उमेश एक हरहुन्नरी मुलगा. त्याच्या खिशात एकदा महागडं पेन मी पाहिलं. म्हणालो, ‘‘मी हे घेऊ?’’ तो म्हणाला, ‘‘हा जरूर ले लो!’’ मग त्या पेनाच्या टोपणाशी मी खेळू लागलो आणि त्या खेळात टोपणाची नाजूक काडी तटकन तुटली.. मी त्याच्याकडे लगेच पाहिलं.. त्याचा चेहरा निर्विकार होता.. मी विचारलं, ‘‘तुला राग आला ना?’’ तो त्याच निर्विकारपणे म्हणाला, ‘‘आता हे पेन तुमचं झालंय.. तुम्ही त्याचं काहीही करा.. वापरा किंवा तोडून टाका.. मला काय त्याचं?’’..
आयुष्यात काही माणसं येणं.. काही ठिकाणांशी आपलं जोडलं जाणं ‘अनपेक्षित’पणे घडतं.. खरं तर ते प्रारब्धानुसारच घडत असतं, पण आपल्याला पूर्वकल्पना नसल्यानं ते ‘अनपेक्षित’ भासतं..
आता हेच पाहा ना.. एका वाहत्या महानगरातील एका हॉटेलशी आणि देशाच्या विविध भागांतून तिथं कामाला आलेल्या मुलांशी माझा भावबंध जुळण्याचं तसं काही कारण नव्हतं.. पण ते ‘अनपेक्षित’पणे घडलंच.. हे हॉटेल माझ्या मित्राचं.. त्या मैत्रीतूनच हॉटेलचं किचन, ज्यूस-भेळपुरी काऊंटरपासून ते गल्ल्यापर्यंत मन मानेल तिथं मी रमत असे.. पण माझा आवडीचा भाग म्हणजे या मुलांमध्ये त्यांचा होऊन वावरणं, त्यांना जाणून घेत त्यांना घडताना पाहात पाहात आपणही घडत जाणं!
त्या काळी बालकामगार बंदीचा कायदा आलेला नव्हता. त्यामुळे अक्षरश: अगदी लहान लहान मुलंही घराला हातभार लावायला म्हणून पाठवली जात.. त्यांचा कुणी नातेवाईक किंवा गाववाला दुसऱ्या हॉटेलात काम करीत असे, तोच त्यांना आणून सोडी.. तेव्हा मोबाइलही नव्हते त्यामुळे घरचा संपर्क तुटल्यातच जमा असे.. मग हॉटेलमध्ये बरोबर काम करणारी मुलं हेच नवे मित्र किंवा शत्रूही बनत! हॉटेलमध्ये ‘नामकरण’ही फार उत्स्फूर्तपणे घडतं.. एक तर आजच्याप्रमाणे आपली ओळख पटवणारी कागदपत्रं गल्ल्यावर तेव्हा द्यावी लागत नसत.. त्यामुळे बरीच मुलं आपलं खरं नाव आणि खरं गावही सांगत नसत. काही जण खरं नाव सांगतही, पण ते कुणालाच खरं वाटत नसे आणि रोजच्या व्यवहारात तर त्यांना नवं नाव ठेवलं जात असे.. रूप, रंग किंवा एखादा आवडीचा खेळ किंवा एखादी सवय यावरून हे ‘नामकरण’ होई.. जसं काल्या, चिकना, क्रिकेटची आवड असलेल्याला ‘धोनी’ आणि गाणी ऐकायला आवडणाऱ्याला ‘एफएम’.. एकाच नावाचा दुसरा मुलगा कामाला आला तर नंतर आलेल्याला आपलं नाव गमवावं लागत असे.. त्याला त्याच्या गावावरून वा राज्यावरून नवं नाव बहाल केलं जात असे.. जसं ‘सातारा’, ‘आग्रा’ किंवा ‘बंगाली’.. ‘सेठ का दोस्त’ असं माझं पहिलं नामकरण त्यांच्या-त्यांच्यात बोलण्यापुरतं झालं.. मग मी सतत देवाधर्माचं बोलत असे म्हणून ‘भगवान का आदमी’ अशी बढती मिळाली.. पण अखेर मला बोलावण्याची वेळ वारंवार येऊ लागली तेव्हा ‘महाराज’ हे नाव मिळालं.. मी सारखा गोंदवलेकर महाराजांच्या गोष्टी सांगत असे, म्हणून! बरं या ‘महाराज’गिरीचा मी स्वीकार केला कारण त्यात श्रेष्ठत्व-कनिष्ठत्व असा काडीचा भाव नव्हता.. ‘‘महाराज इकडे लुडबुड करू नका.. जा बाहेर गल्ल्यावर बसा..’’ इथपासून ते ‘‘महाराज आपको दुनिया मालूम नहीं.. आपको अकलही नहीं’’ इथपर्यंत सहज आपलेपणा त्यात भरला होता!
ही मुलं देशभरातून आली असतंच, पण सगळीच काही नीट घरी सांगून सावरून आली असत असं नव्हे! कुणी घरच्यांशी भांडून शाळेला जाता जाता दप्तरासकट ४०० किलोमीटर अंतर कापून पळून आला असे.. कुणी याच महानगरात आलेल्या एका गाववाल्याची दुष्मनी चुकती करण्याचं ‘उदात्त’ ध्येय उरी बाळगून आला असे.. तर कुणी चित्रपटात चमकण्याच्या हेतूनं आला असे.. राग, सूड आणि स्वप्नांची अखेर मात्र या हॉटेलातच होत असे.. घराशी संपर्क तुटला असेच आणि त्यामुळे धोक्याची अनेक वळणंही मार्गात असत.. जेवणखाणं आणि राहाणं हे महानगरातले दोन प्रमुख खर्च हॉटेलातच राहात असल्यानं भागत आणि वर टीपही मिळत असे.. त्यामुळे रोजच हाती पैसा खेळत असे.. वडीलधाऱ्यांचा अंकुश नाही, रोखणारं-समजावणारं कुणी नाही आणि हाती थोडा का होईना पैसा आहे, एवढं कारण वायफळ खर्चापासून व्यसनांपर्यंत गुरफटायला पुरेसं असे.. त्यांच्या व्यसनांना विरोध करायचा नाही, पण व्यसनं थोडी कमी करायला सुचवायचं, असं तत्त्व मी पाळलं होतं.. लहान मुलं काही बोलत नसत, पण मोठी मुलं कधी कधी चिडून म्हणत की, ‘‘आम्ही आईबापाचंही ऐकत नाही तिथं तुम्ही कोण?’’ बरीच मुलं घरच्या परिस्थितीपायी पळून आल्यानं शिक्षणापासूनही तुटलेली असत.. देवाधर्माची क्षीणशी जाण आणि भीती असली तरी देवालाही त्यांनी आखून दिलेल्या मर्यादेबाहेर त्यांच्या आयुष्यात प्रवेशाची परवानगी नव्हती! बऱ्याच जणांनी तर गावी धर्माचं आणि रूढी परंपरांचं विद्रूप रूपच अनुभवलं होतं.. विषमतेचे चटके सोसले होते..
मारुती म्हणून एक कानडी मुलगा होता.. गप्पांच्या ओघात त्यानं आणि ‘सातारा’नं मला विचारलं की, ‘‘महाराज आपकी जात क्या है?’’
मी माझी जात सांगितली.
त्यावर ते उसळून म्हणाले, ‘‘ नहीं हो सकता!’’
मी आश्चर्यानं हसत विचारलं, ‘‘असं का म्हणता?’’
ते म्हणाले, ‘‘क्यो कि आप अच्छे हो!’’
त्यावर मी हसून म्हणालो, ‘‘ जातीधर्मावरून माणसाचं चांगलं-वाईटपण ठरत नाही. प्रत्येक जातीधर्मात दोन्ही प्रकरची माणसं असतात.’’
पण मारुतीनं सांगितलं तो अनुभव अनेकांचा होताच की.. लहानपणापासून त्याच्या गावी त्यानं अस्पृश्यतेचे चटके अनुभवले होते.. अंगावर सावली पडली तरी माझ्या बापानं शिव्या खाल्ल्या आहेत, असं त्यानं सांगितलं.. मग म्हणाला, आम्ही शाळेतून येत असताना जर समोरून बापाला शिव्या घातलेला तो म्हातारा आला ना तर आम्ही वॉटरबॅग मुद्दाम फिरवत फिरवत त्याच्या जवळून जायचो.. आमचा स्पर्श चुकवायला त्याची धांदल उडायची आणि मग शिव्या घालत आमच्यावर ओरडायचा.. आता त्याची मुलं पाहा, याच शहरात राहतात.. बँकांत मोठय़ा पदांवर आहेत.. वाटेत भेटली तर घरी या म्हणूनही सांगतात.. पण गावी कधी घरी येऊ दिलं नाही त्यांनी..
मारुती कानडी शिकवण्यासाठी म्हणून माझ्या घरी येऊ लागला आणि मग बरीच र्वष माझ्या घरीच राहिला. एकदा पुस्तकांचं कपाट आवरत असताना त्यानं श्रीधर स्वामी यांचं मराठी पुस्तक पाहिलं. आश्चर्यानं त्यानं विचारलं, ‘‘या आमच्या स्वामींचं पुस्तक तुमच्या लोकांकडे कसं?’’
मी म्हणालो, ‘‘हे तुमचे नाहीत बरं का, हे मराठीच आहेत!’’ त्यावर त्यानं थोडा वाद घातला, मग म्हणाला, ‘‘माझ्या काकांना श्रीधर स्वामींनी अनुग्रह दिला आहे.. त्यांच्या पादुकाही दिल्या आहेत..’’
एका दलित व्यक्तीला स्वामींनी अनुग्रह दिल्याची ही घटना मी प्रथमच ऐकत होतो. त्यामुळे मला आश्चर्य वाटलं. मी विचारलं, ‘‘त्यांना भेटू शकेन मी? श्रीधर स्वामींच्या अनेक आठवणी तरी कळतील..’’ त्यावर हसून मारुती म्हणाला, ‘‘गेली कित्येक र्वष ते मौनात आहेत.. रामनामाचा जप अखंड सुरू आहे..’’
माझ्या घरी श्रीगोंदवलेकर महाराज यांची पूर्णाकृती तसबीर आणि पादुका होत्या.. मी बाहेरगावी गेलो की मारुतीच त्यांची मनोभावे पूजा करीत असे.. हॉटेलात जप सुरू करणाराही तो पहिलाच.. त्याला समोर करत मग ज्याच्या त्याच्या आवडत्या देवानुसार प्रत्येकाला जपाकडे वळवणं थोडं सोपं गेलं.. हो! पण जप काही भारंभार नसायचा.. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना प्रत्येकी अकरा वेळा आणि सुटीच्या दिवशी एक माळ, असा नेम आखला गेला होता.. मांसाहार केला असला, सिगारेट ओढली असली एवढंच काय दारूही प्यायली असली तरी जप करायचाच, हा दंडक होता.. आणि कुणाला पटो न पटो.. खरं सांगतो दारू प्यायल्यावरही ही मुलं जपाशी इतकी प्रामाणिक असत जेवढे शुद्धीवर असूनही आपण नसतो!
मुलांचं एकमेकांशी बोलणं अगदी थेट असायचं.. स्वल्पविराम, पूर्णविरामाच्या जागी शिव्याच बरेचदा पेरल्या जात.. मनात एक बाहेर दुसरं असा हिशेबीपणा नसायचा.. दुसऱ्याचं मन न दुखवता त्याला काही सांगता येतं, हे तर कधी माहीतच नव्हतं.. पण आजारपणात, संकटात एकमेकांना ती जितका आधार देत तोही पाहण्यासारखा असे.. एकदा रामनवमी १ एप्रिलच्या सुमारास आली होती.. मारुती हॉटेलच्या स्नानगृहात कपडे धूत होता आणि त्याच्या गावावरून फोन आला.. फोन घेतलेला मुलगा धावतच गेला आणि ओरडत म्हणाला, ‘‘मारुती तेरे गाव से फोन आया हैं.. तेरी माँ मर गयी हैं.. जल्दी आ..’’ मारुतीनं आतून शिव्या घातल्या की असला ‘एप्रिल फूल’ करू नकोस.. कळवळून तो मुलगा म्हणाला, ‘‘अरे सच्ची कह रहा हूँ.. मेरे माँ की कसम!’’ फोनवर बोलून झाल्यावर मारुती जवळ आला.. खूप रडला.. मग सावरून म्हणाला, ‘‘कमीत कमी रामनवमीला गेली हे तर चांगलं झालं ना महाराज? रामानं तिच्यावर कृपाच केली असेल, हो ना?’’
आईपासून किती र्वष दूर राहिला होता तो.. कधी तरी घरी परतू.. आईवडिलांना कष्ट करू देणार नाही.. सुखात ठेवू.. हे स्वप्न त्यानंही पाहिलं असेलच ना? गावी निघाला तेव्हा श्रीमहाराजांच्या प्रवचनांचं कानडी पुस्तक द्याल का, असं त्यानं विचारलं.. मी भारावून ते दिलं तर म्हणाला, ‘‘बाबा वाचतील आणि महाराज त्यांना शांत करतील!’’
उमेश गौडा म्हणून एक हरहुन्नरी मुलगा ‘बाहरवाला’ म्हणजे बाहेरच्या ऑर्डर पोचवायला होता. त्याच्या खिशात एकदा महागडं पेन मी पाहिलं आणि ते घेत म्हणालो, ‘‘मी हे घेऊ?’’ तो म्हणाला, ‘‘हां जरूर ले लो!’’ मग त्या पेनाच्या टोपणाशी मी सहज खेळू लागलो आणि त्या खेळात टोपणाची नाजूक काडी तटकन तुटली.. मी त्याच्याकडे लगेच पाहिलं.. त्याचा चेहरा निर्विकार होता.. मी विचारलं, ‘‘तुला राग आला ना?’’ तो त्याच निर्विकारपणे म्हणाला, ‘‘आता हे पेन तुमचं झालंय.. तुम्ही त्याचं काहीही करा.. वापरा किंवा तोडून टाका.. मला काय त्याचं?’’
श्रीसद्गुरूंच्या चरणीं आपण स्वत:ला पूर्ण समर्पित केलंय, असं आपण तोंडानं म्हणतो, पण आता हे जीवन तुमचं आहे याचं तुम्ही काहीही करा.. मला काय त्याचं, हा खरा निर्लिप्त भाव आपल्यात कणभर तरी असतो का हो? जगण्यात अध्यात्म कसं असावं, हे या माझ्या मुलांनीही मला खूप शिकवलंय. माझे ‘जीवन शिक्षक’ही आहेत ते!
(पूर्वार्ध)
चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com