‘आंतरराष्ट्रीय दीर्घायु केंद्र’ या वृद्धांसाठी कार्य करणाऱ्या पुण्यातील संस्थेने विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत. त्यातलाच एक ‘आजीबाईसाठी बटवा’. पूर्वीच्या काळी घरात कोणी आजारी पडलं की आजीबाई बटव्यातली घरगुती औषधं द्यायची. मात्र अलीकडे एकटय़ा, निराधार गरीब आज्यांकडे स्वत:च्या औषधांसाठीच पैसे नसतात. त्यांच्या औषधोपचारासाठी ‘आजीबाईसाठी बटवा’ सुरू करण्यात आला आहे.

रात्री पावणेतीनची वेळ! फोनची रिंग वाजते. प्रभाकर जावडेकर गाढ झोपेतून उठून फोन घेतात. फोनवर एक स्त्री घाबऱ्याघुबऱ्या आवाजात सांगत असते, तिच्या यजमानांना छातीत तीव्र कळा येताहेत. ते अस्वस्थ आहेत. जावडेकर त्यांच्या घरी धाव घेतात. स्वत:च्या गाडीतून पुण्याच्या रुग्णालयात भरती करतात. डिपॉझिटचे पैसेही भरतात. औषधांचीही सोय करतात. ते गृहस्थ बरे होऊन घरी येतात. जावडेकरांची भेट घेतात आणि त्यांनी केलेल्या मदतीची पोच म्हणून ‘मेडीसीन बँके’ला मदतही देऊन जातात.
प्रभाकर जावडेकर हे ‘आंतरराष्ट्रीय दीर्घायु केंद्र- भारत’ (आय एल सी- इंडिया) या ज्येष्ठांसाठी कार्य करणाऱ्या मान्यवर संस्थेच्या ‘व्हॉलेंटिअर्स ब्युरो’तील एक स्वयंसेवक. स्वत: ज्येष्ठ नागरिक! पण अडचणीत सापडलेल्या ज्येष्ठांसाठी रात्रंदिवस काम करणारे एक सदस्य. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समाजसेवक शरच्चंद्र गोखले हे आय एल सी- इंडिया अर्थात ‘आतंरराष्ट्रीय दीर्घायु केंद्र-भारत’ या संस्थेचे आद्य संस्थापक. त्यांच्या प्रेरणेतून या कार्यासाठी अनेक प्रकल्पांची आखणी केली गेली. या सर्व प्रकल्पांची उत्तर कार्यवाही या संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ माशेलकर आणि संचालिका अंजली राजे यांच्या अथक प्रयत्नांतून केली जाते. ज्येष्ठांसाठी उपयुक्त धोरण आखणी, प्रशिक्षण, प्रबोधन, संशोधन आणि दस्तऐवजांचे संकलन या पाच उद्दिष्टांसाठी संस्था काम करते.
आय एल सी- इंडिया ही संस्था ‘ग्लोबल अलायन्स ऑफ इंटरनॅशनल लँॅजिटिव्हिटी सेंटर’ या आंतरराष्ट्रीय संस्थेची भारतातील एकमेव प्रतिनिधी सदस्य आहे. या संस्थेच्या प्रकल्पांविषयी व्यावस्थापिका अंजली राजे विस्ताराने माहिती देतात. त्या म्हणाल्या, ‘‘आमच्या संस्थेचा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे, ‘आजीबाईसाठी बटवा’. पूर्वीच्या काळी आजीबाईचा बटवा असायचा. घरात कोणी आजारी पडलं की आजीबाई त्या बटव्यातली घरगुती औषधं द्यायची आणि तो माणूस बरा व्हायचा. हल्ली एकटय़ा, निराधार गरीब आज्यांकडे स्वत:च्या औषधांसाठीच पैसे नसतात. म्हणून आम्ही ‘हा आजीबाईसाठी बटवा’ सुरू केला. आजच्या समाजात पुरुषांपेक्षा स्त्रियांची, त्यातही विधवा स्त्रियांची संख्या जास्त आहे. त्यांचं शोषण अधिक होतं. त्यांची काम करण्याची क्षमता संपली की त्या पार अडगळीत पडतात. दुर्लक्षित होतात. गरीब घरांत तर असा कल असतो की हाताशी थोडेसे पैसे उरले तर वृद्ध स्त्रीच्या औषधांपेक्षा घरांतील मुलांच्या गरजांना अधिक महत्त्व दिलं जातं. म्हणूनच आम्ही अशा गरजू, गरीब निराधार वृद्ध स्त्रियांसाठी ही योजना सुरू केली आहे.’’
वृद्ध स्त्रियांसाठी ही योजना पुण्यातील वडारवाडी, कोथरुड, पर्वती अशा सहा विभागांतल्या झोपडपट्टय़ांमधून राबवली जाते. त्यासाठी त्यांच्या वयाचा दाखला, २ फोटो, रेशनकार्ड आणि नगरसेवकाचे पत्र घेतले जाते. त्यांची कौटुंबिक परिस्थिती जाणून त्या खरंच गरजू आहेत का ते तपासलं जातं. त्यानंतरच त्यांना पिवळ्या रंगाचं  कार्ड दिलं जातं. त्यावर त्याचं वजन, बी.पी, व्याधींची नोंद केली जाते. डॉक्टर स्वत: संस्थेच्या समाजसेवकांबरोबर आजींना भेटतात. ते त्यांना उपाशीपोटी औषधं घेऊ नये, तंबाखू खाऊन औषधं घेऊ नयेत अशा नीट सूचना देऊन त्यांना प्रिस्क्रिप्शन लिहून देतात. त्याच विभागांतील एखादा केमिस्ट ही ज्येष्ठमित्र संस्था मुक्रर करते. त्याच्याकडे ही औषधे आजीला विनामूल्य मिळतात. आजीच्या औषधांचा खर्च भागवण्यासाठी संस्था एक प्रायोजक शोधते. एका आजीसाठी दात्याकडून सहा हजार रुपये घेतले जातात. त्यातून आयर्न, कॅल्शिअमच्या, बीपीच्या गोळ्या, डोकेदुखी, सांधेदुखीची औषधं दिली जातात. संस्थेचे ‘सोशल वर्कर’ वेळोवेळी आजींच्या घरी जाऊन त्यांची तब्येत बघतात आणि त्याचं ‘प्रगती पत्रक’  प्रायोजकाकडे पाठवलं जातं. त्या समाजसेवक आणि डॉक्टरांशी सर्वच आज्यांचे जिव्हाळ्याचं नातं जुळतं. कुणी त्यांना गुलाबाचं फूल देतं तर कुणी एखादं चॉकलेट! अनेकवेळा घरची मुलबाळं आपली काळजी घेत नाही इतकी काळजी ही मुलं घेतात या भावनेने त्यांचं हृदय भरून येतं.      
 चिताबाईच्या डोळ्याच्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी प्रायोजक शोधून संस्थेने ते करून दिलं तेव्हा तिला अपार आनंद झाला. धुण्याभांडय़ाची कामं करणारी लक्ष्मीनगरमधली आजी मुलांना कळवळून सांगते, ‘बाळा, मला औषधं दिल्याशिवाय जाऊ नको रे’, आज्या अक्षरश: औषधांची वाट बघत असतात. आपली काळजी घेणारं कुणी तरी आहे याचंच त्यांना समाधान वाटतं. संचालिका अंजली राजेंना मात्र त्या आज्यांच्या मोठय़ा आजारांच्या औषधोपचारांचा खर्च उचलणारे दाते मिळाले तर अधिक समाधान वाटेल! ‘आजीबाईसाठी बटवा’ या सेवेला ‘बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर एजिंग’ हा मान्यताप्राप्त पुरस्कारही मिळालेला आहे.
‘सामाजिक न्याय व सबलीकरण’ या मिनिस्ट्रीच्या सहकार्याने ‘आय एल सी- इंडिया’ ही संस्था अनेक प्रशिक्षण शिबिरे घेते. त्यांना भारती विद्यापीठ, सिम्बॉयसिस अशा शैक्षणिक संस्थांचं सहकार्य मिळतं. डॉक्टर्स, पत्रकार, विद्यार्थी समाजसेवक यांना ज्येष्ठ नागरिकांशी कसं वर्तन असावं, त्यांची संवादाची भूक जाणून त्यांना कसं सांभाळून घ्यावं हे सगळं शिबिरांमधून शिकवलं जातं. त्यातूनच ज्येष्ठांविषयी समाजात सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. ‘केअर गिव्हर्स’ अर्थात आया, मावशा, नर्स-ब्रदर्स यांच्यासाठी विशेष कार्यशाळा घेतल्या जातात. विशेषत:  या कार्यशाळा मेडिकल कॉलेजमध्ये घेतल्या जातात. या कार्यशाळांमधून विकलांग ज्येष्ठांना उठवताना, बसवताना जेवण भरवताना कशी काळजी घ्यावी, त्यांचं स्पंजिंग कसं करावं हे सांगितलं जातं. बरेचदा विकलांग, वयस्क तापट, तिरसट वा हळवा झालेला असतो. त्याची चिडचिड व त्रागा वयपरत्वे व्याधीमुळे आहे हे समजून घेऊन त्याच्या मनाच्या दुखऱ्या जागांचीही काळजी घ्यावी, हे त्यांना प्रशिक्षणातून निदर्शनास आणून दिलं जातं. ज्याचा ज्येष्ठांना खूप फायदा होतो.
ज्येष्ठ नागरिकांच्या क्रियाशीलतेचा समाजाला उपयोग व्हावा यासाठी संस्थेने ‘व्हॉलेंटिअर्स ब्युरो’ स्थापन केला आहे. या ब्युरोतील स्वयंसेवक स्वत: निवृत्त ज्येष्ठ व त्यांच्यातील कौशल्य, क्षमता व आवडीच्या क्षेत्रांची नोंद करतात. त्यानुसार अनाथाश्रम, इस्पितळं, शाळा, वृद्धाश्रम अशा ठिकाणी जाऊन त्या त्या संस्थेच्या गरजेनुसार ते आपली विनामूल्य सेवा पुरवतात. विशेषत: शाळा शाळांमध्ये जाऊन ते मुलांना गोष्टी सांगतात. गाणी म्हणतात. खेळ घेतात. त्यामुळे मुलांशी त्यांचे छान भावबंध निर्माण होतात. संस्थांमधील या कामामुळे ज्येष्ठांना विधायक कार्याचं समाधान मिळतं आणि त्या त्या संस्थेची गरज भागते.
त्याशिवाय सतत ज्येष्ठ नागरिकांच्या सभा घेऊन त्यांच्यासाठी असणाऱ्या कल्याणकारी योजना व कायदेकानू यांचीही वेळोवेळी त्यांना माहिती दिली जाते. पुण्याला ‘पेन्शनर्स पॅराडाईज’ म्हणतात, पण पुण्यातच वृद्ध नागरिकांना ‘सॉफ्ट टार्गेट’ केलं जातं. अनेक वृद्ध मोठमोठय़ा बंगल्यांत एकटे दुकटे राहतात. चोरीच्या हेतूने त्यांच्या हत्या होण्याच्याही घटना वाढत आहेत. याचसाठी संस्थेने १०० व १०९ ही हेल्पलाइन पोलिसांच्या सहकार्याने सुरू केली आहे. बरेचदा त्यावर ज्येष्ठ नागरिक गुन्ह्य़ाच्या तक्रारी न दाखल करता गॅस मिळत नाही, नळाला पाणी येत नाही, लाइट गेलाय अशा खाजगी स्वरूपाच्या तक्रारी करतात. पोलिसांच्या मदतीने या तक्रारींचीसुद्धा योग्य ती दखल घेतली जाते. संस्थेच्या कामाचं स्वरूप आज इतकं व्यापक झालंय की एका वृद्ध जोडप्याने संस्थेच्या समाजसेवकांना घरी बोलावून विचारणा केली ‘आम्ही काही पैसे राखून ठेवलेत. त्यातून तुम्ही आमच्या अंत्यसंस्कारांची सोय कराल का?’      
‘आंतरराष्ट्रीय दिर्घायु केंद्र- भारत’ या संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त शास्त्रीय व तांत्रिक उपकरणं बनवणाऱ्यांसाठी ‘अंजली माशेलकर’ पुरस्कार देण्यात येतो. उत्तम कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघासाठी बी. जी. देशमुख अ‍ॅवॉर्ड, ज्येष्ठांसाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांसाठी ‘एस. डी. गोखले अ‍ॅवॉर्ड आणि सत्तरीवरच्या कार्यशील वृद्धांसाठी ‘जीवन गौरव पुरस्कार’ देण्यात येतो. ज्येष्ठ समाजधुरीण शरच्चंद्र गोखले यांनी लावलेल्या इवल्याशा बीजाचा वटवृक्ष आज आपल्या विशाल छायेखाली अनेक ज्येष्ठांना शांत विसावा देत आहे.                        

पत्ता- ‘इंटरनॅशनल लाँजिटिव्हिटी सेंटर-इंडिया.’
उ/ कास्प भवन, पहिला मजला, पाषाण-बाणेर लिंक रोड, पाषाण, पुणे- ४११ ०२१
दूरध्वनी- ०२०-६५००२५९५
अंजली राजे- डायरेक्टर- ९८९०३०१९८६
वेबसाइट: http://www.iIcindia.org

Story img Loader