तृप्ती चावरे-तिजारे

ध्वनी म्हणजे कानांनी ऐकू येणाऱ्या विशिष्ट लहरी किंवा कंपने. कान कर्णकर्कश गोंधळही ऐकतो आणि भान हरपून जावे असे सुस्वरही. मात्र आजकाल आपल्या कानांवर कलकलाटच जास्त ऐकू येतो. त्यातच भर पाडते विचारांच्या गुंत्याने होणाऱ्या मनाच्या कलकलाटाची. अशा वेळी गरज असते मनाला शांतवणाऱ्या ध्वनिसौंदर्याची. मनावर आणि पर्यायाने शरीरावर परिणाम करणाऱ्या या ध्वनींचे विविध पैलू मांडणारे हे सदर दर पंधरा दिवसांनी.

तृप्ती चावरेतिजारे ‘ध्वनी’ या विषयाच्या अभ्यासिका असून लोककला शैलीच्या चित्रकार आणि कवयित्री आहेत. घन आणि तंतुवाद्यातून निघणाऱ्या ध्वनिलहरी आणि अनुनादाचा मानवी शरीर आणि मनावर होणारा सकारात्मक परिणाम अभ्यासण्यासाठी कार्यरत असणाऱ्या नाशिकच्या ‘अंतर्नाद ध्वनिप्रयोग केंद्रा’च्या निर्मितीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध वृत्तपत्रांतून कला, कलाकार आणि भाषा या विषयांवरील त्यांच्या लेखमालिका प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या फायनान्स आणि एच. आर. विषयात एमएमबीए असून गेली बारा वर्षे कॉमर्स आणि व्यवस्थापन क्षेत्रात त्यांना अध्यापनाचा अनुभव आहे.

मानवाच्या नित्याच्या जगण्यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे ध्वनी. झपाट्यानं बदलत जाणाऱ्या आपल्या जीवनशैलीत या महत्त्वपूर्ण घटकाकडे आपण किती आणि कसं लक्ष देतो, तसेच ते कसं द्यायला हवं याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. गोंगाटविरहित आल्हादक ध्वनीचे एक अंगभूत सौंदर्य असतं. त्याचा आस्वाद घ्यायचा असतो तो मनाच्या सखोल शांतीसाठी.

आणखी वाचा-समाज वास्तवाला भिडताना: समाजवास्तव समजून घेताना…

त्या ध्वनिसौंदर्याच्या प्रांतात शिरण्याआधी ध्वनीच्या उत्सर्जन, वापर, आणि परिणामविषयक नकारात्मक बाबींचा तसेच सकारात्मक शक्यतांचा वेध घेणं अपरिहार्य ठरतं. आजकाल आपल्या अवतीभोवतीचा गोंगाट आणि असंख्य आवाजांचा गदारोळ हा इतका बेसुमार वाढलाय की, आपण ‘किमान शांततेत’ जीवन जगतो आहोत की केवळ काळ पुढे ढकलीत आहोत, हेच सुचेनासं आणि समजेनासं झालं आहे. हे ‘न सुचणं आणि न समजणं’ शब्दात समजून घेणं सोपं जावं तसेच आजूबाजूच्या असह्य गोंगाटातही आपलं रोजचं जगणं सुसह्य व्हावं, यासाठी आवश्यक ‘ध्वनिसौंदर्या’चा आस्वाद घेण्याच्या प्रक्रियेच्या जवळ जाण्याचा आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न आपण ‘ध्वनिसौंदर्य’ या लेखमालेतून करणार आहोत.

गोंगाट आणि ध्वनी या दोन्ही गोष्टींचं प्रवेशद्वार एकच असतं ते म्हणजे कान. कानाचं कार्य हे फक्त ऐकण्यापुरतं मर्यादित नसतं तर त्या ‘ऐकलेल्या’चा अर्थ आपल्या मेंदूला समजावून सांगण्याच्या प्रक्रियेतही ते अविभाज्यपणे सहभागी असतात. हा अर्थ समजल्यामुळेच गोंगाटाचा कर्कश्शपणा आणि ध्वनीचं सौंदर्य यातील फरक आपल्याला ओळखू येतो.

वातावरणातील असह्य किंवा सुसह्य ध्वनिलहरी या सर्वप्रथम आपल्या कानातील पडद्यावर आदळतात, तिथून त्या सूक्ष्म श्रवणस्नायूंना पोहोचवल्या जातात. तिथून मेंदूकडे पाठवल्या गेलेल्या संकेतांमुळे आपल्याला त्या ध्वनीचं आकलन होऊ शकतं. ही प्रक्रिया अविरत चालू असते, म्हणून ती प्रदूषणविरहित, आरोग्यपूर्ण किंवा शुद्ध हवी. आजच्या काळात ही शक्यता कमी होताना दिसते आहे, कारण ध्वनीतील शांततेचा आणि सुस्वरतेचा अनुभव घेण्याच्या संधी कमी होत आहेत. अगदी शांत म्हणून अपेक्षित असलेल्या देवळाच्या वा त्यासारख्या वास्तूतही ध्वनिसौंदर्याचा आस्वाद घेण्याची प्रक्रिया कमी होऊन त्या जागी असह्य ध्वनी किंवा गोंगाट कानावर आदळण्याचं प्रमाण वाढलं आहे. याचा दुष्परिणाम केवळ मानसिक नाही, तर शारीरिकही आहे. एकंदरीतच अशा अनैसर्गिक ध्वनी-श्रवणामुळे मोठ्या आवाजात बोलणं, श्रवणशक्ती कमी होणं, चिडचिड होणं, एकाग्रतेचा अभाव जाणवणं आणि श्रवण आरोग्य धोक्यात येणं हे आता सामान्य होत चाललं आहे.

३५ वर्षीय मीना, तिचं घर मुख्य रस्त्यालगत असल्यानं तिला सतत हॉर्न, गाड्यांचे आवाज आणि शेजारीच सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणचे विविध आवाज सहन करावे लागत. तिच्या कार्यालयाच्या बाजूला तर मोठ्या आवाजातील सवंग संगीत सतत लावलेलं असायचं. यामुळे ती अस्वस्थ राहू लागली, झोपेची गुणवत्ता कमी झाली, चिडचिडेपणा वाढला, एकाग्रता कमी झाली. त्यातच घरातील जवळच्या व्यक्तीच्या अकाली मृत्यूमुळे तिची सहनशीलता कमी झाली आणि अर्धशिशीचा त्रास सुरू झाला. तिचा तणाव वाढला. यावर पूरक सहउपाय म्हणून तिला श्रवण आरोग्यावर काम करणाऱ्या एका ध्वनिप्रयोग केंद्रात योग्य श्वास-संचलनासह काही विशिष्ट वाद्या ध्वनी आणि अनुनाद ऐकविण्यात आले. चार आठवड्यांनंतर या ध्वनिप्रयोगामुळे मीना अधिक शांत आणि एकाग्र झाली. तिला तिच्या झोपेची गुणवत्ता सुधारल्याचं जाणवलं, श्रवण आरोग्यात थोडी सुधारणा झाली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ध्वनिसौंदर्याचा आस्वाद घेता येऊ लागला, ज्यामुळे तिच्या एकूणच ताणतणावात बरीच घट झाली.

आणखी वाचा-विकलांगतेचा स्त्रीवादी विचार

या उदाहरणावरून एक लक्षात येईल की, आपल्या आजूबाजूला गोंगाटाची एक मोठी वर्तुळकक्षा तयार झाली असली, तरी त्या कक्षेतून स्वत:ला बाहेर काढून, काही काळ का होईना, शांततेच्या वर्तुळकक्षेत बसविणं अगदीच अशक्य नाही. ध्वनिसौंदर्याचा आस्वाद घेण्याची प्रक्रिया नेमकं हेच काम करते. मेंदूत तयार झालेली गोंगाटाची न दिसणारी कलकल सुस्वर ध्वनींच्या सौंदर्यावर वेधून घेणं हे या प्रक्रियेचं मुख्य कार्य आहे.

मेंदूत कलकल निर्माण करणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे विचारांचा गुंता. विचारांचा गुंता हा सतत एकापाठोपाठ एक विचार केल्यानं अधिक वाढत जातो. कारण विचारांचा वेग हा अफाट असतो. साधारणपणे प्रत्येक विचाराला दुसरी बाजू ही विवेकाची असते किंवा असावी. योग्य-अयोग्य, सत्य-असत्य, ग्राह्य-त्याज्य इत्यादींचा निवाडा करणं हे विवेकाचं कार्य असतं. वेदांत अभ्यासात ‘एक पाऊल विचाराचं आणि दुसरं पाऊल विवेकाचं’ असं सांगितलं जातं. सामान्य जीवन जगत असताना विचार-विवेकाचे दोन पाय एकमेकांमध्ये अडकण्याचीच शक्यता जास्त असते. विचार आणि विवेक यांच्या संतुलनाचं गणित न जुळल्यामुळे विचारांचा गुंता आणि वेग अधिक वाढत जातो आणि या सगळ्यांचा ताण कुठं तरी मेंदूवर आणि मनावर येतो. अशा वेळी आपण कानातून आत काय घेतो आणि कोणत्या दर्जाचं श्रवण करतो याला फार महत्त्व आहे. काही ध्वनींकडे आपलं लक्ष जातं, तर काही ध्वनींकडे लक्ष जात नाही, काही ध्वनींकडे हळूहळू आपलं दुर्लक्ष होतं, परंतु काही मोजके ध्वनी असेही असतात जे लक्षपूर्वक ऐकले पाहिजेत. जसे वरील उदाहरणात मीनाने ते ऐकले, किंवा तिला ते ऐकविले गेले. यामुळे ती गोंगाटाच्या असह्य कक्षेतून बाहेर पडून सुस्वर ध्वनिसौंदर्याच्या सुसह्य कक्षेवर स्थिर झाली. गोंगाटात घुसमटलेल्या तिच्या कानांनी मोकळा श्वास घेतला म्हणून तिला स्वत:च्या शांततेत फरक जाणवला.

गोंगाटाच्या मुळाशी असलेली पर्यावरणीय ध्वनी प्रदूषण ही एक मोठी समस्या सध्या सर्वत्र भेडसावते आहे. या समस्येचे आरोग्यावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना याविषयी जगभरातून संशोधन सुरू आहे. ‘एनव्हार्मेंटल हेल्थ परस्पेक्टिव्हस्’ या जर्नलच्या फेब्रुवारी २०२३च्या अंकात ‘टिनिटस’(कानात सतत आवाज येणं) या समस्येविषयी लेख प्रकाशित करण्यात आला आहे. यातून ध्वनी प्रदूषणाचे श्रवण प्रणालीवर होणारे नकारात्मक परिणाम स्पष्ट करण्यात आले आहेत. गोंगाटाचा दुष्परिणाम हा वैयक्तिक आणि सार्वजनिक आरोग्यावर कसा होतो, तसेच वातावरणातील कर्कश आवाज हे एक हानीकारक प्रदूषक कसं आहे हे यातून मांडण्यात आलं आहे. हे पाहता, भारतासारख्या जास्त लोकसंख्येच्या आणि रात्री, अपरात्री, केव्हाही फटाके वाजविण्याची प्रथा पडत चाललेल्या देशात, मानवी कानांना गोंगाटाची किंवा कर्कश आवाजाची सवय होणं या समस्येचा धोका लक्षात घेऊन, त्यावर विविध स्तरांवरील उपाय शोधणं आवश्यक आहे.

ध्वनिसौंदर्याचा आस्वाद घेणं हा या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा एक मार्ग नक्कीच असू शकतो या आशेनं आपण या विषयाकडे या लेखमालिकेत बघणार आहोत. कर्णकर्कश गोंगाट हा सध्या तरी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. पण काही सुस्वर ध्वनी असेही असतात ज्याकडे आपल्याला दैनंदिन जीवनात लक्ष देणं शक्य होत नाही. परंतु या उपकारक ध्वनींकडे आवर्जून लक्ष देता यावं, दुर्लक्षित असलेल्या या सुस्वर ध्वनींच्या सौंदर्याचा आस्वाद घेता यावा आणि असह्य गोंगाटात घुसमटलेल्या कानांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी प्रत्येकानं दिवसातले काही क्षण तरी स्वत:साठी राखून ठेवण्याचा सराव सुरू केला पाहिजे.

आणखी वाचा-स्त्री चळवळीची पन्नाशी: भगिनीभाव जिंदाबाद!

ध्वनी-उपचार पद्धतीवर संशोधन करणाऱ्या विविध संस्था आणि जाणकार ‘श्रवण आरोग्य’ या विषयावर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर विचार करत असतीलच. यासाठी संगीत, मानसशास्त्र, ध्वनी आणि योग या विविध विषयांतील समविचारी जाणकारांच्या साहचर्यानं याबाबत प्रयोगात्मक उपक्रम आखणं हेदेखील महत्त्वाचं पाऊल ठरेल. अशा उपक्रमातून ‘ध्वनी’ या विषयाशी निगडित भौतिक, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पैलू उलगडू शकतील, त्यातून कदाचित काही अनुभवात्मक लिखाणही बाहेर येऊ शकेल.

वास्तविक ध्वनी म्हणजे कानांनी ऐकू येणाऱ्या विशिष्ट लहरी किंवा कंपने. पण लेखमालेच्या दृष्टीनं या विषयाकडे बघताना हे लक्षात आलं की, ध्वनिसौंदर्य हा केवळ भौतिकशास्त्रीय किंवा वैद्याकीय दृष्टिकोनातून पाहण्याचा विषय नाही, तर ध्वनीचं मानवी जीवनातील मूलभूत महत्त्व आणि परिणामकारकता लक्षात घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. संवादासाठी, भावनेच्या अभिव्यक्तीसाठी आणि कलेसाठी ध्वनी हा अपरिहार्य असतो. जाणते-अजाणतेपणी जो ध्वनी आपण आत घेण्यासाठी स्वीकारतो, तो न्याहाळणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी ध्वनीच्या विविध पैलूंवर विचार करून त्याचा शारीरिक आणि मानसिक जीवनावरचा सकारात्मक परिणाम जाणून घेण्याचा अधिक प्रयत्न करू या पुढील काही लेखांमधून.

trupti.chaware@gmail.com

Story img Loader