‘ये जो प्यार नाम की चिडिया हैं.. हॉर्मोन्स के अलावा कुछ नहीं हैं! सब ऑरगॅनिक केमिस्ट्री हैं।’ असं म्हणून प्रेयसीला ‘प्रपोज’ करणाऱ्या अजय देवगणचा ‘युवा’मधला ‘डायलॉग’ वीस वर्षांपूर्वी गाजला होता. प्रेमातला ‘हृदया’पेक्षा मेंदूचा असलेला वाटा मान्य करण्यापर्यंतचा मोकळेपणा पुढच्या वीस वर्षांत आला. मेंदू कसं करतो या रासायनिक क्रियांचं संचलन? ‘व्याख्येत मांडता न येण्याजोगं- ‘झोपाळ्यावाचून झुलायचे’ इथपासून ते ‘हृदय रिकामे घेऊन फिरतो..,’ पर्यंतच्या ‘केमिस्ट्री’विषयी.. येत्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या (१४ फेब्रुवारी) निमित्तानं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१४ फेब्रुवारी, म्हणजे संत व्हॅलेंटाइन यांच्या नावाचा, प्रेमाच्या गावी जाण्याचा दिवस! आपल्या सखीला किंवा ‘सख्याहरी’ला आपलं प्रेम जाहीरपणे सांगण्याची संधी देणारा दिवस. ‘व्हॅलेन्टाइन्स डे’ हा आगळावेगळा दिवस. काही लोकांसाठी हा नेहमीच्या दिवसांसारखा नाही उजाडत! सूर्यही जरा लाजत, दबकत उगवतो, उषेचा रक्तिमा अधिक गडद भासतो आणि हवाही पॅरिसच्या हवेसारखी धुंद नशिली बनून जाते. त्यातून या दिवशी आपल्याकडे ‘वसंत पंचमी’; म्हणजे भारतीय कामदेवाचा उत्सव आणि अभारतीय ‘लव्ह डे’ असे एकत्र आले आहेत. म्हणतात ना, ‘आधीच हा, त्यातून हा!’ प्रेमाचा हा झरा, आहे मूळचाची खरा!

हेही वाचा – अजूनही अदखलपात्र विधवांचे जिणे!

कित्येक प्रेमवीर आणि प्रेमवीरांगनांसाठी ‘व्हॅलेन्टाइन्स डे’ची आदली रात्र म्हणजे तळमळ, अस्वस्थता. भेटवस्तू, गुलाबी रिबीन, लाल टपोरा गुलाब, कचकडयाची हृदयं, कार्ड्स, केक्स, शिवाय खास कपडे, आपला लूक.. प्रेमयाचनेचे हे ठरलेले संकेत, पण ते असूनही ‘अव्हेर झाला तर?’ ही चिंता. शिवाय तीव्र शारीरिक ओढीसह, प्रचंड भावनिक गुंतवणूक असलेलं हे नातं पुढे ‘आयुष्यभरासाठी लाभावीण प्रीती ठरेल ना?’ ही तर ‘लॉन्गटर्म’ चिंता.
खरंच काय असतो हा प्रेम नावाचा केमिकल लोच्या? ‘त्या’ क्षणी काळीज धडधडतं, कानशीलं तापतात, सर्वांग मोहरून जातं, हुरहुर लागते, जग अर्थशून्य भासतं, कोण्या जनूचा मजनू बनून जातो. आशिक कधी जग उद्ध्वस्त करू पाहतात, तर कधी कधी स्वत:लाच उद्ध्वस्त करून घेतात. पण हे सगळं होतं कसं?

‘इम्यूनो-न्यूरो-एंडोक्राईन सिस्टिम’ अशा भयसूचक नावाची काही कार्यप्रणाली आपल्या सर्वात असते. आपली प्रतिकारशक्ती, मेंदू, नसा आणि अंत:स्त्रावी ग्रंथी यांचं प्रगाढ नातं असतं. हे नातेसंबंध म्हणजेच ही कार्यप्रणाली. आपलं प्रेमपात्र दिसताच ‘बरंऽऽऽ’ वाटणं इथपासून नकार येताच निराशेनं अंथरूण धरणं, हे सगळं सगळं या सदरात घालता येईल. या साऱ्याच्या मर्मस्थानी असतात हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्रंथी. ही मंडळी साऱ्या अंत:स्त्रावी (एंडोक्राइन) ग्रंथींचा कारभार नियंत्रित करत असतात. म्हणजेच साऱ्या शरीरसृष्टीचे हे नियंते. या नियंत्यांकडे डोपामीन, ऑक्सीटोसीन, टेस्टोस्टेरोन अशी अनेक आयुधं आणि अंकुश असतात.

यातलं डोपामीन हा ‘सुख रस’. डोळ्याला डोळा भिडला, एकांताचा वास घडला की हा मेंदूभर पसरतो. अंगी अगदी वसंत फुललेला. मग आनंदाचे डोही आनंद तरंग. प्रेमात पडलेली माणसं तारतम्य आणि ताळतंत्र गमावून बसतात ते या डोपामीनमुळे. म्हणजे हा स्त्रवत असला की मनाला शांत, आनंदी, प्रसन्न वाटतं. शरीरही त्या आनंदात सहजच सामील झालेलं असतं आणि हा अनुभव वारंवार मिळावा अशी आस लागते. पण याच डोपामीनचा हाच परिणाम माणसाला व्यसनाधीनसुद्धा बनवू शकतो. व्यसन कसलंही असू शकतं. प्रेमाचं, दारू-जुगाराचं किंवा लेखन-व्यासंगाचं. सर्वत्र डोपामीन कार्यरत असतं.

याचाच एक मित्र. त्याचं नाव ऑक्सीटोसीन. हा ‘ममता रस’. एकमेकांच्या कुशीत अगदी खुशीत, निश्चिंतपणे विसावताना जो विश्वास, जी जवळीक, जे भावनिक तादात्म्य जाणवतं ना; ते या ऑक्सीटोसीनमुळे. ‘जन्मोजन्मी मी तुला..’, ‘दुनिया गेली तेल लावत..’, ‘तुला चंद्रावर नेऊन..’ अशा शब्दांनी सुरू होणारी वाक्यं आणि त्यामागचा दुर्दम्य आणि बहुतेकदा फाजील आत्मविश्वास ही ऑक्सीटोसीनची देन आहे. हाती हात धरताना, घट्ट मिठीत मुरताना याची मदत होते, तसं सामाजिक ओळखीपाळखी आणि नाती सांभाळण्यातही याचा हात असतो.

असाच एक व्हासोप्रेसिन नामक गडी आहे. हाही पिट्युटरी ग्रंथीतून झरत असतो. वारंवार ब्रेकअप होणाऱ्या आणि हे धक्के वारंवार पचवून हृदयाला पोचे आलेल्या प्रेमवीरांनी पुढील मजकूर अगदी काळजीपूर्वक वाचावा! व्हासोप्रेसिनला म्हणतात ‘एकगमनी रेणू’. थोडक्यात, एकपत्नीव्रती किंवा एकपतीव्रती राहण्यासाठी हा सहाय्यभूत ठरतो. हा जितका अधिक, तितकं नातं घट्ट. बाहेर भानगडी करू नयेत, जोडीदार/जोडीदारीण एकनिष्ठ राहावा/वी म्हणून गंडेदोरे करण्यापेक्षा, व्हासोप्रेसिनची मात्रा निश्चित लागू पडणारी आहे. मात्र ‘नवऱ्याला ही गोळी घालावी, म्हणजे त्याचे ‘बाहेरचे’ खयाल बंद होतील,’ अशी निष्ठावर्धक वटी अजून बाजारात आलेली नाही! पहिल्या भेटीत तिच्या/त्याच्याबद्दल काही वेगळंच वाटायला लागलं की समजावं, की हायपोथॅलॅमसही आता चांगलंच तापलं आहे. आता डोपामीनचा पूर येतो, माणूस प्रेमात गटांगळ्या खाऊ लागतो, सारं जग विसरायला होतं, फक्त आणि फक्त त्याचं/तिचं स्मरण होत राहतं. मनात फक्त तेवढाच विचार.. ती/तो आता काय करत असेल? पण शरीरात मात्र ऑक्सीटोसीन आणि व्हासोप्रेसिन पुढच्या तयारीला लागलेले असतात. या नाजूक नात्याला काही संदर्भ द्यायला, अधिक सखोल करायला, काही भविष्य द्यायला सरसावलेले असतात. जसं नातं रुजत जातं, जसं ते फुलत जातं. मनं मिळून मिसळून जातात, तारा जुळून येत जातात. तसं ही भारदस्त इम्यूनो-न्यूरो-एंडोक्राईन सिस्टिम आपली साथसंगत करत राहते. हॉर्मोन्सच्या लाटा येतात, जातात. आस, आसक्ती, सक्ती, मर्यादा, मालकीभावही येत जात राहतात. शरीर शरीरसुखाची मागणी करतं. ही असते टेस्टोस्टेरोनची करामत. हा एक ‘नर-रस’. म्हणजे दाढी-मिशांशी आणि पुंबीज निर्मितीशी याचं नातं. मात्र नराला आणि नारीलाही कामेच्छा निर्माण होते ती याच्यामुळे.

कोणतंही नातं म्हटलं, की त्यात ताणतणाव आलेच. ब्रेकअपही आले आणि पॅचअपही. मग विरह आला. पाण्याविना मासोळीसम तळमळणं आलं. आता ‘स्ट्रेस-हॉर्मोन’- कोर्टीसॉल, उसळी मारतो. उपचार लागावेत अशी टोकाची अस्वस्थता अनुभवास येते. पण बऱ्याचदा सारं स्थिरस्थावर होतं. नव्यानं संतुलन साधलं जातं. कोणत्यातरी नव्या बिंदूपाशी पुन्हा सारे हॉर्मोन्स तोलून राहतात.

हेही वाचा – संघर्षांनंतरचं यश

‘व्हॅलेंटाइन डे’ला जे घाऊक प्रमाणात ओसंडून वाहतं ते ‘प्रेम’ आहे की ‘आकर्षण’ हे प्रत्येकानं तपासून घ्यायला हवं. आकर्षण तीव्र, तात्काळ आणि आवेगी असतं. त्याच्या/ तिच्या दोषांकडे दुर्लक्ष किंवा प्रसंगी त्यांचं समर्थन वा उदात्तीकरणही केलं जातं. अनेक प्रेमविवाह फसतात, कारण ते मुळी प्रेमविवाहच नसतात! ते असतात ‘आकर्षण विवाह’. निव्वळ डोपामीनवर आधारलेले.

प्रेम अधिक खोल, अधिक गंभीर असतं. परस्परांना समजावून घेणं, सहवासातून, सह-अनुभूतीतून जाणून घेऊन मग दीर्घकालीन साथीचं वचन देणं-घेणं, हे अभिप्रेत असतं. त्यात समाज आणि संस्कृती अनेक फासे फेकत असतात. स्त्री आणि पुरुषांकडून विशिष्ट अपेक्षा बाळगून असतात. त्यांचे दबाव निर्माण होतात. त्यांना सामोरं जावंच लागतं. संवाद कौशल्यं, उत्तम भावनिक बुद्ध्यांक, समान ध्येयं-मूल्यं-आवडी असतील, तर असल्या दबावातूनही प्रेमाला उत्तम अधिष्ठान लाभतं.

प्रेम; एक सुखद भावना. एक दिव्य अनुभूती. पण ती चक्क इम्यूनो-न्यूरो-एंडोक्राइन सिस्टिमच्या भाषेत मांडता येते. पण यात वावगं काय? पचनसंस्थेचं, श्वसनसंस्थेचं कार्य आपण अशाच भाषेत, अगदी शाळेत शिकतो. पण एकूणच भावना, विचार, कलांचा प्रदेश आपल्याला अस्पर्श, अतीत, परामानवी वाटत असतो. पण असं काही नाही!

आधुनिक तंत्र-विज्ञानानं आता याही क्षेत्रात अनेक नवे शोध लावले आहेत. ‘प्रेमाचा थर्मामीटर’, ‘वशीकरण गुटिका’ आणि ब्रेकअपसाठी गुणकारी ‘पॅचअप मलम’ लवकरच मिळू लागेल! तोवर या दिवसाच्या ‘गुलाबी शुभेच्छा’!

shantanusabhyankar@gmail.com