‘शु क्रतारा’ या माझ्या पहिल्या गाण्यानंतर माझ्या आयुष्याला एक वेगळी, दमदार कलाटणी मिळाली. गझलशिवाय आपण दुसरं काही गायचं नाही, असं ठरवणारा मी; मराठी गायक म्हणून प्रख्यात झालो, याचे सर्व श्रेय मी माझ्या कवी आणि संगीतकारांना देतो. त्यात तीन नावे प्रामुख्याने घ्यावीच लागतील, ती म्हणजे कवी मंगेश पाडगावकर, संगीतकार श्रीनिवास खळे आणि आडनावाचे सार्थक स्वभावात असणारे संगीतकार यशवंत देव. या तिघांशिवाय मी मराठी गायक बनलो नसतो. जवळजवळ २८ र्वष मी टेक्सटाईल इंजिनीअरिंगच्या क्षेत्रात नोकरी केली, पण ८९-९०च्या सुमारास बिर्ला टेक्सटाइलच्या विभागाचे उपाध्यक्ष असताना नोकरी सोडून उरलेलं आयुष्य गाण्यात व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. खरंतर आजपासून २५ वर्षांपूर्वी जवळपास ३५ हजार रुपयांची नोकरी सोडून पूर्णपणे गाण्यात येण्याचा निर्णय हाणून पाडायचा प्रयत्न माझ्या खूप जवळच्या काही लोकांनी केला. पण मला माझ्या कलेवर, माझ्या गाण्यावर आणि माझ्या रसिकांवर प्रचंड विश्वास होता, आणि तो खराही ठरला. आज मी ‘शुक्रतारा’चे २६०० कार्यक्रम पूर्ण केले. फक्त स्वत:ची गाणी गाऊन इतके कार्यक्रम करण्याचे भाग्य मला लाभले, हे मी माझ्या आई-वडिलांचे, गुरूंचे आणि कवी- संगीतकारांचे आशीर्वाद मानतो.
आज जर मी मागे वळून पाहिलं तर मी जर गायक नसतो तर मी आयुष्यात काय चांगलं केलं असतं याची कल्पना करवत नाही. माझ्या आई-वडिलांनी मला जसं बोट धरून कसं चालावं हे शिकवलं तसंच हात धरून कसं वागावं हेसुद्धा शिकवलं. तेच संस्कार संगीताने माझ्यावर केले. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक चांगल्या- वाईट क्षणी माझ्यासोबत माझं गाणं होतं. एखादी कला तुमच्यासोबत असल्यावर तुमच्या साधारण आयुष्याचं कसं सोनं होऊ शकतं हा अनुभव मी घेतला आहे. माझ्या गाणं शिकण्याच्या काळामध्ये (जे मी आजपर्यंत करत आहे) दुसऱ्याचं गाणं कसं ऐकावं आणि त्याच्यातलं चांगलं कसं घ्यावं या काही गोष्टींमुळे बहुधा माझं गाणं थोडंफार परिपक्व होत गेलं. माझ्यासोबत अनेक गायक-गायिका गात असतात, काही तर माझ्या नातवाच्या वयाचे आहेत. पण कधी तरी ते माझ्यासमोर बसून असे गाऊन जातात की वाटतं, आपल्याला अजून खूप रियाज करायचा आहे. इतक्या लहान वयातील त्यांच्यातील कला बघून असं वाटतं की, विलक्षण प्रसिद्धी पावलेला मी एक सामान्य गायक आहे.
माझी उर्दू गझल रेडिओवर ऐकून यशवंत देवांनी खळेसाहेबांना माझा आवाज ऐकण्याची विनंती केली. खळेसाहेबांनी जेव्हा माझा आवाज प्रथम ऐकला, त्यानंतर त्यांना ‘शुक्रतारा’ची चाल सुचली आणि मी जर ते गाणं गायलं नाही तर ते दुसऱ्या कोणाच्याही आवाजात कधीच रेकॉर्ड करणार नाही, असं खळेसाहेबांनी मला सांगितलं. माझ्या आवाजावरचा इतका विश्वास जो मलाही नव्हता तो खळेसाहेबांनी दिला यासाठी मी जन्मभर त्यांचा ऋणी राहीन.
‘सखी शेजारिणी’ हे वा. रा. कांत यांनी लिहिलेलं गाणं जेव्हा संगीतकार वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलं तेव्हा त्यांनी अक्षरश: हट्ट केला की, ज्या मुलाने ‘शुक्रतारा’ गायलं आहे तोच गायक मला हवा आहे. असे भाग्य एखाद्या गायकाच्या नशिबी असणं ही फार मोठी गोष्ट आहे.
मला एकदा अचानक मंगेश पाडगावकरांचा फोन आला. ते म्हणाले, मी एक नवीन कोरं गाणं लिहिलं आहे. अजून कागदावरची शाईसुद्धा वाळलेली नाही. मी तुला फोन करण्याच्या पाच मिनिटं आधी देवसाहेबांशी बोललो आणि त्यांना गाणं ऐकवलं. आम्ही दोघांनीही हे ठरवलं आहे की, या गाण्याला फक्त तूच न्याय देऊ शकतोस. ते गाणं म्हणजे, ‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे’ हे गाणं गाऊन माझी प्रसिद्धी तर वाढलीच पण माझ्या चाहत्यांप्रमाणे मलाही हे गाणं बरंच काही शिकवून गेलं. या गाण्याची एक आठवण फारच ह्रद्य आहे. तो विलक्षण अनुभव आपल्याला सांगावासा वाटतो, माझ्या नाशिकच्या एका कार्यक्रमामध्ये मध्यंतरात माझा बालपणीचा मित्र आणि साहित्यिक वसंत पोतदार मला भेटायला आला. त्याच्या बरोबर एक तरुण मुलगाही होता. त्याला पुढे करून वसंता मला म्हणाला, ‘‘या मुलाला दोन मिनिटे
एक गायक म्हणून मला नेहमी असे वाटते की, एखादे गाणे चिरंतन टिकायला सर्वप्रथम त्याची कविता अप्रतीम असावी लागते. त्याचे संगीत चांगले पण सामान्य माणसालाही कळेल असे असावे लागते. तरच ते गाणे वर्षांनुवर्षे मनामध्ये स्थान मिळवते. आजची बरीचशी गाणी ऐकताना मला हा प्रश्न पडतो की, गायकापर्यंत जेव्हा एखादा कवी किंवा संगीतकार गाणं पोहोचवतो तेव्हा त्यांना स्वत:ला ते पसंत असते का? किंवा त्यांना ते कळले असते का? कारण अलीकडच्या काळात हृदयनाथ मंगेशकर, बाबुजी किंवा श्रीधर फडके यांच्यासारखे प्रतिभावान गायक – संगीतकार भावगीताच्या क्षेत्रात शोधूनसुद्धा सापडत नाहीत. आजचा आघाडीचा संगीतकार, गायक मिलिंद इंगळे, आजचा आघाडीचा कवी आणि अभिनेता किशोर कदम ऊर्फ सौमित्र यांनी काही वेगळे प्रयोग करून वेगळी दिशा निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना बऱ्यापैकी यश ही मिळाले.
माझा मुलगा अतुलच्या एका वाढदिवसाला त्याचे जवळचे दोन-तीन मित्र (मिलिंद इंगळे, सौमित्र आणि प्रचंड लोकप्रिय अभिनेता प्रशांत दामले) आमच्या घरी बसून गाणं बजावणं करीत होते. मिलिंद गात असलेलं गाणं मला खूप आवडलं. दुसऱ्या दिवशी अतुलला सांगून मी त्यांना बोलावून घेतलं आणि हे गाणं खूप छान आहे, तुम्ही रेकॉर्ड करा, असं म्हटलं. त्यावर मिलिंद आणि सौमित्र म्हणाले, आम्हाला कोणी ओळखत नाही. आमचं गाणं कोण रेकॉर्ड करणार? हे ऐकल्यावर मी त्या दोघांना म्हटलं की, तुम्ही आठ-दहा चांगल्या चाली आणि चांगल्या कविता ऐकवा, मी तुमचा पूर्ण अल्बम रेकॉर्ड करायला तयार आहे. पुढे मी आणि कविता कृष्णमूर्ती यांनी ‘दिस नकळत जाई’ हा त्या दोघांचा अल्बम गायला आणि तो लोकांच्या पसंतीस उतरला.
माझा प्रत्येक कार्यक्रम ही दहावीची परीक्षा आहे, असं मी मानतो कारण तीच आपल्या आयुष्यातली पहिली सर्वात मोठी परीक्षा असते. माझ्या प्रत्येक मैफलीत आपण आज जे गाऊ ते लोकांना आवडलं पाहिजे हा माझा प्रयत्न असतो. म्हणून रियाजाला- रिहर्सल्सला मी खूप महत्त्व देत असतो. मी जर आजतागायत २६०० कार्यक्रम केले असतील तर त्यासाठी किमान ३००० रिहर्सल्स केल्या आहेत. तरी प्रत्येक कार्यक्रमानंतर आपण यापेक्षा चांगले गाऊ शकलो असतो, असं वाटत असतं. माझ्या वडिलांनी मी बरा गातो, असं वाटल्यावर सांगितलं होतं की, तुला तुझे गाणे व्यावसायिक करायचे नसेल तरी तुझी तयारी व्यावसायिक आणि चांगल्या दर्जाचीच हवी, हे मी नेहमी लक्षात ठेवलं आहे.
मला इतके उत्तम कवी आणि संगीतकार लाभले की, माझी गाणी प्रसिद्ध होण्यातलं ९९ टक्के श्रेय मी त्यांना देतो. १ टक्का फक्त मी स्वत:जवळ ठेवतो तो यासाठी की ती गाणी न बिघडवता मी लोकांसमोर आणली.
गाण्यापेक्षा, संगीतापेक्षा कुठल्याच गोष्टींनी इतका आनंद मला कधीच दिला नाही. त्या आनंदाचे वेगवेगळे पैलू मी पाहिले. उत्तम कलाकारांचं गाणं ऐकण्याचा आनंद, माझ्या किंवा इतर कलाकारांच्या गाण्याचा आनंद घेतानाचा प्रेक्षकांचा आनंद किंवा रसिकांना माझे गाणे खूप आवडल्याचा आनंद या तीनही आनंदाच्या क्षणांना तुम्ही फक्त नतमस्तक होऊ शकता, विकत घेऊ शकत नाही.
मी सांगितल्याप्रमाणे जवळपास ६० र्वष मी या क्षेत्रात आहे. व्यावसायिकरीत्या बघायला गेलं तर ५० ते ५५ वर्षे असे अनेक अविस्मरणीय कार्यक्रम आणि कार्यक्रमांचे क्षण आहेत, ते मी जपून ठेवले आहेत आणि म्हणूनच मी आजही गात आहे.
१९६३-६४ च्या दरम्यानची गोष्ट असावी. माझा एके ठिकाणी अनेक दिग्गज कलाकारांसोबतचा पहिला कार्यक्रम होता. (सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, उषा व लता मंगेशकर) मी नवीन असल्यामुळे फक्त दोनच गाणी गाणार होतो. पहिल्याच गाण्यातील एका अंतऱ्यामध्ये ‘क्या बात है!’ अशी दाद प्रेक्षकांमधून आली. त्या दाद देणाऱ्या आवाजाकडे माझं चटकन लक्षं गेलं कारण तो आवाज माझ्या वडिलांचा होता. मी माझी दोन्ही गाणी संपवून बाबांना लगेच घरी घेऊन गेलो. कारण त्या दरम्यान त्यांची तब्येत खूपच खालावली होती. मी त्यांना घरी गेल्यावर तुमची तब्येत चांगली नसताना तुम्ही कार्यक्रमाला का आलात, असे विचारले. त्यावर त्यांनी उत्तर दिले, ते ऐकून मी नि:शब्दच झालो. ‘‘ते म्हणाले, माझी तब्येत ठीक नाही हे मला माहीत आहे, पण इतक्या मोठय़ा कलाकारांबरोबर तुझा पहिला कार्यक्रम होता. अशा परिस्थितीत तुझे गाणे ऐकता ऐकता मला मरण आले असते तरी चालले असते. इतक्या मोठय़ा आनंदाच्या क्षणी तुझा आनंद पाहावा म्हणून मला यावेसे वाटले. माझा मुलगा उत्तम गातो याची मला खात्री आहे. पण तुझ्या यापुढच्या अशा अनेक मोठय़ा मैफलींना मी येऊ शकेन याची मला खात्री वाटत नाही म्हणून मी आज आलो.’’
माझ्या गाण्याला जगभरातील अनेक रसिकांची तसेच अनेक मान्यवर कलाकारांची पसंती मिळाली, दाद मिळाली. त्यानंतर माझे अनेक मोठे कार्यक्रमही झाले पण त्या दिवशीनंतर मी गातोय आणि बाबा ऐकताहेत अशी मैफील पुन्हा झाली नाही.
आजतागायत ज्यांच्या गाण्यांनी किंवा संगीताने माझ्यावर संस्कार केले किंवा माझी संगीताची आवड द्विगुणित करून माझे आयुष्य भारून टाकले अशा कलाकारांमध्ये, बेगम अख्तर, पं. कुमार गंधर्व, उ. अमिर खाँसाहेब, मेहंदी हसन, शोभा गुर्टू,
पं.भीमसेन जोशी, बालगंधर्व, किशोरीताई आमोणकर, भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, तलत मेहमूद, सुरेश वाडकर, सुधीर फडके अशा महान कलाकारांसोबत आजच्या काळातील आरती अंकलीकर टिकेकर, देवकी पंडित, मिलिंद इंगळे, साधना सरगम, सावनी शेंडे ही नावे प्रामुख्याने घेता येतील. भावसंगीताच्या बाबतीत म्हणाल तर श्रीधर फडकेनंतर तितका ताकदीचा संगीतकार मला दुसरा कोणी दिसत नाही. श्रीधरचे वडील बाबुजी यांना मी भावसंगीताचा खरा शिलेदार मानतो. तीच परंपरा श्रीधर उत्तमरीत्या पुढे चालवीत आहे. असेच काम त्याच्या हातून होत राहावे, अशी माझी सदिच्छा.
‘चतुरंग मैफल’ मध्ये पुढील शनिवारी सुप्रसिद्ध लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा