स्मिता देव
मूलच आईला जन्म देतं असं म्हणतात! माझ्यावर झालेले अनेक चांगले संस्कार माझ्या आईकडून मला मिळाले असंच मला वाटत असे. पण मी आज जी काही आहे, ते व्यक्तिमत्त्व घडवण्यात माझ्या सासूबाईंचा (सीमा देव) वाटा फार मोठा आहे. फार साधी बाई! (यापुढे त्यांचा उल्लेख प्रेमापोटी एकेरीच, ‘आई’ असा करतेय.) साधीशी कॉटनची साडी, मानेवर रुळणारा सैलसर अंबाडा आणि तिच्या नम्र, मायाळू चेहऱ्याला अगदी शोभून दिसणारं कपाळावरचं मोठं कुंकू! हेच तिचं रूप कोरलं गेलंय माझ्या मनावर आणि तेच राहील कायम आता. भारतात लग्न करताना फक्त जोडीदाराशी नव्हे, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाशी लग्न लागलेलं असतं. माझं लग्न झालं, ते देव या एका आनंदी, मोठय़ा कुटुंबाशी! आईप्रमाणे माझ्यासाठीही कुटुंब ही सगळय़ांत महत्त्वाची गोष्ट आहे. तशी मी वाढले एकत्र कुटुंबातच, पण नाती जोडणं, लोकांना एकसंध ठेवणं, हे या आईकडूनच शिकले मी. आता ही धुरा मी सांभाळू शकीन, अशी अपेक्षा आणि प्रार्थनाही!
आमचं नातं आगळंवेगळं होतं. रूढ अर्थानं सासू-सुनेचं नव्हतंच. कधी ती माझी आई होत असे आणि मी असे तिची लाडावलेली मुलगी. कधी आम्ही जिवलग मैत्रिणींसारख्या एकमेकींशी मनातली गुपितं मोकळेपणानं बोलत असू. काही वेळा मात्र ती सासूबाईच्या भूमिकेत जाई.. घरातल्या मंडळींनी न्याहरी आणि रात्रीच्या जेवणासाठी एकत्रच बसायला हवं.. ही आपल्याकडची परंपरा आहे आणि ती पाळायलाच हवी, असा ठाम आग्रह धरणारी! तिला जवळच्या प्रत्येकाची मनापासून काळजी वाटत असे. जेव्हा अभिनय (पती आणि दिग्दर्शक अभिनय देव) प्रवासात असे, तेव्हा ती त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत राही. तिच्या या काळजी करण्याच्या स्वभावाची मी चेष्टा करत असे, की ‘‘आई, तो साधा कामासाठी बाहेर गेलाय, युद्धावर नाही गेला!’’ आठवडा सुट्टय़ांना आम्ही दोघं आमच्या मित्रमंडळींबरोबर जेवायला जायचो. तेव्हा परतायला कितीही उशीर झाला, तरी ती जागी असे. का? तर आम्ही आल्यावर तिनंच दार उघडावं, असं तिला वाटत असे! सर्व कुटुंबीय घरात आलेले बघितल्यानंतरच ती शांतपणे झोपी जाई.
साडीखरेदी हा दोघींचाही ‘वीक पॉइंट’ होता. त्याशिवाय आम्ही दोघी जेव्हा एकत्रित भाजी आणायला, वाणसामान आणायला जात असू, तेव्हा कधी गाडी उपलब्ध नसेल, तर ती बिनधास्त माझ्याबरोबर टॅक्सी आणि रिक्षानं फिरत असे. आपण इतकी मोठी अभिनेत्री होतो, याचा जराही ‘अहं’ नसे. ती म्हणे, ‘‘घरातली स्त्री घराला घरपण देते!’’ हे तिचं वाक्य मलाही खूप काही शिकवत असतं. घरातल्या, कुटुंबातल्या सर्व गोष्टींत रस घेणं, आपल्या माणसांच्या आवडीचा स्वयंपाक करणं, घरात काम करणारे मदतनीस असतात, त्यांना मानानंच वागवलं पाहिजे; ते कोणत्या परिस्थितीतून आपल्याकडे कामाला येताहेत याची नेहमी आठवण ठेवायला हवी, या सर्व तिनं मनापासून जपलेल्या गोष्टी होत्या. मी त्या आनंदानं स्वीकारल्या. ‘‘घरात काहीही असू दे; घराचं तोरण नेहमी हसरं असायला हवं,’’ असं ती म्हणे. त्याचा अर्थ मला तिला पाहताना हळूहळू समजत गेला.
ती फार मोठी कलाकार होती, पण बाबांच्या (अभिनेते रमेश देव) पाठीशी ती कायम सावलीसारखी उभी राहिली. कुठेही बाहेर कार्यक्रमांसाठी गेली, तरी तिच्यातला आत्मविश्वास, स्वाभिमान तिच्या चेहऱ्यावर झळकत असे. मृदू वागणं आणि साधेपणानंच ती समोरच्याचं मन जिंकून घेत असे. या गोष्टी तिला बघून बघून शिकायचा मीही प्रयत्न केला. गेल्या तीन वर्षांच्या काळात आम्ही मनानं खूप जवळ आलो होतो. आता आई, मैत्रीण, कधी माझ्याबरोबर अल्लडपणा करणारी युवती, जिच्या आत्मविश्वासाकडे पाहात राहावं अशी मार्गदर्शक, या सर्व रूपांत तिला मी गमावलं होतं.. तिचा आजार तिला आमचं नातंच नव्हे, तर माझी ओळखही स्मरू देत नव्हता. आम्ही कोण आहोत, हे जेव्हा तिला आठवत नसे, तेव्हा तिच्या डोळय़ांत एक भीती दिसे मला.. पण क्षणार्धात मंद स्मिताच्या पडद्यामागे ती भीती, ती यशस्वीपणे दडवून टाकी. आणि मग अखेर तो क्षण आलाच, जेव्हा आमच्या भूमिकाच पूर्णपणे बदलल्या. ती झाली माझी लेक आणि मी.. तिची आई!