आपल्या अंत:करणात डोकावून पाहिलं तर वाटतं की तिथे फक्त ‘अभावविश्व’च पसरलं आहे. म्हणून हाव काही संपता संपत नाही. हाव आहे म्हणून दिशाहीन धावाधावही आहेच.. आणि ती दिवसागणिक वाढतेच आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कुठल्याशा गावातून मी आणि माझा एक पंचविशीतला दुचाकीस्वार मित्र एक पत्ता शोधत निघालो होतो. पत्ता सांगणारा वाटसरू म्हणाला, ‘‘इथून सरळ गेलात की थोडी गलिच्छ वस्ती लागेल. तिच्यातूनच रस्ता जातो. तो संपतो तिथं डावीकडे वळून मुख्य रस्त्याला जा..’’

आम्ही निघालो. ‘ती’ वस्ती लागली. रस्त्याच्या दुतर्फा झोपडय़ांची चळत घरंगळत गेलेली.. माझा मित्र दुचाकीच्याच गतीनं म्हणाला, ‘‘तो माणूस गलिच्छ वस्ती म्हणाला.. पण इथंही माणसंच राहतात ना? ही तर भावविश्वंच आहेत ना प्रत्येकाची?’’

त्याचा हा टोकदार प्रश्न जणू माझ्यातल्या पांढरपेशा ‘मी’लाच होता! तो मघाचा वाटसरूही तर असाच होता.. पांढरपेशा! मी नकळत अपराधी भावनेनंच होकार भरला. या माझ्या मित्राचं अवघं जगणं संघर्षांचंच. तरी उमदेपणा काठोकाठ भरलेला. माझ्यासारख्या स्वयंघोषित ‘विचारवंता’च्या अवघडलेपणानं हसून त्याच उमदेपणानं तो अधिकच जोरात म्हणाला, ‘‘अहो भावविश्वं कसली? हावविश्वंच आहेत ही! झोपडय़ांपासून टॉवपर्यंत सर्वत्र हावविश्वंच पसरली आहेत की!’’

त्याच्या या शाब्दिक षट्कारानं मी जणू बादच झालो आणि वाटलं, खरंच हावविश्वंच आहेत ही.. शंभर रुपये गाठीला असलेल्याही हाव आहे आणि शंभर कोटी असलेल्याचीही हाव संपता संपत नाही! प्रत्येकाला जे आहे त्यात समाधान नाही.. आणखी हवं असं काही तरी उरलंच आहे. नेमकं काय हवं आणि किती हवं हेच उमजत नसल्यानं कितीही मिळालं तरी ही हाव काही शमत नाही.

श्रीगोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे, ‘कारणाचा आनंद कारणापुरता टिकतो!’ आणि थोडं आपल्या जगण्याकडे पाहिलं तरी जाणवेल ज्या-ज्या वस्तू, जी-जी माणसं आपल्याला आपल्या आनंदाची कारणं वाटतात ती आपल्या आयुष्यात आहेत तोवर.. नव्हे! ती आपल्या मनाजोगती आहेत तोवर आपला आनंद टिकतो! त्यामुळे अशा वस्तूंची आणि व्यक्तींची हाव मनात असते.. पण ज्यांना आंतरिक वाटचालीची खरी ओढ असते त्यांच्यातलं हवेपण संपत जातं.. किंवा हवेपण किती संपत आहे त्यावरून वाटचालीची प्रगती जोखता येते म्हणाना! याचा अर्थ वस्तू किंवा व्यक्तीचं मोल ते नाकारतात असं नव्हे, पण आपलं मन अडकून पडेल इतकंही मोल ते या दोहोंना देत नाहीत. ‘असलं तर असू द्या, नसलं तर नसू द्या,’ इतक्या सहजभावानं ते वावरत असतात.

माझे एक ज्येष्ठ गुरुबंधू गुरुभक्तीत अगदी रममाण झालेले होते. सगळं घरच तसं होतं. परिस्थिती बेतास बात अशीच. एकदा त्यांच्या देव्हाऱ्यातल्या काचेच्या दिव्यानं लक्ष वेधून घेतलं. त्या दिव्याची रचना मोठी मनोवेधक होती. बैठक म्हणून उपडी अर्धगोलाकार मोठी वाटी, तिच्यावर बसवलेली अर्धगोलाकार खोलगट ताटली, तिच्यात दिवा, त्यासभोवती उंच वर्तुळाकार काच आणि त्या काचेवर पुन्हा उपडी घातलेली अर्धगोलाकार वाटी..

मी थोडं कुतूहलानं विचारलं, ‘‘हा दिवा कुठून आणला?’’

ते म्हणाले, ‘‘ही काच सोडली तर बाकीचा दिवा घरच्या घरी बनवला.’’

‘‘म्हणजे?’’ मी आश्चर्यानं विचारलं.

‘‘अहो घरातल्याच वाटय़ा, ताटल्या, भांडी वापरून बनवलाय हा,’’ ते उद्गारले.

‘‘मलाही कधी तरी बनवून द्याल असा दिवा?’’ मी विचारलं.

ते म्हणाले, ‘‘कधी तरी कशाला? आत्ताच बनवू की. एक जास्तीची काच आहेच नाही तरी घरी.’’

पत्नीला म्हणाले, ‘‘या आकाराच्या वाटय़ा-ताटल्या आणा.. मी पाहिलं, वाटय़ा, ताटल्या कोऱ्या करकरीत होत्या आणि त्यात काही ना काही भरूनही ठेवलं होतं. त्यांनी आनंदानं त्या वाटय़ा रिकाम्या केल्या. धुतल्या. कोरडय़ा फडक्यानं पुसून समोर ठेवल्या. मग त्यांना छिद्रं पाडली गेली.. ठाकठूक केली गेली.. बैठक डगमगू नये म्हणून खालच्या वाटीच्या आत छोटा लाकडी ठोकळा बसवायचा होता. त्यासाठी लगेच धुण्याचं धोपाटणं आलं.. छोटय़ा करवतीनं त्याचा वरच्या दांडक्याचा भाग कापला गेला. अध्र्या-पाऊण तासात दिवा तयारही झाला! छोटय़ाशा चमच्यातसुद्धा आपला जीव अडकत असतो.. त्यामुळे या प्रसंगाचा मनावर संस्कार झालाच.

श्रीगोंदवलेकर महाराज यांचे एक अनन्य भक्त बाबा ऊर्फ केशवराव बेलसरे यांच्या जीवनातला एक प्रसंग तर विलक्षणच आहे. बापूसाहेब मराठे यांनी ‘श्रीमहाराजांनी बाबांना असे घडवले’ या पुस्तकात तो नमूद केला आहे. हा प्रसंग असा : बाबा हे तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक. दृश्य जगाला तत्त्वज्ञान मिथ्या मानतं, भ्रामक मानतं, पण त्याचं खरेपण अनुभवानं उमगावं आणि मनावर ठसावं, अशी बाबांची आर्त इच्छा होती. आपल्या आवतीभवतीचं जग आपल्याला सुख देईल, अशी आपली खोलवर रुजलेली भावना असते. अध्यात्माच्या मार्गावर आल्यावर दृश्य जगाचं सतत बदलणारं स्वरूप उमगू लागतं आणि त्याच्यावर मनाचं अवलंबणंही थांबावंसं वाटतं, पण ते साधतही नाही. आनंद हा कारणावर आणि कारणापुरता टिकून राहू नये, असंही वाटतं. परिस्थिती कशीही आली तरी आनंद टिकावा, असं वाटतं. दृश्य म्हणजे आपल्या अवतीभवती पसरलेल्या जगावरचं मनाचं जे अवलंबणं आहे ते संपावं, या भावनेतून बाबांनी श्रीमहाराजांना प्रार्थना केली की, ‘‘महाराज दृश्य जग मला सुख देईल, हा माझा भ्रम घालवा!’’

ही घटना आहे १९४२ ची. श्रीमहाराजांना देहरूपानं जाऊन तेव्हा २९ र्वष झाली होती आणि तात्यासाहेब केतकर यांच्या माध्यमातून श्रीमहाराज भक्तांशी पुन्हा संवाद साधू लागले होते. बाबांनाही तात्यासाहेबांच्याच माध्यमातून श्रीमहाराजांचा प्रदीर्घ सहवास या घटनेनंतर लाभला. तर १९४२मध्ये बाबांनी ही विनंती केली आणि श्रीमहाराज म्हणाले, ‘‘योग्य वेळ आली की हा भ्रम जरूर घालवीन!’’

ही योग्य वेळ आली १९४४ ला! त्या वर्षीच्या सात एप्रिलला मुंबई गोदीत मोठा स्फोट झाला. मोठी घबराट पसरली. मुंबईवर बॉम्बवर्षांव होणार, अशाही अफवा पसरल्या. पाऊण मुंबई रिकामी झाली! त्या वेळी बाबा बेलसरे दादरला हिंदू कॉलनीत राहात होते. त्यांच्याही मनात आलं की, आपणही मुंबई सोडून हैदराबादला वडिलांकडे जाऊन राहावं. मात्र श्रीमहाराजांना विचारल्याशिवाय काही करायचं नाही, ही सवय लागली होती. म्हणून काय करावं, हे विचारायला ते पत्नीसोबत श्रीमहाराजांकडे आले. त्या वेळी तात्यासाहेबांचे वास्तव्य मालाडलाच होतं. बाबांचं सारं सांगणं श्रीमहाराजांनी ऐकून घेतलं आणि मोठय़ा खुबीनं म्हणाले, ‘‘केशवराव, मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी माझ्याकडेच येऊन राहावं. कारण मग माझं जे होईल तेच तुमचंही होईल!’’

बाबांना हे फार आवडलं. त्यांनी विचारलं, ‘‘मग कधी येऊ? सामान कसं आणि काय आणू?’’

श्रीमहाराज म्हणाले, ‘‘आपल्याला सामान आणायचंच नाहीये! ती वेळच कुठे आली आहे?’’

मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी लागतं त्या सामानाचा हा सूचक उल्लेख होता. मग म्हणाले, ‘‘असं करा. अंगावरच्या कपडय़ांनिशी तुम्ही दोघं या. बरोबर तीन-चार महत्त्वाची पुस्तकं तेवढी आणा. बाकीचा सगळा संसार लुटून टाका!!’’

बाबांनी आणि त्यांच्या पत्नीनं ही आज्ञा तंतोतंत पाळली. दादर स्थानकातून हमाल बोलावले. समोर गरीब लोक राहत होते त्यांना बोलावलं आणि घर लुटायला सांगितलं. म्हणजे ज्याला जे हवं ते त्यानं न्यावं! तासा-दीड तासात सगळं घर रिकामं झालं!

दोघं पती-पत्नी मालाडला आल्यावर श्रीमहाराजांना फार आनंद झाला. ते म्हणाले, ‘‘केशवराव मला कसा आनंद होतोय सांगू का? एखादा उस्ताद शिष्याला गाणं शिकवत असतो. गाणं शिकत असताना तो शिष्य एखादी तान गुरूपेक्षाही चांगली घेतो. तेव्हा त्या गुरूला जो आनंद होतो ना, तसा मला होतोय! आता तुमचा दृश्य जगावरचा मोह जरूर जाईल! कसा लय लागतो बघा नामात..’’

बापूसाहेब मराठे यांनी या प्रसंगावरून बाबा बेलसरे यांच्या पत्नीला विचारलं की, ‘‘अहो वहिनी, घर लुटवू देण्याचं धाडस कसं झालं तुमचं?’’ त्यावर त्या म्हणाल्या की, ‘‘बापूसाहेब सौदा फार स्वस्त होता. दृश्याचा भ्रम जाणं ही काय कमी कृपा आहे का? त्यासाठी घर लुटवू देणं ही किंमत फार जुजबी होती. आणि ही संधी गमावली असती तर महाराजांनी पुन्हा अशी संधी दिलीच असती असंही नाही..’’

दृश्याचा भ्रम असा सुटला आणि मग काही दिवसांतच बाबांच्या जीवनात भौतिक संपदा पूर्ववत झाली, पण आध्यात्मिक संपदा कैकपटीनं वर्धिष्णु राहिली.. ती अखेपर्यंत!

असे प्रसंग वाचून आपल्या अंत:करणात डोकावून पाहिलं तर वाटतं की आपल्या अंत:करणात ‘अभावविश्व’च पसरलं आहे! म्हणून हाव काही संपता संपत नाही. हाव आहे म्हणून दिशाहीन धावाधावही आहेच.. आणि ती दिवसागणिक वाढतेच आहे..

अंत:करणातलं अभावविश्व ओसरावं आणि शुद्ध भावविश्व नांदावं, असं आपल्यालाही वाटतं ना? त्यासाठी बाबांप्रमाणे घर लुटवू देण्याची गरज नाही.. आपला तो आवाकाही नाही..

पण निदान एक गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे..

एकदा अलाहाबादच्या एका शिष्याला गुरुजींनी बोलावणं पाठवलं. तो दूरध्वनीवरून अजीजीनं म्हणाला, ‘‘गुरुजी अमुक-अमुक महत्त्वाचं काम आहे. ते संपवून दोन दिवसांनी येऊ का?’’ गुरुजी त्याला ‘हो’ म्हणाले. मग आम्हा लोकांकडे वळून म्हणाले, ‘‘मृत्यू आला तर त्याला हे सांगता येईल का? त्या क्षणी आयुष्यभर जमवलेलं आणि ‘माझं’ ‘माझं’ करीत जपलेलं सारं सोडून निघावंच लागेल. मग जे कधी ना कधी क्षणार्धात सोडावंच लागणार आहे त्यात मनानं गुंतणं तरी सोडून द्या!’’

खरंच परमार्थासाठी काही सोडायची गरज नाही.. एक मनाची ही ‘गुंतवणूक’ आणि ती जिच्यापायी होते ती हाव सोडली तर!

चैतन्य प्रेम chaturang@expressindia.com