वहिदा रेहमान

‘‘आम्ही एकत्र आलो की अखंड गप्पा सुरू होतात.. खूप आठवणी आहेत. खूप काही असतं शेअर करण्यासारखं. कटू आठवणीही येतातच वर, पण त्याचा कडवटपणा रेंगाळता कामा नये, असं आम्ही सख्यांनी ठरवलं आहे. आम्हाला एकमेकींच्या सहवासानं निखळ आनंदच दिला आहे. आमची ही गेल्या २५ वर्षांतली मैत्रीच आता आमच्या जगण्याचं निमित्त झाली आहे.’’ नुकत्याच झालेल्या मैत्री दिनाच्या निमित्ताने चित्रपट अभिनेत्री वहिदा रेहमान आणि आशा पारेख यांनी जागवलेल्या आपल्या मैत्रिणी नंदा, शम्मी आणि हेलन यांच्याबरोबरच्या मैत्रीच्या आठवणी..

आशाशी माझी मैत्री तशी उशिराच झाली. आशा माझ्यापेक्षा ५-६ वर्षांनी लहान. आम्ही दोघींनी कोणत्याच चित्रपटात एकत्र काम नव्हतं केलेलं. त्यामुळे कामानिमित्तानं भेटायचा प्रश्नच नव्हता. त्या काळी माझी मैत्री झाली ती नंदाशी. त्या वेळी ती ‘बेबी नंदा’ म्हणूनच प्रसिद्ध होती. घट्ट मैत्रिणी होतो आम्ही एकमेकींच्या. इतक्या, की नंदाच्या घरचा फोन, त्यावेळी लँडलाइनच असत, तो लागला नाही, तर बिनदिक्कतपणे निर्माते-दिग्दर्शक मला फोन करत! जेव्हा माझ्या घरचा फोन लागत नसे किंवा मी घरी नसले की नंदाला फोन जात असे. हे लता मंगेशकर यांच्या बाबतीतही घडलंय. दीदींना माझ्याकडे काही महत्त्वाचं आणि तातडीचं काम होतं, त्यासाठी त्यांना मला भेटायचं होतं. मी मुंबईत नव्हते. आमच्या बंगळूरुच्या फार्म हाऊसवर गेले होते. लता मंगेशकर यश चोप्रा यांना भाऊ मानत. त्यांनी यशजींना माझा ठावठिकाणा शोधायला सांगितलं. तेव्हा यशजींनी लतादीदींना सांगितलं, ‘‘दीदी, अगर वहिदासे र्अजट बात करनी हो, संपर्क नहीं हो रहा हो, तो सीधे नंदा के घर पर फोन लगाना और नंदासे बात नहीं हो रही हो, तो वहिदा के घर फोन करना। चुकला फकीर मशिदीत सापडतो, तसं या दोघींचं आहे.’’ तर अशी आमच्या मैत्रीची आख्यायिका.

नंदामुळे माझ्या आयुष्यात महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ आले. मला फारच आवडायचे त्यांच्याकडचे पदार्थ. नंदाच्या घरी गणपती यायचा. गणपतींच्या त्या संपूर्ण दिवसांत तिच्याकडे मिष्टान्नांची रेलचेल असायची नुसती. उकडीचे मोदक, पुरणपोळी, पंचामृत हे तर माझे खास आवडीचे पदार्थ. मैत्रीणच असल्यानं मी सगळय़ा पदार्थावर यथेच्छ ताव मारायची, पण हे झालं सण किंवा उत्सवातलं. इतर वेळीही जेव्हा मला तिच्या घरी जायचं असायचं, तेव्हा ‘मी येतेय,’ असं आधीच कळवून ठेवायची. नंदाला माझ्या  आवडीचे सगळे पदार्थ माहीत असल्याने ती ते करून ठेवायची. माझ्या खाण्याच्या सर्व फर्माईशी ती पूर्ण करायची म्हणा ना. अतिशय सौम्य- अगदी शांत व्यक्तिमत्त्व होतं तिचं. नंदा मैत्रीण होतीच, त्यात हळूहळू शम्मी, हेलन आणि आशा (पारेख) याही सामील झाल्या. हेलन वांद्रयाला, माझ्या जवळच राहते. शम्मी आणि आशाची खूप आधीपासूनच मैत्री होती. त्यामुळे मग आमचा मस्त ग्रुप तयार झाला, आशानंच तयार केला तो. खूप छान होता तो काळ. आम्ही घट्ट बांधलो गेलो होतो एकमेकींशी. पण काळापुढे कुणाचं चालत नाही. नंदा, शम्मी आता आपल्यात नाहीत. त्यांची कमी भासतेच! आता आम्ही तिघीच आहोत. आशा, मी आणि हेलन. तितक्याच घट्ट आहोत, आजही.

    आमच्या मैत्रीत विचारांचा एक समान धागा आहे, त्यामुळे आमच्यात भांडणं होत नाहीत. क्वचित प्रसंगी आमची मतं एकमेकींना पटत नाहीत, पण त्याचं वादात रूपांतर कधीच नाही होत. मतमतांतरं असतातच; त्यांचं तिथल्या तिथे निराकरण करायचं, हा आमचा अलिखित नियम आणि तो आम्ही कटाक्षानं पाळतो. त्यामुळे आमच्यात कधीही दुरावा नाही आला.. आणि तो येण्याची सुतराम शक्यता नाही. एकमेकींच्या सहवासानं आम्हाला निखळ आनंदच दिला आहे. आमची ही गेल्या २५ वर्षांतली मैत्री आता आमच्या जगण्याचं निमित्त  झाली आहे. एकमेकींच्या सतत संपर्कात राहणं, एकमेकींची काळजी घेणं हे आम्ही करतोच, पण धमालही करतो. मुंबईत एखादं नवं रेस्टॉरन्ट उघडलं, की आधी त्याचा रिव्ह्यू वाचतो. चांगलं असलं, की मग थेट तिथे धडकतो आणि मनमुराद खातो. मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा चेंज हवाहवासा वाटला, की मग कुठेतरी मुंबईबाहेर स्वच्छंद भटकंती करतो. आतापर्यंत ताडोबा टायगर सफारी, राजस्थान, या भारतीय ठिकाणांबरोबरच स्कँडिनेव्हियन ओशन, कॅनडा, अलास्का, केनिया, मसाईमारा जंगल अशा अनेक ठिकाणी फिरलो. कधी जंगलात राहिलो, कधी क्रूझची सफारी केली.

  आशाच्या बाबतीत सांगायचं, तर ती तिच्या काळातली ‘हायेस्ट पेड’अभिनेत्री होती, याचा मला कायमच अभिमान वाटत आलाय. तिच्या आणखी एका गोष्टीचा मला अभिमान वाटतो, तो तिच्या दानशूरपणाचा. अभिनयाखेरीज नृत्याचे अनेक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम तर तिनं कायम केलेच, पण सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे ‘आशा पारेख हॉस्पिटल’ची निर्मिती. आमच्या चित्रपट क्षेत्रात ‘बेदाग इमेज’ असणं सोपं नाही, आशाची प्रतिमा तशी आहे. तिच्याकडून शिकण्यासारखंही खूप आहे. तिचा ‘कटी पतंग’ मला खूप आवडतो आणि माझ्या या सख्यांना माझी ‘गाईड’मधली ‘रोझी’ खूप आवडते! खरं तर ही व्यक्तिरेखा करावी, असं तेव्हा मला वाटत नव्हतं. कारण ‘सीआयडी’ या माझ्या पहिल्याच चित्रपटात मी निगेटिव्ह भूमिका साकारली होती. माझ्या अनेक चाहत्यांनी तशा भूमिका न करण्याची विनंती केली होती. त्यामुळे आर. के. नारायणन यांच्या गाजलेल्या पुस्तकावरच्या या चित्रपटात पतीला सोडून राजू गाईडबरोबर राहणारी रोझी माझ्या चाहत्यांना कितपत आवडेल याबद्दल मी साशंक होते, पण माझ्या सगळय़ा मैत्रिणी म्हणतात, गाईडमधली रोझीची भूमिका हीच तुझी सर्वश्रेष्ठ भूमिका!

   हेलनच्या बाबतीत सांगायचं, तर त्या काळात कॅब्रे डान्स करण्याचं साहस तिनं केलं होतं. अर्थात त्याहीपलीकडे आपली एक वेगळी प्रतिमा तिनं निर्माण केली होती. ही आमची खूपच वेगळी मैत्रीण आहे, कारण तिची ‘ऑन स्क्रीन इमेज’ आणि ‘ऑफ स्क्रीन इमेज’ यामध्ये जमीन-आस्मानाचं अंतर आहे. आता वयाच्या या टप्प्यावर मनात रुतून राहिलेल्या मस्त आठवणी आणि आम्हा तिघींची मैत्री आम्हाला शेवटपर्यंत पुरेल..

‘‘एकमेकींबरोबर असणं हीच मैत्रीची ताकद’’

वहिदा माझ्यापेक्षा मोठी, पण आमच्या मैत्रीत वय कधी आडवं आलंच नाही. वहिदा अतिशय ग्रेसफूल, डिग्निफाईड अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाची उंची सगळय़ांनाच गाठता येत नाही हे नि:संशय. आम्ही- मी, वहिदा, हेलन, शम्मी जिवलग मैत्रिणी. आमच्या या मैत्रीला वयाचं, जाती-धर्माचं, भाषेचं कधीच कसलंही बंधन नव्हतं आणि नाही. आज आमच्या ग्रुपमधल्या आम्ही तिघीच आहोत, पण आजही एकत्रित खूप धमाल करतो. ३ वर्षांपूर्वी आम्ही अंदमानला गेलो होतो. मी, वहिदा, हेलन, वहिदाची मुलगी काशवी (रेखी). इतक्यात एका माजी संपादकांचा फोन आला, ‘‘कुठे आहात तुम्ही मैत्रिणी? कुणाचेच फोन लागत नाहीत.’’ मी म्हटलं, ‘‘आम्ही अंदमानला स्नॉर्क लिंग करतोय.. धमाल सुरू आहे!’’ खरंच वेगळाच अनुभव होता तो. २०२० मध्ये करोनाची दहशत होतीच. त्यादरम्यान एकमेकींना भेटता आलं नव्हतं. पण जेव्हा करोना कमी झाला, तेव्हा आम्ही घराबाहेर पडून मोकळा श्वास घेण्यासाठी अंदमानला पोहोचलो. स्नॉर्क लिंग, क्रूझिंग, वॉटर गेम्स एन्जॉय केले, सी-फूडचा आस्वाद घेतला. डिनर करताना लाइट म्युझिक, तर कधी गझल, तर कधी थेट लता-आशा यांची गाणी. आणि गप्पा तर अखंड..

आमच्या गप्पांना विषय कधीच कमी पडत नाहीत. यात कधी सेटवर झालेल्या घटना, त्यातून मीडियाला मिळालेलं खाद्य, सहकलाकारांचे किस्से, असं खूप काही असतं. मी, वहिदा, हेलन आम्ही तिघीही ‘डान्सर’ म्हणून लोकप्रिय होतो. त्यामुळे त्याचेही वेगळे किस्से आहेतच. खूप आठवणी आहेत. खूप काही असतं शेअर करण्यासारखं. काही कटू आठवणीही येतातच वर, पण त्याचा कडवटपणा रेंगाळता कामा नये आणि कुठल्याही व्यक्तीबद्दल नकारात्मकता ठेवायची नाही, असं आम्ही सख्यांनी ठरवलं आहे. वयाच्या या टप्प्यावर तर ती नकोच. त्यानं जगण्यातला आनंद हिरावला जातो याचा अनुभव आम्ही घेतलाय. त्यामुळे जे काही चांगले आणि सत्य अनुभव येतात त्याबद्दलच आम्ही बोलतो. मैत्री माणसाचा बौद्धिक आणि मानसिक विकास करते, असं वहिदा नेहमी सांगते. आमच्या जीवनात आलेले बरेवाईट अनुभव एकमेकींना सांगून त्यातून योग्य तो धडा घ्यायचा आणि कटू अनुभव विसरून जायचे, हेच आम्ही करतो. आमच्या क्षेत्रात अक्षरश: हजारो व्यक्ती भेटतात, संपर्कात येतात. त्यांपैकी अनेकांच्या चांगल्या अनुभवांचं संचित प्रत्येकीकडे आहे. ते आम्ही जपलं आहे. 

दु:खाच्या क्षणी एकमेकींबरोबर असणं हीच आमच्या मैत्रीची ताकद आहे. मला आठवतंय, वहिदाकडे ‘कभी ख़ुशी, कभी गम’ या चित्रपटाची ऑफर होती. यश चोप्रांचे त्यापूर्वी तिनं ‘चांदनी’, ‘मशाल’, ‘कभी कभी’ हे चित्रपट केलेत, पण हा चित्रपट तिला सोडावा लागला. कारण शूटिंग सुरू झालं आणि वहिदाचे पती कमलजीत रेखी यांचं ‘ब्रेन हॅमरेज’नं निधन झालं. त्या तिच्या कठीण प्रसंगी आम्ही सगळ्या तिच्यासोबत पूर्ण वेळ होतो. मी अविवाहित आहे आणि माझ्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मला वहिदा, हेलन, शम्मीसारख्या मैत्रिणी लाभल्या नसत्या, तर जीवनात किती पोकळी निर्माण झाली असती या विचारांनी मी आजही बेचैन होते! माझ्या मैत्रिणींनी मला जगण्याचं बळ दिलंय. आयुष्याला एक परिमाण प्राप्त झालं आहे.

शब्दांकन – पूजा सामंत

Story img Loader