– स्वाती देहाडराय
स्त्री चळवळीच्या पहिल्या पिढीतील स्त्रीवादी अभ्यासक कार्यकर्त्या डॉ. विद्युत भागवत यांनी आंतरशाखीय संशोधन पद्धती आणि कोणताही अभ्यास वा संशोधन हे लिंगभाव व जात याचा संदर्भ घेतल्याशिवाय होऊ शकत नाही, अशी आग्रही भूमिका घेऊनच आपल्या कामाची आणि लिखाणाची वाटचाल केली. स्त्री अभ्यास ही एक ज्ञान कृती म्हणून पुढे आणणाऱ्या डॉ. भागवत यांचे ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’तील स्त्रीअभ्यास केंद्र उभारण्यात आणि त्याचा वैचारिक पाया भक्कम करण्यात खूप मोठे योगदान होते. नुकतेच (११ जुलै) त्यांचे निधन झाले. त्यांच्याविषयी…
डॉ. विद्युत भागवत या स्त्री अभ्यास क्षेत्रातील अग्रणी विचारवंत-अभ्यासक, आणि स्त्री चळवळीच्या, सामाजिक परिवर्तनाच्या, चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या होत्या. १९७० पासून स्त्री-प्रश्न, स्त्रीवादी सिद्धांत आणि महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास अशा विषयांवर संशोधनपर निबंध तसेच लघुनिबंध, कविता, वृत्तपत्रीय सदरे अशा भिन्न माध्यमांतून त्यांनी विपुल अभ्यासपूर्ण परिवर्तनवादी लेखन केले. त्यांच्या लिखाणातून त्यांनी साहित्य आणि समाजाच्या अनुबंधांचे विश्लेषण तर केलेच, त्या बरोबरीने संशोधन कसे करायचे आणि त्यासाठी कोणकोणते अपारंपरिक स्राोत वापरता येतात याची ओळखही करून दिली.
हेही वाचा – गर्दीच्या गारुडात गारद विवेक
आंतरशाखीय संशोधन पद्धती आणि कोणताही अभ्यास वा संशोधन हे लिंगभाव व जात याचा संदर्भ घेतल्याशिवाय होऊ शकत नाही, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली. सामाजिक शास्त्रात आंतरशाखीय संशोधन आणि स्त्रियांचा अभ्यास हा इतर संरचनांच्या संदर्भातच करावा लागतो आणि त्या संरचनांचा अभ्यास हासुद्धा लिंगभाव दृष्टिकोनातूनच करावा लागतो, असा आग्रह त्या धरायच्या. अशा प्रकारचे आंतरशाखीय संशोधन आणि पद्धती रुजवणाऱ्या प्रारंभीच्या अभ्यासकांपैकी त्या एक आहेत. आंतरशाखीयता ही संज्ञा ‘फॅशनेबल’ होण्याआधी त्यांनी खऱ्या अर्थाने आंतरशाखीयतेचा मार्ग चोखाळला. साहित्य, भाषाशास्त्र, समाजशास्त्र यातील पदव्या तर त्यांनी संपादन केल्याच याशिवाय या ज्ञानशाखांमध्ये आणि स्त्री अभ्यासामध्ये अध्यापनही केले. महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास, विशेषत: वासाहतिक इतिहास याच्या भरीव अभ्यासामध्ये त्यांनी लिंगभाव दृष्टिकोनातून सखोल मांडणी करून आपला ठसा उमटवला. वासाहतिक महाराष्ट्रातील स्त्री शिक्षण, लैंगिकतेचा प्रश्न, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे आणि महात्मा फुलेंची स्त्री प्रश्नावरील मांडणी यावरील त्यांचे लिखाण यादृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यांच्या या लिखाणातून त्यांनी वासाहतिक भारताच्या इतिहासाकडे बघण्याची नवी दृष्टी दिली. त्याचमुळे महाराष्ट्रातील स्त्री प्रश्नांची जडणघडण कशी झाली यावर त्यांनी केलेली मांडणी स्त्री अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ठरली.
‘women writing in india 600 b. c. to the present’ या सुझी थारू आणि के. ललिथा यांनी संपादित केलेल्या महत्त्वाकांक्षी, पथदर्शक प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातील स्त्रियांचे लिखाण प्रकाशित करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. संत साहित्य आणि दलित स्त्री संतांचा वारसा पुढे आणून त्यांनी भारतामधील स्त्रीवादी जाणिवांचे बहुविध मार्ग घडवले. त्यांच्या लिखाणातून त्यांनी स्त्रियांच्या लेखनात येणारे शरीर, लैंगिकता आणि समाज या विषयीचे मुद्दे मांडले. त्यातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे लैंगिकता आणि त्याचे विविध पदर या विषयीची त्यांची मांडणी त्यावेळी नवी आणि स्त्रीवादी अभ्यासाला वेगळे वळण देणारी होती. त्यांच्या ‘ Feminist Social Thought’ या पुस्तकातून त्यांनी पाश्चात्त्य जगातील स्त्रीवादाची पायाभरणी करणाऱ्या, सामाजिक-राजकीय प्रश्नावर मूलभूत काम करणाऱ्या सहा विचारवंत स्त्रियांचा संदर्भासहित चिकित्सक वेध घेतला आहे. त्यांचे हे काम इंटरनेट आपल्याला उपलब्ध होण्यापूर्वीचे असल्याने तो एक धाडसी प्रकल्पच मानला जातो. ज्यातून त्यांनी पाश्चात्त्य जगातील स्त्रीवाद आणि भारतीय संदर्भातील त्याचा अर्थ यावर मूलभूत मांडणी केली. भारतातील स्त्रीवादी विचार पुढे नेण्यात त्यांच्या या पुस्तकाचे आणि इतर लिखाणाचे योगदान मोठे आहे. ‘स्त्री-प्रश्नाची वाटचाल: परिवर्तनाच्या दिशेने’ (प्रतिमा प्रकाशन) या ग्रंथलेखनासाठी त्यांना २००४ चा ‘समाजविज्ञान कोश न्यासा’चा पुरस्कार मिळाला होता. Feminist Social Thought ( Rawat २००४), स्त्रीवादी सामाजिक विचार (डायमंड पब्लिकेशन्स २००८), Women’ s Studies Interdisciplinary Themes and Perspectives (डायमंड पब्लिकेशन्स २०१२), स्त्रियांचे मराठीतील निबंध लेखन, संपादन-विद्याुत भागवत (प्रथम आवृत्ती, साहित्य अकादमी २०१३) ही त्यांची इतर काही उल्लेखनीय पुरस्कारप्राप्त पुस्तके आहेत. त्या पुस्तकांचा आढावा हेच अधोरेखित करतो की, त्यांचा प्रयत्न हा स्त्री अभ्यासावरचे साहित्य निर्माण करणे हा तर होताच, पण त्याचबरोबर त्या स्त्री अभ्यास / स्त्री प्रश्नांवर चर्चा आणि ज्ञान निर्मिती त्या करू पाहत होत्या. त्यांनी लिखाण करण्याबरोबरच स्त्री अभ्यास हा उच्च शिक्षणाच्या पातळीवर कसा रुजेल यासाठी केंद्रात विविध अभ्यासक्रम सुरू केले आणि त्यांनी अध्यापनही केले. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या अभ्यासप्रकल्पांमधून स्त्रियांविषयीचे संशोधन केले. त्यांच्या कामातून त्यांनी सामाजिक शास्त्र आणि स्त्री अभ्यास यांना कृतिप्रवण बनवले. स्त्री अभ्यास ही एक ज्ञान कृती म्हणून त्यांनी पुढे आणली. त्यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्राने भारतातील पाच अग्रगण्य केंद्रांमधील एक केंद्र म्हणून मान मिळवला. स्त्रीप्रश्न आणि जातीप्रश्न, संशोधन आणि कृती, सिद्धांत आणि सार्वजनिक भाष्य, मराठी आणि इंग्रजी भाषांमधील ज्ञानाचे राजकारण, स्थानिक आणि जागतिक पातळींवरील ज्ञानव्यवहार यांच्यात अतूट अशी जोडणी करण्याची दृष्टी त्यांनी या केंद्राला दिली.
स्वत:चे लेखन करत असतानाच त्यांनी इंग्रजीमधील अनेक महत्त्वपूर्ण स्त्रीवादी लेखांचे मराठीतून भाषांतर केले. त्यांच्या या उपक्रमातून फक्त त्या संहिता मराठीमधून उपलब्ध झाल्या, असे नसून त्यांनी मराठीतील स्त्री-अभ्यासाच्या ज्ञानविश्वात भरीव असे योगदान दिले. त्या भाषांतरांना त्यांनी ज्या प्रस्तावना लिहिल्या त्यातून त्यांनी भाषांतरित लेखांवर भाष्य केले आणि त्याच बरोबर ते लेख ज्या मुद्द्यांच्या संदर्भात होते. त्या विषयावरही त्यांनी मांडणी केली. त्यांच्या या प्रकल्पाद्वारे त्या फक्त साहित्य निर्मिती करत नव्हत्या, तर इंग्रजी आणि मराठी ज्ञानविश्वात पूल बांधणीचे काम करत होत्या.
विद्याुत भागवत यांनी स्त्री चळवळीबरोबरची नाळ कायम जोडून ठेवली. त्याचबरोबर त्यांनी शेतकरी चळवळीमध्ये आणि दलित आदिवासी आणि ओबीसी, मुस्लीम संघटनांमध्ये आपला सहभाग नोंदविला होता. जनवादी चळवळींमधले त्यांचे स्त्रीप्रश्नावरचे काम आणि महाराष्ट्रातील स्त्रीवादी आंदोलनामधला बंडखोर सहभाग यामधून त्यांनी अभ्यास आणि परिवर्तनवादी राजकारण यांचा मेळ घातला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे स्त्री अभ्यासातील राजकीयता आणि चिकित्सक दृष्टी हरवली नाही. ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’तील स्त्री-अभ्यास केंद्र उभारण्यात आणि त्याचा वैचारिक पाया भक्कम करण्यात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. संस्था उभारणी करत असताना आपल्या सहकाऱ्यांना आणि संशोधक साहाय्यकांना काय म्हणायचे आहे ते ऐकून घेणे किंवा त्यांना एक प्रकारची मुभा देणे यामुळे आमच्या- सारख्या त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांना स्वातंत्र्य मिळाले आणि स्वायत्त विचार कसा करायचा हे शिकलो. त्यांच्या या पद्धतीमुळे वैचारिक स्वातंत्र्य तर मिळालेच, पण त्याचबरोबर ज्ञानव्यवहारातील उतरंड आणि संस्थात्मक श्रेणी रचना यालाही छेद दिला गेला.
त्यांनी व्यक्तिगत आणि संस्थात्मक या सर्व पातळ्यांवर नवा विचार / दृष्टिकोन रुजवण्यासाठी संघर्ष केला आणि आमच्यासारख्या त्यांच्या सहकाऱ्यांना स्त्री अभ्यासात शिकत असलेल्या संकल्पना उदाहरणार्थ ‘जे जे खासगी ते ते राजकीय’ हा विचार कसा जगायचा आणि तो जगत असताना त्याची आणखी एक जगण्याची पद्धत या पुरतंच ते मर्यादित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न का करावे लागतील याविषयीचे भान त्या सातत्याने देत असत.
या सगळ्यांबरोबरच समाजाकडे आरपार बघण्याच्या त्यांच्या दृष्टीमुळे त्यांनी लिहिलेल्या कविता आणि अलीकडेच त्यांची प्रकाशित झालेली कादंबरी त्यांच्यातील तरल तरीही धारदार विश्लेषकाची ओळख आपल्याला करून देते. त्यांचा कविता संग्रह आणि त्यांची ‘आरपारावलोकिता’ ही कादंबरी साहित्य आणि सामाजिक शास्त्र यामध्ये निर्माण करण्यात आलेला भेद मोडून काढतात.
हेही वाचा – वैद्यकीय शिक्षणात लिंगभाव!
स्त्री अभ्यासामधील विचार आणि व्यवहार हा मर्यदित आणि गुळगुळीत होऊ नये म्हणून अती अनुभवकेंद्रितता नको पण आकादमिक शिस्त आणि त्यातील काटेकोरपणा याच्या नावाखाली आपले संशोधन हे सगळ्यांना कठीण किंवा न कळणारे नसले पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. त्यांची शिस्त, पारदर्शकता, फटकळपणा आणि त्यांच्या अनपेक्षित प्रतिक्रिया या सगळ्या पैलूंमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व जितके चतुरस्रा होते तितकेच ते दाहकही होते, मात्र कदाचित त्यामुळेच त्या शेवटपर्यंत स्वत:चे लिखाण चालू ठेवू शकल्या आणि आत्ताच्या तरुण पिढीशी स्वत:ला जोडून ठेवू शकल्या.
स्त्री चळवळीच्या पहिल्या पिढीतील स्त्रीवादी अभ्यासक कार्यकर्त्या म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्राला दिलेल्या योगदानाला आणि ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’तील स्त्री अभ्यास विभागात त्यांनी केलेले पायाभूत काम याला विभागातील आम्ही सर्व अभिवादन करतो.
( या लेखासाठी अनघा तांबे आणि संजयकुमार कांबळे यांनीही सहकार्य केले आहे.)