खूप वर्ष माईंनी मंदिर सांभाळलं.. माणसं जोडली, त्यांना गुरुदेवांकडे वळवलं.. पण कालांतरानं देह थकत चालला.. वारंवार आजार भेटीला येऊ लागला तेव्हा त्यांनी ठरवलं की, गुरुमंदिर सोडायचं! मी म्हणालो, ‘‘कशाला सोडता? कधी उपचारांची गरज लागली तर इथं ते सारं सहजपणे मिळेल..’’ तर म्हणाल्या, ‘‘मी इथं आले ते गुरुदेवांच्या सेवेसाठी. ती सेवा जर या देहाच्यानं होत नसेल आणि उलट जर या देहाचीच सेवा करून घ्यावी लागत असेल, तर मी इथं राहता कामा नये! हे गुरुमंदिर आहे.. मला याचा वृद्धाश्रम करायचा नाही!!’’

पुन्हा सांगतो! घडलं तेच लिहिणार आहे.. पण यातल्या कुणाचंही नाव उघड करणार नाही. का? आज सांगीनच.. तर घडलं ते असं..

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
middle-class father video
‘बाप असेल त्या परिस्थितीत आनंदी राहायला शिकवतो…’ मध्यमवर्गीय बापाचा सुंदर VIDEO एकदा पाहाच…
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
1st anniversary celebrations of Ram Lalla idol consecration
अयोध्येत रामभक्तांची गर्दी ; रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा पहिला वर्धापन दिन सोहळा
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी

एखाद्या प्रवाही रेषेसारखं आपलं जीवन सरळ सोपं असेल, अशीच माणसाची कल्पना असते. काही दशकांपूर्वीच्या स्त्रीची तरी बहुतांश हीच कल्पना असते. लग्न होणं, मुलं होणं, त्यांची शिक्षणं, त्यांची लग्नं, नातवंडांना अंगाखांद्यावर खेळवणं.. उंबरठय़ावर तांदळाची नक्षी पखरत सासरी प्रवेश करणाऱ्या स्त्रीच्या भावविश्वाचा परीघ सामान्यपणे एवढाच असे.

माईंची पाश्र्वभूमी थोडी वेगळी होती. कारण जन्म अशा घरात झाला होता ज्या घराच्या कर्त्यां पुरुषानं अवघ्या देशालाच घर मानलं होतं! स्वातंत्र्य लढय़ातल्या अनेक प्रवाहांना बळ देताना या घरानं लोकांचं अलोट प्रेम आणि तितकाच पराकोटीचा द्वेष, ध्येयाची निश्चितता आणि परिस्थितीची अनिश्चितता, असामान्य विद्वत्ता आणि ब्रिटिश सरकारची पाशवी क्षुद्रता अनुभवली होती. त्यामुळे परिस्थितीला सामोरं जात तिच्याशी झुंजण्याचा संस्कार रक्तातच होता. तरीही स्वातंत्र्य लढय़ाच्या अखेरच्या दशकातील त्या काळचा विचार करता, लग्नबंधनात अडकलेल्या मुलीचं विश्व घर आणि पतीनंच व्यापलं असणार, यात काय नवल?

जीवनाचा प्रवाह रेषेसारखा सरळ नसतोच. पण  भीतीनं, निराशेनं एकाच जागी अडखळून थांबलात तर प्रवाह थांबतो. डबकं तयार होतं.. एकाच जागी आहे त्या अवस्थेत डचमळत राहाणारं.. माई तशा निराशेनं थांबणाऱ्या नव्हत्या.. म्हणून तर समुद्रापर्यंत पोहोचल्या! त्या म्हणाल्या, ‘‘आई म्हणजे गुरुदेव ज्ञानाचा सागरच होत्या.. त्यांच्या गुरुदेव तर मला स्वातंत्र्यपूर्व काळातील या देशातील उच्च कोटीच्या ज्ञानीच वाटतात. त्या काळात देशभर फिरून त्यांनी हजारो स्त्रियांच्या आध्यात्मिक जाणिवा रुंदावल्या होत्या. त्या म्हणत की, या मानवी जीवनाचा पसारा केवळ एका वासनेमुळे आहे. ती वासना आहे तोवर जन्म आहे आणि मृत्यूही आहे. क्षणोक्षणी नवनव्या वासनेचा जन्म आहे आणि वासनापूर्तीच्या अपेक्षांचं मरणही आहे! त्या वासनेतून सुटका झाल्याशिवाय या जन्म-मृत्यूतून सुटका नाही. वासनेच्या पकडीतून सुटायचं असेल, तर भौतिक जगातल्या वस्तूंमध्ये आसक्तीनं गुंतणं कमी झालं पाहिजे.’’ परात्पर गुरू अर्थात गुरूंच्या गुरूंकडून निर्वासन होण्याच्या बोधाचा हा वारसा माईंनीही आत्मसात केला.

गुरुमंदिरात त्या जात तेव्हा काही गुरुभगिनी त्यांना हसतही. तिथं किती तरी ज्ञानचर्चा घडे. त्यात माई तोकडय़ा पडतात, असं काही भगिनींना वाटे. ज्ञानमार्गाची आपली परंपरा असताना या ‘अज्ञानी’ बाईला गुरुदेवांनी इतकं का जवळ केलंय, असाही सूर क्वचित उमटे. आईंच्या दृष्टीत मात्र शिक्षित आणि अशिक्षित, ज्ञानी आणि अडाणी, श्रीमंत आणि गरीब असा भेदच नव्हता. कोणीही, कोणत्याही स्थितीत, परिस्थितीत आणि स्तरावर असू दे. तो जसजसा जागा होत जाईल, अंतर्मुख होत जाईल तसतशी त्याची वाटचाल आत्मज्ञानाकडेच होईल, असं त्या म्हणत. काहींची अशी जडणघडण माईंनी आपल्या डोळ्यांनी पाहिली तर स्वत:च्या बाबतीतही ती अनुभवली. एक बाई धुण्याभांडय़ाचं काम करीत असे. शिकलेलीही नव्हती. पण या मार्गाची गोडी होती. कथाकीर्तनातून लहानपणापासून एक मात्र ऐकलं होतं की, गुरूशिवाय काही ही वाट पार करता येणार नाही. तेव्हा गुरू कसा मिळेल, अशी तळमळही होती. त्या ज्या घरी काम करीत त्या गृहिणीनं त्यांना एकदा आईंकडे आणलं. आईंना पाहताच त्या बाईच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. आईंनी हसून विचारलं, ‘‘काय गं, गुरू हवाय म्हणतेस, पण त्याला कुठे घेणार? डोक्यावर की कडेवर?’’ पण त्या बाईनं गुरुदेवांना काळजातच घेतलं जणू! तिनं इतकी तन्मयता आणि उंची गाठली की, आईंनी आयुष्याच्या अखेरच्या काही दिवसांत तिला विचारलं की, ‘‘माय, तू माझ्याबरोबर इतकी र्वष आहेस, मग सांग काय शिकलीस माझ्याकडून?’’ ही बाई म्हणाली, ‘‘जो सगळीकडे भरून आहे तो राम, खेळतो आहे तो कृष्ण आणि वाणीनं बोलतोय तो वासुदेव आहे!’’ त्यामुळे वरकरणी अडाणी भासलेला किती पुढे निघून जाऊ शकतो, हे जाणणाऱ्या गुरुदेवांनी माईंच्या ‘अडाणीपणा’ची पर्वा केली नाही. इतर काही भगिनींचे शेरे ऐकून एकदा आईंनी सर्व बायांना जरा स्पष्टच सांगितलं, ‘‘तुम्ही तिला आता हसता आहात, पण हीच शेवटी मला सांभाळणार आहे!’’

याचा अर्थ माईंनाही तेव्हा कळला नव्हता..

माई ज्या थोर स्वातंत्र्ययोद्धय़ाच्या घरी जन्मल्या होत्या त्यांची पुण्यतिथी जवळ येत होती. आई म्हणाल्या, ‘‘त्या दिवशी तू कथा करायचीस!’’ माई हबकल्या. काय बोलावं, कसं बोलावं, त्यांना काही कळेना. तरी जमेल तशी तयारी केली. ‘तो’ दिवस उजाडला. ज्ञानमंदिरात बायका जमल्या होत्या. आईही समोर बसल्या होत्या. कथेकऱ्याच्या महर्षी नारदाच्या गादीवर माई उभ्या होत्या. याच जागी कित्येकांनी कित्येक उत्तुंग ज्ञानमौक्तिकं उधळून लोकांना दिपवून टाकलं होतं, हे माईंनी श्रोत्यांत बसून अनुभवलं होतं. आता स्वत:ला बोलायचं होतं! काहीच सुचेना, काहीच आठवेना, तोंडातून शब्द फुटेना. गुरुदेव मात्र स्थिर आश्वासक नजरेनं पाहात होत्या. त्या नजरेत पाहताच मन थोडं स्थिर झालं, पण कथा झाली ती गुरुदेवांबद्दलच! कथा संपली. गुरुदेवांनी सर्वासमोर कौतुकच केलं.. नंतर मात्र एकटय़ा असताना म्हणाल्या, ‘‘तयारी करून बोललं जातं ते ज्ञान नसतं बरं.. ती वाचलेल्या, ऐकलेल्या माहितीच्या पुनरुक्तीची धडपड असते. ज्ञान सहजतेनं आलं पाहिजे.. त्यासाठी जे बोलतो त्याचा अनुभव पाहिजे! ज्या ज्ञानाचा स्वत:च्या जीवनात पडताळा घेता आला नाही तर ते नुसत्या शब्दांनी दुसऱ्यापर्यंत तरी कसं भिडेल? त्यामुळे जगतानाचा प्रत्येक क्षण जागृतीत जगा, मग प्रत्येक क्षण ज्ञानच देईल!!’’

एकदा माई ताक करीत होत्या. डेऱ्याइतकीच मनातही घुसळण सुरू होती! हे एवढंसं ताक घुसळून लोणी तरी हाती लागतं.. माझ्या या निर्थक जीवनात काय आहे? नुसती घुसळणच तर सुरू आहे.. तितकीच निर्थक, व्यर्थ.. त्यातून तत्त्वाचं लोणी लाभणार आहे का कुणाला? मग आपल्या जीवनाच्या या परवडीची जाणीव जागी झाली आणि मग या परवडीला जे जबाबदार वाटू लागले त्यांच्या विरोधातील भावनांनी उग्र रूप धारण केलं. मन अशांत, क्रोधित झालं की शंभपर्यंत अंक मोजायचे, हा उपाय! तो सुरू होता आणि आई अचानक खोलीत आल्या. विचारलं, ‘‘काय सुरू आहे?’’

माई विमनस्कपणे म्हणाल्या, ‘‘शंभर अंक मोजते आहे..’’ आई म्हणाल्या, ‘‘मी नाहीच.. हा देह गुरूचाच आहे, हा भाव ठेवा आणि कुणाबद्दलही मनात कटुता बाळगू नका.’’

हा प्रसंग सांगून माई म्हणाल्या की, ‘‘मग माझी तयारी करून घेण्यासाठी आईंनी मला वेळ निर्थक विचारात निर्थक जात नाही ना, याकडे लक्ष ठेवायला सांगितलं. मला याज्ञवल्क-जनक संवाद, चुडाला आख्यान वाचायला सांगितलं. म्हणाल्या – मनाची भूमी तयार करा.  मग मोकळ्या मनानं वावरू शकाल..’’ मी आर्जवी असावं, पण कुणी माझी कीव करावी, हे त्यांना मान्यच नसे. माझी अस्मिता सदैव जागी असली पाहिजे. पण ही अस्मिता सूक्ष्म अहंकारात रूपांतरित होण्याचा मोठा धोका असतो. म्हणून तीही कुरवाळत राहू नका, असं त्या सांगत. माईंनाही जाणीव झाली. ‘‘मी माझ्या बळावर निर्धारानं जगत आहे, ही माझी अस्मिता होती. पण हासुद्धा मीपणाच नव्हता का? मी केवळ गुरुदेवांच्याच आधारावर स्थिर झाले होते हे खरं नव्हतं का? त्या भेटल्या नसत्या तर शंभर अंक दिवसातून कितीदा मोजले असते ‘मी’ आणि तो उपाय निष्प्रभ ठरल्यावर काय करणार होते ‘मी’?

पती जरी पती म्हणून उरले नव्हते तरी त्यांनी देहानं या जगाचा निरोप घेण्याच्या घटनेनं त्या पार खचल्या. त्याही अवस्थेतून आईंनीच बाहेर काढलं. कालांतरानं आईंनीही देह सोडला. गुरुमंदिराची घडी नीट राहावी यासाठी माई अधिक वेळ देऊ लागल्या. मात्र एक दिवस असा आला की त्यांना सर्व सोडून गुरुमंदिर सांभाळण्यासाठी तिथंच येऊन राहावं लागलं. ‘शेवटी हीच मला सांभाळणार आहे,’ या गुरुदेवांच्या वाक्याचा अर्थ त्या दिवशी उमगला!

खूप र्वष माईंनी मंदिर सांभाळलं.. उपक्रम पार पाडले.. माणसं जोडली, त्यांना गुरुदेवांकडे वळवलं.. पण कालांतरानं देह थकत चालला.. वारंवार आजार भेटीला येऊ लागला तेव्हा त्यांनी ठरवलं की, गुरुमंदिर सोडायचं! मी म्हणालो, ‘‘कशाला सोडता? कधी उपचारांची गरज लागली तर इथं ते सारं सहजपणे मिळेल..’’ तर म्हणाल्या, ‘‘मी इथं आले ते गुरुदेवांच्या सेवेसाठी. ती सेवा जर या देहाच्यानं होत नसेल आणि उलट जर या देहाचीच सेवा करून घ्यावी लागत असेल, तर मी इथं राहता कामा नये! हे गुरुमंदिर आहे.. मला याचा वृद्धाश्रम करायचा नाही!!’’

माई तिथून गेल्या.. प्रथम एका रुग्णालयात.. मग एका वृद्धाश्रमात.. तिथपर्यंत क्षीणसा संपर्क उरला होता.. त्यांची तीन-चार पत्रं आली.. दूरध्वनीवरून क्वचित भेट झाली.. म्हणाल्या, ‘‘जगाचा आधार तुटतो म्हणजे काय आणि केवळ गुरूच सांभाळतो म्हणजे काय, हे सध्या अनुभवते आहे!’’

त्यांना म्हणालो, ‘‘गुरुदेवांच्या आठवणी लिहून काढा ना..’’ ही कल्पना त्यांना आवडली. पण इतरांनाही त्यांनी बरोबर घेतले आणि आपल्या तुटपुंज्या आठवणी  लिहिल्या.. छापून आलेलं ते पुस्तक त्यांनी मोठय़ा प्रेमानं हाताळलं आणि मला पाठवलं. ही त्यांची अखेरची अक्षरभेट..

त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या शिष्यांनी त्यांची उपचारांसह काळजी वाहिल्याचं कानावर आलं.. पण माई गेल्या होत्या.. त्यांचं जाणंही अचानक कळलं आणि हुरहुर वाटली.. मंद तेवणारी ज्योत अवचित मिटून जावी आणि कळूही नये? दुनियेच्या झगमगत्या प्रकाशानं इतकं आंधळं केलंय का आपल्याला?

माईंना एकदा म्हणालो होतो, ‘‘तुम्ही लिहून काढा सारं त्यांच्याविषयी.. लोक वाचतील..’’

म्हणाल्या, ‘‘दूरान्वयानंही त्यांचा अवमान व्हावा, अशी माझी इच्छा नाही.. आणि लोक काय करतात? कुणा तरी एकाचीच बाजू घेतात.. हा चुकला किंवा त्या चुकल्या.. जीवनाला आहे तसं स्वीकारत नाहीत.. मग काय करायचंय लिहून? ज्याचं-त्याचं जीवन ज्याचं त्याचंच असतं.. आणि काय वाईट झालं हो? लाखो लोकांना यांच्या ज्ञानाचा लाभ झाला आणि अनंत काळ तो होत राहील.. आणि त्याच घटनेनं तर गुरुदेव माझ्या जीवनात आल्या ना? हा लाभ किती मोठा आहे? यासाठी मी सगळ्या दु:खांची अनंत जन्मं ऋणी राहीन! ’’

माई गेल्यावर हे सारं आठवलं.. एका वियोगिनीचा जीवनयोगिनी होण्याचा प्रवास माझ्या मनात खोलवर आहे.. माई गेलेल्याच नाहीत.. त्या तिथेच आहेत!

चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

Story img Loader