सुमित्रा भावे
‘संवाद’ आणि ‘मुक्ती’ या दोन्ही चित्रपटांच्या प्रक्रियेत मी चित्रपट बनवण्याच्या तंत्रापेक्षा पुरुषीपणाची संस्कृतीनं दिलेली कवच-कुंडलं आपणहून टाकून देण्याची प्रेरणा घेतली. स्त्री-पुरुषात ‘संवाद’ असेल तरच मैत्री शक्य आहे आणि स्त्रीला तथाकथित साच्यातून बाहेर काढून बघायला शिकण्यात पुरुषाची स्वत:ची ‘मुक्ती’ आहे..
गुजरातमधल्या वलसाडजवळच्या पिंडवळ या छोटय़ा आदिवासी खेडय़ाकडे आमची बस चालली होती. सागाच्या झाडांमधून सूर्य अधूनमधूनच डोकावत होता, इतकं घनदाट जंगल होतं.. आम्ही ज्यांना भेटायला चाललो होतो त्या होत्या कांताबेन शहा आणि हरविलासबेन शहा. त्यांच्या ‘सर्वोदय परिवार ट्रस्ट’च्या कौलारू टुमदार घर-दवाखाना-कार्यालयाशी बस थांबली. आणि पुढचे काही दिवस मी त्या अनोख्या व्यक्तींच्या आयुष्याच्या दर्शनानं भारावून जात राहिलो. तिथून आम्ही बाहेर पडलो ते त्यांच्या आयुष्यातून व्यक्त होणाऱ्या तत्त्वज्ञानावर लघुपट बनवण्याचा निश्चय करतच..
विनोबांच्या भूदान यात्रेतून प्रेरणा घेऊन या दोघी या पिंडवळच्या जंगलात आल्या. कांताबेन कर्मठ घरातल्या बालविधवा. वडील कट्टर गांधीद्वेष्टे. अगदी गांधीजींची हत्या झाल्यावर पेढे वाटणारे! त्या तरुण मुलीला हरविलास ही मैत्रीण भेटली, जिचं स्वप्न होतं जैन साध्वी बनण्याचं. या दोघींचं एक जिवाभावाचं नातं तयार झालं. ते मैत्रीण, बहीण अशा साच्यांच्या पलीकडे होतं. विनोबा त्यांच्या या मैत्रीला आध्यात्मिक अधिष्ठान आहे असं मानत. त्या दोघी या आदिवासी भागात आल्या आणि त्यांच्या भाषेत सांगायचं तर त्यांना ‘भावनगर’पासून दूर हे ‘अभावनगर’ सापडलं. त्यांना नवनीतभाई फौजदार हे डॉक्टर आणि कांतिभाई शहा हे पत्रकार येऊन मिळाले. आणि या चार ब्रह्मचाऱ्यांचा हा सर्वोदय परिवार तयार झाला. आरोग्य, सूतकताई, वनसंरक्षण अशा अंगांनी काम वाढतच गेलं. विनोबांना गुरुस्थानी मानणाऱ्या या चौघांनी आणीबाणीमध्ये सक्रिय विरोधाची कामं करून तुरुंगवासही भोगला. आम्ही भेटलो तेव्हा कांताबेनच्या कर्करोगाशी सगळे मिळून झुंजत होते.
सुमित्राच्या ‘स्त्री-वाणी’ या संस्थेच्या एका प्रकल्पात गांधीविचारी स्त्री नेत्यांचा अभ्यास चालू होता. मी नुकताच ‘एफटीआयआय’मधून बाहेर पडलो होतो. आयुष्याचं काही तरी ताबडतोब केलंच पाहिजे असा अट्टहास नव्हता. स्कूटरमधलं पेट्रोल वगळता खर्च नव्हता. मुंबईच्या ‘इंडस्ट्री’मध्ये जायचं नव्हतं. त्यामुळे मी सुमित्राला अप्रशिक्षित सहकारी या नात्यानं सामाजिक अभ्यासात मदत करू लागलो. लेखनिक म्हणून सुमित्राबरोबर हिंडून शब्दन् शब्द लिहून घेताना कांताबेन असतील किंवा तमिळनाडूमधल्या कृष्णम्मा जगन्नाथन असतील अशा उत्तुंग लोकांना जवळून पाहत गेलो. आणि या सगळ्यातून स्त्रीमुक्तीचा, खरं तर स्त्री-शक्तीचा भारतीय, विशेषत: गांधीविचारी दृष्टिकोन सुमित्राला सापडत होता त्याचा साक्षीदार होत गेलो.
सुमित्राच्या मनात एक कथा आकार घेत गेली. एका बाजूनं या पटकथेचा आधार होता कांताबेन आणि हरविलासबेन यांचं आयुष्य आणि दुसऱ्या बाजूनं सुमित्राचा स्वत:चा स्त्री म्हणून झालेला विचार. त्यामुळे ‘संवाद’ हा आमचा लघुपट एका शहरी स्त्री-वादी अभ्यासक बाईचा दोन गांधीविचारी स्त्रियांची मुलाखत घेतघेत झालेला वैचारिक, मानसिक आणि भावनिक प्रवास दाखवतो. या लघुपटात एक प्रसंग आहे. अभ्यासक राधा अमला आणि कमला (कांता-हरविलास यांची चित्रपटातली नावं) या दोघींना प्रश्न विचारते, ‘स्त्रीसाठी सर्वात महत्त्वाची तीन मूल्ये कोणती?’ कमलाबेन म्हणतात- ‘मुळात तीनच का? आणि स्त्री-पुरुष यांना वेगवेगळी मूल्यं थोडीच लावायची?’ पुढे जाऊन अमलाबेन उत्तर देतात- ‘प्रेम, सेवा, आत्मसन्मान.’ त्या राधाला विचारतात, ‘तू काय सांगशील?’ राधा उत्तर देते- ‘समता, स्वातंत्र्य आणि न्याय.’ कमलाबेन हसून म्हणतात, ‘सर्व देवो नमस्कार: केशवं प्रतिगच्छति..!’ आपण एकच विचार वेगवेगळ्या भाषेत बोलतो आहोत, कदाचित..!
मला हा प्रसंग अनेकदा आठवत राहतो. स्त्री-मुक्ती चळवळीची आपण भारतीयांनी भरपूर चेष्टा केली.. अजूनही करतो. ते काही तरी पाश्चात्त्य खूळ आहे असं म्हणणं मध्यमवर्गाला आवडतं. जुन्या आया-आज्यांच्या काबाडकष्टाचे गोडवे गात स्वातंत्र्य हे मूल्य उच्चारणाऱ्या नव्या बायकांना उर्मट मानणं, हा भल्याभल्या पुरुषांचा आवडता खेळ आहे. मला कॉलेज काळापासूनच हे खुपायला लागलं होतं. पण मनात पुरुषी गोंधळ खूप होता.
सुमित्राला या अभ्यासातून सापडत गेलेला विचार ‘संवाद’मध्ये तिनं नेमका व्यक्त केला. त्याग आणि दुसऱ्याची सेवा करणं भारतीय स्त्रीला नवीन नाही. त्याचंच उदात्तीकरण ‘आई’ या संकल्पनेत झालं आहे. पण अनेकदा नाइलाजाला त्यागाचं गोंडस नाव दिलं जातं आणि अन्यायी परिस्थितीला खोटय़ा गौरवाचं आवरण मिळतं. प्रेमातून केलेल्या सेवेचं मोल खूप आहे.. जे सक्तीतून करवून घेतलेल्या कष्टांना नाही. आणि याला जर आत्मसन्मानाची जोड नसेल तर जो बिचारेपणा तयार होतो तो कितीही उदात्तपणाच्या कोंदणात बसवला तरी त्यातून त्या झटणाऱ्या व्यक्तीच्या पदरी दु:खच पडतं. तसंच मुळात हे सारे गुण फक्त स्त्रीच्याच दावणीला बांधले तर पुरुष मोकाटच राहणार.. म्हणून राधा समता, स्वातंत्र्य आणि न्याय यांचा उच्चार करते. कांताबेनना कर्मठ घरच्यांनी अपरिमित त्रास दिला पण त्या आदिवासींसाठी झटत असताना कुटुंबालाही शांतपणे आधार देत राहिल्या. पण त्यांच्या या कुटुंबीयांच्या मूल्य-व्यवस्थेला त्यांनी न भिता झिडकारलं. स्त्रीच्या ताकदीचा हा अविष्कार वेगळाच होता. हे चार अविवाहित लोक धीटपणे एका घरात रहात होते.. कांतिभाई मिश्कीलपणे सांगायचे, ‘तेव्हा तर आम्ही तरुणही होतो..!’
गांधींना गोळी घालण्याला पुरुषार्थ मानण्याच्या आणि गांधींचा सत्याग्रह म्हणजे नेभळटपणा किंवा नाटकीपणा मानण्याच्या आजच्या काळात मला ही आज हयात नसलेली माणसं आठवत राहतात. स्त्री-मुक्तीची चेष्टा करण्याच्या पुरुषी बालबुद्धीतून ते मला वाचवतात आणि प्रगल्भ स्त्री-शक्तीची स्पष्टता देतात. निमूट सोसणं म्हणजे अहिंसा नव्हे तर न भिता न पटलेल्या गोष्टींना खणखणीत विरोध करून त्यापायी जो त्रास होईल ते सोसायची तयारी ठेवणं- हा सत्याग्रह. हे उमगलं तर आजही कुटुंबा-कुटुंबात होणाऱ्या बाईच्या अपमानाला, थेट किंवा लपून-छपून होणाऱ्या शोषणाला बाईनं कसं तोंड द्यायचं याची उत्तरं सापडतील.
‘संवाद’ आम्ही तेव्हा पुण्यातल्या स्त्री-मुक्ती कार्यकर्त्यांना दाखवला. त्यांना त्यातल्या अनेक गोष्टी खटकल्या. ब्रह्मचर्य हा सर्वाना मानवणारा मार्ग नाही, असं त्याचं म्हणणं पडलं. राधा तिच्या बडय़ा कंपनीत अधिकारी असणाऱ्या नवऱ्याशी घटस्फोट घेण्याच्या प्रक्रियेत असताना अमला-कमला यांना भेटते आणि स्वत: कमावती असून नवऱ्याला धडा शिकवण्यासाठी स्वत:साठी आणि मुलीसाठी पोटगी मागण्याचा तिचा निर्णय या दोघींशी बोलल्यावर शेवटी बदलते. केस मागे घेते. हा शेवटही चळवळीच्या दृष्टिकोनातून प्रतिगामी आहे असं त्या वेळी या कार्यकर्त्यांना वाटलं. या घटनेला १०/१२ वर्ष झाली. त्याच गटानं पुन्हा ‘संवाद’ बघायची इच्छा व्यक्त केली. या वेळी मात्र या गोष्टींना तेव्हा आम्ही जी उत्तरं दिली होती ती त्यांना पटत गेली! एक ‘संवाद’ पूर्ण झाला असं वाटलं.
पिंडवळला त्या चौघांचं सहजीवन बघताना मला ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ उमगत गेला. ‘सेलिबसी’ या शब्दापेक्षा तो वेगळा आहे. सेक्सपासून दूर राहणे, हा फार मर्यादित अर्थ घेऊन गांधींच्या ब्रह्मचर्याच्या मूल्याची यथेच्छ टिंगल झाली. पण सामाजिक वर्तुळात एकत्र काम करताना सहकारी स्त्री-पुरुषांनी एकमेकांकडे लैंगिक दृष्टिकोनातून न पाहता व्यक्ती म्हणून आदराने पाहावं- हा त्या संकल्पनेचा अन्वयार्थ लावला तर कदाचित उत्तम ‘वर्क रिलेशनशिप’चा मार्ग सापडू शकेल. निखळ मैत्री होतील आणि पुरुषी वर्चस्वाचा वापर अधिकाराच्या ठिकाणी करून स्त्रीच्या ‘स्त्री’पणाचा गैरफायदा घेण्याची संस्कृती थांबू शकेल, हे आजच्या ‘मी-टू’च्या निमित्तानं प्रकर्षांनं जाणवतं.
त्याच प्रमाणे पोटगी, न्यायालयातला लढा हा अनेक घटस्फोटित स्त्रियांसाठी अनिवार्य भाग असला तरी राधा सारख्या बाईला तुटलेलं नातं आदरानं आणि प्रेमानं मागे टाकून नव्या भांडणाच्या राजकारणात न पडता उत्साहानं मुलीबरोबर आयुष्य सुरू करण्याचा अमला-कमला यांनी दिलेला सल्ला प्रतिगामी नाही तर स्त्री-मुक्तीचा विचार पुढेच नेणारा आहे हे ‘संवाद’मधून सुमित्राला सांगायचं होतं. भारतीय संस्कृतीचा खोटा अविर्भाव आणून स्त्रीच्या सोसण्याचा वापर आपल्या वर्चस्वासाठी करणारे पुरुष आणि त्याच गोंधळातून त्यांची साथ देणाऱ्या स्त्रिया यांना ‘संवाद’मध्ये स्त्री-शक्तीचा खरा आणि नवा अर्थ सापडू शकेल.
त्या वेळी आम्ही चित्रपट दाखवून त्यावर प्रेक्षकांशी चर्चा करायचो. मी माझी ही नव्यानं फुटलेली मतं हिरिरीनं मांडायला लागलो. आणि हे लक्षात आलं की जेव्हा एक पुरुष पोटतिडकीनं समानतेचा मुद्दा मांडतो तेव्हा पुरुषी जग ते गांभीर्यानं घेतं! समानतेचा मुद्दा बायकांचा आहे, आपला काय संबंध असं वाटणारे पुरुष प्रेक्षक थोडे तरी सटपटतात.
आम्ही या आधी पुण्यातल्या ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’साठी ‘मुक्ती’ हा जवळजवळ पूर्ण लांबीचा चित्रपट हिंदी भाषेत बनवला. ‘मुक्तांगण’मध्ये उपचार घेणाऱ्या अनेक खऱ्या लोकांनी त्यात अभिनय केला. शिवाय काही ‘बाहेरचे’ कलाकार होते. त्यात मीही एक अभिनेता होतो. त्या उपचार पद्धतीत त्या सर्वाबरोबर भाग घेत गेल्यावर माझ्या मनातला हा ‘बाहेरचेपणा’ कमी होऊ लागला. आपणही कोणत्याही क्षणी या ‘व्यसनी’ कप्प्यात जाऊही शकतो, याची जाणीव झाली. आणि एक मोठी समजूत मला तरी येत गेली. ते सर्व पुरुष होते.. आणि त्या सर्वाना दारू किंवा ड्रग्जपेक्षा मोठं व्यसन होतं- पुरुषी अहंकाराचं! त्यांना सांभाळणाऱ्या आया-बहिणी यांच्यावर न
लाजता अवलंबून राहत स्वत:ला आणि व्यसनाला ते पोसत होते. त्यांचं व्यसन हा आजार होता म्हणून ते तसं करत होते, हे तर खरंच. पण सुनंदामावशी (डॉ. अनिता अवचट) आणि अनिलकाका यांनी तयार केलेल्या उपचारपद्धतीत ते नम्र होत होते. आणि तो नम्रपणा त्यांना स्वत:मधल्या माणूसपणाचा शोध घ्यायला मदत करू शकत होता.
या दोन्ही चित्रपटांच्या प्रक्रियेत मी चित्रपट बनवण्याच्या तंत्रापेक्षा पुरुषीपणाची संस्कृतीनं दिलेली कवचकुंडलं आपणहून टाकून देण्याची प्रेरणा घेतली. (जमलंय की नाही हे भोवतालच्या स्त्रियांना माहीत!)
स्त्री-पुरुषात ‘संवाद’ असेल तरच मैत्री शक्य आहे आणि स्त्रीला तथाकथित साच्यातून बाहेर काढून बघायला शिकण्यात पुरुषाची स्वत:ची ‘मुक्ती’ आहे.. प्रेम आणि सेवा अंगीकारणारे पुरुष आणि आत्मसन्मानाशी तडजोड न करता स्वत्व जपणाऱ्या स्त्रिया मिळून एक मस्त समाज तयार होऊ शकेल हे आपल्याला कधी कळणार?
chaturang@expressindia.com