विदर्भाच्या मातीतील, माणसातील अघळपघळ, मोकळाढाकळा स्वभाव वऱ्हाडी खाद्यसंस्कृतीनेही उचललाय. एकाच पदार्थातून गोड, तिखट पदार्थ करण्यात त्यांचा हातखंडा! चवीबरोबर पोषक मूल्यांचंही संवर्धन करणाऱ्या या विदर्भाच्या पदार्थाचा आपल्या रोजच्या जेवणात समावेश करायलाच हवा. आंब्याच्या कोयीचं चूर्ण असो, बेसनच्या कुरडया असोत की घाऱ्या, विस्मरणात गेलेल्या या पदार्थाना कृतीतूनच पुन्हा जिवंत करायला हवं. फेब्रुवारीमधल्या कोकणच्या खाद्यसंस्कृतीनंतर आजची ही विदर्भाची खाद्यसफर! यानंतर आणखीही काही प्रदेशांच्या चवी लवकरच..
विदर्भातील माणसं अघळपघळ, मोकळी- ढाकळी, जशी वागण्या-बोलण्यांत तशी खाण्यात-खिलवण्यातही. आग्रह करण्यात तर वऱ्हाडी माणसाचा हात कोणी धरू शकणार नाही. विदर्भात मुख्य पीक ज्वारी, गहू, कापूस, तूर थोडय़ाफार प्रमाणात बाजरीही पिकते. विदर्भातील त्यातही नागपूरची संत्री तर प्रसिद्धच आहेत. त्याशिवाय मोठमोठय़ा बागायतदार शेतकऱ्यांकडे पायरी, रायवळ, लंगडा, गोटय़ा, खारक्या आदी वेगवेगळ्या जातींची आंब्याची झाडे असलेल्या आमरायाही असतात.
इथल्या ज्वारीच्या भाकऱ्या आणि मिरच्यांचा ठेचा पाहून भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटते. आता हा वऱ्हाडी ठेचा तर बाजारात पॅकिंगमध्येही उपलब्ध आहे. पण ज्वारी म्हणजे फक्त भाकरी हेच समीकरण नाही. मुलांना, मोठय़ा माणसांनाही बरेचदा भाकरी आवडत नाही. पण ज्वारीचे खाण्यातील महत्त्व बरेच आहे, तेव्हा ती खाण्यात तर आलीच पाहिजे. यासाठी विदर्भात ज्वारीचे किती प्रकार करतात पाहा- ज्वारी जेव्हा कच्ची असते तेव्हा तिला हुरडा म्हणतात. हा हुरडा शेतात जाऊन भाजून चटणी आणि दह्य़ाबरोबर खायला मिळाला तर.. ‘व्वा! क्या बात है!’ पण आता बाजारात मिळणारा हुरडा महागडय़ा भावात घेऊन, गॅसवर भाजून खाण्याचे दिवस आहेत. हाच हुरडा जर धुऊन, मिक्सरमध्ये बारीक करून त्याला हिरव्या मिरच्यांची फोडणी देऊन वाफवलं आणि कोथिंबीर, खोबऱ्याने सजवलं तर छानसा हुरडय़ाचा उपमा तयार होतो. बाजारच्या नि:सत्त्व रव्याचा उपमा नेहमीच करण्यापेक्षा एकदा हा करून पाहावाच. या उपम्याला विदर्भात काही ठिकाणी ‘लोढे’ असे म्हणतात. आता हुरडा नेहमीच मिळत नाही. मग तो वाळवून हवा तेव्हा रवा काढून वापरायचा. दुसराही पदार्थ ज्वारीच्या रव्याचाच. ज्वारी ओलवून तिचा रवा काढायचा. तो ताकात सैलदार भिजवायचा. थोडीशी चणा डाळ कडकडीत शिजवून घ्यायची. भिजवलेला रवा कुकरमध्ये शिजवून घ्यायचा.
(पूर्वी पातेल्यांत पाणी घालून त्याच्या तोंडावर कपडा बांधून त्यावर हा रवा वाफेवर शिजवत.) हा शिजवलेला रवा थंड झाल्यावर हाताने मोकळा करून घ्यायचा. त्यात आधीच शिजवून ठेवलेली चणा डाळ मिसळायची. तुरीच्या साध्या पातळ वरणावर ‘पळी’ गरम करून तिळाची खमंग फोडणी घालायची आणि त्यासोबत ‘ज्वारीचं फुंदकं’ खायचं. रुचिपालट किंवा सोय म्हणून (पोळ्या लाटण्याऐवजी) आपण जेव्हा दक्षिणात्य इडली, डोसा, आप्पे किंवा गुजराती खमण-ढोकळ्याचा विचार करतो तेव्हा आपल्याच प्रांतातल्या विस्मरणांत गेलेल्या या पदार्थाचा विचार करायला काय हरकत आहे. एक वेळचं पूर्ण जेवण होऊ शकेल ते, तेही कमी कष्टात.
पॉपकॉर्न हा आबालवृद्धांना माहीत असलेला लोकप्रिय पदार्थ आहे. पण याच ज्वारीच्या लाह्य़ांचे (ज्या आपल्याला फक्त नागपंचमीलाच आठवतात.) किती तरी प्रकार करतात. मुलांना उन्हाळ्यात सुट्टय़ा असतात आणि त्यांना सतत काही ना काही खायला हवं असतं. या लाह्य़ांचा चिवडा तर होतोच पण गुळाच्या पाकांतील लाडूही करता येतात. जंकफूडपेक्षा मुलांसाठी उत्तम पौष्टिक खाऊ होऊ शकतो. करायलाही सोप्पे!
हे तर फक्त लाह्य़ाचं झालं. वरवरच्या लाह्य़ा घोळून घेतल्यानंतर खाली ज्या अर्धवट भाजलेल्या लाह्य़ा राहतात (त्याला गणंग म्हणतात.) त्याही वाया जात नाहीत. मिक्सरवर त्याचा रवा काढता येतो. कुठे कुठे त्याला लाहीपीठ किंवा कुटा म्हणतात. तर या रव्यात कोथिंबीर, तिखट, मीठ, तीळ घालून ताकांत सैलसर भिजवायचे. थोडेसे मुरले की न्याहारीसाठी तयार. भाजलेल्या लाह्य़ामुळे पचायलाही हलका. जास्त प्रमाणात असला तर चकलीच्या साच्याने त्याच्या खारोडय़ा पाडून उन्हात वाळवायच्या आणि वाळल्यावर भाजलेल्या शेंगदाण्यासोबत खायच्या. शिजवायचीही गरज नाही. कितीही व्यस्त असलं तरी करता येण्यासारखा! पण कुणाला माहीत असेल, असं वाटत नाही. ज्वारीप्रमाणे साळीच्या लाह्य़ांचेही लाडू करता येतात.
विदर्भात (आणि कदाचित महाराष्ट्रातही) देवीचं नवरात्र दोनदा असतं. एकदा गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत तर दुसऱ्यांदा अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत. चैत्रांत नैवेद्य म्हणून काही ठिकाणी गव्हाच्या जाडसर रव्याचे वेगवेगळे पदार्थ असतात, तर अश्विनात बाजरीचे पदार्थ असतात. आपल्या भारतीय संस्कृतीत विविध ऋतुंनुसार आहारात आरोग्यदायक असे पदार्थ करण्याची पद्धत आहे. म्हणून उन्हाळ्यात गहू पिकतो म्हणून गव्हाचे पदार्थ तर हिवाळ्यात बाजरी पिकते आणि ती तेव्हा तब्येतीलाही चांगली असते म्हणून आधिकात बाजरीचे पदार्थ.
तर हा गव्हाचा जाडसर रवा कुकरमध्ये चांगला शिजवून घेतल्यानंतर त्याच्या काही भागांची दूध, साखर, वेलची घालून खीर करतात. काही भाग थंड करून त्यात दही, जिरेपूड व चवीपुरते साखर, मीठ घालून ‘करंबा’ करतात. काही भागांत शिजलेली मुगाची डाळ घालून, चांगलं घोटून मऊसर खिचडी करतात. त्यावर वरून साजूक तुपाची धार सोडायची. शिवाय आणखी एखादा भाग करून त्यांत तूप आणि गूळ घालून ‘सांजा’ करतात. हिवाळ्यात गव्हाऐवजी बाजरीचा रवा घ्यायचा की झालं. एकाच धान्याचे किती पौष्टिक पर्याय आहेत. एरव्हीसुद्धा आवडीनुसार यातला फक्त एखादाच पदार्थ करू शकतो. हे पारंपरिक पदार्थ हरवू न देता त्याचे पुनरुज्जीवन करायलाच हवे.
असाच एक पदार्थ आहे, ‘कानवले.’ नाक मुरडवणरा! त्यातही गोड पदार्थ म्हटलं की नको म्हणण्याची फॅशन आली आहे जणू. पण हेच ‘कानवले’ तिखटाचेही करतात. हरभरा किंवा मुगाची डाळ घेऊन ती भिजत घालायची. त्यात आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ घालून भरडसर वाटून घ्यायचे (हिरव्या मिरच्यांऐवजी लाल मिरची आणि धणे भिजवून ते घातले तर आणखी छान वेगळी चव येते.). कणिक किंचित मोहन घालून भिजवायची. छोटय़ा-छोटय़ा पात्या लाटून त्यात वरील सारण भरायचे आणि करंज्यासारखे दुमडायचे. नंतर चाळणीवर वाफवून घ्यायचे. तुपासोबत किंवा कढी-चटणीसोबत खूप छान लागतात किंवा हेच सारण पारीत न भरता हातावर छोटेसे गोळे घेऊन, थापून तसंच वाफवलं तरी ‘वाफेवरचे वडे’ म्हणून खाता येतात किंवा भरपूर तेलाच्या फोडणीत परतलं तरी छान लागतं. याला विदर्भात ‘दातरं’ म्हणतात आणि यो मोकळ्या दाळीत मुळ्याच्या कोवळ्या शेंगा (डिंग्य्रा) बारीक चिरून कालवल्या की ती होते पुरणावळ. ज्वारीचे उन्हवणी (आधणाचे गरम पाणी) घालून भिजवलेले पीठ कणकेच्या गोळ्यांत पुरणासारखे भरून त्याची पोळी केली की झाली ‘पीठपोळी.’ सोबत हवी ताकाची कढी. हा झकास मेनू का हरवू द्यावा मग? ज्वारीचे पीठ थोडय़ाशा तांदळाच्या पीठासोबत किंवा तसेच ताकात डोशाच्या पीठासारखेच पातळ भिजवून विदर्भात त्याचे डोसे करतात, त्याला ‘आयते’ म्हणतात किंवा तेच मिश्रण पातेल्याला कपडा बांधून त्यावर किंवा ताटलीला तेल लावून त्यावर पसरले आणि वाफवले तर त्यांना ‘वाफा’ म्हणतात. पानग्याचाच एक प्रकार. जोडीला एखादी सुकी भाजी किंवा शेंगदाण्याची दही घालून केलेली ओली चटणी असली की झालं. असाच पदार्थ गव्हाच्या पीठात मीठ आणि किंचित सोडा घालून खापरावर करायचे म्हणून त्याला खापरपोळी म्हणत. आता तो निर्लेपच्या तव्यावर करता येतो.
उन्हाळा आला की पूर्वी ताज्या हिरव्या भाज्या मिळत नसत. मग वडे, पापड, कुरडय़ा, सांडगे त्यांच्या जोडीला उपयोगात येत. ‘काचऱ्या’ हिवाळय़ात मुबलक मिळणाऱ्या हिरव्या फळभाज्या उदा. भेंडी, कच्चे कारले, वांगे, टोमॅटो, गवार, वालाच्या शेंगा, मुळ्याच्या शेंगा, तोंडली इ.च्या चकत्या वाळवून ठेवायच्या आणि उन्हाळ्यात त्या तेलांत परतून त्यावर वरून तिखटमीठ भुरभुरवले की झालं तोंडी लावणं तयार! कुरकुरीत खायला छान लागतात. आता महाग असल्या तरी वर्षभर सर्व भाज्या मिळतातच तरीही बदल म्हणून केल्या तर आठवणीत राहतील. मेथीची भाजीसुद्धा वाळवून ठेवत असत. करण्यापूर्वी ती पाण्यांत थोडा वेळ भिजवली की झालं. या मेथीच्या भाजीचा सुद्धा एक लोकप्रिय प्रकार आहे. मेथीची भाजी धुऊन, बारीक चिरून घ्यायची आणि ती फोडणीस घालून त्यावर बेसनाला थोडेसे दही लावून घालायचे. ते भाजीत घालायचे. दाटसर भाजी करायची. वरून गरमागरम तीळ, मोहरी, तिखटाची तडतडणारी फोडणी हवीच. हे अळण खायला, तेही भाकरीसोबत इतकं छान लागतंय म्हणून सांगू. काही समाजात तर लग्नाच्या पंगतीतसुद्धा स्थान दिलंय त्याला!
विदर्भात भाजलेल्या आंब्याच्या कोयीचं चूर्ण करतात. ते खाऊनसुद्धा आता खूप र्वष झालीत, पण अजून चव रेंगाळतेय. जिभेवर आणि मनातही! आंब्याच्या कोयीतील आतला गर काढून, तो भाजून त्याचे वस्त्रगाळ चूर्ण करायचे आणि त्यात चवीनुसार काळंमीठ, हिंग मिसळायचं. नुसतंच किंवा एखाद्या वेळेस पोळीवर तेल घेऊन ते खाण्याची मजा औरच असते. शिवाय आमरसाचं जड जेवण पचायलाही उत्तम! पूर्वी घरोघर चुली असायच्या. मग ती विझत आल्यावर राहिलेल्या राखेच्या फुफाटय़ात या कोयी भाजत्या जायच्या. रताळं, बटाटे, वांगे, भुईमुगाच्या शेंगा, ओला हरभरा एवढंच नाही तर पन्ह्य़ासाठी लागणारी कच्ची कैरीही त्यातच खमंग भाजून निघायची. पाण्याचा संपर्क न येऊ देता भाजलेल्या या पदार्थाची नैसर्गिक चव टिकून राहायची. याच चुलीवर ‘रांधणं’ (खापराचा खोलगट तवा) टाकून नेहमीच्या पोळ्या-भाकरी तर व्हायच्याच पण आमरसाबरोबर खाण्यासाठी खास रव्याच्याही पोळ्या व्हायच्या. याला कुणी मांडेही म्हणतात. अहं.. खानदेशातील पुरणाचे मांडे नव्हेत हे. तर आजच्या रुमाली रोटीचा पूर्वावतार आहे. रवा भिजवून तो ओल्या कपडय़ाने झाकून ठेवायचा. चांगला मुरवून मऊ करून घ्यायचा आणि हाताने ताणून ताणून त्याची पोळी खापरावर भाजायची. जराशी वातड, खरपूस अशी ही पोळी/मांडे खीरीबरोबर किंवा आमरसाबरोबर खायची. आता त्या आठवणंसुद्धा मुश्कील!
या आठवणीतून आणखी आठवणींच्या लडी कशा उलगडताहेत बघा. सामान्यत: आमरसाबरोबर गव्हाच्या चिकाच्या कुरडया खाण्याची पद्धत आहे. पण विदर्भात काही ठिकाणी ‘बेसनाच्या कुरडया’ हा खास पदार्थ असतो. पाटवडय़ा बहुतेकांना ऐकून तरी माहिती असतील. त्या पाटवडय़ांसारखंच डाळींचं पीठ/ बेसन हळद-मीठ घालून चांगलं शिजवून-वाफवून घ्यायचं. अजिबात कच्चं राहाता कामा नये. नाहीतर कुरडया तुटतात. नंतर ओल्या, स्वच्छ कपडय़ावर किंवा ताटाला तेल लावून त्यावर बारीक शेवेच्या साच्याने शेव पाडायची. जेवताना त्यावर ‘पळी-फोडणी’ घेऊन खायची. ही शेव न तुटता हाताला न चिकटता, मान वर करून खाता आली तर करणारी सुगरण! पूर्वीच्या आज्या-आयांचा यात हातखंडा असायचा. पीठ/पाणी सर्व अंदाजाने घालत तरी उन्हाळ्यात लग्न होऊन नवी सून घरात आली की तिला हमखास या कुरडया करायला सांगत. ती बिचारी आधीच धास्तावलेली असे. त्यात ते बेसन जरासं जरी कच्चं राहिलं की झालंच. कृती सोपी वाटली तरी करताना बारकावे समजून घ्यायला लागायचे. मग एखादी प्रेमळ आजी तिला जवळ घेऊन धीर देऊन ते करून दाखवायची. आताच्या मुली हुशार, कुकरमध्ये बेसन आणि प्रमाणशीर पाणी घालून शिजवलं की कच्चं राहण्याचा प्रश्नच येत नाही. जमतंच नाही म्हणण्यापेक्षा हे चांगलं नं. यालाच ‘ओली शेव’ असं नाव देऊन त्यावर कोथिंबीर, खोबरं पेरलं की झाली नवीन रंगरूपाची डिश!
वैदर्भीय खाण्याची हीच तर खासियत आहे. इथं एकच पदार्थ अनेक पर्यायांसोबत चालू शकतो आणि एकाच गोष्टीपासून तिखट किंवा गोड पदार्थ करता येतात. रव्याच्या उपम्याऐवजी जाडसर कणिक फोडणीत भाजून पाणी घालून शिजवतात. त्यात चवीनुसार आंबटगोड घालतं की ‘उकडपेंडी’ तयार होते. पोहे, मुरमुरे, शेंगदाणे, दाळं सगळं एकत्र करून त्यावर थोडंसं कच्चं तेल टाकून तिखट-मीठ भुरभुरवलं की कच्चा चिवडा तयार होतो. भरपूर प्रमाणात करून डब्यात भरून ठेवायचा. उन्हाळ्यात दोन जेवणांमध्ये दुपारी किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर उशिरापर्यंत गप्पांचा फड रंगवताना एका मोठय़ा ताटांत या कच्च्या चिवडय़ावर कांदा, कोथिंबीर, कैरी बारीक चिरून घालायची. त्याच्या जोडीला ज्वारीचे, तांदळाचे, नागलीचे असे कोणतेही पापड, ज्वारीच्या खारोडय़ा, उडदाचे सालोडे असं काहीही घ्यायचं. मग हास्यविनोदांत गप्पा रंगताना हे ताट कधी रिकामं होतं ते कळतही नाही. त्याच्यासोबत एखादा गोडाचा पदार्थ हवा असेल तर गुळपापडी लाह्य़ा, खोबऱ्याचा कीस, हिवाळा असला तर डिंक, सुकामेवा घालायचा आणि गुळाच्या पाकात वडय़ा पाडायच्या. बदल म्हणून जाडसर कणकेत तुपाचं भरपूर मोहन घालायचे आणि पाणी घालून गोळा करायचा. हातावर वळून त्याची तोंडल्याच्या आकारासारखी शेव करायची आणि ती तुपात तळायची आणि नंतर साखरेच्या पाकांत पाकवायची. झाली ‘गोड शेव’ किंवा कणकेत तुपाचे थोडेसे मोहन घालून ती गुळाच्या पाकांत भिजवायची आणि पोळीसाठी छोटासा गोळा घेतो तसा घेऊन तो थोडासा चपटा करून तव्यावर श्ॉलोफ्रॉय करायचा की ‘दिवडे’ तयार होतात. जीभ आणि पोट दोन्ही खूश!
विदर्भात मुख्य जेवण म्हणजे भाकरी किंवा पोळी, तुरीचं साधं किंवा फोडणीचं वरण, भाज्या, चटण्या, लोणची, कोशिंबिरी साधारणत: असंच असतं. कोरडी चटणी करताना फक्त शेंगदाण्याची किंवा फक्त तिळाची करण्याऐवजी तीळ, खोबरं, शेंगदाणे, कारलं, जवस अशी पंचमिसळय़ाची करतात. अंबाडय़ाच्या फुलांची, आंबट चुक्याच्या देठांची, कच्चा टोमॅटोची, दोडक्याची सालांची अशा उपलब्धतेनुसार ओल्या चटण्या करतात. रोज रोज तेच एकाच चवीचे कैरीचे किंवा लिंबाचे लोणचे खाण्याऐवजी भोकरं, करवंद, गाजरं, ओली हळद, कारलं, पठाडीच्या शेंगा, (खडकमुळं/आबई) कच्च्या कवठाचा ठेचा, आदीची तात्पुरती लोणची जेवणाला वेगळीच चव आणतात. कढीचेसुद्धा किती प्रकार. सर्वपरिचित ताकाची कढी केली तरी कधी तिच्यासोबत मेथीचे किंवा मुळ्याच्या भाजीचे मुटकुळे वाफवून/परतून घेऊन कढी-गोळे खायचे. कधी कच्च्या कवठाची, कधी ताज्या किंवा वाळवलेल्या कैरीची आंबटगोड कढी, कधी कैरीच्या कढीत बेसनाचे छोटे-छोटे गोळे करून कढी उकलताना टाकले की झाली चुबुकवडय़ांची कढी. शिवाय उन्हाळ्यात कैरीचं पन्हं हे दुपारी सरबताप्रमाणे पिण्याचे पेय नसून जेवताना घेण्याचा पदार्थ आहे असं मानतात. शिजवलेल्या कैरीच्या गरांत गूळ मिसळून पन्हं करायचं आणि त्याला हिंग, जिरं, मोहरीची बिनतिखटाची फोडणी द्यायची. अहाहा! फक्त पन्हं पिऊनच अर्ध पोट भरतं आपलं!
पोपटीच्या शेंगा ही विदर्भाची आणखी एक खासियत. साधारण चपटय़ा, पण चवळीसारख्या दिसणाऱ्या या शेंगाचं विदर्भाबाहेरील लोकांना एवढं अप्रूप आहे की बस्स! कुणीही तिकडे गेलं की आणायला सांगणारच. तसंच त्या कुपऱ्या. इंग्रजी एस (२ )आकाराच्या, काळपट हिरव्या रंगाच्या, थोडीशी लव असणाऱ्या या शेंगासारख्या दिसणाऱ्या कुपऱ्याची भाजी मस्तच लागते. तसंच कम्रकाबद्दल म्हणता येईल. तजेलदार पोपटी रंग असलेलं, ५-६ शिरा असलेलं, जरासं फुगीर आणि आंबट चव असलेल्या या फळाची भाजी किंवा लोणचं/ साजुक रायतं, काहीही करावं विदर्भात बऱ्याचशा भाज्यांमध्ये मुगाची डाळ किंवा क्वचित चणा दाळ घालण्याची पद्धत आहे. भाज्यांसोबत डाळीतील प्रोटिन्स पोटात जावेत हा उद्देश असावा. तसेच आंबट म्हणून चिंच किंवा कोकमऐवजी कैरीचा उपयोग जास्त करतात. त्यासाठी कैरीचा हंगाम संपल्यावर वापरण्यासाठी कैऱ्यांचे तुकडे वाळवून-दळून आमचूर करून ठेवतात.
रात्रीच्या जेवणात पोळ्या-भाकरीला वरणफळं किंवा शेंगोळ्यांचा उत्तम पर्याय असतो. जाडसर कणिक थोडेसे तेलाचे मोहन आणि ओवा घालून भिजवायची आणि त्याचे हातवार छोटेसे चपटे आकार करून ते फोडणीच्या वरणांत, वालाच्या, गवाराच्या शेंगात टाकून शिजवायचे. शेंगोळ्यासाठी भाजणीचे किंवा कुळीथाचे पीठ वापरतात. पोळ्या लाटण्याऐवजी कमी श्रमांत पूर्ण जेवण आणि रुचीपालटही किंवा फक्त भात चालत असला तर नेहमीच्या साध्या किंवा फोडणीच्या खिचडीऐवजी भरडा भात करतात. तर चणा, मूग, उडीद अशा ४-५ डाळी घेऊन त्यावर जाडसर भरडा काढून ठेवायचा. कुकरमध्ये भरडा आणि भात वेगवेगळे शिजवून घ्यायचे. थंड झाल्यावर दोन्ही मोकळे करून, मग एकत्र वाळवायचं. लाल मिरच्या तीळ आणि शेंगदाणे घालून फोडणी द्यायची. असं सगळ्या डाळी एकत्र करून मिसळ्याचं वरणही करतात आणि तूप भातासोबत खायला मेतकूटही.
विदर्भात मुख्य गणपती विसर्जन झाल्यावर पुढच्या दहा दिवसांत म्हणजे कृष्ण-पक्षांत पुन्हा गणपती बसवण्याची परंपरा आहे. त्याला ‘अखरपक्या’ गणपती असं म्हणतात. तसेच बैल-पोळ्याचेही. मुख्य पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी छोटय़ा मुलांचा ‘तान्हा पोळा’ असतो. आपापले लाकडी बैल सजवून मुलं ओळखीच्या ठिकाणी जातात. हे दुय्यम असले तरी त्यांच्या नैवेद्याचा थाट मात्र मुख्यासारखाच असतो. आत ही परंपराही हळूहळू लुप्त होत आहे. दिवाळीतही इतर फराळ तर असतोच पण सुतरफेणीही करतात. रव्याची जाडय़ापासून बारीक अशी शेव करून ती बोटाभोवती गुंडाळून, चपटी करून तळून काढणे फारच कौशल्याचे काम आहे. आताच्या मुलींनी संधी मिळताच ती वडीलधाऱ्या स्त्रियांकडून शिकून घ्यायला हवी नाहीतर ती विस्मरणांत जायला कितीसा वेळ लागणार!
‘घाऱ्या’ हा आणखी एक पदार्थ पुरणाबरोबर खाण्याचा. तांदळाची उकड घालायची. ती छानपैकी मळून घेताना त्यात थोडासा मैदा/ कणिक मिसळायची. पुऱ्या लाटून तळायच्या आणि पुरणासोबत खायच्या. आपण फक्त पुरणपोळीच तेवढी लक्षात ठेवली आहे. करंज्या करतानाही भाजलेल्या तिळाचा कूट करून त्यात बुऱ्याची किंवा पिठीसाखर मिसळतात आणि ते सारण करंज्यात भरतात. हिवाळ्यांत तिळांतील उष्मांक पोटात जावेत हा हेतू.
पौषाच्या महिन्यात आणखी वेगळे प्रकार करतात. पौष रविवारचं महत्त्व जरा जास्तच. त्यामुळे प्रत्येक रविवारी एक वेगळा प्रकार. तिखटमिठाच्या पुऱ्या आणि साध्या पुऱ्या त्यांच्यासोबत कढी, ज्वारीचे आयते आणि भाजी/चटणी, ओला हरबरा आणि वाटाणा भरपूर मिळतो, मग तो वाटून हिरवी मिरची, कोथिंबीर घालून परतायचा (विदर्भात कोथिंबीरीला ‘सांबार’ म्हणतात.) आणि कणकेच्या गोळ्यांत पुरणाप्रमाणे भरून पोळी लाटायची. तव्यावर तेल टाकून श्ॉलो फ्राय केली की झाली चटपटीत घरगुती कचोरी तयार! सोबत दही किंवा चटणी. एखाद्या रविवारी पीठ-पोळी. कुणी कुणी या प्रत्येक पदार्थाबरोबर पाक खातात. या वेळेस हिवाळा असतो म्हणून गुळाचा पाक खात असावेत. म्हणजे पक्वान्नं तर नाही पण गोड तर खाल्लं. इतक्या विविध चवींचे, विविध प्रकारचे पदार्थ विस्मरणांत जाऊ नयेत असं वाटतं.
आठवून-आठवून विस्मरणात गेलेले, हरवत चाललेले किती म्हणून पदार्थ सांगावेत. कितीही सांगितले तरी दशांगुळे उरलेच, अक्षरश: इतके प्रकार. पण जिभेचे लाड करणाऱ्या आणि शरीराचेही, स्वास्थ टिकवणाऱ्या या पदार्थाना हरवू न देता, ते टिकवून ठेवण्याची, त्यांचे रंगरूप खुलवून त्यांना पुनरुज्जीवित करण्याची जबाबदारी आता नवीन पिढीची आहे. जुनं ते सगळंच कालबाह्य़ न म्हणता त्याला नव्याने पेश केलं पाहिजे. स्वत: खाल्लं पाहिजे इतरांना खिलवलं पाहिजे..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा