आज ही माझी मुलं पाककलेच्या जोरावर देशभरातच नव्हे तर परदेशांतही पोहोचली आहेत. या मुलांना त्यांच्या जीवनानं खूप काही शिकवलं आहे आणि या मुलांच्या जीवनानं मला खूप काही शिकवलं आहे.. आणि आजही ती माझी ‘शिक्षक’च आहेत.. एका अभंगात थोडा बदल करून मला म्हणावंसं वाटतं.. काय या मुलांचे मानू उपकार? मज निरंतर जागविती!!
मुंबईत हॉटेलमध्ये काम करायला आलेल्या अनेक मुलांपैकी हा एक मुलगा. मराठवाडय़ातल्या शाळेतून थेट पळून आलेला! पहिली काही र्वष तर तो कुठला हे त्यानं कुणालाच कळू दिलं नव्हतं.. र्वष सरत गेली. त्यानं तारुण्यात प्रवेश केला.. तो देखणा होताच. जवळच्या दुकानात काम करणाऱ्या, परिस्थितीनं गरीब असलेल्या एका मुलीच्या प्रेमात पडला.. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या.. तिच्या घरूनही या लग्नाला विरोध नव्हता.. पण काही दिवसांत ती तुटकपणे वागू लागली.. याला टाळू लागली.. हा बेचैन झाला.. एकदा तिला गाठून जाब विचारला.. ती म्हणाली की, ‘‘घरच्यांनी माझं लग्न ठरवलंय.. मला विसरून जा!’’ हा कडाडून भांडला, पण ती ठाम होती.. हा उद्ध्वस्त मनानं माझ्यापाशी आला.. सगळं सांगून म्हणाला, ‘‘घर तर कधीच दुरावलंय आता हीसुद्धा.. मग जगू कशाला?’’
आत्महत्येचे किंवा दुसऱ्याला कायमचा धडा शिकवण्याचे विचार या मुलांच्या तोंडी फार पटकन येतात.. त्यांचं मन थाऱ्यावर आणणंही सोपं नसतं.. तरी त्याला खूप समजावलं.. दोन दिवस तो यंत्रवत वावरत होता.. मलाच राहावलं नाही.. खरं कारण कळावं, या हेतूनं त्या मुलीच्या जवळच्या मैत्रिणीला भेटलो.. तिनं सांगितलेली माहिती मन हेलावणारीच होती. त्या मुलीच्या आईला कर्करोग झाल्याचं उघड झालं होतं. उपचारांसाठी जो खर्च येणार होता तो आकडा ऐकूनच घरातले हबकून गेले होते. त्यानंतर तिच्या वहिनीनं हे स्थळ आणलं.. त्या मुलाची परिस्थिती चांगली होती आणि त्यांनी तिच्या आईच्या उपचारांचा खर्च करण्याचं वचन दिलं होतं. या मैत्रिणीला ती मुलगी म्हणाली की, ‘‘मी तरी काय करू? आईनं आमच्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत.. तिला खंगत खंगत मरू कशी देऊ? त्याच्यावर माझं काय कमी प्रेम का आहे? पण आता पर्याय नाही. शिवाय मी त्याच्या जीवनातून दूर झाले तर तो सुरळीत जगेल तरी.. फार तर जन्मभर मला शिव्या घालेल, पण सावरेल.. लग्न करेल.. सुखी होईल!’’
परिस्थितीनं, शिक्षणानं, सामाजिक दर्जानं श्रीमंत असलेल्या समाजातल्या मुला-मुलींचं आकलन कुठे आणि गरिबीत पिचत असतानाही आपल्या इच्छेचा दुसऱ्यासाठी त्याग करण्याची ही भावनिक श्रीमंती कुठे! तिच्या म्हणण्याप्रमाणेच झालं.. तो हळूहळू सावरू लागला.. मग कधी तरी तिच्या प्रेमाचा उदात्त अर्थ मी त्याला समजावला.. यानंतर काही दिवसांनी त्यानं गावी परतावं म्हणून मी मोहीमच सुरू केली! तो म्हणू लागला, ‘‘मला भीती वाटते.. आई-बाप जिवंत आहेत की नाहीत, तेही माहीत नाही.. नसलेच तर ते माझ्यामुळेच गेले, अशा शिव्या गावाकडून खाव्या लागतील.. त्यापेक्षा न गेलेलंच बरं!’’ तरी वर्षभराच्या माझ्या समजावण्याला यश आलं.. ‘‘तुझ्या आईबापाचं रडणं आता मला सहन होत नाही,’’ असंही मी सरळ ठोकून दिलं आणि त्याच्या मनातलं घराचं प्रेम जागं झालं.. तो जायला निघाला.. अट एकच होती की दर अध्र्या तासानं मी त्याच्याशी मोबाइलवरून बोलायचं आणि काही गडबड वाटली तर तो तसाच परत निघून येईल! दर अध्र्या तासांनी मी त्याच्याशी बोलत होतो.. त्याचा अखेरचा फोन गावच्या वेशीवरून आला.. भेदरलेला.. म्हणाला, ‘‘खूप लोक जमल्येत.. मला मारतील की काय?’’ मी हसलो म्हणालो, ‘‘महाराजांचं नाव घे आणि जा सरळ!’’ म्हणाला, ‘‘कधी केला नाही एवढा जपच तर करतोय आत्ता!’’ काही मिनिटांत फोन वाजला.. पलीकडून त्याचे वडील ओक्साबोक्शी रडत होते.. म्हणाले, ‘‘लेकाला पाहण्याआधीच जीव जाईलंसं वाटत व्हतं.. आज भरून पावलो!’’
आज तो सुखात आहे, पण महानगराच्या संस्कारामुळे खेडय़ात निरुपयोगी झालाय! शेतातल्या कामांना तर अगदी आळशी! एकदा हसत म्हणाला, ‘‘आई रोज शिव्या घालत्ये.. म्हणते आमी राब राब राबतो आन् तू बसून खातो.. जा परत पळून!’’
पळून जाण्यावरून आठवलं. बहुतेक सुटीच्या दिवशी मुलं माझ्या घरी जमत आणि गप्पा, खाद्यपदार्थावर ताव मारणं आणि झोपा काढणं असा दिवसभराचा कार्यक्रम सुरू राही. कधीमधी मी खारे शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ यांचा ठेचा दह्य़ात घुसळून दहीपोहे बनवत असे. एकदा उमेश गौडा भल्या सकाळी घरी आला. मी आश्चर्यानं विचारलं, ‘‘डय़ुटी आहे ना?’’ म्हणाला, ‘‘हो, पण वाटलं की तुमच्या हातचे दहीपोहे खावेत. बनवाल तुम्ही?’’ मी हो म्हटलं. त्यानं सर्व साहित्य आणलं होतंच. अगदी पटकन दहीपोहे बनले. त्यानं मनसोक्त खाल्ले आणि मग श्रीमहाराजांच्या तसबिरीला आणि मला नमस्कार करून भर्रकन निघून गेला. नंतर हॉटेलला आलो तर समजलं की तो पळून गेलाय! आता त्या दहीपोह्य़ांचं आणि नमस्काराचं गूढ उकललं होतं!
कमलेश या उत्तर प्रदेशातील माझ्या एका स्नेह्य़ानं एक आठ-दहा आसनी गाडी विकत घेतली होती. तिचा पहिला प्रवास एकत्रित करावा, अशी त्याची इच्छा होती आणि मग या सर्व मुलांना गोंदवल्याला घेऊन जायचा बेत ठरला. रविवारी रात्री बारानंतर सर्व जण निघालो. दहा मिनिटं झाली नाहीत तोच कमलेशला झोप यायला लागली. गौडानं थोडं चाचरत विचारलं, ‘‘मी चालवू का गाडी?’’ कमलेशला झोप इतकी अनावर होत होती की ‘थोडा वेळासाठी’ म्हणून त्यानं गाडी उमेशकडे दिली आणि प्रत्यक्षात गोंदवल्यापर्यंतच्या दीर्घ प्रवासाचं सारथ्य या मुलानंच केलं! सकाळी आम्ही पोहोचलो तेव्हा कानडी-नेपाळी-तामिळी-मराठी-बंगाली अशी काळी-गोरी, लहान-मोठी, उंच-मध्यम आकारातली मुलं पाहून स्वागतकक्षातल्या माणसाला वाटलं की हे सारे ‘पिकनिक’साठीच आल्येत. रात्रभर कुणाची झोप झाली नव्हती म्हणून दोन तासांपुरती खोली मागितली. बरेच आढेवेढे घेत त्यानं खोली दिली, पण झोपलं कुणीच नाही. स्नानं वगैरे आटोपून सर्व जण मंदिरात आणि तिथून जप-ध्यान मंदिरात गेलो. तेव्हा ते जुन्या जागी होतं आणि आत मिट्ट काळोख असे. आत गेल्यावर सर्व जण अगदी शांत बसले. मला भीती वाटू लागली की कुणाचीच झोप झालेली नाही. या अंधारात त्यांना झोप लागेल. मग कुणाला ते दिसलं तर काय वाटेल? त्यामुळे मी डोळे ताणून प्रत्येकाकडे पाहायचा प्रयत्न करू लागलो.. पाच मिनिटांत मी प्रत्येकाला हलवून जागं केलं आणि बाहेर आलो. त्यांच्या चेहऱ्यावर थोडी नाराजीच होती. मग प्रत्येकानं आतमध्ये कोण-कोणता जप केला, ते सांगितलं. मग एकानं मला विचारलं, ‘‘तुम्ही कोणता जप केलात?’’ मला हसू आलं. न सांगता या मुलांना जप करावासा वाटला होता आणि माझा सगळा वेळ ही मुलं जागी आहेत का, ते पाहण्यातच वाया गेला होता.
मुस्तफा नावाच्या मुलानं मला नमाज़्ा शिकवला आणि काही काळ आम्ही दोघांनी कुराणाचाही अभ्यास केला. मीलन शेख हा बंगालचा एक गोंडस मुलगा. हॉटेलच्या पाकगृहात काम करत असतानाही हे दोघं रमझानही फार कडक पाळायचे. सर्वानाच या गोष्टीचं कौतुक वाटायचं. पुढे हॉटेल सोडून मीलन गुजरातला जरी उद्योगात गेला.
श्रीगोंदवलेकर महाराजांना अन्नदान अतिशय प्रिय आहे. त्यामुळे महिन्यातून एकदा या मुलांकडून अन्नदानाची प्रथाही काही काळ सुरू होती. पुलाव, तीन चपात्या, एक पातळ भाजी आणि एखादं फळ; असं भरलेली अकरा पाकिटं आम्ही तयार करीत असू. ही पाकिटं मंदिराबाहेर किंवा सिग्नलवर झुंडीने असलेल्या ‘व्यावसायिक’ भिकाऱ्यांना द्यायची नाहीत तर शक्यतो एकटय़ादुकटय़ा असलेल्या, वृद्ध अथवा अपंग आणि खरोखर निराधार भासणाऱ्या माणसाला द्यायची, असा निकषही ठरला होता. असा माणूस शोधताना मुलांची काहीवेळा दमछाकही होत असे, पण खऱ्या भुकेल्या माणसाच्या डोळ्यात ते ताजे, गरम अन्न पाहून जे पाणी येई आणि मुखातून जो आशीर्वाद उमटे त्याचेही खोल संस्कार या मुलांच्या अंतर्मनावर झाले. हे अन्नवाटप सुरू करण्याआधी एक प्रार्थना केली जाई की, ‘‘महाराज, तुम्हीच म्हटलं आहे की दुपारचे बारा वाजले की राजाच्या आणि गरिबाच्या पोटातली भूक एकसारखीच असते! त्यामुळे हे अन्न खऱ्या भुकेल्या गरिबापर्यंत पोहोचू दे. खरे दाते तुम्हीच आहात आम्ही निमित्त आहोत. त्यामुळे ज्याच्या मुखी हे अन्न लागेल त्याच्यातली देवाचं नाम घेण्याची बुद्धी जागी होऊ दे!’’
आज ही माझी मुलं पाककलेच्या जोरावर देशभरातच नव्हे तर परदेशांतही पोहोचली आहेत. ती संपर्क करतातच, पण त्यांचा राग आटोक्याबाहेर गेला तर त्यांचे पालक आणि त्यांच्या बायकादेखील तक्रारीसाठी संपर्क साधतात! रात्री बारा ते तीन ही या मुलांची मला फोन करण्याची हक्काची वेळ. कुणी दारू प्यायला असेल तर किती वेळ जुन्या गोष्टी आठवून बोलत राहील, यालाही नेम नाही! मग जप किती होतो, नमाज पाचही वेळचा सुरू आहे का, रोझे पाळले गेले का इथपासून ते पैसा वाचवता का, मुलांचं शिक्षण सुरू आहे का, इथपर्यंत माझ्या चौकशांना त्यांना तोंड द्यावं लागतं.
या मुलांना त्यांच्या जीवनानं खूप काही शिकवलं आहे आणि या मुलांच्या जीवनानं मला खूप काही शिकवलं आहे.. आणि आजही ती माझी ‘शिक्षक’च आहेत.. तसं या मुलांपलीकडे मी सहसा कुणाशी मनमोकळं बोलू शकत नाही. पण ज्या काही थोडय़ा लोकांना भेटलो त्यांच्या तोंडून माझी वारेमाप स्तुती मनीष नावाच्या एका मुलानं ऐकली. ती ऐकून तो मला गंभीरपणे म्हणाला, ‘‘तुम्ही आमचे आहात ते ठीक आहे. लोकांचे होऊ नका.. बाबागिरी कधी करू नका!’’
एका अभंगात थोडा बदल करून मला म्हणावंसं वाटतं.. काय या मुलांचे मानू उपकार? मज निरंतर जागविती!!
चैतन्य प्रेम
chaitanyprem@gmail.com