पन्नाशीनंतर त्यांनी पहिल्यांदा सायकल चालवली आणि मग सायकलवरून ट्रेकला जाणं हा त्यांचा छंदच झाला. गोवा ते कोचिन हा ट्रेक पूर्ण होण्यास केवळ २ दिवस उरले असताना त्या सायकलवरून तोल जाऊन
५, ४, ३, २, १.. असे उलटे आकडे मोजल्यानंतर ज्याप्रमाणे एखादं रॉकेट सुसाट सुटतं, त्याप्रमाणे आयुष्याच्या उत्तरार्धात तुफान सुटलेल्या निरुपमा एक्स्प्रेसचं (प्रा. निरुपमा भावे) आत्ताचं आयुष्य म्हणजे एक झंझावात आहे. निवृत्तीला आयुष्याची नवी आवृत्ती का म्हणायचं हे यांच्याकडे बघून पटावं. वयाच्या पन्नाशी-साठीनंतर सायकलवरून आणि पायी जे ट्रेक केलेत आणि आजही करताहेत ते पाहून दिग्मूढ व्हायचं एवढंच काय ते आपल्या हातात उरतं.
गेल्या १२-१५ वर्षांत सायकलवरून जवळजवळ सगळा भारत पालथा घालणाऱ्या निरुपमाताईंनी वयाच्या ५२/५३ वर्षांपर्यंत सायकल एक फर्लागभरदेखील चालवली नव्हती. जे काही ते करायचं ते स्कूटरवरून. अगदी कोपऱ्यावरून मिरच्या-कोथिंबीर आणायलादेखील त्या स्कूटर बाहेर काढायच्या. त्या निरुपमाताईंच्या जीवनात एवढा आमूलाग्र बदल होण्यामागे जी घटना घडली ती त्यांच्याच शब्दात सांगयची तर.. ‘आयुष्य, घर..कॉलेज.. वाचन अशा संथ लयीत सुरू होतं. अशातच एकदा माझ्या पतीचे एक प्राध्यापक मित्र सायकलवरून आमच्या घरी आले आणि बोलता बोलता त्यांनी ‘सायकल आख्यान’ सुरू केलं. भरभरून बोलत होती स्वारी! चेहऱ्यावर आनंद नुसता फुलून आला होता. रोज घर ते कॉलेज हा जाऊन येऊन १५/१६ कि.मी.चा प्रवास सायकलवरून पार पाडत असल्याने तब्येतही धट्टीकट्टी दिसत होती. मुख्य म्हणजे त्या भव्य गृहस्थांचं त्या वेळचं वय होतं फक्त साठ. निरुपमाताई म्हणाल्या, ‘थोडय़ा वेळाने भावोजी परतले पण बॉम्बची वात पेटवूनच.’
त्याच दिवशी त्यांनी पुतणीची १५/२० र्वष धूळ खात पडलेली सायकल बाहेर काढली आणि दुरुस्त करून आणली. त्या पुनरुज्जीवित सायकलच्या सीटवर हात ठेवून निरुपमाताईंनी त्याच संध्याकाळी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून प्रतिज्ञा केली. ‘यापुढे पुण्यातल्या पुण्यात कुठेही एकटं जायचं असेल तर मी सायकलवरूनच जाईन.. पेट्रोल जाळणार नाही.. त्यांच्या त्या नियमात आज सत्तरीकडे झुकतानादेखील जरासाही बदल झालेला नाही.
निरुपमाताईंना आरोग्याचा वारसा आपल्या आईकडून मिळाला. त्यांची आई ९० व्या वर्षांपर्यंत तीन-तीन तास खाली बसून विणकाम-भरतकाम करत असे. त्यांचं माहेरचं नाव कुंदा मराठे. माहेर आणि सासर दोन्ही पुण्यनगरीतच. बुद्धी लहानपणापासूनच तेज. एम.एस्सी. (मॅथ्स)च्या दुसऱ्या वर्षांला असताना म्हणजे १९७० साली त्यांचं लग्न झालं तरी मार्कामध्ये फरक पडला नाही. फक्त विद्यापीठात पहिल्या ऐवजी दुसरा क्रमांक आला एवढंच काय ते. त्यानंतर वाडिया कॉलेजात शिकवत असताना पुन्हा एकदा शिकण्याची उबळ आली आणि मुलगा जेमतेम २ वर्षांचा असताना त्यांनी स्टॅटिस्टिक्स विषय घेऊन परत एम.एस्सी. केलं, ते मात्र पहिल्या नंबराने. पुढे त्याच विषयात एम.फिल. आणि १४ वर्षांनंतर मुलगा १०वी असताना मॅथ्समध्ये डॉक्टरेट. लग्नानंतर १७ र्वष ही बाई शिकतच होती.
अध्यापनही पुरी ४४ र्वष केलं. आधी वाडियात, मग फग्र्युसनमध्ये, त्यानंतर पुणे विद्यापीठात हेडशिप करून आता निवृत्त. निवृत्तीनंतरही पुणे इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये ४ वर्षे ऑनररी प्राध्यापक. जोडीदारही तितकाच विद्वान ‘फिलॉसॉफी ऑफ मॅथ्स’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय. या दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा मरिन इंजिनीअर असून सध्या हाँगकाँगला स्थिरावलाय.
सायकलशी मैत्री झाल्यावर एकदा निरुपमाताईंचं लक्ष वर्तमानपत्रातील एका बातमीकडे गेलं. ‘सायकल प्रतिष्ठान’ हा पुण्यातील एक ग्रुप सायकल प्रसारासाठी दर महिन्याच्या पहिल्या रविवारी रॅली काढतो. त्या संबंधी ते वृत्त होतं. ते वाचून निरुपमाताईही त्या फेरीत सामील झाल्या. तिथे त्यांना समजलं की त्या ग्रुपचा ‘वाघा बॉर्डर ते आग्रा’ हा ६०० कि.मी.चा सायकल ट्रेक ठरतोय. ग्रुप लीडरला जाऊन आल्या. पण मीटिंगमध्ये गेल्यावर त्यांना समजलं की ट्रेकची तयारी म्हणून एकजण वाईला जाऊन आला होता (जाऊन येऊन अंतर १६० कि.मी.) तर दुसरा ११० कि.मी. पार करून रांजणगावला; तिसरा आणि कुठे. हे ऐकून निरुपमाताई गुपचूप दुसऱ्या दिवशी एकटय़ाच कात्रजच्या घाटातून भोरला जाऊन आल्या. पुढच्या मीटिंगमध्ये जेव्हा भोरचं १२०कि.मी. अंतर पार करून आल्याचं (आणि तेदेखील साध्या सायकलवरून) सांगितलं तेव्हा ती मंडळी समजली की, ‘बाई अफाट आहेत म्हणून.’
त्यानंतर वाघा बॉर्डर ते आग्रा, भुवनेश्वर ते कलकत्ता, गोवा ते कोचिन, चेन्नई ते कन्याकुमारी, जोधपूर ते उदयपूर, कोटा ते अहमदाबाद, मनाली ते लेह, सौराष्ट्र, मध्यप्रदेश.. असा बराचसा भारत त्यांनी सायकलवरून पालथा घातला.
यातील गोवा ते कोचिन हा ट्रेक सफल संपूर्ण होण्यास केवळ २ दिवस उरले असताना गरुवायूरजवळ तोल जाऊन त्या सायकलवरून पडल्या आणि त्यांच्या पायाला घोटय़ाजवळ फ्रॅक्चर झालं. ग्रुप लीडर डॉक्टर होता. त्याने कोचिनला गेल्यावर पायाला प्लॅस्टर घातलं. पण निरुपमाताईंना एक वेगळीच चिंता होती. ती अशी की, तिथून परत आल्यावर ‘गंगासागर ते गोमुख’ हा २४०० कि.मी. चालण्याचा ट्रेक एका वेगळ्या ग्रुपबरोबर आधीच ठरला होता त्याचं काय? शेवटी बरोबरच्या मैत्रिणींचा आग्रह आणि मनाचा निर्धार यांचा विजय झाला आणि निरुपमाताई ‘प्लॅस्टरमधला पाय, कुबडय़ा आणि पोर्टेबल कमोड’ यासह निघाल्या. गंगेच्या संपूर्ण किनाऱ्यावरील गावांमधून रोज २० कि.मी. चालत, तिथल्या गरीब, गर्भवती महिलांचे आरोग्याविषयक प्रबोधन करायचं हा त्या ट्रेकचा हेतू. १०० दिवसांच्या या प्रवासाची झिंग एवढी की, त्यासाठी निरुपमाताईंनी ४ महिन्यांची बिनपगारी रजाही घेतली. पाय प्लॅस्टरमध्ये होता तेव्हा महिनाभर जेव्हा बाकीच्या चालायच्या तेव्हा यांनी सामानाबरोबर बसमधून प्रवास केला. मात्र बस थांबताच बाहेर सतरंजी टाकून तेवढय़ा वेळात एक अख्खी साडीही भरतकामाने भरली. कोचिनला घातलेलं प्लॅस्टर १ महिन्याने फराक्काला निघालं. त्यानंतर थोडा थोडा सराव करून आठवडाभरातच ही जिद्दी बाई प्रथम रोज ५ कि.मी. आणि नंतर सगळ्यांबरोबर रोज २० कि.मी. चालायलाही लागली. निरुपमाताई म्हणतात, ‘पुढचे ३ महिने रोज दिवसभर चालल्याने परत येईपर्यंत पायाला काही झालं होतं हेदेखील मी विसरून गेले होते.
‘मनाली ते लेह’ हा त्यांच्या मते सर्वात आव्हानात्मक ट्रेक. एवढय़ा लांब स्वत:च्या सायकली नेणं शक्य नव्हतं म्हणून सोलंग येथे भाडय़ाच्या सायकली घेऊन सुरुवात झाली. एकूण २० जणांत ज्येष्ठ नागरिक या एकटय़ाच. पण वय आणि स्टॅमिना याचं प्रमाण मात्र व्यस्त. खार्दुंगलापास या सर्वात उंच (१८३०० फूट) गाडीरस्त्यावरून सायकल चालवण्याची त्यांची इच्छा एवढी जबरदस्त की त्यासाठी त्यांनी केलेली तयारी पाहूनच एखाद्याला भोवळच यावी. दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी कधी ताम्हीणीचा घाट (जाऊन येऊन १८० कि.मी.) तर कधी पाचगणीचा घाट (जाऊन येऊन २२० कि.मी.) तर कधी आणखी एखादा अवघड मार्ग.. अशी त्यांची प्रॅक्टिस नियमितपणे सुरू होती. मुळात ‘९० मिनिटांत सिंहगड पार करता येणं’ ही या ट्रेकला प्रवेश मिळण्यासाठीची अट होती. निरुपमाताईंना पहिल्या खेपेला ११० मिनिटं लागली. प्रयत्नांनंतर हा वेळ जेव्हा ८५ मिनिटांवर आला तेव्हाच त्यांनी आपलं नाव पक्कं केलं. त्या म्हणाल्या, ‘प्रत्यक्षात हा ट्रेक करताना शेवटचे २ दिवस मी प्रचंड दमले होते. पण खार्दगलापासला पोहोचल्यावर मला एवढं ‘स्फु रण आलं की मी चक्क सायकल दोन्ही हातात धरून उंच उचलली. हिप हिप हुर्ये! वी डिड इट!’
अशा अवघड ट्रेकमध्ये पाळायची अवधानं सांगताना त्या म्हणतात, ‘मुख्य म्हणजे श्वासोच्छ्वास आणि पायडलिंग यांच्यात समन्वय हवा; तरच न दमता सायकल चालवणं शक्य होतं. यासाठी रोज सकाळी तासभर योगासनं अनिवार्य. शरीर कार्यक्षम राहावं म्हणून खजूर, केळी, तूप, प्रोटीन पावडर याबरोबर लसणीच्या २/४ पाकळ्या, कढिपत्त्यांची पानंही खावीत. त्याबरोबर तहान लागली नाही तरी रोजचं ४ लिटर पाणी पिणं गरजेचं. पाणी पित राहिलं की दुसराही प्रश्न उभा राहतो खरा, त्याचा निचरा तिथेच आसपास लाड-भीड न बाळगता करायचा. लुकला ते कालापत्थर (एव्हरेस्टचा पायथा) हा ९८०० फूट उंच ट्रेक पायी चढतानाचा अनुभव सांगताना अनुपमाताई म्हणाल्या, ‘शेवटचा टप्पा गाठण्यासाठी जेव्हा आम्ही गोरक्षेपहून पहाटे ३ ला चढायला सुरुवात केली तेव्हा बाहेरचं तापमान होतं- १० सेंटीग्रेड, त्याचबरोबर उडून जाऊ इतका वारा. पाठीवरच्या पाण्याचं तर केव्हाचं बर्फ झालं होतं. आमच्या १३ जणांच्या टीमपैकी एकेक करून ९ जण पाठी फिरले. मनाच्या सामर्थ्यांवर मी कशीबशी रेटत होते. पण एका क्षणाला माझ्याही अंगातलं त्राण संपलं. निराश होऊन मी बाजूच्या दगडावर बसकण मारली. इतक्यात एक परदेशी मुलगी चढता चढता माझ्यापाशी आली आणि म्हणाली, ‘मॅम कमॉन, यू कॅन डू इट!’ बस्स! तिच्या त्या एका वाक्याने माझ्यात बाटलीभर ग्लुकोज चढवल्यासारखी शक्ती आली आणि पुढचं अंतर मी एका दमात पार केलं. ’
स्वत:ला अजमावण्यासाठी निरुपमाताईंनी केलेला आणखी एक प्रयोग- २ वर्षांपूर्वी पुण्याच्या ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या १५/२० शिलेदारांनी एव्हरेस्ट सर केलं तेव्हा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एका अवलियाने एक भन्नाट कल्पना मांडली. त्यानुसार पाच ज्येष्ठांनी लोणावळ्याजवळील तैलडौला इथल्या ३०० फूट उंच कडय़ावर रॉक क्लायम्बिंग आणि रॅपलिंग करून मोहिमेचा नारळ फोडायचा होता. यासाठी निवडलेल्या पाचापैकी चार अनुभवी; पाचव्या निरुपमाताताई मात्र या प्रकारात संपूर्ण अनभिज्ञ. तरी पण आत्मविश्वास आणि निधडी छाती या बळावर त्यांनी हा गडसुद्धा सर केला आणि हम ‘किसीसे कम नही’ हे सप्रमाण दाखवून दिलं.
पुण्यात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘एन्डय़ुरो-३’ या संस्थेतर्फे क्षमतांची कसोटी पाहणारी ‘एक साहस स्पर्धा’ घेण्यात येते. गेली १० र्वष बाबासाहेब पुरंदरे यांचा मुलगा प्रसाद या स्पर्धेचं आयोजन करतोय. या शर्यतीतील चार टप्पे म्हणजे ६० कि.मी. चालणं + ७० कि.मी. सायकलिंग + रिव्हर क्रॉसिंग+ कयाकिंग (छोटी बोट वल्हवणे). तिघांच्या ग्रुपने मिळून स्पर्धा पूर्ण करायची असते. वाटेत सायकल पंक्चर झाली. (खाचखळग्याचा रस्ता असल्याने ती होतेच), चाकातील हवा कमी झाली किंवा इतरही काही दुरुस्त्यांची वेळ आली तर सगळं आपलं आपणच निपटायचं. या स्पर्धेत निरुपमाताईंनी वयाच्या साठीनंतर भाग घेतला आणि ‘शर्यत पूर्ण करणारी सर्वात ज्येष्ठ महिला’ हे बक्षीस दोन वेळा मिळवलं.
गिरनार पर्वताच्या १०,००० पायऱ्या तर त्या अगदी अलीकडे चढून आल्यात. गुरुवारी डोंगराभोवती परिक्रमा, शुक्रवारी शिखराला भोज्या आणि शनिवारी नेहमीप्रमाणे १०८ सूर्यनमस्कार. हा रोजचे १२ आणि सूर्यनमस्कार हा त्यांचा नेम गेली २ वर्षे सुरू आहे. या वयात हे कसं जमतं यावर त्यांचं उत्तर.. प्रथम एका दमात ३६ सूर्यनमस्कार घालायचे मग एक स्ट्रेचिंगचा सूर्यनमस्कार, त्यानंतर पुन्हा ३६ मग परत तोच स्नायूंना उत्तेजना देणारा नमस्कार, ९० झाल्यानंतर पुढचे १२ जलदगतीने, आणि शेवटची ६ मात्र सावकाश.. त्यानंतर भीमरुपी महारुद्रचा श्लोक म्हटला की कुठेही उडय़ा मारायला तयार!
हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत निरुपमताईंचा डिसेंबर मध्यापासूनचा आठवडाभराचा प्लॅन पूर्णत्वाला आला असेल. त्याची आखणी अशी होती.. रोज सकाळी ६ वाजता सायकलवर स्वार होऊन घर सोडायचं आणि रात्री घरी परतेपर्यंत रोज एकेक करत पानशेत, रोजणगाव, सोलापूर रोडवरचं यवत, भोर, लोणावळा, मुळशी, लवासा.. अशा वेगवेगळ्या मार्गावरल्या सात गावांना भेट द्यायची. बरोबर कुणी आलं तर आनंद नाहीतर ‘एकेला चालो रे!’ हा निश्चय.
त्यांचा हा मनसुबा ऐकताना आपल्याला लागलेली धाप थांबायच्या आधीच त्यांचं आणखी स्वप्न आपल्या अंगावर कोसळतं.. ते म्हणजे ‘रोज १०० कि.मी. सायकलिंग करत एकदा त्यांना त्यांच्या लेकाच्या घरी म्हणजे थेट हाँगकाँगला जाऊन थडकायचंय.. या सुसाट निरुपमाताईंना भेटल्यावर निर्मला आठल्ये यांच्या कवितेतील या ओळी आठवण अपरिहार्यच नाही का?
वार्धक्य, पैलतीर असं काहीही नसतं
मनाचं वय नेहमी पंचवीसच असतं..
ज्येष्ठ नागरिक अर्थात आमचे समस्त आजी-आजोबा! तुमच्यासाठी हे खास पान. तुम्हाला आवडेल, जपून ठेवावंसं वाटेल असं. तुमचं स्वास्थ्य जपणारं डाएट, तुमचा व्यायाम, इतकंच नव्हे तर तुमच्यासाठी महत्त्वाचे कायदे, तुमच्या गरजेच्या सरकारी योजना, बँकांच्या स्कीम्स, एनजीओचे विविध प्रकल्प, इतकंच नाही तर आम्ही तुम्हाला इंटरनेट वापरायलाही शिकवणार आहोत. आणि खास वाचकांकडून मागवण्यात येणारा मजकूर- नवीन काय शिकलात- त्यातल्या गमतीजमती सांगणारं सदर, ‘आनंदाची निवृत्ती’. याशिवाय वयाच्या ७०-७५ नंतरही स्वत:ला कार्यरत ठेवणाऱ्या काही आजी-आजोबांच्या स्फूर्तिदायक कथा, ‘वयाला वळसा’ या सदरातून. तेव्हा आजी-आजोबा, सब कुछ तुमच्यासाठी! वाचनाचा भरपूर आनंद घ्या. आणि लिहा आणि प्रसिद्ध झाल्याचा आनंदही अनुभवा. दर शनिवारी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा