‘वहिनी कपडे तर घेऊ आम्ही. पण हे पैसं घ्या तुम्ही. मला मनापासून द्यायचे आहेत तुम्हाला. दोन वर्षांपासून सण नवता केला आम्ही.. पोराच्या केसपाई लय खाडे होत होते म्हणून इतर बायका नाही नाही ते बोलत होत्या. काहींनी कामावरूनपण काढलं. पण वहिनी तुम्ही अडचण समजून घेतली आमची..’
एक दुपार.. कसल्याशा आवाजाने मला जाग आली. आई काही तरी शोधात होती. ‘‘काय गं, काय शोधतेस?’’ मी विचारलं. ‘‘अगं मावशींना जास्तीचे पैसे देऊ या म्हणतेय आज.. उद्या कसलासा सण आहे त्यांचा. तिच्यासाठी दिवाळीपेक्षा कमी नसतो तो.. म्हणजे दिवाळीसारखीच साजरी करतात ते आणि मावशींनी पैसे नाही मागितले म्हणून काय झालं.. त्या इतर कामवाल्यांसारख्या पैसे मागत नाहीत म्हणून म्हटलं द्यावेत आपणच. पगार आणि जास्तीचेही.’’ आई सांगत होती खरी, पण मी झोपेतच होते. पुन्हा गाढ झोपून गेले.
चार वाजता चहा पिता पिता आईने मला विचारलं, ‘‘मी मावशींना पैसे दिल्यावर काय झालं असेल सांग?’’
‘‘काय झालं असणार? त्यांचा चेहरा उजळला असेल. खूश झाल्या असतील अजून काय?’’
‘‘हो पण नंतर काय झालं असेल?’’
‘‘नंतर काय?’’
‘‘त्यांनी पैसे घेतले, मोजले आणि १०० रुपये परत केले. म्हणाल्या, ‘वहिनी लेकरास्नी मिठाई आणून द्या. आमच्याकडून.’ मला काही कळलंच नाही काय म्हटल्या त्या. मी आपली, ‘अहो राहू द्या ते पैसे. तुम्हीच मिठाई घ्या. तुमच्या नातवाला ड्रेस घ्या एखादा..’ तर मलाच म्हणाल्या, ‘वहिनी कपडे तर घेऊ आम्ही. पण हे पैसं घ्या तुम्ही. मला मनापासून द्यायचे आहेत तुम्हाला. दोन वर्षांपासून सण नवता केला आम्ही.. पोराच्या केसपाई लय खाडे होत होते म्हणून बायका नाही नाही ते बोलत होत्या. काहींनी कामावरूनपण काढलं. पण वहिनी तुम्ही अडचण समजून घेतली आमची.. सगळा पैका कोर्टात जात व्हता. पार पिचून गेलो होतो. तुम्ही परत्येक येळी तारखेच्या आधी पैसं देत व्हता. दिवाळीत  नातवाला कपडे दिलेत. मला साडी दिली. आज पोरगा सुटला म्हणून सण साजरा होतोय. तुम्ही नेहमी मदत करत राहिलात.. अन् आता आम्हास्नी तुम्हाला भेट द्ययची आहे तर नाय म्हणू नका.’’
‘‘काय? आणि तू पैसे घेतलेस की काय?’’ मी आईला विचारलं.
‘‘हो, अगं डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं त्यांच्या आणि माझ्यापण. शेवटी म्हटलं, ‘मावशी १०० रुपये नको, ५०च पुरे. आम्ही नक्की मिठाई आणू.’’ आत्ताही डोळे पाणावले होते आईचे आणि थोडेसे माझेही.. शेवटी आईच म्हणाली, ‘‘बघ ना त्यांचं पोट हातावरचं. त्यातल्या स्वत:च्या हक्काच्या पगारातील पैसे त्या मला देत होत्या.. मी फार फार तर ५० रुपये जास्तीचे देत होते त्यांना बक्षिसी म्हणून.. किती मन मोठं असेल ना त्यांचं!’’
 रोजच्या कामात मावशींना बोलायलाही वेळ मिळत नाही, तरी कधी तरी आपण काही तरी केल्याचं लक्षात ठेवून त्यांनी असं काही केलंय की मी आतून हललेय. तुमच्याकडे पैसाच असावा, असं काही नाही. कोणासाठी काही करायचं तर कोणीही करू शकतं..मला खऱ्या अर्थाने पोटात कालवाकालव होणं म्हणजे काय याचा अर्थ पटला.. बाप रे मी किती संवेदनाशून्य दृष्टीने मावशींकडे पाहत होते. त्यांची दया येत होती. त्यांच्या परिस्थितीबद्दल वाईटही वाटत होतं.. पण आज मला त्यांचा अभिमान वाटत होता मला. आपल्या व्यक्तीसाठी आपण शक्य असूनही  काहीच कसं करत नाही?  हो.. पण यापुढे मात्र मनात येईल तेव्हा आपल्या माणसांसाठी काही तरी करीनच, मी मनाशी नक्की ठरवलं.

Story img Loader