वंदना गुप्ते

दडपशाहीतून जन्मलेल्या गुलामगिरीचा शेवट तेव्हाच होतो जेव्हा आपल्यावरच्या दास्यत्वाची जाणीव होते. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातील दीदीराजेला आपल्याला पांगळं केलं गेलेलं आहे याची जाणीव व्हायला थोडा वेळ जावा लागतो, परंतु जेव्हा ते भान येतं तेव्हा तिचाही प्रवास ‘पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे’ सुरू होतो. दडपशाहीच्या प्रवृत्तीविरुद्ध बंडखोरी करा आणि मुक्ततेचा आनंद उपभोगा, हेच सांगणारं अगदी आजच्याही काळाला लागू होणारं पु.ल. देशपांडे यांचं हे नाटक म्हणूनच कालातीत ठरतं.

concept of house husband
स्त्री ‘वि’श्व: ‘हाऊस हसबंड’ असणं!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
achieving life goals steps to be successful in life
सांधा बदलताना: तो प्रवास सुंदर होता
Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
chaturang nature disorder harmful to society Personality American Psychological Association
स्वभाव-विभाव: समाजासाठी विघातक विकार
chaturang transgender Berlin No Border Festival Gender discrimination Ideology
स्वीकार केव्हा होईल?
women empowerment challenges women experience in society
स्त्रियांचं नागरिक असणं!
family, old women, attention to old women,
मनातलं कागदावर: दुधातील साखर…

‘मृत्यू म्हणजे वसंत माझा, मजवरी खुलणार सुंदर मी होणार, मरणाने जगणार’, असं म्हणणारी दीदीराजे म्हणजे मी. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातील माझी ही व्यक्तिरेखा मृत्यूची वाट पाहते आहे. गेली दहा वर्षं एका खुर्चीला खिळून पांगळ्याचं जीवन जगणाऱ्या दीदीला, फक्त मरणच या वेदनेतून मुक्त करू शकतं याची खात्री झालेली आहे. तिच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे मृत्यू आहे. पण जेव्हा तिला, ‘शरीर दुबळं नसतं, मन असतं’, याचा साक्षात्कार होतो तेव्हा ती, ‘थेंबभर पाण्यालाही विशाल समुद्राची ओढ असते’, असं म्हणत खऱ्या स्वातंत्र्यासाठी घराबाहेर पडते…

आणखी वाचा- सांदीत सापडलेले…! : मदत?

आपल्याही आजूबाजूच्या अशा अनेकींच्या पायात, कधी दृश्य तर कधी अदृश्य मानसिक पारतंत्र्याच्या बेड्या पडलेल्या आपण पाहतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी दीदीराजेंसारखं आधी त्या दास्याचं भान यावं लागतं आणि नंतर मनाला विशाल करावं लागतं, मग स्वातंत्र्य मिळतंच. मला वाटतं हेच पु.ल. देशपांडे यांनी ‘सुंदर मी होणार’ या नाटकातून अधोरेखित केलं आहे. देशाला पारतंत्र्यातून मुक्ती मिळून इतकी वर्षं झाली, तरी स्त्रीचा जीवनप्रवास अजूनही जोखडातून सुटलेला नाही. वर वर सुखी आहोत असा आभास निर्माण करणाऱ्या अनेक स्त्रिया अजूनही समाजात वावरत असतात. पुरुषप्रधान संस्कृतीची पाळेमुळे इतकी खोलवर गेलीत की, सहज तोडून टाकता येत नाहीत. काहींना तर त्याची जाणीवही झालेली नसते. मात्र दडपशाहीच्या विरुद्ध बंड पुकारायला फार धैर्य लागतं.

‘सुंदर मी होणार’ या नाटकाचा पट खूप व्यापक आहे, असं मला वाटतं. घरात, बाहेर, समाजात जे दडपलेपण आहे. घराणेशाही, सरंजामीपण, राजकारण आहे त्यातून जन्म घेतलेली इतरांना दाबून टाकायची प्रवृत्ती आहे. तिच्याविरुद्ध बंडखोरी करा, हेच पुलंना सांगायचं आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लगेचच लिहिलेलं हे नाटक असल्याने त्या वेळी समाजात जे गुदमरलेपण होतं त्याची जाणीव सर्वसामान्यांपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांना व्हावी आणि प्रत्येकाला आपला आवाज मिळावा हाच या नाटकाचा गाभा होता. सध्या आपल्या आजूबाजूला जो माहोल आहे तो पाहता आजच्या समाजालाही हा लागू पडतोच. एकूण समाज काय आणि त्या समाजातली पंगू केली गेलेली स्त्री काय, या सगळ्यांनी मुक्ततेचा आनंद घ्यायला हवा, हेच मी केलेल्या दीदीराजेच्या भूमिकेतून दिसतं. अशी भूमिका करायला मिळालं हे माझं भाग्य. दीदीराजेची आंतरिक तळमळ, शारीरिक आणि मानसिक दुबळेपण, त्यामुळे आवाजाला आलेली कातरता आणि कविमनाची काहूर योग्य स्वरात उमटणे आणि प्रेक्षकांना ते जाणवणे ही माझी फार मोठी कसोटी होती. केवळ संगीताचा थोडाफार अभ्यास इथे उपयोगी पडला.

आणखी वाचा-जिंकावे नि जगावेही: मुखवट्यांच्या आड

नाटकाची सुरुवातच दीदीचं शारीरिक दुबळेपणाच्या प्रसंगाने होते. गेल्या दहा वर्षांत तिचं हे परावलंबित्व वाढत गेलं आहे. कारण आजूबाजूला परिस्थितीच तशी आहे. नंदनवाडीचे महाराज हे तिचे पप्पा (रवि पटवर्धन), त्यांचं संस्थान खालसा झाल्यामुळे अस्वस्थ आहेत. त्यांच्या हातातील सत्ता गेली आहे, उरला आहे तो त्यांचा उद्दामपणा, नियंत्रणाची लालसा, भकास राजवाडा आणि धाकदपटशासाठी समोर आहेत त्यांची मुलं, राजेंद्र, दिलीप, बेबीराजे. अर्थात या तिघांनाही स्वातंत्र्याची ओढ लागली आहे. ते या राजवाडा नामक तुरुंगातून बाहेर पडू इच्छितात. खरं तर या राजवाड्यातील सगळेच जण बंधनात आहेत. अगदी दीदीराजेंवर उपचार करणारे डॉक्टर (श्रीराम लागू) सुद्धा. ‘या मुलांची आई होईन,’ या मम्मींना दिलेल्या शब्दाखातर डॉक्टर इथे आहेत. आणि या मुलांनाही डॉक्टर आणि दीदीचं प्रेम बांधून आहे. पण शेवटी प्रत्येकालाच वाचा फुटते आणि प्रत्येकजण बंधनातून मुक्त होतो. अगदी दीदीसुद्धा.

लहानपणी सशक्त असणारी दीदी नंतर दुबळी होत जाते, पण ते फक्त शरीराने. मनाने ती वादळ आहे याचा साक्षात्कार तिला संजय देशमुख (गिरीश ओक) या कवीच्या येण्याने होतो. लहानपणी पाय चांगले असताना तिने अनुभवलेला निसर्ग, पाऊस, त्यातलं मोकळं जगणं तिच्या कवितेत आताही त्याच नजाकतीने येतं. मला नेहमी असं वाटतं, पुलंनी हे नाटक लिहिलं नाही. तर महाकाव्य लिहिलं आहे. माझ्या तोंडचे संवाद म्हणताना, निसर्गकविता ऐकवताना माझ्या म्हणजे, दुबळ्या दीदीमध्ये चैतन्य येतं. इतकं सुंदर निसर्गचित्र लिहिणारी व्यक्ती दुबळी असूच शकत नाही, तिने मुक्त व्हायला हवं, हे भान संजय तिला आणून देतो खरं, पण ते तिच्यासाठी सहज सोपं नाही. तिला त्या मुक्ततेच्या आरंभबिंदूकडे नेणारी घटना म्हणजे तिचं पायावर उभं राहणं. स्वत:च्या पायाने चाललेली पहिली ४८ पावलं तिला या स्वातंत्र्याचं भान देतात. आपण चालू शकतो ही जाणीव झालेल्या दीदीला मुक्तीचा अर्थ कळायला लागतो. हळूहळू आपण राहात असलेल्या राजवाड्याचा झालेला कोंडवाडा दिसू लागतो. आपल्याला पप्पांनी जाणीवपूर्वक पंगू केलं गेलेलं आहे, याची लख्ख जाणीव होते आणि त्याच वेळी ‘स्वातंत्र्य मिळत नाही मिळवावं लागतं,’ या धाकटी बहीण बेबीराजेच्या म्हणण्याची प्रचीती येते. पप्पांच्या स्वार्थी आणि दडपशाहीमुळे झालेलं मम्मीचं पराधीन आयुष्य लक्षात यायला लागतं आणि त्यावर कडी म्हणजे पप्पांची वैषयिक नजर तिला भाजून काढते. त्या वणव्यात ती पप्पांचा धिक्कार करते नि घराबाहेर पडते. इथे एक आठवण मला आवर्जून सांगावीशी वाटते. आमचं हे नाटक बघायला पुलं आणि सुनीताबाई दोनदा आले होते. दोन्ही वेळा त्यांनी माझं कौतुक केलं ते प्रामुख्याने या प्रसंगासाठी. पुलं म्हणाले, ‘‘मी जे कागदावर लिहायला धजावलो नाही ते तू तुझ्या देहबोलीने, आवाजाने आणि नजरेने बोलून दाखवलंस.’’

आणखी वाचा-माझी मैत्रीण: व्यक्त-अव्यक्त नातं

वडीलसुद्धा असे असू शकतात हे लक्षात आल्यावर मुलगी त्यांचा ज्या प्रकारे धिक्कार करते तो सगळा प्रसंग तिच्या या स्वातंत्र्याच्या प्रवासासाठी महत्त्वाचाठरतो. ज्या क्षणी ती पप्पांच्या दडपशाहीतून मुक्त होते तेव्हाही ती ‘सुंदर मी होणार’ हे गीत गाते. पण आता ती मृत्यूला बोलवत नाही तर, ‘जुनी इंद्रिये, जुना पिसारा, सर्व सर्व झडणार, नव्या तनूचे नव्या शक्तीचे पंख मला फुटणार,’ असा आशावाद तिच्यात आलाय.

तिचा हा पारतंत्र्यापासून स्वातंत्र्यापर्यंतचा प्रवास तिच्या मनाचा प्रवास आहे. तिचं सुंदर होणं केवळ शरीराचं नाही. मनाचं आहे, विचाराचं आहे. मुख्य म्हणजे स्वातंत्र्याचं आहे.

मानसिक दास्यातल्या प्रत्येकाला हा प्रवास असाच करावा लागतो. या नाटकात दीदीराजेबरोबरच महत्त्वाचं पात्र आहे ते बेबीराजेचं, (कविता लाड-मेढेकर). ही नाटकातली माझी धाकटी बहीण. तेव्हा ती अवघी १६-१७ वर्षांची होती. पण तिने ही भूमिका फार उमजून-समजून केली होती. कारण या नाटकात भावंडांमध्ये ती एकटीच अशी आहे की, तिला स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळला आहे. एकाच वेळी ती घरातल्यांसाठी आनंदाचा झराही आहे आणि बंडखोरही. पप्पांना आपण आवडत नाही तर आपल्याला पप्पा का आवडावेत? आम्ही प्रेमाची भीक का मागावी? असा तिचा स्पष्ट सवाल आहे. त्यातूनच तिच्यात बंडखोरी आली आहे. ती म्हणते, मी ठरवलंय, या राजवाड्यातून जाताना पप्पांना जबरदस्त धक्का देऊन जायचं. तिचं बंडा सावंत या मोत्तदाराच्या मुलावर प्रेम आहे. आणि पप्पा कधीही याला संमती देणार नाही याची तिला खात्री आहे. पण स्वकर्तृत्वावर निवडणूक जिंकणाऱ्या बंडाला आता समाजाने नेता म्हणून स्वीकारलं आहे. समाजातला हा बदल राजघराण्यातल्या बेबीराजेनेही स्वीकारला आहे. खऱ्या प्रेमापुढे ती खोट्या राजवाडी प्रतिष्ठेला धिक्कारते.

पु.ल. देशपांडे यांनी हे नाटक लिहिताना ‘इम्मॉर्टल लव्ह’ या ब्राउनिंग पतिपत्नींच्या चरित्र-ग्रंथाचा, व्हर्जीनिया वूल्फने लिहिलेल्या ‘फ्लश’ या पुस्तकाचा आणि ‘बॅरेट्स ऑफ विंपोल स्ट्रीट’ या नाटकाचा आधार मिळाला आहे, तसा स्पष्ट उल्लेख या नाटकाच्या पुस्तकात केला आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग ३० एप्रिल १९५८ रोजी मुंबईत झाला. साहजिकच त्या काळची राजकीय-सामाजिक परिस्थिती त्यात आली आहेच. पण मला वाटतं, आज आपल्या आजूबाजूचा माहोल आहे त्याचेच हे पडसाद आहेत.

नाटकात दीदीराजेंच्या तोंडचं एक वाक्य आहे, ‘स्वातंत्र्य केवळ स्वातंत्र्यासाठीच हवं असतं. आपल्याला हवं तसं, पण कायद्याच्या चौकटीत बसणारं. ते सुधारक असावं. संहारक नसावं.’ हे या नाटकाचं सार आहे आणि आपल्या जगण्याचा अंतस्थ हेतूही! शब्दांकन : आरती कदम

vsndanasgupte@yahoo.com