बाबांच्या त्या भेटीचा मनावर खोलवर परिणाम झाला. मी सांगतो ना, सगळं माझ्या आशीर्वादानं चांगलं होईल, असा फसवा आशीर्वाद त्यांनी दिला नव्हता. उपाय म्हणून गंडेदोरे, ताईत दिला नव्हता. सरळ शास्त्रशुद्ध सल्ला होता तो! तो स्वीकारण्याचा आग्रहही नव्हता..
आयुष्यात योग्य माणसं योग्य वेळी येऊन आयुष्याला योग्य दिशा मिळणं, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या आयुष्यात दोन सत्पुरुष असे अगदी योग्य वेळी आले.. आता ही वेळ ‘योग्य’ म्हणण्याचं कारण एवढंच की त्याआधी ते आले असते तर त्यांच्या येण्याचं महत्त्व मला उमगलं असतंच, असं नव्हे. मग त्यांच्या येण्याचा खरा लाभही घेता आला नसता. या दोन सत्पुरुषांमध्ये पहिले होते बाबा बेलसरे!
आयुष्य तेव्हा प्रारब्धाच्या झंझावातात पाचोळ्याप्रमाणं भिरभिरत होतं. लहानपणी कीर्तनं ऐकताना डोळे पाणावत. काही ठरावीक मंदिरं आणि काही ठरावीक चर्चमध्ये शांत बसायला खूप आवडायचं. पण वय वाढू लागलं आणि ‘समज’ वाढू लागली तशी श्रद्धा ओसरू लागली होती. हिंदू धर्माचं आंधळं प्रेम होतं, पण अध्यात्माची दृष्टी आली नव्हती. त्यात मी स्वयंघोषित विज्ञानवादीही झालो होतो. त्यामुळे धर्मातल्या अनेक गोष्टी थोतांड वाटत असल्या तरी समान धर्मविचारांवर देश संघटित राहू शकतो, या मतामुळे आणि मतापुरतं धर्माला मन महत्त्व देत होतं. अध्यात्म, सद्गुरू, नाम आणि अन्य साधना यांची जाणही नव्हती. त्यामुळे बाबा बेलसरे यांच्याकडे गेलो तेव्हा आपण एका विचारवंत सत्पुरुषाच्या ‘दर्शना’ला जात आहोत, याची काही जाणीव नव्हती.
माझ्या एका परदेशस्थ आप्त तरुणीला त्यांच्या दर्शनाची ओढ होती आणि तिला केवळ सोबत म्हणून मी गेलो होतो. भगवे कपडे घातलेल्या आणि हारबीर घातलेल्या एखाद्या बुवाच्या दरबारात आपल्याला काही मिनिटं काढावी लागणार आहेत, इतपत माझी समजूत होती. प्रत्यक्ष भेटीत तिला सुखद तडा गेला. बाबा सहजप्रसन्न होते आणि साध्याशा पांढऱ्या शुभ्र पेहरावात होते. प्रथम त्यांनी माझ्याकडे एक खोलवर नजर टाकली आणि तीन प्रश्न विचारले. तुमचं नाव काय, नोकरी कुठे करता आणि पगार किती! कुणीही ज्येष्ठ माणूस पहिल्याच भेटीत विचारेल इतके सहज साधे प्रश्न! मी यांत्रिकपणे उत्तरं दिली आणि त्यानंतर बाबांनी असं एक वाक्य उच्चारलं ज्या वाक्यानं माझ्या तेव्हाच्या आंतरिक मनोदशेवर थेट बोट ठेवलं होतं! इतरांना त्या वाक्याचं मर्म कळणं शक्यच नव्हतं. पण मला मात्र त्या वाक्यानं आरपार धक्का दिला. मग बाबा त्या आप्त तरुणीकडे वळले. तिलाही तीन साधे प्रश्न विचारले. नाव काय, पती कसा आहे आणि तुम्हा उभयतांमध्ये संबंध सुखाचे आहेत ना? तिनं सगळं काही आलबेल असल्याचं ध्वनित करणारी उत्तरं दिली. तिचा परभाषक तरुणाशी प्रेमविवाह झाला होता त्यामुळे त्यांचे संबंध प्रेमाचे असणारच, हे मीही जाणून होतो. बाबा मात्र गंभीरपणे म्हणाले, ‘‘तुम्हाला जो आजार जडला आहे तो मानसिक आहे आणि तो शक्य असूनही स्वत:चं मूल होऊ न दिल्यानं जडला आहे! मूल होऊ द्या मग हा त्रासही उरणार नाही.. आणि भगवंताची जी भक्ती तुम्ही करीत आहात त्यावरून तुम्हाला कोणी वेडय़ात काढत असेल, तर त्याला बेलाशक तसं करू द्या. त्याची काळजी भगवंतच करील!’’
आम्ही घराकडे निघालो आणि तिनं सांगितलं की, तिचा नवरा खरंच अत्यंत चांगला असूनही आणि सर्वाधिक कष्ट तोच करीत असूनही त्यांच्यात अधेमधे खटके उडत होते. या भांडणातून आपलं पटेनासंच झालं आणि घटस्फोटापर्यंत वेळ आली तर त्याच्या झळा मुलांना कशाला, या विचारातून तिनं मूल होऊ दिलं नव्हतं! बाबांच्या त्या भेटीचा मनावर खोलवर परिणाम झाला. मी सांगतो ना, सगळं माझ्या आशीर्वादानं चांगलं होईल, असा फसवा आशीर्वाद त्यांनी दिला नव्हता. उपाय म्हणून गंडेदोरे, ताईत दिला नव्हता. सरळ शास्त्रशुद्ध सल्ला होता तो! तो स्वीकारण्याचा आग्रहही नव्हता.
मग मी श्रीगोंदवलेकर महाराज यांचं चरित्र वगळता, बाबा यांनी लिहिलेली बहुतेक सगळी पुस्तकं वाचली. काही तर इतक्यांदा वाचली की ती जणू पाठच होऊन गेली. त्या काळी काही कामानिमित्त मला आठवडय़ातून तीन दिवस दहा-दहा तासांचा प्रवास करावा लागे. तेव्हा एकानं बाबांच्या प्रवचनाच्या ध्वनिफिती दिल्या होत्या. त्याही प्रवासात इतक्यांदा ऐकल्या की बाबांचं पुस्तक जणू मी त्यांच्याच शब्दफेकीनुसार वाचत असे! तोवर सहा महिने उलटले. लखनऊला नोकरीनिमित्त असलेला एक तरुण आप्त तेव्हा सुटीत आला होता. लखनऊत कोणीच परिचयाचं नसल्यानं दिवसभर नोकरी आणि रात्रभर जप, असा त्याचा दिनक्रम झाला होता. त्याला जपातल्या अडचणींबद्दल बाबांना भेटायची इच्छा होती. मला निमित्तच हवं होतं! बाबांकडे गेलो. या वेळची मन:स्थिती काहीशी वेगळी होती. भारावलेली.. त्या सहा महिन्यांच्या अवधीत बाबांना हजारो माणसं भेटून गेली असणार. त्यामुळे त्यांनी मला ओळखण्याची शक्यता नव्हतीच. त्यामुळे त्यांनी पुन्हा माझ्याचकडे नजर टाकत गेल्या वेळचेच तीन प्रश्न विचारले तेव्हा मला आश्चर्य वाटलं नाही. नाव काय, नोकरी कुठे करता, पगार किती.. मी उत्तरं भरभर दिली आणि म्हणालो, ‘‘बाबा, मी मागे आपल्याला भेटून गेलो आहे.’’
बाबा सपकन म्हणाले, ‘‘पण मी सांगितल्याप्रमाणे केलं मात्र नाहीत!’’
मला आश्चर्याचा धक्का बसला. बाबा हसले. मी विचारलं, ‘‘तुम्ही माझे गुरू आहात का?’’
बाबा अधिकच मोकळं हसले आणि म्हणाले, ‘‘मी ठरवलं आहे की कुणाचाच गुरू व्हायचं नाही! पण तुमच्याकडे पाहून वाटतं की तुम्ही सज्जनगडावर जावं आणि समर्थाच्या समाधीवर अनुग्रह घ्यावा!’’
घराकडे निघालो तसतसा मनातला गोंधळ वाढत चालला होता. का कोण जाणे, गेले अनेक दिवस मनात कृष्णाविषयी प्रेम दाटून येत होतं आणि सज्जनगडावर जायचं म्हणजे राममंत्र मिळणार! राम की कृष्ण, असा पेच मनात उत्पन्न झाला. वरकरणी किती क्षुल्लक गोष्ट! पण तेव्हा ती उग्र भासत होती, एवढं खरं. पुन्हा बाबांकडे जाऊन त्यांना हे विचारायची प्राज्ञा नव्हती. कोणाला विचारावं, हे उमगत नव्हतं आणि अचानक भाऊंचं नाव डोळ्यापुढे आलं! नाव डोळ्यापुढे आलं कारण एकाच कार्यालयात, पण स्वतंत्र विभागात काम करीत असूनही भाऊ काळे आहेत की गोरे, हे मला ठाऊक नव्हतं!
**
‘‘घरत भाऊ आहेत का हो? बोलावता का जरा? तातडीचं काम होतं..’’
अजिजीच्या सुरात दूरध्वनीवर पलीकडून कुणी बोलत असे. असे दूरध्वनी अधेमधे येत आणि दूरध्वनी माझ्याच टेबलवर असल्यानं मला ते घ्यावे लागत. मग मी काहीशा नाराजीनं शिपायाला हाक मारून सांगे, ‘‘अरे, त्या भाऊंसाठी फोन आलाय.’’
असा दूरध्वनी बहुतेक वेळा एखाद्या रुग्णालयातून असे. कुणाची तरी प्रकृती चिंताजनक आहे आणि भाऊंनी देवाला प्रार्थना करावी, असं त्याचं साकडं असे. हे सारं बोलणं ऐकूनही मला राग येई. प्रार्थनेनं का कुणाची प्रकृती सुधारते, असं वाटे आणि हा सगळा वेडेपणा आहे, असं मानून मी गप्प राहात असे.
निरोप जाताच काही क्षणात आतून भाऊंचा एखादा सहकारी येई आणि सांगे, ‘‘काळजी करू नका. साधना चालू ठेवा. भाऊंनीही प्रार्थना केली आहेच.’’
कधी कधी परत दूरध्वनी यायचा.. प्रकृती सुधारत आहे.. मी मनात म्हणे, सगळा वेडय़ांचा बाजार आहे झालं!
आज त्याच भाऊंची मला आठवण झाली आणि वाटलं, यांनाच का विचारू नये?
ज्या भाऊंना, त्यांच्या सहकाऱ्यांना आणि त्यांच्यावर श्रद्धा बाळगलेल्या भाविकांना मी नावं ठेवत असे, त्यांनाच भेटायचा विचार मनात तरी कसा आला, याचं नंतरही मला आश्चर्य वाटलं, पण योग आला होता हेच खरं!
‘‘भाऊ आहेत का?’’
मी त्यांच्या विभागात पाऊल टाकत प्रश्न केला. तिथं संगणकासमोर बसलेल्या वीसेक जणांना मी कुतूहलानं न्याहाळत होतो, की यातले भाऊ कोण असावेत?
‘‘बोला! मीच भाऊ..’’
धीरगंभीर चेहऱ्याच्या एका व्यक्तीनं मोठय़ा वात्सल्यानं मला सांगितलं. भाऊ सावळ्या वर्णाचे, सडसडीत बांध्याचे आणि सहा फूट उंच होते. चेहरा अगदी शांत प्रसन्न होता. एकानं अदबीनं भाऊंच्या शेजारी माझ्यासाठी खुर्ची ठेवली.
मी म्हणालो, ‘‘मला थोडं बोलायचं आहे..’’ सर्वासमोर हे बोलावं का, असा प्रश्न मनात होता. भाऊ हसले आणि म्हणाले, ‘‘थोडय़ा वेळात कॅन्टीनला जाऊ, तिकडे बोलू. चालेल ना?’’
मी लगेच होकार भरला. कॅन्टीनमध्ये चहा पिता पिता मी बाबांशी झालेलं बोलणं सांगितलं आणि पडलेला पेच विचारला, ‘‘राम की कृष्ण?’’
भाऊ हसले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र का करत नाही? हा ज्ञानेश्वरांचा सिद्ध मंत्र आहे आणि तुमचा इष्ट देव कोण आणि इष्ट मंत्र कोणता, हे हा मंत्रच दाखवून देईल!’’
पहिल्याच पावलात मनात उडालेल्या गोंधळावर किती साधा सोपा उपाय! मग रोज भाऊंचा सत्संग मला लाभू लागला. आमचं काम संपलं की मग कार्यालयात एक तास, प्रवासात एक तास असा रोज दोन तासांचा सत्संग चाले. रात्रपाळी संपवून घरी पोहोचायला दोन वाजत. ब्राह्ममुहूर्तावर जप करावा, या हेतूनं मग मी झोपत नसे. मग त्या दोन तासांसाठी भाऊ अनेक उपासना करायला सुचवत. असंच एकदा म्हणाले, ‘‘तुम्ही रोज कापराचं हवन करा.’’ मंत्र म्हणून कापराचं हवन करण्यात मला वेगळाच आनंद वाटू लागला. तेव्हा माझा परिचय धर्मशास्त्राचं उत्तम ज्ञान असलेल्या एका ज्योतिष आचार्याशी झाला होता. सहज एकदा त्यांच्याशी बोलताना हा कापराच्या हवनाचा विषय निघाला. ते म्हणाले, ‘‘अहो, कापूर हे काही यज्ञाचे हव्यद्रव्य नाही. तो काही परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही!’’
मी विचारात पडलो. रात्री भाऊंना त्यांचं म्हणणं सांगितलं. भाऊंनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले, ‘‘तुम्ही हवन करता त्याचा तुम्हाला आनंद होतो ना?’’
‘‘हो’’ मी म्हणालो.
भाऊ म्हणाले, ‘‘ परमात्मा कुठे असतो? तुमच्या हृदयातच ना? मग जर हवनाचा आनंद तुम्हाला होत असेल, तर तो हृदयस्थ परमात्म्यालाही होतोच ना?’’
मी होकार भरला. मग भाऊ म्हणाले, ‘‘यज्ञात काय टाकतात? तीळ, तांदूळच ना? पण ते तर यज्ञपात्रात तसेच जळलेले राहतात. मग ते कुठे हो पोहोचले परमात्म्यापर्यंत?’’
त्यांच्या या उद्गारांनी मी विचारमग्न झालो. भाऊच म्हणाले, ‘‘मी यज्ञावर टीका करतो, असं नाही. पण खरा शुद्ध विधिवत यज्ञ जमणारे का? उलट कापराचं हवन साधकाला कितीतरी गोष्टी शिकवतं. कापूर जळून पूर्ण भस्मसात होतो. मागे कुठलीही खूण ठेवत नाही. साधना तशी हवी. मी केलं, हा भावही उरू नये!’’
(पूर्वार्ध)
चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com