आजच्या अंकात सुप्रसिद्ध चित्रपट, नाटय़ कलावंत विक्रम गोखले सांगताहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अपयशाचा लावलेला अर्थ.
अपयशाचाच अर्थ? आयुष्यातल्या वळणवाटातल्या यशाला काही अर्थच नसतो? मला असं वाटतं की, सारासार विचार, म्हणजे भान ठेवून आपण आपल्या अपयशाचा अर्थ काढायला बसलो, तर आयुष्यातल्या यशाचा अर्थही आपण नक्कीच काढू शकतो; परंतु यशापयशाचा अर्थ काढणं सोपं नाही. ते अत्यंत अवघड आहे. त्यासाठी अलिप्ततावादाची आवश्यकता असते आणि असा त्रयस्थ भाव आत्मसात करणं, याकरिता स्वत:च्या स्वत:वर असलेल्या प्रेमातून बाहेर पडणं फार आवश्यक असतं. नाही तर थोरामोठय़ांनी जे शतकांपूर्वी सांगितलं ते मातीमोल ठरतं. पूर्वसुरींनी म्हटलेलं आहे की, यशाचे असंख्य दावेदार असतात, परंतु अपयशाला मात्र बाप नसतो आणि म्हणून वळणवाटा शोधताना आपल्या अपयशाचे आपण बाप झालो, तर प्रश्न लवकर सुटतात आणि एकदा अपयशाचं गणित आपलं आपल्याशी मांडता आलं, की मग आपल्या यशाबाबतही आपण दावेदारांना दाराशीही उभं करत नाही.
मी कोणी संतिबत नाही किंवा कुणी बुद्धिवादी, विचारवंतही नाही; परंतु पन्नाशीच्या आसपास केव्हा तरी अलिप्ततावाद लक्षात आलेला आणि वळणवाटांवर आपल्या प्रत्येक अनुभवाच्या किंवा कृतीच्या शेवटी जे पदरी पडलं त्याला अपयश असं नाव द्यायचं ठरल्यावर शक्य होतील ते सर्व प्रश्न स्वत:लाच विचारायला हवेत हे शंभर टक्के लक्षात आलेला एक सामान्य पुरुष आहे. मांडलेले मुद्दे लक्षात यावेत यासाठी माझ्या आयुष्याशी निगडित अशा काही वळणवाटांवरच्या यशापयशाची उदाहरणे द्यावीशी वाटतात. आमच्या वडिलांच्या एकूणच दुर्दैवानं कुटुंबावरच आणि त्यामुळे माझ्या बालपण आणि तारुण्यात प्रवेश करेपर्यंतच्या काळात माझं जे आयुष्य गेलं त्याबद्दल सांगतो.
माझ्या वडिलांची महाराष्ट्रीय मनात एक प्रतिमा तयार झालेली होती. त्यांच्या भूमिका पाहून लोकांनी ठरवून टाकलं होतं की, चंद्रकांत गोखले हे अत्यंत शांत स्वभावाचे, अत्यंत सहनशील असे एक गृहस्थ असावेत. प्रत्यक्षात बाबा हे ‘जमदग्नी’ होते. त्यांच्या सत्त्याऐंशिव्या वयातही मी त्यांच्या नजरेला नजर देऊ शकलो नाही. ते सद्गृहस्थ होते, सद्विचारी होते, फारच खरे होते आणि बहुधा फार सरळ व रोखठोक असल्यामुळे संतापी होते. या गृहस्थाची मनस्वी इच्छा होती की, मी शास्त्रीय गायक व्हावं आणि नंतर गायक नट होऊन संगीत रंगभूमीवरही कामं करावीत. गरिबीमुळे अनेक वेळा ते रात्री उपाशी झोपून पहाटे चार वाजता उठून त्यांच्यासमोर तानपुरा वाजवायला शिकवत. ‘खर्ज’ लावून दोन दोन तास मांडी घालून बसल्यामुळे पायाला मुंग्या यायच्या; पण रियाजात टाळाटाळ केलेली त्यांना अजिबात चालत नसे. मला शिकवणीचा कंटाळा. त्यांच्या लक्षात हा कंटाळा आला, की फाड्फाड् दोन्ही कानांवर होळीच पेटायची. केव्हा तरी हा जुलमाचा रामराम त्यांच्या नीट लक्षात आल्यावर सुमारे दहा-बारा वर्षांनी त्यांनी त्यांचा हा हट्ट सोडून दिला; परंतु त्या दहा-बारा वर्षांत ते मला खूप वेळा खूप ठिकाणी खूप मोठय़ा कलावंतांचं गायन, वादन ऐकण्यासाठी घेऊन गेले. हे त्यांचे माझ्यावर उपकार आहेत. ज्यांना मी ऐकलं त्यांच्यातल्या काहींची नावं सांगतो. उस्ताद खाँ साहेब, बडे गुलाम अली खाँ, कुमार गंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर, भीमसेन जोशी, प्रभाताई अत्रे, किशोरीताई आमोणकर, डागरबंधू, सलामत अली, नजाकत अली (भारतात, पुण्यात आलेले असताना) तसंच वादकांपकी, उस्ताद खाँ साहेब, अहमद जान थिरकवा, अल्लाहरखा खाँ साहेब, लालजी गोखले, छोटबा गोखले, विजय दुग्गल वगरे. झाकीर त्या वेळी बारा-तेरा वर्षांचा होता, पण त्यालाही ऐकायला ते मला घेऊन गेले होते. हे सगळं अर्थातच ही कला किती महत्त्वाची आणि मोठी आहे हे माझ्या टाळक्यात शिरावं म्हणूनच होतं; पण मी फार शिकलो नाही. मोठा झाल्यावर आणि सुरेल गायकांना ऐकल्यावर स्वत:च्या मूर्खपणावर आज मी आतल्या आत खूप रडतो. वेळ निघून गेली आहे हे लक्षात येतं; पण त्याचबरोबर हेही लक्षात येतं की, गेल्या पंचवीस-तीस वर्षांत मराठी संगीत रंगभूमीची काय भीषण परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे एका अर्थाने मी वाचलोच ना? परंतु आणखी एक गोष्ट झाली की, मी तानसेन झालो नाही तरी जबरदस्त कानसेन मात्र झालो आणि त्याकरिता किशोरीताईंसारखी कलावती, पं. वसंतराव देशपांडे, आरती अंकलीकर, पंडित अजयजी पोहनकर,
पं. बिरजू महाराज, कोमकली, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, फय्याज शेख, असे अनेक जण दाद देत असतात. तानपुरा मी फार म्हणजे फारच सुरेल लावतो, अगदी जवारीसकट. तो एक वेगळाच आनंद आहे. हे यश नाही?
मी सुमारे नऊ-दहा वर्षांचा असेन. दिवाळीचे दिवस. आमच्या घराच्या खिडकीतून मी, धाकटा भाऊ आणि त्याहून धाकटी बहीण, असे तिघेही शेजाऱ्यापाजाऱ्यांची मुलं फटाके उडवताहेत हे पाहात होतो. दुसऱ्या दिवशी बऱ्यापकी उजाडल्यावर मी आणि भाऊ आदल्या रात्री न उडालेले फटाके शोधून वेचत होतो. इतक्यात बाहेरून वडील घरी आले. त्यांनी आम्हाला आात बोलावलं. वेत काढला आणि सपासप आमच्यावर चालवला. मी मोठा म्हणून माझ्यावर जरा अधिकच. मारहाण संपल्यावर संध्याकाळ होईपर्यंत सगळं घर गप्प! संध्याकाळी वडील बाहेर पडले. पुन्हा घरी आले तेव्हा त्या काळातल्या म्हणजे साठ वर्षांपूर्वीच्या शंभर रुपयांचे फटाके घेऊन आले. आम्हाला म्हणाले, उडवा. आम्ही मुलं बुचकळ्यात आणि आनंदातही. फटाके उडवताना माझं आईवडिलांकडे लक्ष गेलं. दोघांच्याही डोळ्यांत अश्रू. त्यांच्या अश्रूंनी मला त्या संध्याकाळी अचानक आणि अकाली प्रौढ केलं. फटाके उडवणं माझ्यापुरतं थांबवून मी घाबरत घाबरत वडिलांना विचारलं की, फटाक्यांसाठी त्यांनी पसे कुठून आणले आणि त्या दोघांचाही बांध फुटला. आम्हा तिघांनाही आईबाबांनी मिठीत घेतलं. मला कळलं की, कुणाकडून तरी उसने पसे घेऊन त्यांनी फटाके आणले होते. त्या रात्रीनंतर या क्षणापर्यंत मी फटाके उडवलेले नाहीत. त्या रात्री वडिलांनी माझ्या आणि भावाच्या अंगावरील वेताच्या वळांवर हळुवार तेल लावलं. त्यांचा तो स्पर्श अजूनही आठवतो. श्रीमंत बालपण नाही मिळालं, पण फटाके उडवणं म्हणजे पसे जाळणं आणि ध्वनी व परिसर प्रदूषण करणं आहे हे लक्षात आलं आणि कायम लक्षात राहिलंही! एका दृष्टीनं हे यश नाही?
पानशेत आणि खडकवासला धरणं फुटून अर्ध पुणं पाण्याखाली गेलं. मी नववीत शिकत होतो. आमच्या घरावरही वीस-पंचवीस फूट पाणी होतं. जगाबरोबर आम्हीही दु:खी होतो. खूप नुकसान झालं. साफसफाईत काही आठवडे गेल्यावर एका सकाळी नटवर्य जोगळेकर, चित्तरंजन कोल्हटकर आणि तत्कालीन मराठी नाटय़ व्यावसायिक मंडळी आमच्या घरी आली. आम्हाला आíथक म्हणून काही मदत त्या सर्वानी आणली होती. सर्वानी खूप आग्रह करूनही वडिलांनी एक रुपयाही घेतला नाही. तो उद्दामपणा नव्हता. विनम्रतेनं वडिलांनी मदत घ्यायला नकार दिला. त्यांच्या त्या नकाराचा अर्थ त्याच संध्याकाळी मला समजला. वडील मला घेऊन आजच्या (पूर्वीचा लकडी पूल) संभाजी पुलावर आले आणि पूर्वेकडे ओंकारेश्वराकडे, म्हणजे त्या दिशेनं पाहात उभे राहिले. पाच मिनिटं मीही समोर वाहून गेलेलं पुणं पाहात होतो. वडिलांकडे पाहिलं तर ते नि:शब्दपणे अश्रुपात करत होते. मला म्हणाले, आपल्याला छप्पर तरी आहे, वाचलेलं. ज्यांची घरंच पायापासून या धरणफुटीने उखडून नेली त्यांचं दु:ख, यातना काय असतील या विचाराने आजची सकाळची समोर आलेली मदत मी नाकारली. समजलं तुला? मी एकदम गहिवरलो.
धरणफुटीमुळे आमच्याही वाटय़ाला उपासमार, दारिद्रय़, कपडे, वस्तू या गोष्टी बरेच दिवस नसणे हे सर्व आलं; परंतु तशाही परिस्थितीत आपल्यापेक्षा अधिक दु:खात, संकटात असलेल्यांचा विचार मनात जागता ठेवणं हे मी शिकलो. याला यश नाही तर काय म्हणायचं? आणि म्हणूनच थोडाफार पसा जमवल्यावर सामाजिक सार्वजनिक विश्वस्त निधीकरिता प प करत तीस वर्षांपूर्वी मी एक ट्रस्ट स्थापन करू शकलो. त्या न्यासामार्फत गेली अनेक वष्रे खारीची वाळू म्हणून का असेना काही भरीव समाजकार्य मी करू शकतो आहे, हे यश नव्हे?
साठच्या दशकाच्या मध्यानंतर, त्या वेळच्या मराठी चित्रपटांत मिळेल ती भूमिका करणं, समोर आलेल्या तत्कालीन सामान्य मराठी नाटकांतून मिळतील त्या भूमिका स्वीकारत राहाणं आणि मिळतील त्या पशातून वडिलांना काहीशी का होईना, पण भावंडांमधला थोरला या नात्यानं मदत करण्याचा प्रयत्न करणं हे मी आनंदानं केलं. वस्तुत: तेव्हाच्या माझ्या बौद्धिक लायकीप्रमाणेसुद्धा मी जे करत होतो किंवा मला जे करावं लागत होतं त्याबद्दल मला नितांत मानसिक वेदना होत होत्या. आपण जे काही करतो आहोत ते सगळं पोरकट, बालिश आहे हे मला कळत होतं; पण विक्रम गोखले नावाच्या एका तरुण आणि शारीरदृष्टय़ासुद्धा देखण्या पोराला आपण संधी देण्याचं एक महत्त्वाचं काम करतो आहोत अशी बहुतेक निर्माते, दिग्दर्शकांची खात्रीच होती आणि ते मला ‘पुढेबिढे’ आणण्याचं महान कार्य करत होते. त्या वेळी ‘हू का चू’ करण्याचं माझ्याकडे लायसन्स नव्हतं! अर्थात धडपडण्याच्याच नव्हे, तर थोडंसं स्थिरस्थावर झालेल्या काळातसुद्धा जगभरातल्या सगळ्याच नटांना, कलाकारांना, कवींना, लेखकांना, संगीत दिग्दर्शकांना आणि थोडय़ा फार प्रमाणात दिग्दर्शक नावाच्या प्राण्यांनाही तक्रार करण्याचं हे लायसन्स नसतंच आणि एखाद्यानं ते लायसन्स आपल्याकडे असल्यासारखी उद्धट वागणूक केलीच तर त्याला बाहेरचा रस्ता कुठे आहे तो लगेच दाखवला जातो.
मला असा बाहेरचा रस्ता कुणीही कधीही दाखवला नाही. म्हणजे मी तशी वागणूकही कधी केली नाही. मात्र उपकारांच्या ओझ्याखाली कुणी मला वाकवण्याचा प्रयत्न करतोय, असं दिसताच मीच त्यांच्या जगातून बाहेर पडलो. काही नाटय़लेखक, नाटय़कंपन्यांचे काही मालक आणि काही सिनेमा/नाटक दिग्दर्शक यांच्या बरोबरची माझी एकेकदाच झालेली भांडणे किंवा वाद अगदी महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. कालांतराने मी संताप या विकृतीपासून दूर झालो, शांत झालो. परंतु ऐन तारुण्यात मात्र एकदम मोडेन पण वाकणार नाही. मराठी बाणा – जयभवानी – जय शिवाजी वगरे वगरे माझ्यात भरपूर प्रमाणात होतं. आता मात्र मी शांत झालेला ज्वालामुखी आहे.
मराठी बाण्याच्या या बेभान नशेत असताना मी जबरदस्त मूर्खपणाही केलेला आहे. निर्मात्यांची जशी नटांसाठी करारनाम्याची एक भानगड असते त्याप्रमाणे मीही माझी स्वत:ची निर्मात्यांसाठी असलेली नियमावली म्हणजे करारनामा छापूनच घेतला होता. मी जर निर्मात्याच्या करारावर सही करायची असेल तर निर्मात्यानेही माझ्या करारपत्रावर सही करायला हवी असा माझा हट्ट होता. तो कोणीही पुरवला नाही हा भाग वेगळा आणि मला अनेक र्वष नाटक-सिनेमातून वाळीत टाकलं. अर्थात मला फरक पडला नाही. पण शेवटी माझ्या मूर्खपणाची एक खूण म्हणून माझ्या त्या करारनाम्याची एक प्रत मी जपून ठेवली आणि बाकी फेकून दिल्या. आजही ती प्रत बघून मला माझ्या मूर्खपणाबद्दल खदाखदा हसूं फुटतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा