करणार असाल, तर तुम्ही तरुण पिढीपासून भावनिकदृष्टया अधिक लांब जाल. तुमच्यातली मानसिक दरी आणखीनच वाढत जाईल. ती सांधायची असेल, तर पहिलं म्हणजे तरुण पिढीच्या या भावना आहेत, ही त्यांची मतं आहेत, हे मान्य करा. हे मान्य करणं म्हणजे त्यांच्या मताला संमती देणं नव्हे. पण त्यांना तसं वाटू शकतं, या वस्तुस्थितीचा स्वीकार करणं. हा स्वीकार केला, की पुढच्या पायरीवर साधकबाधक चर्चा करता येते. परंतु ती मान्य करण्यासाठी तरुण पिढीला आपल्यापेक्षा वेगळं वाटू शकतं हे स्वीकारावं लागेल. त्यासाठी ‘ऐकून घेण्याची मानसिकता’ जोपासावी लागेल किंवा विरोधी विचार स्वीकारण्याची खुली जीवनदृष्टी ठेवावी लागेल. अशी मानसिकता जोपासण्यास वळणबिंदूत आवाहन केलं आहे. अर्थात याही वाचकांचे मी आभार मानते, कारण माझी ‘ऐकून घेण्याची मानसिकता’ वृद्धिंगत होण्यास त्यांनी हातभार लावला आहे.
हेही वाचा : पाहायलाच हवेत: अजीब दास्ताँ हैं ये!
तरुण पिढीचं पालकत्व हे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत चाललेलं आहे. हा टप्पा पालकांसाठी अवघड आणि नाजूक असतो. पालकांसाठी ते महत्त्वाचं स्थित्यंतर असतं. मुलं सज्ञान झालेली असतात. त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धुमारे फुटलेले असतात. एका स्वतंत्र आणि वेगळया व्यक्तीत त्यांचं रूपांतर झालं असतं. वळण लावण्याचं वय निघून गेलं असतं. आपण सांगू ते मुलं ऐकत नाहीत, तरीही मुलांमधली गुंतवणूक थांबवता येत नाही, अशी अवघड अवस्था पालकांची असते. मुलांच्या बोलण्यामुळे किंवा कृतीमुळे दुखावलेले पालक घरोघरी आढळून येतात. काही मुलांपासून भावनिकदृष्टया तोडले जातात, तर काही मुलांच्या पाठी जाऊन स्वत:ची फरफट करून घेतात. ही दोन्ही टोकं न गाठता त्यातील सुवर्णमध्य गाठण्याचं आणि स्वत:चं मानसिक स्वास्थ्य सुस्थितीत ठेवण्याचं खडतर आव्हान पालकांपुढे असतं. हे आव्हान समर्थपणे पेलण्यासाठी आजच्या समारोपाच्या लेखात मी एक मंत्र नमूद करत आहे, की ज्याचा उपयोग तरुण पिढीशी सामंजस्य प्रस्थापित होण्यासाठी तुम्ही करू शकाल. या मंत्राचं नाव आहे- HOPE.
H-Healthy Detachment- निरोगी विलगता- आपल्या मुलांशी आपलं नातं कितीही घट्ट जोडलेलं असलं, तरी पालक-मुलांच्या नात्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर मूल वैचारिकदृष्टया आणि भावनिकदृष्टया आपल्यापासून विलग होणं अपरिहार्य आहे. विलगतेचा हा टप्पा आज ना उद्या येणार, याची मानसिक तयारी करणं आणि कटुता न बाळगता त्याचा स्वीकार करणं, म्हणजे निरोगी विलगता होय. ती आधीपासूनच जोपासली, तर पालक आणि मूल दोघांनाही स्वतंत्र अवकाश मिळू शकतो आणि अंतरावर राहून निरोगी नातं जोपासता येतं.
O- Open Communication- खुला संवाद- अनेकदा पालक-मुलांच्या तणावलेल्या संबंधांचं मूळ हे विसंवादात असतं. कितीही तणाव आले, चढ-उतार आले, तरी मुलांशी संवाद ठप्प करू नका. संवादाचा एक मार्ग बंद झाला, तर दुसरा शोधा. संवाद जितका खुला, मोकळा होईल तेवढे तुमचे नातेसंबंध सुधारतील, हे लक्षात ठेवा.
हेही वाचा : देहभान: निकोप कामसंवाद वाढवू या!
P- Positive Reinforcement- धन प्रबलीकरण- अनेकदा पालक मुलांमधील कमतरता उगाळत बसतात. तुलनेनं त्यांची बलस्थानं फार कमी वेळा बोलून दाखवतात. पालक आपल्यावर सतत टीका करतात असं वाटून मुलं भावनिकदृष्टया दुरावतात आणि न्यूनगंडाचे बळी होऊ शकतात. हे टाळायचे असेल, तर मुलांमधल्या सकारात्मक गोष्टीची आवर्जून दखल घ्या आणि त्या बोलून दाखवा.
E- Empathy- सह-अनुभूती- ‘तुमच्या मुलांना एक बाजू आहे आणि ती त्यांच्या दृष्टीनं खरी आहे,’ हे लक्षात ठेवलंत, तर त्यांची बाजू ‘चूक-बरोबर’ असं निदान न करता ‘ऐकून घेण्याची मानसिकता’ तुमच्यात निर्माण होऊ शकेल. तुमच्यातल्या संवादाचे अनेक दरवाजे त्यामुळे उघडले जातील.
एकदा पालक झालं की आयुष्यभर पालकत्व निभावून न्यावं लागतं, मग मुलं कितीही मोठी झाली तरीही! हा एक न संपणारा प्रवास असतो. आपल्या सगळयांचा हा प्रवास सुखद होवो आणि अनेक आनंदाचे वळणबिंदू या प्रवासात येवोत ही शुभेच्छा!
anjaleejoshi@gmail.com
(सदर समाप्त)