गे ली साठ वर्षे मी कथालेखन करत आहे. बहुतेक कथा वेगवेगळ्या बावीस संग्रहांत एकत्रित झाल्या. काही मलाच न आवडल्यामुळे संग्रहात त्यांचा समावेश केला नाही. या संग्रहातील निवडक कथांची संपादने झाली. एका संकलनाच्या संपादक होत्या रसिक मर्मज्ञ शांताबाई शेळके आणि दुसऱ्या संकलनाची संपादक मी स्वत:च. वाचकांचा पुरेसा प्रतिसाद मिळाला. पाच-सहा विद्यार्थ्यांनी माझ्या कथांवर प्रबंधही लिहिले. पुरस्कार मिळाले. या सर्व गोष्टींचा आनंद मनात आहेच. तो त्या त्या क्षणी लाभतो आणि यथावकाश ओसरूनही जातो; पण एक आनंद मात्र आजवर कधी ओसरलेला नाही. तो आनंद म्हणजे मला अजूनही ज्याची कथा होऊ शकेल असे काही ना काही सुचत राहते. त्यामुळे मनात एखादी, क्वचित दोन-तीन कथा तरंगत राहतात आणि कथा आपणहून किनाऱ्यावर येऊन माझ्यासमोर उभी राहते. मी तर तिची वाटच पाहत असते. ते अमूर्त सुचणे कालांतराने/ शब्दांतून मूर्त होत जाते.
कसा असतो हा प्रवास? नीट उलगडून सांगता येणार नाही. कारण तो तसा धूसरच असतो. पण त्याच्या वाटा, त्याची वळणे समोर येत राहतात. ते पहिले पाऊल मी कधी आणि कोणत्या वाटेवर टाकीन याचे दुरून निरीक्षण करत राहते. कधी स्वत:ला आलेला (स्वत:चाच नव्हे, तर इतर कोणत्याही व्यक्तीचा) अनुभव, एखादी प्रत्यक्ष पाहिलेली किंवा ऐकलेली घटना, एखादी वृत्तपत्रात किंवा मासिकात आलेली बातमी, एखाद्या प्रवासात भेटलेली माणसे, स्थळे, एखादा आवडलेला चित्रपट; बहुधा पाश्चात्त्य, एखादे प्रभावित करणारे पुस्तक- विशेषत: त्यातील मनावर कोरला गेलेला प्रसंग. या सगळ्यात एखादे कथाबीज लपलेले असते, आणि ते माझ्या मनात रुजून राहते. हे बीजच असते हे आवर्जून सांगितले पाहिजे. त्याला एखादी अनाम शक्ती खतपाणी घालत असते. मग ते फुलते किंवा फुलतही नाही. माझ्या हातात काहीच नसते. कधी त्या बीजाचे विस्मरणही होते. मग ते नाहीसेच होते. शोधूनही सापडत नाही. तसे होऊ नये म्हणून मी माझ्या टिपणवहीत त्याची नोंद करून ठेवते. अगदी तत्परतेने नव्हे, पण आठवण ठेवून. ते कागदावर लगेच उतरते असेही नाही. मनाच्या आकाशात ते दिशाहीनपणे भिरभिरत राहते. पण ते जेव्हा पुन्हा जमिनीवर उतरते तेव्हा चमत्कार घडतो. त्या कथाबीजाभोवती असलेले पण मला अदृश्य राहिलेले अनेकविध संदर्भ अचानकपणे दृश्य होतात. त्याच कथबीजाभोवती त्याला पूरक असलेली अनेक कथाबीजे संमिश्रित होतात, प्रसंग नव्याने सुचतात, व्यक्तिरेखा घडू लागतात. त्यात फक्त एकच एक व्यक्ती नसते, तर अनेक व्यक्तींचे ते संमिश्रण असते. हे रसायन कसे तयार होते हे सांगता येणार नाही. पण एकदा ते सिद्ध झाले की मी उचललेले असते ते माझ्या त्या कथेच्या प्रवासातील पहिले पाऊल. कधी नंतरची पावले जलदपणे पुढे पडतात; तर कधी ते पाऊल किंवा पुढे चाललेली काही पावले खिळूनच राहतात. पण असे सहसा होत नाही किंवा झाले, तरी चालत राहिले पाहिजे असा निर्धार मनात असतो. त्या निर्धारामुळे कथा पूर्ण होते. कधी ती जमलेली असते तर कधी नाही. कधी सुचलेले उत्तम होते, पण लेखनात त्याचा आविष्कार मात्र मध्यम झाला हे कळते. तर कधी मध्यमातून चांगले काही घडल्याचा अनुभवही येतो. अशी असतात ही निर्मितीच्या वाटेवरील वळणे.
खरे आव्हान असते ते कोऱ्या कागदाला सामोरे जाताना. जवळ एखादे टाचण असते. पण त्यानुसार एखादी कथा अगदी आखीवरेखीवपणे लिहिली गेली, असे सहसा; नव्हे, कधीच होत नाही. तीन चार ओळी कागदावर लिहिल्या जातात, अन् मग तो शत्रू वाटणारा कागद सखा वाटू लागतो. शब्द सुचू लागतात आणि त्या शब्दांतूनच पुढची वाक्येही सुचत राहतात. म्हणून महत्त्व सुचण्याइतकेच, मनात जमलेल्या रसायनाइतकेच, या आविष्कारालाही. हा आविष्कार निर्मितीचाच एक भाग असतो; त्यातूनच त्या अनुभवाला आकार येऊ लागतो. हा समाधानाचा क्षण. पण काही तरी राहून गेले ही बोचही त्या समाधानात सलत असतेच. तसे होणेच चांगले. कारण मग धन्यता, कृतार्थता या भावना नेहमीच दूर राहतात. त्यामुळेच आणखी वेगळे एखादे पाऊल टाकण्याची इच्छा मनात तीव्रपणे होऊ लागते. म्हणून हे समाधानातले असमाधान हे कोणत्याही कलावंताला मिळालेले वरदान! प्रकाशाच्या वाटेवर चमकणारे अंधाराचे किरण, त्या किरणातही प्रकाशच. असा हा अंधार-प्रकाशाचा अगम्य खेळ.
तो खेळ दूरस्थपणे न्याहाळतच मी इतकी वर्षे लिहिते आहे. या काळात कथेने कायम सोबत केली. नैमित्तिक ललितलेखन झाले, समीक्षालेखनही झाले. या दोन नव्या क्षेत्रांतील सहभागामुळे कथांची संख्या कमी झाली. ‘कथालेखिका’ म्हणून निर्माण झालेल्या ओळखीऐवजी ‘समीक्षिका’ असा उल्लेख होऊ लागला. समीक्षेत निर्मितीचा भाग असतो, अशी माझी भूमिका असूनही मला माझ्यातील समीक्षिकेऐवजी कथालेखिका अधिक प्रिय आहे. आता पुढे जे काही लिहीन ते कथा या साहित्यप्रकारातच. कारण मी आता समीक्षेचा मनोमन निरोप घेतला आहे. कथेचा निरोप घेण्याचा प्रश्न येत नाही. कारण अजून कथेच्या भूमीत काही बीजे आहेत, आणि ती अंकुरावीत अशी इच्छा आहे. नेहमीप्रमाणे ते मनात घोळत राहील, त्याचा आसपासही दिसत राहील, आणि कथा घडत राहील.
इतका प्रदीर्घ कालखंड. त्यात माझ्या कथेत पुष्कळ काही घडले. त्यामुळे आता थोडे आत्मचिंतन करणे आलेच. अगदी आरंभी नवकथाकारांचा थोडासा प्रभाव होता. प्रभाव म्हणजे संस्कार. अनुकरणाचा मोह कधी झाला नाही. त्यांचे अनुकरण करणे सोपे तर नव्हतेच, शिवाय त्या पहिल्या चार-पाच वर्षांत मला माझी वाटही दिसू लागली होती. त्या आनंदात सात-आठ कथा लिहिल्या. पण त्या भावुक, ‘टिंबटिंब’वाल्या. त्यांच्यावर टीका झाली, त्यांची चेष्टाही झाली. ते चांगलेच झाले. कारण त्या टीकेमुळे मी खडबडून जागी झाले. स्वत:कडे पाहण्याऐवजी आजूबाजूला पाहू लागले. ते भोवताल किती गुंतागुंतीचे, जटिल होते! त्याचा शोध घेण्याची ओढ निर्माण झाली. ते समजूही लागले. मग मी ‘स्व’ची कथा ओलांडून ‘स्वतेरां’क डे पाहू लागले. या स्थित्यंतरात जी पहिली कथा लिहिली गेली ती (‘अधांतर’ या माझ्या पहिल्या संग्रहात समाविष्ट असलेली) ‘पुरुष’. त्यात विचलित, असुरक्षित करणारे वास्तव होते. ते मनाला अधिकाधिक भेदत गेले. त्या भेदातून काही कथा लिहिल्या. समांतरपणे मी इंग्रजी व इंग्रजीत अनुवादित झालेले साहित्यही अधाशीपणे वाचत होते. प्रामुख्याने ‘अॅबसर्ड’ साहित्य. त्याचा तात्पुरता प्रभाव पडला. त्यातूनही दोन-तीन कथा लिहिल्या. नंतर माझे मलाच उमगले की माझे हे लेखन फसले आहे. या वेगळ्या स्वरूपाच्या कथांप्रमाणे काही जुने फॉम्र्स, जुन्या शैली पुनरुज्जीवित करणाऱ्या कथा, काही प्रवासकथा. हीही तात्पुरतीच वळणे ठरली. त्यांनी टिकाव धरला नाही.
या सगळ्या स्थित्यंतरातून जाताना ‘माझी’ कथा लिहीत होतेच. ती स्त्रीची कथा होती किंवा स्त्रीकेंद्री कथा. या कथेतील स्त्री कणखर आहे. एका विस्तृत तीन पिढय़ांचा कालखंड तिने पाहिला आहे. या कणखर स्त्रीची अनेक रूपे माझ्या कथांत आहेत. या संदर्भातील एक उदाहरण येथे देते. माझी ‘अनपढ’ नावाची एक कथा आहे. एका वसतिगृहात विद्यार्थ्यांने आपल्या संचालकाविरोधात पुकारलेला संप. त्याला हरतऱ्हेने दिलेला त्रास, घोषणा, फलक वगैरे. शेवटी संप मिटतो. त्या संचालकाच्या राहत्या जागेचा प्रश्नही संप मिटल्यावर सुटतो, तो आपल्या पत्नीला- लक्ष्मीला समाधानाने तसे सांगतो. ज्यांनी ‘हकलावून लावायचे ठरवलेले असते त्यांच्याच सहवासात पुन्हा राहायचाय?’ ती नकार देते. म्हणते आता आपण हे वसतिगृह सोडू. त्या वेळी दोघांत झालेला संवाद.
‘पण, इतकां का आग्रह तुझा ? तुला खरंच सांगतो, ती मुलं आपल्याला यापुढे त्रास देणार नाहीत.’
‘मी त्यांच्याबद्दल कुठे काय म्हणते आहे? मला एकच समजतं, एकदा आपण कुणाला नकोसे झालो की मग तिथं राहू नये. त्यांना सुख नाही, आपल्याला सुख नाही.’
याच कथेच्या संदर्भात ‘सुचण्या’विषयी आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते. कथेतील लक्ष्मी ही व्यक्तिरेखा माझ्या मनात कुठेच नव्हती. मला ती लिहिता लिहिता सुचली. असे अचानकपणे जेव्हा काही सुचते, तेव्हा मी स्तिमित होते. कथा प्रवासातील तो आनंदाचा सर्वोच्च क्षण असतो.
आणखी एक कथा आठवते, ‘अखेरचे पर्व’. पती स्वैराचारी. संसार सोडून बायकोच्या अंगावर दोन मुले टाकून तो घराबाहेर पडतो, वेगवेगळ्या तीन स्त्रियांच्या सहवासात रमतो, पण शेवटी भ्रमनिरास झाल्यावर एका मित्राच्या मध्यस्थीने घरी परतायचे ठरवतो. मनात शंका, ती होकार देईल का. पण ती म्हणजे शारदाबाई म्हणतात. ‘येऊ, दे त्यांना.’ त्यांची व्यवस्था मात्र गच्चीवर केली जाते. शारदाबाईंनी स्वत:च्या हिमतीने नव्याने बांधलेल्या घराच्या गच्चीवर. इतर सगळी व्यवस्था उत्तम. पण येणे-जाणे नाही, बोलणे नाही. हा शारदाबाईंचाच निर्णय. ते जेव्हा घरात दोघेच असतात, तेव्हा खाली येऊन बागेत पाणी घालणाऱ्या शादाबाईंना विचारतात-अर्थात अपराधी मनाने,‘ हे तुला कसं शक्य झालं,’ तेव्हाचे शारदाबाईंचे उत्तर.
‘तुम्ही गेल्यावर माझ्यापुढे दोन मार्ग होते. झुरत राहायचं, स्वत:चा छळ करून घ्यायचा. पण मी दुसरा मार्ग स्वीकारला. सगळं विसरून जायचं. नव्या आयुष्याला सुरुवात करायची. त्या आयुष्यात रुजायचं, स्वत:ला राखायचं. मी एक साधी बाई. धड शिक्षणसुद्धा झालेलं नाही. पण एका माणसानं स्वत:ला उध्वस्त करायचं नाही. फुलवत राहायचं, जेवढं जमेल तेवढं. हा निर्णय घेतल्यानंतर काय कठीण असतं. किंवा कठीण असेलही पण मला ते जमलं खरं !’
मी माझ्या कथांतील स्त्रीच्या तीन पिढय़ांचा उल्लेख केला. माझी ‘पै पैशांची गोष्ट’ हीही याच समूहात मोडते. एका वृद्धत्वाकडे झुकलेल्या स्त्रीने सांगितलेली. तिला ते मौखिक वळण आहे. या कुटुंबात ती, अधिकच वृद्ध अशी तिची आई आणि तरुण मुले- ज्यांची ‘अफ्लुअंट सोसायटी’त गणना होईल अशी. ही बिचारी पै-पैशाचा हिशोब ठेवणारी. तिची आईही तशीच. एकदा हे कुटुंब समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाते. आजीच्या हातातील चार आणे (पावली) वाळूत हरवतात. आणि ती ते शोधत बसते. त्यावर आईची प्रतिक्रिया.
‘वाळू या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरली आहे आणि ती आपली पावली शोधते आहे. मला हसू आलं. अन् माझ्या डोळ्यात पाणीही आलं.
अलीकडे मलाही तिच्यासारखंच होतं. पैशांच्या लाटा, नाण्यांचे ढीग अंधारात सगळं चमकतं आहे, असा भास होतो. आणि मीही आपली हरवलेला पै पैसा मनातल्या मनात शोधत राहते.
म्हातारचळ दुसरं काय ? ’
याही तीन पिढय़ाच. आपापसात कोणतेही ताण नाहीत. पण पैशांमुळे जीवनशैली बदलते आहे. पै पैशांकडून डॉलर, पाउंडकडे ती चालली आहे. आता नवे ‘चलन’ अस्तित्वात आले आहे. त्याला आईचा विरोध नाही. हे न कळण्याच्या मानसिकतेला ती ‘म्हातारचळ’ म्हणते. स्वत:लाच हसते!
या काळात ‘स्त्रीवाद’ आला होता. पण मी त्या वादाच्या चौकटीत राहिले नाही. कारण मला वाद घालायचा नव्हता, तर संवाद साधायचा होता; विश्लेषण न करता संश्लेषण करायचे होते; नकारात्मक न राहता सकारात्मक राहायचे होते. ते वैयक्तिक आयुष्यात जमले आणि कथालेखनातही जमले (असे वाटते).
मी षोडषींच्या, कुमारिकांच्या कथा लिहिल्या. त्याप्रमाणे प्रौढ व उतारवयात असलेल्या स्त्रियांच्या कथाही लिहिल्या. त्यांची मानसिकता हेरण्याचा प्रयत्न केला, त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचाही. मुक्त स्त्रियांप्रमाणे बद्ध किंवा बद्धमुक्त स्त्रियांच्या कथाही लिहिल्या. या स्त्रियांभोवती पुरुषही होते. बहुतेक वेळा या स्त्रियांना समजून घेणारे. हा स्त्री-पुरुष संवाद होता. संवाद होतो तो मुख्यत: स्त्रीच्या बाजूने. या स्त्रीच्या आगेमागे तरुण व अधिक वृद्ध स्त्रियाही आहेत. त्यांच्यातही संवाद आहे. विशेषत: पहिल्या पिढीत व तिसऱ्या पिढीत. म्हणून या काही वेळा आजी-नातीच्या स्नेहसंबंधांच्या कथा आहेत. मधली पिढी नव्या काळातली आहे. त्यामुळे या कथांत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारखे प्रश्नही येतात. पण या सगळ्याच स्त्रिया कणखर आहेत, आधार देणाऱ्या आहेत. पुरुषाला आपल्यात असलेल्या आंतरिक शक्तीने विस्मयचकित करणाऱ्या आहेत. काहीसे भयचकित करणाऱ्याही. मला स्त्रीच्या मनापेक्षाही स्त्रीच्या शरीराविषयी खूपच अधिक कुतूहल आहे. या शरीरात ‘सृजन’ आहे. तीच स्त्रीची शक्ती आहे. या शरीराची जवळजवळ सगळी स्थित्यंतरे आणि त्यातून निर्माण झालेल्या कथा मी वेळोवेळी लिहिल्या आहेत. ऋतुप्राप्तीपासून ऋतुसमाप्तीपर्यंत, प्रसूतिवेदनांपासून प्रत्यक्ष प्रसूतीपर्यंत. मला नम्रता सोडून आणि थोडेसे धाडस करून असे म्हणावेसे वाटते, की अशा ‘स्त्री-शरीर’ कथा त्या काळात लिहिल्या गेल्या नव्हत्या. मला जुन्या-नव्या लेखिकांतील काही लेखिका आवडतात. पण त्यांची क्षेत्रे वेगळी आहेत. आणि माझे हे शरीरक्षेत्रही वेगळे आहे. एकमेकींना पसंतीची दाद देण्याइतकी माझी त्यांच्याशी मला समृद्ध करणारी मैत्री आहे. हेच माझे संचित.
या शक्तीबद्दल अपार कुतूहल असणाऱ्या, स्त्री-शरीर हे कोडे न उलगडणाऱ्या आणि शेवटी त्या सृजनशक्तीचा साक्षात्कार झालेल्या पुरुषाचे मनोगत शब्दांकित करणाऱ्या माझ्या ‘विदेही’ या कथेतील पुरुषाला प्रश्न पडतात :
‘‘हे मला का समजू नये ?’’
सांगणे का नाकारले जाते आहे?
तिच्या प्रसूतिवेदना पाहत असताना त्याचे चिंतन चालू होते :
‘‘वेदना अनादी
म्हणून हा देहही अनादी.
हा दुभंगतो आणि सांधतो.
मृत्यूच्या सहवासात राहतो
आणि अधिकच जीवन-समृद्ध होतो.’’
आणि शेवटी रोमांचित झालेला तो ‘‘तृप्तपणे तिच्यापासून दूर होतो. तिच्यातच राहून.’’
अशी आणखी एखादी कथा माझ्या हातून पुन्हा लिहिली जाईल का? कोण जाणे !
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा