‘‘गुरुमंदिरात जायला आवडायचं.. पण इतर गुरुभगिनींकडे पाहून वाटायचं, आपण अगदीच सामान्य आहोत.. ना आर्थिक संपन्नता, ना विद्वत्ता.. ‘‘तुम्ही काय करता? पती काय करतात? मुलं काय करतात?’’ हे प्रश्न खोलवर रुतायचे.. भीतीच वाटायची कुणाशी ओळख करून घेण्याची.. इथंही आईंनीच सावरलं.. म्हणाल्या, ‘‘आयुष्य लपत नाही.. मग ते लपवण्याची तगमग कशाला? त्यापेक्षा ‘मी’पणा लोपावा ही तळमळ वाढावी..’’
घडलं तेच लिहिणार आहे.. जे लिहिलं आहे ते अगदी खरंच तसंच्या तसं घडलेलं आहे, पण ज्यांच्या बाबतीत घडलं त्या कुणाचंही नाव मात्र लिहिणार नाही.. कारण? शेवटी सांगीनच.. तर घडलं ते असं..
‘‘तुम्ही माईंना एकदा तरी भेटलं पाहिजे.. खरं तर आपण तिघांनी एकत्र भेटावं असं मला फार वाटतं..’’ ताईंनी एक-दोनदा मला हे सांगितलं खरं, पण मी ‘‘पाहू कधीतरी,’’ असं म्हणून तो विषय टाळत असे.
खरं तर माई कोण आहेत, हे ताईंनी मला सांगितलं होतं. या आपल्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीबद्दल त्यांना अभिमान होता. देशाच्या स्वातंत्र्य लढय़ातील अग्रणी अशा ऋषितुल्य नेत्याच्या घराण्यात त्यांचा जन्म झालाय, ही एकच गोष्ट ऐकली असती तरी मी उत्साहानं त्यांच्या भेटीसाठी गेलो असतो.. पण त्या कुणाच्या पत्नी आहेत, हे ऐकून का कोण जाणे, मला त्यांना भेटावंसं वाटत नव्हतं..
त्या कुणाच्या पत्नी आहेत हे जगाला अज्ञातच होतं.. संसार कधीच संपला होता.. एक तपस्वी, संन्यासी म्हणून त्यांच्या पतीला जगात आदराचं स्थान होतं.. तरी त्यांचा मार्ग, अध्यात्माच्या क्षेत्रात सुरू असलेले त्यांचे कथित अभिनव प्रयोग हे माझ्या मनाला त्या वेळी भिडत नव्हते. त्यांच्याविषयीचं माझं जे आकलन होतं त्याच परिमाणातून मी माईंबाबतही कल्पना करीत होतो. बहुधा त्यामुळेच भेट टळत होती.. त्या त्यांच्या गुरुदेवांचं मंदिर सांभाळत होत्या आणि ती वास्तू माझ्या घराजवळच होती तरी पावलं वळत नव्हती..
आणि अचानक ताई गेल्या! त्यांच्या शरीराला अनंत व्याधी जडल्या होत्याच, पण हे सारं देहाला आहे, मला नव्हे, या सहज भावातून त्या वावरत असत. देहबुद्धी लोपलेली अशी दुसरी व्यक्ती माझ्या पाहण्यात नव्हती. त्यामुळे त्यांच्या जाण्यानं मनाला फार चुटपुट लागून राहिली होती.. मग त्या वाटेवरून जाता-येता आणि ती वास्तू पाहताना कानात त्यांचे आर्जवी शब्द घुमत..
‘‘तुम्ही माईंना एकदा तरी भेटाच!’’
माझी पावलं एके सकाळी त्या वास्तूकडे आपसूक वळली.. दार उघडलं ते माईंनीच.. वार्धक्याकडे झुकलेलं कृश शरीर, पण दीपज्योतीप्रमाणे शांत तेवणारा अत्यंत प्रसन्न, सात्त्विक, नितळ, तेजस्वी चेहरा.. औपचारिक ओळख झाली आणि खूप जुनी ओळख असल्यागत आम्ही एकमेकांशी बोलू लागलो.. ताईसुद्धा आमच्यासोबत या क्षणी आहेत, असं दोघांनाही वाटत होतं..
मग अनेकदा त्या वास्तूत जाणं झालं.. त्या माझ्यावर मातृवत् प्रेम करीत होत्या.. अनेक विषयांवर अनेकवार सविस्तर बोलणं होई.. आणि एक दिवस मी मोठय़ा धाडसानं ‘तो’ विषय काढलाच..
‘‘तुमच्या पतीबद्दल सांगा ना.. त्यांनी संन्यास का घेतला?’’
माझ्या या प्रश्नानं त्या स्तब्ध झाल्या. काही क्षण मूक तणावात सरल्यासारखे भासले.. त्यांचा चेहरा मात्र अगदी शांतच होता.. त्या सांगू लागल्या, ‘‘ते मोठे लोकोत्तर सत्पुरुषच होते..’’
‘‘अध्यात्मात ते पूर्वीपासूनच होते?’’ माझ्या या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘‘लौकिकार्थानं म्हणाल तर पूर्वायुष्यही फार विलक्षणच होतं. साहित्यसृष्टी, नाटय़सृष्टी, चित्रपटसृष्टी आणि शास्त्रीय संगीत या क्षेत्रांत त्यांचा व्यापक सक्रिय वावर होता. घरी त्या काळी मोटारगाडी आणि नोकरचाकरही होते.. श्रेष्ठ साहित्यिक, कलावंत, गायक, संगीतकार, पत्रकार आणि अगणित राजकीय नेते यांचीही उठबस होती.. विद्वत्ता, प्रतिभा, चिकाटी आणि श्रीमंती असा दुर्मीळ योगही जुळला होता.. पण काळाचे काटे एकसमान का राहतात? अपयशाचं नख लागत गेलं.. सांपत्तिक स्थिती खालावली आणि त्याच वेळी माझ्यावरही एक मोठी शस्त्रक्रिया झाली. त्यानं मूल होण्याच्या शक्यतेचे कोंबही कापले गेले! लग्नाला दहा-पंधरा र्वष होऊन गेली होती.. यांचं मन या सर्व परिस्थितीत खूप अंतर्मुख होत गेलं.. संन्यास घेण्याच्या निर्णयानं मनातलं सर्व द्वंद्व संपलं!’’
‘‘या निर्णयानं तुम्हाला काय वाटलं?’’ प्रश्न फार नाजूक होता.. माई म्हणाल्या, ‘‘हा निर्णय अचानक झाला नव्हता.. पाच-सहा र्वष तो मनात घोळत होता.. अनेकांशी त्याबाबतीत चर्चाही केली होती यांनी.. संन्यासाश्रम स्वीकारण्याच्या एक-दोन दिवस आधी आम्ही दिल्लीत होतो. थोर तत्त्वज्ञ राष्ट्रपतींच्या व्यक्तिगत भेटीसाठीही गेलो होतो. यांच्यासमोरच त्या पितृतुल्य नेत्यानं मला आस्थेनं विचारलं, ‘‘हे संन्यास घेणार आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची अनुमती आहे का?’’
‘‘ते आत्मज्ञानासाठी संन्यास घेत आहेत याचा मला आनंदच आहे. ते त्यांना साध्य व्हावं,’’ असं मी म्हणाले.
त्या वेळच्या माझ्या धीरगंभीरतेचं अनेकांना कौतुक वाटलं. पण माझं पुढचं जीवन कसं असेल, हे मलाही नीटसं उमगलं नव्हतं. यांच्यापलीकडे मी तोवर कसलाही विचार केला नव्हता. ज्ञानानं, कर्तृत्वानं मी यांच्यापुढे तोकडीच होते.. त्या काळच्या स्त्रीचं जीवन कसं होतं? आर्थिक स्वावलंबन हा शब्दही तिला माहीत नव्हता. कमवायचं तेही कुटुंबासाठीच, हीच भावना होती.. घरादारापलीकडे भावनेनं कधी उंबरठाच ओलांडला नव्हता.. फक्त माझ्या मनानं एक पक्का निर्णय घेतला की, यांच्या मार्गात अडसर बनून कधीच जगायचं नाही.. यांनी संन्यास घेतला आणि मी आपोआप संन्यस्त झाले!
माईंची भावमुद्रा मी हृदयाच्या डोळ्यांनी निरखत होतो. त्या सांगत होत्या, ‘‘शक्यतो स्वत:च्या पायावर लवकरात लवकर उभं राहायचं मी ठरवलं होतं. आमच्या परिचयातल्या एका मोठय़ा उद्योगपतीनं मला भेटण्यासाठी निरोप पाठवला. मी गेले तेव्हा वडीलकीच्या नात्यानं त्यांनी माझी विचारपूस केली आणि म्हणाले, ‘‘तू मला मुलीसारखीच आहेस.. तुला शेवटपर्यंत काही कमी पडणार नाही, याची काळजी मी आणि माझी पत्नी घेऊ..’’
मी नम्रपणे म्हणाले, ‘‘मला यातलं काहीच नको. इच्छा असेल तर मला नोकरी द्या एखादी!’’
त्यांना खूप वाईट वाटलं. माझं शिक्षणही फार नव्हतं. त्यामुळे मोठय़ा पगाराच्या नोकरीची अपेक्षाही नव्हती. तरी त्यांनी विचारलं, ‘‘कोणती नोकरी देऊ सांगा..’’
त्यांच्या अनेक सामाजिक संस्थाही होत्या. त्यात एक अनाथाश्रमही होता. तिथल्या लहान मुलांच्या संगोपनाची सेवा मी मागितली. त्या कामात मन रमायचं.. माझ्यातल्या ‘आई’ला वाव मिळायचा..
‘‘याच काळात गुरुदेव भेटल्या का?’’ मी विचारलं. त्या भूतकाळात हरवल्याच होत्या. म्हणाल्या, ‘‘वरकरणी मी स्वावलंबी झाले होते. जीवनाला एकटीनं सामोरी गेले होते.. पण मनानं? मन अधिकच तळमळत होतं.. अस्वस्थ होतं.. जगात आपलं कुणी नाही, ही भावना कधी कधी अंत:करण पोळत असायची.. त्या काळात नात्यातल्या एका आजींनी मला थोडंसं आग्रहानंच सांगितलं, ‘‘अगं माझ्या गुरुदेवांकडे चल..’’
प्रथम नकोसंच वाटे. आपल्या भावनिक आधाराची उणीव कृत्रिम आधारानं भरून काढणं योग्य आहे का आणि शक्य आहे का, असंही वाटे. पण तरी का कोण जाणे गुरुदेव ‘स्त्री’ होत्या म्हणून म्हणा किंवा त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी त्या आजींकडून ऐकल्या म्हणून म्हणा, त्यांच्याकडे जावं आणि त्यांचा अनुग्रहही घ्यावा, असं वाटू लागलं. मग एक दिवस गुरुदेवांकडे आले.. मला विचारलं त्यांनी, ‘‘कशासाठी आलात?’’ मी म्हणाले, ‘‘आपल्याकडून बोध घेण्यासाठी आले आहे.’’ त्यांनी बोध दिला म्हणजे अनुग्रह दिला. उपासना काय करायची, हेही समजावून सांगितलं आणि म्हणाल्या, ‘‘वेळ मिळाला की येत जा. श्रवण होईल तसतसं समाधान वाटत जाईल.’’
तिथून परतले ती नवी शांती घेऊनच! या जगात आपलं कुणीतरी आहे, हे जाणवलं. जगाच्या बाजारात वणवण करताना मनाचं खालीवर होणं त्या दिवसापासून कमी झालं. निवाऱ्याची, शांतीची जागा लाभली.. मनाची खळबळ कमी झाली होती, पण पूर्ण ओसरली नव्हती. मन:पटलावर मध्येच भावनेचे तरंग उमटत आणि पाहता पाहता उग्र लाटांप्रमाणे उसळत.. यांची पुन्हा भेट व्हावी, असं तळमळून वाटे..
गुरुदेवांना मी तोवर आई म्हणू लागले होते.. माझ्या मनातली ही आंदोलनं जगापासून लपली होती, पण आईंपासून काय लपणार? एकदा आम्ही दोघीच होतो तेव्हा गंभीरपणे म्हणाल्या, ‘‘आता त्यांची भेट घ्यायचीच तर ती तोडीस तोड! ज्ञानाच्याच पातळीवर.. कमकुवत मनाच्या पातळीवर नव्हे!’’ ऐकलं आणि आरपार पालट होऊ लागला..
यांनी कुठेसा छोटा आश्रम काढला आहे.. साधक जमताहेत, असं कानावर पडत होतं. अशात अचानक यांचं पत्र आलं.. मी काहीशा आश्चर्यानं उघडलं आणि वाचलं.. यांनी लिहिलं होतं, ‘‘मी खूप आजारी आहे.. अन्य कुणाकडूनही शुश्रूषा करून घेत नाही.. तुम्हाला शक्य असेल तर यावं.. फक्त एक गोष्ट पाळावी लागेल.. पूर्वाश्रमीचा तुमचा-माझा काय संबंध होता, ते उघड केलं जाणार नाही.’’
मी त्या पत्राकडे सुन्नपणे पाहात बसले.. मी कशी आहे? माझं कसं चाललंय?.. काही नाही.. मी मनानं खंबीर राहण्यासाठी काय करावं, यासाठीही काहीच नाही.. मी तिरीमिरीत उत्तर पाठवलं. लिहिलं, ‘‘तुमची शुश्रूषा हे माझं आजही प्रथम कर्तव्य आहे, पण पूर्वाश्रमी आपण एकमेकांचे कोण होतो, ही जाणीव मनातून लोपली नसताना ते वास्तव लपवून एकाच वास्तूत राहणं मला तरी जमणार नाही!’’
दुपारी आईंकडे गेले.. त्यांना पत्राचं काहीच सांगितलं नव्हतं.. पण माझ्या पाठीवर थाप मारून त्या हसल्या आणि म्हणाल्या, ‘‘एक परीक्षा उत्तीर्ण झालीस!’’
मला गुरुदेवांनी म्हणजेच आईंनीच खंबीर केलं.. त्या अतिशय कोमल होत्या तितक्याच कठोरही होत्या. आध्यात्मिक उन्नतीचा स्त्रियांनाही अधिकार आहे आणि तिला आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे, असं त्यांना कळकळीनं वाटे. आपल्या स्त्रीभक्तांच्या पाठीशी त्या एखाद्या वाघिणीप्रमाणे उभ्या ठाकत. एकदा एका गुरुभगिनीची आजारी आई गेली आणि त्यानंतर तिची मुलगी बाळंतपणाला म्हणून येऊन गेली. दोन्ही प्रसंगांत तिला बरीच दगदग झाली होती. विश्रांतीची गरज होती. पण सांगणार कुणाला? गृहिणीला हक्काची रजा असते का? तिच्या घरी आई एका भल्या सकाळीच थडकल्या. तिच्या पतीची कार्यालयात जाण्यासाठीची लगबग सुरू होती. त्यांना म्हणाल्या, ‘‘मी उद्या इंदूरला जाणार आहे. हिला विश्रांतीची गरज आहे. हिलाही नेणार आहे!’’
त्या गुरुभगिनीचे पती नाराजीच्या सुरात म्हणाले, ‘‘घरात जेवणाखाण्याचं काय मग?’’
त्यावर आई ताडकन म्हणाल्या, ‘‘तुम्ही काहीही करा.. उद्या ही कायमचीच गेली तर काय कराल?’’
असा सारा सडेतोड मामला होता.
एकदा अशाच परराज्यात गेल्या होत्या. तिथं आत्मज्ञानावर कुणाचं तरी प्रवचन होतं. तर या पहिल्या रांगेत जाऊन बसू लागल्या. एक गृहस्थ लगबगीनं आला आणि म्हणाला, ‘‘ही पुरुषांची जागा आहे.’’
त्याच्याकडे रोखून पाहात आईंनी विचारलं, ‘‘इथं कोण स्त्री आणि कोण पुरुष?’’
तो वरमून म्हणाला, ‘‘माताजी तुम्ही बसा इथंच.’’
गुरुमंदिरात जायला आवडायचं.. पण इतर गुरुभगिनींकडे पाहून वाटायचं, आपण अगदीच सामान्य आहोत.. ना आर्थिक संपन्नता, ना विद्वत्ता.. ‘‘तुम्ही काय करता? पती काय करतात? मुलं काय करतात?’’ हे प्रश्न खोलवर रुतायचे.. भीतीच वाटायची कुणाशी ओळख करून घेण्याची.. इथंही आईंनीच सावरलं.. म्हणाल्या, ‘‘आयुष्य लपत नाही.. मग ते लपवण्याची तगमग कशाला? त्यापेक्षा ‘मी’पणा लोपावा ही तळमळ वाढावी.. तो लोपला की आयुष्य आहे तसं स्वीकारता येतं!’’
(पूर्वार्ध)
चैतन्य प्रेम
chaitanyprem@gmail.com