अंधत्व स्वीकारून सक्षमतेने आयुष्याला दिशा देणाऱ्या या तीन ज्योती. आपल्याबरोबर इतरांनाही प्रकाश देणाऱ्या. येत्या १५ ऑक्टोबर रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक ‘पांढरी काठी दिना’च्या निमित्ताने..
I asked for strength,
God gave me difficulties to make me strong
I asked for courage
God gave me danger to overcome
I asked for favour
God gave me opportunities
I received nothing I wanted
But everything I needed
My prayers have been answered

१६ वर्षांच्या भक्तीचा १० वीत अपंगांमध्ये प्रथम क्रमांक पटकवणारी विद्यार्थिनी म्हणून सत्कार होत होता तेव्हा सत्काराला उत्तर देताना या ओळी भक्तीनं ऐकविल्या. धनंजय आणि सुषमा घाटोळे यांचं भक्ती हे दुसरं अपत्य. सुदृढ, सशक्त अन् सुंदर अशी मुलगी लहान असतानाच आईला भक्तीच्या डोळ्यांत एक काळा डाग दिसला. सुंदर जग दिसण्यापूर्वीच भक्तीने ऑपरेशन थिएटर अनुभवलं तेव्हा भक्ती होती अवघ्या सहा महिन्यांची अन् भक्तीच्या डोळ्यात होता रेटिनोब्लासटोमा अर्थात डोळ्यांचा कर्करोग. इथूनच सुरुवात झाली एका संघर्षांला!
ती दवाखान्याच्या दुष्टचक्रात अडकली. भक्तीचा उजवा डोळाही याच रोगाने ग्रासला. आईवडिलांचे अथक परिश्रम तिच्या डोळ्यासाठी खर्ची पडू लागले. पुढे चार वर्षे शंकर नेत्रालय आणि अपोलो कॅन्सर हॉस्पिटल, चेन्नई येथे भक्तीवर उपचार सुरू होते. डॉ. संतोष हॉन्वोर आणि विजयानंद रेड्डींसाठी भक्ती रुग्ण नव्हती तर त्यांची मुलगी होती. किमो आणि रेडिओथेरपीच्या असह्य़ वेदना इवलीशी भक्ती सहन करत होती. एवढं करूनही डॉक्टरांना डोळा वाचविण्यात यश येत नव्हतं. शेवटी डोळा गमावण्याचा तो दिवस क्रूर काळाने उभा केला. ‘‘मला ऑपरेशन थिएटरकडे डॉक्टर घेऊन जाताना मी आईजवळ खूप रडले,’’ ती सांगते. १ एप्रिल २००४ चा तो दिवस भक्तीच्या आयुष्यात कायम अंधकार पसरवून गेला..
वेदना, दु:ख ऑपरेशनने संपलं होतं, तो शारीरिक उपचार होता, पण मानसिक धक्का जबरदस्त होता. भक्तीने जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे रामभाऊ खांडवे यांचं मार्गदर्शन घेतलं. हळूहळू सावरत सावरत बदल घडून येत गेला आणि एका क्षणी भक्तीला वाटलं, ‘‘It is better to light candle than to blame the darkness’’
दृष्टी देणारे दोन डोळे तर आता सोबत नव्हते परंतु बुद्धिमत्तेचा तिसरा डोळा ज्याचा प्रकाश प्रज्ञाचक्षू म्हणून विकसित करायला काय हरकत आहे ? १० वर्षांच्या भक्तीने आपलं आयुष्य स्वीकारलं..
माऊंट कार्मेल या शाळेत भक्तीनं जिद्दीनं अभ्यास सुरू केला. जिज्ञासा कुबडे या दृष्टिहीन शिक्षिकेने संगणक शिकविला. ममता कुसबेकरनी ‘ब्रेल’ भाषा शिकविली. ‘सक्षम’ या संस्थेनं वेळोवेळी मदतीचा हात दिला. सामान्य शाळेत भक्तीचं शिक्षण झालं. कायद्यानेही तीन टक्के आरक्षण दिलं असलं तरी शाळा ते मान्य करीत नाही; परंतु भक्तीला माऊंट कॉर्मेल या शाळेने प्रोत्साहन दिलं. भक्ती त्यांच्यासाठी एक अभिमानाची बाब होती. वेलणकर, गणेशन, मुखर्जी या समस्त शिक्षिकांनी मार्गदर्शन करीत भक्तीचं ध्येय पूर्ण करण्यास मदत केली. दहावीत भक्तीने ९३.४५ टक्के घेऊन अपंगांमधून पहिला क्रमांक मिळविला. बोलक्या संगणकाच्या साहाय्यानं भक्ती पुस्तक वाचते, टीव्ही बघते. (ऐकते) भक्ती इतर संकटांवर मात करीत सामान्य आयुष्य व्यतीत करते, नव्हे तर ११ वीला लॉजिक आणि फ्रेंच भाषा घेऊन आपलं करिअर घडविण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्थात या संपूर्ण कार्यात तिची आई तिची साहाय्यक असते. ‘सत्यमेव जयते’च्या कार्यक्रमातील कृष्णकांतबरोबर भक्तीने संवाद साधला. आपल्यातील व्यंग अव्यंग बनू शकतं. हाच संदेश भक्ती आपणास देते.
 * * *
डॉ. पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या हस्ते तिचा सत्कार होता. सत्कार होता डॉक्टरेट मिळाल्याबद्दल आणि तो स्वीकारत होती एक शापित सूरगंधर्व क्षिप्रा सरकार. ती शापित एवढय़ासाठी कारण ती दृष्टीहीन होती.
डॉ. क्षिप्रा आणि तिचे कुटुंबीय प. बंगालचे. मातृभाषा बंगाली. क्षिप्रा सगळ्यात वडील अपत्य. वर्षभरानंतर क्षिप्राची दृष्टी कमजोर असल्याचं लक्षात आलं. क्षिप्राला थोडा अस्थिव्यंगाचाही त्रास होता. सतत किरकिर करणारी क्षिप्रा रेडिओवरील गाण्यांनी मात्र शांत व्हायची. नागपुरात फक्त एकच अंध विद्यालय. क्षिप्राचे वडील तिला शाळेत सोडायचे; परंतु शाळेत शैक्षणिक माध्यम मराठी, त्यामुळे क्षिप्राला काहीच समजायचं नाही. क्षिप्राला एक अल्पबुद्धी विद्यार्थी म्हणून समजलं गेलं. विशेष शिकवणी लावून मराठी माध्यमातून क्षिप्राने दहावी परीक्षा उत्तीर्ण केली; परंतु त्या काळातही लेखनिक मिळण्यासाठी अडचणच असायची. शाळेत अल्पबुद्धी ठरलेल्या क्षिप्राने मॉरिश कॉलेजमध्ये ११वीत प्रवेश घेतल्यावर मात्र तिचं विश्वच बदललं. हिंदी माध्यम घेत तिचा अभ्यास सुरू झाला. महाविद्यालयात मित्रमैत्रिणींची सोबत क्षिप्राला संगीतात एम.ए.पर्यंत होत राहिली. विद्यापीठात मेरिटचा किताबही क्षिप्राने पटकाविला. १९९८ साली क्षिप्राने नेट उत्तीर्ण केले. शैक्षणिक पात्रता बाळगूनही नोकरीचं यश पदरात पडत नव्हतं. नागपुरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात अंशकालीन प्राध्यापक म्हणून क्षिप्रा काम करू लागली; परंतु पूर्णकालीन पदाकरिता तिला नाकारण्यात आलं. आपल्या मुलीला या शिखरापर्यंत नेणाऱ्या पित्याने येथे मात्र हार खाल्ली. अशातच क्षिप्राच्या वडिलांचं निधन झालं. त्यांचं स्वप्न उराशी जपत क्षिप्रा संघर्ष करीतच होती आणि धरमपेठ महाविद्यालयात क्षिप्राचं प्राध्यापक होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं.
रागांमधील रसभाव संबंधित बंदिशी अशा प्रबंधाचा विषय क्षिप्राने सुरुवातीला निवडला होता; परंतु पुढे तिनं शास्त्रीय व चित्रपट संगीताचा तुलनात्मक अभ्यास यावर डॉक्टरेट मिळवली. दोन्ही संगीत प्रकार मनाला कसे भावणारे आहेत, असं सांगताना क्षिप्रा तल्लीन होत होती. डॉ. क्षिप्राने दुर्गाचालिसा आणि महिषासुर मर्दिनी श्लोकाची सी.डी. तयार केली. केवळ तबला, तंबोरा अन् संवादिनी या माफक वाद्यांसह चारुदत्त जिचकार यांनी या स्वरांना भक्तीचा रंग चढविला. तिची या क्षेत्रातली भरारी उंच आहे. यासाठी अर्थातच तिला अनेकांची मदत होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या नायर तर तिला आपलं अपत्य मानतात, तर इतर सहकाऱ्यांची मदत क्षिप्राला साहाय्यभूत ठरते. पण इतकं असूनही आयुष्याची तिची वाटचाल एकाकी सुरू आहे, पण त्यातही तिला समजून घेणारा कुणी मिळेल याची तिला खात्री आहे. स्वकर्तृत्वावर अंधत्वावर मात करणाऱ्या क्षिप्राला त्यासाठी शुभेच्छा.
* * *
गोष्ट पुण्यातील. रणरणत्या वैशाखातील तो दिवस. दुपारची वेळ. सुरेल भजनाचा आवाज कानी पडला. गायिकेचा शोध घ्यायचा तर फक्त दोन मजले उतरायचे होते. त्या गानमंदिरात पोहोचले अन् क्षणभर विश्वास बसेना.  ५७-५८ वर्षांची प्रौढा, दृष्टिहीन मीनाताई पावसकर स्वागत करायला आल्या. सवयीप्रमाणे घरात जाऊन त्यांनी माझ्यासाठी पाणीही आणलं. त्यांना बोलतं करताना त्यांच्या जीवनाचा चित्रपट माझ्यासमोर उलगडत गेला..
साठच्या दशकात स्त्रियांच्या शिक्षणाला फक्त सुरुवात झालेली होती. मीनाताई नारायण पेठ, पुणे येथील शाळेत दाखल झाल्या. मुळात अल्पदृष्टी असल्याने मीनाताईंना शिक्षणात अडचण येऊ लागली. कसेबसे इयत्ता चवथीपर्यंत प्रथम शिक्षण घेतलं आणि सरस्वतीच्या एका दालनाचा निरोप घेतला. सगळ्यांना वाटू लागलं मीनाचं अभ्यासात लक्ष नाही. मीनाची बुद्धीची झेप कमी आहे; परंतु त्यांना फळ्यावरचं, दूरचं दिसत नव्हतं. विविध साधनांचा अभ्यास करून अभ्यास करायचा तो काळ नव्हता. तेवढी आर्थिक सुबत्ताही नव्हती. मीनाताईंचे काका मेंडोलिनचे वर्ग घ्यायचे. काकूला गाण्याची आवड होती. मीनाला बरोबर घेऊन काकू त्यांना घडवू लागली. गंधर्व महाविद्यालयात काकूंच्या पुढाकाराने संगीताचा श्रीगणेशा सुरू झाला आणि मीनाताईंची साधना त्यांना संगीत विशारदची पदवी देऊन गेली. मीनाताईंमध्ये आत्मविश्वास जागृत झाला. आई-वडिलांचं प्रोत्साहन अन् काका-काकूंचे प्रयत्न यांनी मीनाताईंचा संगीतप्रवास सुरू झाला..
ज्या गंधर्व विद्यालयात मीनाताईंनी धडे घेतले तिथेच मधुकर मराठे या गुरूंबरोबर मीनाताई दुसऱ्यांना धडे देऊ लागल्या. आपली शिष्या दृष्टिबाधित असूनही जिद्दी आहे म्हणून गुरूंना सार्थ अभिमान वाटला तर नवल काय? याच गुरूंच्या आदेशाने मीनाताई ‘गांधी भवन’ कोथरूड येथील अंध विद्यालयात संगीत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. आपल्यासारख्याच विकलांग व्यक्तींना, विद्यार्थ्यांना शिकविण्यात मीनाताई रंगून गेल्या. १४ र्वष मराठे सरांकडे आणि पाच र्वष गांधी भवन येथे शिकवून मीनाताईंचा आत्मविश्वास वाढला होता. अल्पदृष्टी असल्याने मीनाताई हा प्रवास सिटी बसमधून सहज करीत होत्या. त्या काळी आतासारखी वाहनांची गर्दी नव्हती आणि माणुसकीचे झरे जिवंत होते. पुढे मीनाताईंचे बिऱ्हाड नारायण पेठेतून चिंचवडला हललं. थोडय़ा अडचणींना सामोरे जात असतानाच महिलांचे भजनाचे वर्ग चिंचवडला सुरू झाले होते. अशा वर्गामधून शिकविताना मीनाताईंची संवादिनी त्यांच्याशी संवाद करत होती. चिंचवडशिवाय औंध येथे स्वरानंद भजनी मंडळ तयार झालं तर शुभांगी कुळकर्णी आणि अर्पणा कुळकर्णी यांनी बाणेर येथे वर्ग सुरू केले, ज्याच्या मीनाताईंच्या शिष्या होत्या. १९८५ ते २००९ पर्यंतचा कालावधी या संगीत साधनेत चिंचवडला घालविल्यावर पुन्हा बिऱ्हाड वारजेला आजची पालक असलेल्या उज्ज्वल भुरके या बहिणीकडे हलविले. जागा बदलली, आता पुन्हा नवीन उमेदीने वर्ग सुरू करायचे का? अशा प्रश्नांची उत्तरं काळाने सोडविली. आज मीनाताईंचे गार्डन सिटी वारजेत भजनाचे वर्ग, पेटी शिकविण्याचे वर्ग पुन्हा गजबजू लागले. मुळात मिश्कील स्वभाव, उत्तम नकला करणाऱ्या मीनाताईंकडे कधी नेतृत्व आलं हे कळलेच नाही. आज स्त्रीसूक्त, अथर्वशीर्ष यांतून वेगवेगळे कार्यक्रम, सहली यांमध्ये मीनाताई रंगून गेल्या आहेत. मीनाताईंनी आपली संगीत साधना उपजीविकेचं साधन बनविलं. एका अपंग व्यक्तीने आपल्या अपंगत्वावर केलेली ही सहज मात होती.
‘Differently able not disable’ सक्षम अशीच व्याख्या या सर्वाकरिता करता येईल. या सर्वाची बुद्धिमत्ता, जिद्द अलौकिक असते; परंतु त्यावर एखाद्यानं परिसस्पर्श करून फक्त चकाकी देता येते. या उदाहरणांवरून एक आवाहन करावसं वाटतं की, त्यांचे मित्र बना, सहृदय बना. ‘सक्षम’ ही समस्त विकलांगांकरिता काम करणारी संस्था आहे. समस्त विकलांगांना एकत्रित आणून त्यांच्या ऊर्जेचा राष्ट्रीय प्रवाहात उपयोग करून घेणं हे समाजाचं कर्तव्य आहे. शासन, सरकार या पलीकडे समाजातून या सर्वाचा विकास व्हावा, हीच आमची तळमळ आहे. या राष्ट्रीय संपत्तीचा स्वीकार व्हावा.    u
chaturang@expressindia.com

A mechanism has been created by the ST administration to complain to the depot head about any problem in the journey of the ST Mumbai news
एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Crime against three who tie down man in house even after repaying the loan
कर्जाची परतफेड केल्यानंतरही घरात डांबणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा
Pimpri, Notice to Engineers, Road Repair Works pimpri,
पिंपरी : रस्ते दुरुस्तीच्या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांना नोटीस; काय आहे कारण?
badlapur rape case marathi news
बदलापूर प्रकरणात माध्यम प्रतिनिधींचा आरोपींमध्ये समावेश; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नोटीसा आल्याने संताप
old man suicide rumour, lohmarg Police,
ठाणे : प्रवाशांसोबतच्या वादानंतर वृद्धाने आत्महत्या केल्याची अफवा; अफवांवर विश्वास ठेवू नका, लोहमार्ग पोलिसांचे आवाहन
Sanjay Manjrekar brually trolled by fans
Duleep Trophy 2024 : रोहित-विराट, बुमराहच्या विश्रांतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या माजी खेळाडूला चाहत्यांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…
over 120 hospitalised after food poisoning on janmashtami in mathura
जन्माष्टमीच्या प्रसादातून विषबाधा; मथुरेतील घटना, १२०हून भाविक रुग्णालयात दाखल