अर्चना जगदीश
१५ वर्षीय ग्रेटा थनबर्गने आंतरराष्ट्रीय वातावरण परिषदेत, तसंच दावोसच्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये ‘तरुणाई आणि वातावरण बदल’ यावर विचार मांडले आणि ती प्रकाशझोतात आली. मात्र ती एकटी नाही तर पॅरिस कराराच्या अटी सरकारांनी पाळण्यासाठी, त्यांच्यावर दबाब आणण्यासाठी होणाऱ्या विद्यार्थी चळवळींचं लोण ब्रिटन, हॉलंड, बेल्जियम, जर्मनी आदी अनेक युरोपीय देशांमध्ये पसरलं आहे. अगदी ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतही अशी विद्यार्थ्यांची निदर्शनं सुरू झाली आहेत. पर्यावरणरक्षणासाठी तरुणाई आता जोमाने चळवळीत उतरली आहे.
भवताल बिघडत-बदलत चाललं आहे, याची भेदक जाणीव संवेदनशील लोकांना आहेच, पण त्यातले काही जण वातावरण बदल, वैश्विक तापमानवाढ याबाबत फारसे आशावादी नाहीत, काही जण मात्र वेगवेगळ्या पद्धतीने जगाचं आणि निर्णय घेणाऱ्या सरकारांचं, नागरिकांचं याकडे लक्ष वेधू पाहतात. तरुणाईचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा माहिती महाजाल आणि स्मार्टफोनच्या नादात ही पिढी भवतालच विसरत चालली आहे की काय असं वाटू लागतं, पण ते संपूर्ण खरं नाही. ही तरुण पिढी संवेदनशील आहे आणि ती आता पृथ्वीच्या बिघडलेल्या स्वरूपाला जबाबदार असणाऱ्या आपल्या आणि आधीच्या पिढय़ांना धारदार प्रश्नही विचारू लागली आहे आणि या चळवळीचे, नव्या विरोधाचं नेतृत्व मुली करताहेत ही अभिमानाची गोष्ट आहे.
बालवयातून तरुण वयाकडे जाण्याच्या संक्रमणकाळात जगण्याचे अनेक प्रश्न नव्या पिढीला पडत असतात. खूप संवेदनशील टप्पा असतो हा आयुष्याचा! शिक्षण, कारकीर्द, नोकरी, आर्थिक क्षमता आणि व्यक्ती म्हणून जगाचा सामना करणं हे सगळे प्रश्न या संक्रमणकाळात खरं तर प्रत्येकालाच सतावत असतात. मात्र काही अतिसंवेदशील तरुण-तरुणींना आपल्या आयुष्यापलीकडे भवतालात काय चाललं आहे आणि त्याचा यासमान प्रश्नांशी काय संबंध आहे याची चिंता जास्त भेडसावत असते. आपण राहत आहोत त्या पृथ्वीची वाताहत बघून ते अवस्थ होतात. मग कुणी तरी लहानपणापासूनच प्लास्टिकच्या भस्मासुराचा बीमोड करण्याचा पण करतात, त्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करायला लागतात. तर कुणाला जंगल आणि प्राणी वाचवावेसे वाटतात. तर आणखी कुणी या अर्धवट वयात आजच्या पर्यावरणाच्या परिस्थतीला जबाबदार मागच्या पिढय़ांना जाब विचारण्यासाठी काय करता येईल यावर विचार करतात आणि कृतीही. त्यासाठी ही आजची संक्रमणकाळातली पिढी झटते आहे. पण ‘माझाही थोडा प्रयत्न, खारीचा वाटा’ अशा व्यक्तिगत उपायांनी फरक पडणार नाही याची जाणीव होऊन एकत्रित, सुसंघटित काम; मागच्या पिढय़ा म्हणजे पालक, शासन आणि बाजारप्रणीत अर्थव्यवस्था या सगळ्यांनाच जाब विचारायचा आणि त्यांचा निषेध करायचा मार्ग निवडायचा हे अपरिहार्य बनतं.
वैश्विक तापमानवाढ आणि वातावरण बदल हे शब्द सतत आपल्या कानावर पडत असतात. विकसित देश आणि उत्पादन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या त्याला जबाबदार आहेत, असं म्हणत सामान्यजन त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र आपण सगळे कळत-नकळत करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा संबंध वातावरण बदलाशी आणि आपल्या त्याबद्दलच्या भूमिकेशी आहे हे आपल्या गावीही नसतं. ज्यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने जग बदलून टाकलं त्या बिल गेट्स यांचा एक व्हिडीओ नुकताच प्रसृत झाला आहे. त्यात दीड मिनिटाच्या क्लिपमध्ये त्यांनी सौर आणि पवनऊर्जानिर्मितीमुळे पृथ्वीवरून होणारं कार्बन उत्सर्जन कमी होतं आहे हे स्तुत्य असल्याचं सांगितलं आहे. पण इमारतीपासून ते अगदी साध्याशा खेळण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट तयार करायला लागणारी ऊर्जेची गरज मात्र अफाट वाढत चालली आहे. ती भागवायला हे नवे ऊर्जास्रोत पुरे पडणार नाहीत हे बिल गेट्स आपल्याला परिणामकारकरीत्या लक्षात आणून देतात. म्हणजे एकीकडे उपाय शोधले तरी जोपर्यंत वापर कमी होत नाही तोवर ऊर्जेची गरज वाढत जाणार आणि पर्यायाने वातावरणबदलही वेगाने होणारच. आपण ऊर्जेच्या वापराबाबत खऱ्या अर्थानं जागरूक आहोत का हे तपासून बघायला हवं. शिवाय इथून पुढच्या दोन-तीन दशकांपासून ऊर्जेची गरज ही वातावरण आणि शहरं थंड करायला लागणार आहे हे आपल्या गावी नाही.
पण हे सगळं कुणी करायचं, कसं करायचं, त्याबद्दल कृती करण्यासाठी जनमत तयार करता येईल का हे प्रश्न खरं तर मागच्या अनुभवी पिढय़ांपेक्षा नव्या पिढीला जास्त त्रास देतात, कारण त्यांना त्यांचं धूसर भविष्य दिसतं आहे. म्हणूनच युरोपमध्ये १५-१६ वर्षांच्या मुलामुलींनी उत्स्फूर्तपणे या विषयासाठी जनमत तयार करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. ही विद्यार्थ्यांची चळवळ गेल्या वर्षीपासून सुरू झालीय. २०१८ च्या ऑगस्टमध्ये स्वीडनच्या १५ वर्षीय ग्रेटा थनबर्गने एका शुक्रवारी शाळा बुडवून स्टॉकहोमच्या स्वीडिश संसदेबाहेर धरणं धरलं. स्वीडनमधील वातावरणबदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी स्वीडिश सरकार पुरेसे प्रयत्न करत नाही याकडे तिला जगाचं लक्ष वेधायचं होतं. तिची साधी कृती खूपच परिणामकारक ठरली. नंतर तिनं एक व्हिडीओ तयार करून तो माहिती महाजालावर प्रसृत केला. तो आजवर लाखो लोकांनी बघितलाय. नंतर ग्रेटाने आंतरराष्ट्रीय वातावरण परिषदेत, तसेच दावोसच्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये ‘तरुणाई आणि वातावरणबदल’ यावर विचार मांडले आणि ती प्रकाशझोतात आली. आता तर तिच्या नावाचा विचार शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी केला जातोय. मात्र ती एकटी नाही तर पॅरिस कराराच्या अटी सरकारांनी पाळण्यासाठी, त्यांच्यावर दबाब आणण्यासाठी होणाऱ्या अशा विद्यार्थी चळवळींचं लोण ब्रिटन, हॉलंड, बेल्जियम, जर्मनी आदी अनेक युरोपीय देशांमध्ये पसरलं आहे. अगदी ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतही अशी विद्यार्थ्यांची निदर्शनं सुरू झाली आहेत.
बेल्जियममध्ये दर गुरुवारी शाळा सोडून सगळे रस्त्यावर येतात. वातावरणबदलावर सर्वतोपरी उपाय तसेच सरकारी स्तरावर धोरणात्मक बदल ताबडतोब झाले पाहिजेत म्हणून निदर्शनं करत आहेत. या सगळ्याचं नेतृत्व करते आहे अनुना द वेवर आणि तिची मत्रीण कायरा गॉनुआ. या दोघींनी वैश्विक वातावरणबदल आणि तापमानवाढ यावर एक यूटय़ूब व्हिडीओ तयार केला. त्यांची प्रेरणा अर्थातच ग्रेटा आणि तिचा व्हिडीओ ही होती. या दोघींनी विद्यार्थ्यांना गुरुवारच्या निदर्शनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. त्यांना वाटलं फार तर वीस-पंचवीस मुलंमुली येतील पण अॅन्टव्रप या बेल्जियममधील शहरात पहिल्याच गुरुवारी तीनशेहून अधिक विद्यार्थी आणि काही स्थानिक नागरिक सहभागी झाले. आजपर्यंत जवळजवळ लाखभराहून अधिक विद्यार्थ्यांनी अशा निदर्शनांमध्ये भाग घेतला आहे.
अनुना द वेवरने सांगितलं की, ग्रेटाच्या फिल्ममुळे दोन गोष्टी झाल्या. इतर युरोपियन देशांप्रमाणेच, आपलं कार्बन उत्सर्जन कमी करायला बेल्जियन सरकार तयार नाही ही वस्तुस्थिती प्रकर्षांने जाणवली. याला विरोध मतपेटीतून करायचा तर अठरा वर्ष पूर्ण झालेली नाहीत. त्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन दबाव आणायचा. हा उपाय कदाचित मतपेटीतून धोरणं बदलता येतील अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा चांगला असू शकतो. वातावरण बदलाचे परिणाम म्हणून कोरल रिफ्स नष्ट होण्याचा आणि समुद्राची पातळी वाढण्याचा धोका वाढेलच शिवाय या सगळ्या परिणामांची झळ स्त्रियांनाच जास्त सोसावी लागणार आहे ही जाणीव या सगळ्या मुलींना झाली आहे.
या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याची काळजी आहे. वातावरण सुधारण्यासाठी अजूनही खूप उशीर झालेला नाही म्हणून ते आशावादी आहेत. मात्र काही अप्रिय निर्णय आणि पॅरिस परिषदेत ठरलेल्या गोष्टी अमलात आल्या पाहिजेत याबद्दल ते आग्रही आहेत. सर्व पातळ्यांवर काम करायला हवं याची त्यांना जाणीव आहे. तुम्ही असे एकत्र येऊन काय करणार, अशी खिल्ली उडविणाऱ्यांना या मुली आणि विद्यार्थी सांगतात, ‘‘उपाय आमच्याकडे नाहीत, तुमच्याकडे होते आणि आहेत. ते तुम्ही करावेत म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत आणि येत राहू. तुम्ही निर्माण केलेल्या वाढविलेल्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे मागू नका.’’
जर्मनीतही लुईसा नॉयबौवर ही बावीसवर्षीय मुलगी वातावरण बदल चळवळीचं नेतृत्व करते. तिच्या ट्विटर प्रोफाइल मध्ये तिने लिहिलंय, ‘‘मी जर्मन ग्रेटा नाही, पण आम्हाला वातावरण बदलासंदर्भातला न्याय हवा आहे. आमच्या देशानं त्यावर उपाय करायची जबाबदारी घेतली पाहिजे म्हणून आम्ही ही चळवळ उभी केलीय आणि ती आपोआप वाढणार आहे, तिला चौकटीत बांधायची गरज नाही. आम्ही मोकळ्या मनाने गोष्टी बघू शकतो. समंजसपणे वागण्याच्या नव्या शक्यता आम्हाला दिसतात.’’
अतिशय काळजीपूर्वक आखलेल्या, मोठय़ा संस्थांच्या नेतृत्वाखाली वाढलेल्या पर्यावरण निदर्शनांपेक्षा ही चळवळ जास्त थेट आहे आणि त्यातून मोठय़ा चळवळींना शिकण्यासारखं खूप काही आहे. ही चळवळ कुणा एकाने किंवा एकीने सुरू केली नाही आणि त्याला कोणतीही चौकट नाही. जागतिक पातळीवर कुणीही याचं नेतृत्व करत नाही. अगदी ग्रेटासुद्धा नाही. ती आणि जगातली अनेक मुलं-मुली स्वतहून त्यात पडली आहेत. ग्रेटा, अनुना द वेवर, कायरा, लुईसा हे प्रतिनिधी आहेत. उत्स्फूर्तपणे आपल्या पिढीच्या भविष्याची आणि पृथ्वीच्या बिघडलेल्या स्थितीची विदारक जाणीव झाली म्हणून हा निषेध सुरू झालाय. आता हा विरोध करणारे विद्यार्थी मोठे होतील आणि कदाचित वातावरण बदल थांबवण्यासाठी आणखी काही तरी ठोस, वेगळं काम करायला लागतील. त्यांची जागा नवी तरुणाई, त्यांच्या पुढची पिढी घेईल.
पाश्चिमात्य देशांत लहान मुलं शिकत असतानाच विचार करायला शिकतात, बदल घडविण्याची आपली जबाबदारी ओळखत त्यासाठी काम करायला सज्ज होतात. त्यातूनच असे नवे कार्यक्रम-चळवळी तयार होतात आणि काही काळाच्या कसोटीवर टिकूनही राहतात. बिंदू-ठिपके तर सगळीकडेच असतात. ते जोडूनच मनाला आनंद देणारी रांगोळी काढता येते आणि हे काम तर मुलींना उपजतच येत असतं. त्यामुळे त्या याही रांगोळीत रंग भरतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.
godboleaj@gmail.com
chaturang@expressindia.com