‘गणेश महानिधी’ या विश्वस्त संस्थेच्या निमित्तानं जयंतराव साळगांवकर या धर्मज्ञानसंपन्न आणि भावसंपन्न व्यक्तीशी दृढ परिचय झाला आणि याच संस्थेच्या निमित्तानं समाजातला उपेक्षित कोपरा मनात उजळून निघाला.. मनाच्या पाटीवर व्यापक सामाजिक संस्कारांचा श्रीगणेशा उमटवून गेला..
माझ्याकडून आध्यात्मिक लिखाण सुरू झालं नव्हतं तेव्हाची गोष्ट. ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर यांची एका नियतकालिकासाठी मुलाखत घ्यायला मी गेलो होतो. दिवस अर्थातच गणेशोत्सवाच्या तोंडावरचे होते. ‘‘या दिवसांत पत्रकारांना माझी हटकून आठवण होते आणि माझ्या मुलाखतींना बरे दिवस येतात,’’ अशी कोपरखळी मारत त्यांनी भेटीची वेळ दिली होती. ‘‘पत्रकार नवे नवे असतात, पण प्रश्न जुनेच असतात. त्यामुळे विचारा काय ते,’’ असं म्हणत त्यांनी माझा चेहरा वाचायला जणू सुरुवात केली होती.
खरंच प्रश्न जुनेच होते आणि त्यामुळे मुलाखत सुरू असताना त्यांच्या कार्यालयातले कर्मचारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी, ओझरत्या भेटीपुरते आलेले व्यापारी मित्रमंडळाचे पदाधिकारी यांची ये-जाही सुरू होतीच. त्यात विचक्षण वाचकापासून एखाद्या नेत्यापर्यंत कुणी ना कुणी दूरध्वनीवरूनही जवळीक साधत व्यत्यय आणत होता. त्यांची केबिन क्षणभरासाठी ‘निर्मनुष्य’ झाल्यावर मी प्रश्न विचारला, ‘‘चाणक्यानं गुप्तहेरांचे जे प्रकार सांगितले आहेत त्यात ज्योतिष सांगणाऱ्याचाही समावेश आहे!’’ लकाकत्या डोळ्यांनी त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी म्हणालो, ‘‘म्हणजे राजानं जुजबी ज्योतिषज्ञान असलेल्या एखाद्या हेराचा बोलबाला घडवून आणायचा. मग त्याच्याकडे जाणाऱ्या दरबारी मंडळींना, मंत्र्याला त्या ज्योतिष्यानं ‘अमुक काळात राजा तुमच्यावर प्रसन्न होईल,’ असं सांगायचं. राजानं त्याप्रमाणे प्रसन्न होऊन त्या मंत्र्यावर विशेष मेहेरबानी करायची! अशानं त्या ज्योतिषावरचा विश्वास वाढवायचा. मग राजाविरुद्धच एखादी चाल खेळण्याची कुणाला बुद्धी झालीच तर तो सर्वप्रथम आडून आडून का होईना, पण त्या ज्योतिष्याचाच सल्ला घेईल, असा चाणक्याचा साधार तर्क होता.. तर प्रश्न असा की, कुणा नेत्यानं त्याचे विरोधक तुम्हाला काय काय विचारतात, असं कधी विचारलं का हो?’’
या प्रश्नावर जयंतराव खुलले आणि हसले. मग म्हणाले, ‘‘या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नंतर देईन.. पण या मुलाखतीत नको!’’ मग म्हणाले, ‘‘गणेश महानिधी ही विश्वस्त संस्था मी स्थापली आहे. तिचं काम करायला तुम्हाला आवडेल का?’’ मी काहीशा गोंधळलेल्या मन:स्थितीत या अनपेक्षित प्रश्नावर होकार भरला. जयंतरावांबरोबर सामाजिक कार्यानिमित्त असा भावबंध जुळला. जयंतराव अत्यंत दिलदार स्वभावाचे होते. अत्यंत खडतर परिस्थितीतून मार्ग काढत ते यशाच्या उच्च शिखरावर आरूढ होते; पण त्यांच्या वागण्यात श्रीमंतीचा, ज्ञानाचा, यशाचा दर्प कणमात्र नव्हता. गणपती हा विद्येचा, कलेचा आणि सामर्थ्यांचा देव आहे म्हणून प्रत्येक महाविद्यालयातील सर्वोत्तम कलावंताचा, लेखकाचा आणि छात्र सेनेतील उत्तम कॅडेटचा ‘महानिधी’तर्फे गौरव करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. त्यांचा सत्कार करण्यासाठी विख्यात कलावंत, सिद्धहस्त लेखक आणि लष्करी अधिकारी यांना पाचारण करायची योजकताही त्यांचीच. प्रत्येक मुलाला वा मुलीला येण्या-जाण्याचा खर्च आणि मानपत्र व प्रत्येकी हजार रुपये त्यांनी दिले. त्या काळी ही रक्कमही खूप मोठी होती. आध्यात्मिक विषयांवर आम्ही काही खुल्या निबंध स्पर्धाही आयोजित केल्या. त्यातून अध्यात्माबाबत समाजाचं मत काय आहे, आकलन काय आहे, आक्षेप काय आहेत, याबाबत माझी जाण वाढायलाही मदत झाली.
माणसं वाचण्याचं अद्भुत ज्ञान जयंतरावांना होतं. अनेकदा ते मिस्कील भाष्यही करायचे. अनंत माणसांचे अनंत किस्से सांगतानाही ते रंगून जात. त्यातले काही किस्से हे मनमोकळं हसवणारे, तर काही डोळ्यांच्या कडा पाणावणारे असत. एका उद्योजक मित्राचा किस्सा त्यांनी सांगितला. तो उद्योजक एकदा आजारी पडला. सकाळपासून अंगात ताप भरला होता. तरी घरातलं कुणी खोलीत फिरकलं नव्हतं. थोडय़ा वेळानं सून आली. अगदी हळुवार आवाजात तिनं विचारलं, ‘‘दादा, आज तुम्ही बाहेर पडणार नाही ना?’’ घरात कुणाला तरी नव्हे तर साक्षात सुनेलासुद्धा माझी काळजी आहे, या विचारानं जयंतरावांच्या या मित्राचा ऊर भरून आला. तो कण्हत म्हणाला, ‘‘हो.. आज घरीच आराम करीन.’’ मग सुनेनं पुन्हा हळुवारपणे विचारलं, ‘‘मग आज तुमची गाडी घेऊन मी दिवसभर बाहेर जाऊन आले तर चालेल ना?’’
एका वृद्ध परिचिताची गोष्ट तर मनात रुतणारी. ग्रंथालयातून निवृत्त झालेला हा वृद्ध कुठल्याशा एका संस्थेची किरकोळ कामं करीत असे. एकदा दुपारी तो त्या संस्थेसाठी देणगी घ्यायला म्हणून जयंतरावांकडे आला. देणगी देऊन झाली. जेवणाची वेळ होती म्हणून जयंतरावांनी त्याला जेवून जायला सांगितलं. तो म्हणाला, ‘‘मी थोडय़ा वेळापूर्वीच डबा खाऊन घेतलाय.’’ मग निदान दूध पिऊन जा, असं म्हणून जयंतराव आत गेले. थोडय़ा वेळानं बाहेर येतात तर दुधाचा कप रिकामा झालेला, पण पेपर वाचता वाचता त्या वृद्धाचा आरामखुर्चीत डोळा लागलेला. अध्र्या-पाऊण तासानं तो खडबडून जागा झाला आणि ओशाळला. मग थोडय़ा गप्पा होऊन तो गेला. तो जाताच जयंतरावांना त्याचं एक पावती पुस्तक तिथंच पडलेलं दिसलं. त्याचं घर जयंतरावांच्या कार्यालयाच्या मार्गावरच होतं म्हणून चार वाजता कार्यालयाकडे जाताना जयंतराव ते घेऊन गेले. त्याच्या घरी गेले तर दाराला कुलूप. तोच शेजारचं दार उघडलं. त्या वृद्धाची जयंतरावांनी चौकशी केली तर ती शेजारची बाई म्हणाली, ‘‘काय सांगावं हो! घर बिचाऱ्या आजोबांच्याच नावावर आहे, पण सकाळी ऑफिसाला जाताना मुलगा आणि सून त्यांना घराबाहेर काढतात. दिवसभर यांनी वणवण करीत वेळ काढावा, बरोबर दिलेला जेवणाचा डबा खावा आणि संध्याकाळी ते दोघं आले की घरी परतावं, असा दंडक आहे! निदान रात्री तरी बेवारस झोपावं लागत नाही, एवढय़ाच समाधानावर जगताहेत आजोबा!’’
अनंत किश्शांबरोबरच धर्म, अध्यात्म, सामाजिक प्रश्न अशा विषयावरही बरीच चर्चा जयंतराव आवर्जून करीत. बदललेल्या काळानुसार अनेक प्रथांचं अभिनव रूपांतर त्यांना सुचत असे. एखाद्या अनाथाश्रमाला किंवा ग्रामीण भागातल्या शाळेला टय़ूबलाइट, दिवे देऊन दिव्यांची अवस साजरी करावी, प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या मुलांना शैक्षणिक मदत देऊन सरस्वती पूजन साजरं करावं, अशा काही कल्पना ते मांडत. ‘धर्मशास्त्रीय निर्णय’ या ग्रंथात त्यातल्या अनेक कल्पना त्यांनी ग्रथित केल्या आहेत.
त्यांना असलेल्या सामाजिक जाणिवेमुळेच ‘महानिधी’तर्फे सामाजिक पुरस्कार देण्याची कल्पना सुचली. सगळं काही करून थकलेल्या आणि आता पुरस्कारापुरतं काम उरलेल्या कुणालाही हा पुरस्कार देऊ नये, तर नवीन पिढीतल्या किंवा उपेक्षित राहिलेला सामाजिक प्रश्न धैर्यानं हाती घेतलेल्या व्यक्तीस हा पुरस्कार द्यावा, असा माझा आग्रह होता. तो जयंतरावांनीही मानला. पहिला पुरस्कार दिला गेला तो ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’च्या मेहरुन्निसा दलवाई यांना! समाजाचे किंवा सरकारचे कोणतेही पाठबळ नसलेल्या आणि मुस्लीम समाजासाठी काम करणाऱ्या संघटनेनं ‘गणेश महानिधी’ या संस्थेचा पुरस्कार स्वीकारणं ही मोठी गोष्ट होती; पण त्यासाठी कित्येक दिवस आधी सहा तास मला दलवाई यांच्याशी चर्चा करावी लागली. आता खरं तर एका सच्च्या निष्ठावंत रणरागिणीशी संवाद साधण्याची ही संधीच होती. त्या चर्चेनं माझ्यावरही काही संस्कार केलेच. कोणत्याही पक्षाशी वा धार्मिक संघटनेशी आमचा काही संबंध नाही, हे त्यांना दीर्घ चर्चेअंती पटलंच; पण ‘‘हा पुरस्कार मलाच का? यामागे तुमचा हेतू नेमका काय आहे?’’ या त्यांच्या प्रश्नांचा ऊहापोह करताना सामाजिक समन्वयाचं महत्त्वही दोन्ही बाजूंना पटलं. मग सामाजिक प्रश्न, धर्माचं स्वरूप, धार्मिक सलोख्याकरिता काय करता येईल, दोन्ही धर्मातले गुण-दोष यावरही चर्चा झाली.
धर्मबंधनांच्या सीमा ओलांडणाऱ्या या पुरस्काराला अनेक नामवंतांकडून शुभेच्छा मिळाल्या तेव्हा दुसरा पुरस्कार कुणाला द्यावा, यावर अधिक गांभीर्यानं विचार सुरू झाला. त्या पुरस्कारासाठी निवड झाली ती रमेश हरळकर यांची. ते स्वत: सफाई कामगार होते आणि सफाई कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अखंड कार्यरत होते. या कामाकडे ते कसे वळले, हे सांगताना ते म्हणाले, ‘‘एकदा मी संध्याकाळी कामावरून येऊन घराबाहेर बसलो होतो. एक तरुण मुलांचं टोळकं सिगारेटी फुंकत जवळून गेलं. त्यांना पाहून मला माझ्या मित्रांची आठवण झाली आणि जसजसा विचार करू लागलो तेव्हा जाणवलं, माझा एक एक मित्र दारूच्या व्यसनात किंवा अमली पदार्थाच्या व्यसनात गुरफटून मेला होता. मग पुन्हा त्या टोळक्याकडे लक्ष गेलं आणि जाणवलं काही तरी करायला पाहिजे.. पण काय करणार? विचार भंडावून सोडत होता. मग जाणवू लागलं, आम्हाला शिक्षण तर मोफत मिळतंय, पण मुलगा नेमकं काय शिकतो, शिकतो की नाही, याचा आई-बापाला पत्ताच नसतो. घरी ‘गृहपाठ’ दिला जातो, हेसुद्धा माहीत नसतं. कारण आई-बापही अशिक्षित असतात. मग ही मुलं संध्याकाळी घरी आली की बाहेर भटकतात आणि हळूहळू भरकटतात! कधी सिगरेट हाती येते, कधी दारू.. व्यसनाच्या जाळ्यात कधी अलगद सापडतात कुणाला कळतही नाही. मग विचार केला, या मुलांचा संध्याकाळी दोन तास अभ्यास घेणारा मोफत वर्ग का सुरू करू नये? महाविद्यालयात जाणाऱ्या वस्तीतल्याच काही जाणत्या मुला-मुलींनी ही कल्पना उचलून धरली. त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतपतच होती, पण तेवढय़ानंही बळ आलं. वस्तीलगतच्या पालिका शाळेत संध्याकाळपुरता एक वर्ग मिळाला. प्रथम गृहपाठ करून घेण्यापासून सुरुवात झाली. मग इतर अभ्यासही घेऊ लागलो. उत्तीर्ण होण्याचं प्रमाण वाढू लागलं आणि नंतर तर काही मुलं साठ टक्क्यांवरही गुण मिळवू लागली! पाहता पाहता दोनशे मुलं वर्गात येऊ लागली. मग आणखी एका वस्तीत असा वर्ग सुरू झाला.’’ हरळकर यांचं काम जिथं चालत होतं तिथंही जाऊन नव्या पिढीची शिक्षणाची आस आणि त्यांच्यातली ऊर्जा जाणून घेता आली. ‘शिका’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पाहिलं सूत्र तिथं प्रत्यक्षात येताना दिसत होतं.
अन्य कामांचा व्याप वाढत गेला तसतसं ‘गणेश महानिधी’चं काम माझ्या बाजूनं नकळत कमी होत होत थांबलंच; पण यानिमित्तानं जयंतराव साळगांवकर यांच्यासारख्या धर्मज्ञानसंपन्न आणि भावसंपन्न व्यक्तीशी दृढ परिचय झाला आणि याच संस्थेच्या निमित्तानं समाजातला उपेक्षित कोपरा मनात उजळून निघाला.. मनाच्या पाटीवर व्यापक सामाजिक संस्कारांचा श्रीगणेशा उमटवून गेला, हे कसं विसरता येईल?
चैतन्य प्रेम
chaitanyprem@gmail.com