जवळजवळ दररोज फोटोजसाठी पोजेस द्याव्या लागतात. फ्लॅशनी डोळे न दिपता कॅमेऱ्याच्या डोळय़ात डोळे घालावे लागतात. मी हात बांधून चेहऱ्यावर हसू आणून फोटोज देते खरी, पण तेव्हा मी ‘मी’ नसते. आत कुठेतरी बांधल्यासारखं वाटतं. फोटो निघत असताना नुसतंच उभं राहून विचार कसला करावा सुचत नाही. मग ते ‘न सुचणं’ अवघडलेपणात बदलतं. मला हे बदलायचं आहे. मला या फोटो कॅमेऱ्याशी असलेली माझी जुनी मैत्री पुन्हा मिळवायची आहे. त्याला एक कारण आहे..
त्याच्याशी सलगी करावीच लागली. म्हणजे.. या क्षेत्रात आल्यावर दुसरा पर्यायच नव्हता. आधी मी त्याच्याविषयी पूर्ण अनभिज्ञ होते. मग हळूहळू ओळख वाढायला लागली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. प्रेमाचं लग्नात आणि लग्नानंतर इतकी र्वष त्याच्याबरोबर काढल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्याविषयी अनभिज्ञ वाटायला लागलं आहे. अज्ञान अनभिज्ञतेपासून ते सज्ञान अनभिज्ञतेपर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी खूप चित्तथरारक राहिला आहे.
मी तान्ही असतानाच तो माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आला. आईमुळे. बाबा सतत ऑफिसच्या कामात.. घरी ती आणि मीच. तेव्हा तिनं एकदा मला छानसा फ्रॉक, टोपी इतकंच नव्हे तर ऐटबाज छोटुकला गॉगल घातला आणि त्याच्यासमोर बसवलं. ती त्याची-माझी पहिली भेट. ही भेट माझ्या नेणिवेतच जाऊन बसलेली, पण आता मला सहज न आठवणारी. त्यानं बंदिस्त केलेले ते काही क्षण एका चौकटीमधून आता माझ्याकडे पाहातात. तोच पुरावा, आमच्या भेटीचा. त्यानं बंदिस्त केलेला असाच एक क्षण एका चौकटीत माझ्या बाहेरच्या खोलीतल्या भिंतीवर लटकतो आहे. त्या क्षणामध्ये माझ्या तरुण बाबांनी अडीच वर्षांच्या मला त्यांच्या तळहातावर उभं करून हवेत वर उचललं आहे. मी फुग्यांचा बाह्य़ांचा गोल घेराचा फ्रॉक घालून दोन्ही हात बॅलेनर्तिकेसारखे धरलेत. मी फार आनंदात आहे. आता बाबा नसताना त्यानं टिपलेला हा क्षण माझ्यासाठी फारच अमूल्य होऊन बसला आहे. लहानपणी कळतच नव्हतं, पण आता मात्र त्यांच्याविषयी ऋणी वाटतं आहे. आयुष्यात काही माणसं कितीही जपायची म्हटली तरी कधी ना कधी कायमची जाणार असतात. त्यानं ती गेलेली माणसं असताना त्यांना त्या चौकटीपुरतं का होईना जाता जाता थांबवलं आहे. त्यांच्या त्या जाता जाता थांबण्याला त्यांच्या जाण्यानंतर आपण समजुतीचा हार घालतो तो केवळ त्याच्यामुळे. त्याचं तसं प्रत्येकाशी नातं आहे, पण आमच्या अभिनयाच्या क्षेत्रातल्या लोकांशी तर विशेष जवळचं. मी जसजशी या क्षेत्राकडे ओढली गेले तसतसं त्याचं माझं नातं बदलत गेलं, जातं आहे. माझ्या आसपासच्या बऱ्याच जणांना वाटतं की मी प्रत्यक्षात आहे त्याहीपेक्षा त्याच्या नजरेतनं पाहिल्यावर जास्त छान दिसते. शाळेत असताना माझ्या ताईच्या लग्नासाठी मी दिल्लीला गेले होते. रात्रीच्या छानशा झोपेनंतर सकाळी उठून विस्कटलेल्या केसांनी बेडसमोरच्या आरशात बघत होते. स्वत:च्याच तंद्रीत. तोच त्याचा आवाज आला. ‘क्लिक!’ मी दचकून पाहिलं तर माझा दादा माझे फोटो काढत होता. मी एकदम केस सारखे करून पुन्हा त्याच्या दिशेनं बघून हसायला लागणार तोच दादा म्हणाला, ‘कॅमेऱ्याकडे बघू नकोस गं.. तुझं जे चाललंय ते चालू दे..’ लहान होते त्यामुळे असेल मी हे लगेच ऐकू शकले. आणि त्या ‘क्लिक’ला विसरून पुन्हा आरशात बघण्याचं माझं आवडतं काम करायला लागले. नंतर सगळे जण त्या माझ्या झिपऱ्या फोटोचं कौतुक करायला लागले. तेव्हा मला कळेना या झोपाळू, छंदिष्ट फोटोंमध्ये एवढं आवडण्यासारखं काय आहे?  तेव्हा ते कळलं नाही तरी ठीक होतं, पण आता मला ते कळायला हवं आहे. कारण मोठं होऊन या क्षेत्रात येता येता त्याच्या माझ्या नात्यात एका भीतीचा शिरकाव होताना मला दिसतो आहे. लहानपणीचा त्याच्या माझ्यातला मोकळेपणा, या भीतीमुळं झाकोळल्यासारखा होतो आहे. माझ्या क्षेत्रात इतकी र्वष राहिल्यावर सिनेमाच्या कॅमेऱ्याशी माझी घट्ट मैत्री झाली आहे आता. कारण सिनेमाच्या कॅमेऱ्यासमोर मी एकटी उभी नसते. माझ्या बरोबर माझी संहिता असते, दिग्दर्शक असतो आणि सर्वात महत्त्वाचं माझी भूमिका असते. मी तिच्या विचारांमध्ये असते. ‘रोल, कॅमेरा, अ‍ॅक्शन’ हे शब्द आता तिच्या- माझ्या इतक्या परिचयाचे झालेत, की ते ऐकताच ती न चुकता माझा हात हातात घेते आणि आम्ही दोघी कॅमेऱ्याला सामोऱ्या जातो. या सगळय़ा सुंदर प्रक्रियेशी आता इतकं तादात्म्य वाटतं की कॅमेऱ्याला चांगल्या अर्थी विसरायला होतं. म्हणजे एकदा मी गुलजारसाहेबांबरोबर एक चित्रीकरण करत होते. तेव्हा एका प्रसंगात त्यांनी मला मी करत असलेल्या ‘निर्मला’ या भूमिकेविषयी अनेक सूचना केल्या. म्हणजे ‘तिची आत्ताची मन:स्थिती कशी असेल, ती व्यक्त करण्यासाठी ती काय काय करू शकेल, कॅमेरा कुठे ठेवलाय, त्यानुसार मी कुठे बघायला हवं’ असं सगळं खूप काही सांगितल्यावर ते म्हणाले, ‘बेटा, ये सब ठीक से सुन लिया?’ मी म्हटलं, ‘हां’ मग ते म्हणाले, ‘तो अब ये सब भूल जाओ और शॉट दे दो!’ तसं आता सिनेमाच्या कॅमेऱ्याबद्दल वाटतं. इतक्या वर्षांत अनेक उत्तम छायालेखकांकडून, कसलेल्या सहकलाकारांकडून, दिग्दर्शकांकडून कॅमेऱ्याविषयी इतकं काही छान शिकता आलं आहे. फिल्म, प्रकाशयोजना, आता डिजिटल तंत्रज्ञान, कॅमेरा अँगल्स या सगळय़ाचं एक इतकं श्रीमंत दालन माझ्या क्षेत्रानं माझ्यासमोर खुलं केलं आहे. मी अजून शिकतेच आहे, शिकतच जाणार आहे. पण आता या कॅमेऱ्याविषयीचं अवघडलेपण कधीच गळून पडलं आहे. त्याच्याविषयी जमेल तितकं जाणून त्याला जमेल तितकं विसरू शकते मी आता. खूप मोकळं वाटतं त्याच्यासमोर. पण फोटो काढणाऱ्या स्थिर चित्रं चितारणाऱ्या कॅमेऱ्याशी अजून तितक्या मोकळेपणानं बोलता येत नाहीये, जसं लहानपणी यायचं. जवळजवळ दररोज फोटोजसाठी पोजेस द्याव्या लागतात. फ्लॅशनी डोळे न दिपता कॅमेऱ्याच्या डोळय़ात डोळे घालावे लागतात. मी हात बांधून चेहऱ्यावर हसू आणून फोटोज देते खरी, पण तेव्हा मी ‘मी’ नसते. आत कुठेतरी बांधल्यासारखं वाटतं. एक तर माझे स्वत:चे फोटोज निघत असताना कुठलीच भूमिका माझ्या सोबतीला नसते. फोटो निघत असताना नुसतंच उभं राहून विचार कसला करावा सुचत नाही. मग ते ‘न सुचणं’ अवघडलेपणात बदलतं. थोडय़ाच वेळात मी दमते. हसून गाल दुखतात. आमच्या क्षेत्रात तर ‘फोटोसेशन’ ही अपरिहार्य गोष्ट आहे. पण या सगळय़ा अवघडलेल्या कारभारामुळे मी वर्षांनुवर्षे ‘फोटोसेशन’ करतंच नाही. त्यामुळे माझं कधी अडलं नाही. माझ्या कामामुळे मला काम मिळालं खरं, पण तरी मला हे बदलायचं आहे. मला या फोटो कॅमेऱ्याशी असलेली माझी जुनी मैत्री पुन्हा मिळवायची आहे. त्याला एक कारण आहे. माझे गुरू सत्यदेव दुबे यांनी एका शिबिरात आमच्याकडून एक ‘एक्सरसाईज’ करून घेतला होता. नंतर मला वाटतं ‘स्तानीस्लाव्हस्की’ या थोर नाटय़गुरूच्या पुस्तकात पण मी बहुधा तो वाचला होता.
प्रत्येकानं समोर यायचं, शिबिरातल्या रंगमंचावर एक खुर्ची ठेवलेली होती. त्यावर जाऊन बसायचं. आणि दुबेजी ‘बास’ म्हणत नाहीत तोवर ‘स्वत:’ बनून तिथे बसायचं. जणू आपण स्वत:चीच भूमिका करतो आहोत. जसे आपण आहोत तसे. हे वाटतं तितकं सोपं नाही. एरवीचं आयुष्य जगताना आपण सहज ‘स्वत:’ असतो. पण रंगमंचावर असताना, समोरचे सगळे तुमच्याकडे पाहात असताना ‘स्वत:’ असणं तेव्हा आम्हा सगळय़ांनाच अवघड गेलं होतं. कुणाला अवघडून हसूच येत होतं. कुणी बंद आक्रसून खालीच पाहात होतं. कुणी ‘मला कसं काहीच वाटत नाही’ हे दाखवायला इकडे तिकडे पाहात होतं. खूप कमी जणांना खरंखुरं ‘स्वत:’ होता आलं. दुबेजींच्या या खेळाचं नाव होतं, ‘खुद की नकल उतारो’ या खेळाचा आणि ‘फोटोसेशन’मध्ये फोटो देण्याचा संबंध आहे असं मला वाटतं. माझे फोटो जास्तीत जास्त सहज यावेत म्हणून मी संधी मिळेल तेव्हा वेगवेगळय़ा ‘मॉडेल्स’चे फोटो अभ्यासत असते. मला नेहमी जी माणसं फोटोतही खरी, जिवंत वाटतात ते फोटो आवडतात. आपल्या इथले काही टॉप मॉडेल्स अभ्यासताना जाणवलं, ते कधीच कॅमेरा समोर आला म्हणून ‘वेगळं’ काही करायला जात नाहीत. फिसकन् हसत नाहीत. ते त्यांच्या असण्यासकट फक्त कॅमेऱ्याच्या दिशेनं पाहातात. कधी कॅमेऱ्यातही पाहात नाहीत. ते फक्त ‘असतात’. मला मिलिंद सोमणच्या अनेक छायाचित्रांत हे केवळ ‘असणं’ जाणवलं आहे. गंमत म्हणजे सोनम कपूर अभिनेत्री म्हणून मला खूप आवडते असं नाही पण ती एक उत्तम मॉडेल वाटते मला. तिच्या कुठल्याच फोटोत कसलाच अभिनिवेश नसतो. काही जाहिरातींसाठी तिला घालायला दिलेले कपडे नुसते पाहिले तर विचित्र वाटतील, पण तिने घातले की सुंदर दिसतात. तिचे बरेचसे फोटो ‘स्वत:त’ असतात. ‘अंतर्मुख.’ तिनं कुठल्याशा प्रथितयश फॅशन नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे, ‘‘मी माझ्या स्वत:च्या आनंदासाठी नटते. प्रत्येक नवीन वेश अंगावर घालताना मी एका नवीन आयुष्याला सामोरं जाते आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी आत्तापर्यंत अनेक आयुष्यं जगलेली आहे.’’ तिचं हे म्हणणं मला मदत करेल असं वाटतं आहे. मी ते आपलंसं करू पाहाते आहे. फोटोसेशनच्या वेळी आसपास उडत असलेल्या फ्लॅशच्या पलीकडे, अंगावर पडत असलेले हवेचे झोत, चेहऱ्यावर चढलेला मेकअप, अंगावर चढलेली आभूषणं, केसांवर चढलेली जेल्स, स्प्रेज् या सगळय़ाच आत एक ‘मी’ आहे. या सगळय़ा गोष्टी कृत्रिम असल्या तरी माझ्या क्षेत्रात त्या मला खूप मदत करतायेत. त्या कृत्रिमतेपलीकडची सहजता मला पकडायची आहे. मी अनेक कृष्णवर्णीय ‘मॉडेल्स’चे फोटो पाहिलेत. एरवी बघताना त्यांचा चेहरा पूर्ण साधारण वाटेल, पण कॅमेऱ्याच्या डोळय़ांत त्या ज्या आत्मविश्वासानं बघतात त्यामुळे त्या ‘लोभस’ होऊन जातात. शांत ठिकाणी शांत वाटतंच. पण ही झगमग, ही चमचम हा माझ्या क्षेत्राचा भाग आहे. त्या झगमगाटात मला शांत राहायचं आहे. त्या सगळय़ात मला ‘स्वत:’ बनायचं आहे. म्हणून मी त्याच्या माझ्या नात्याकडे पुन्हा एकदा पाहाते आहे. नव्या आत्मविश्वासाच्या डोळय़ांनी! लहानपणी मोकळं असलेलं त्याचं माझं नातं मला पुन्हा मोकळं करायचं आहे. कारण त्यासाठी ज्या रस्त्यावर चालावं लागेल तो रस्ता मला एका नव्या ‘माझ्याकडे’ घेऊन जाईल हे मला लख्ख दिसतं आहे, कॅमेऱ्याच्या फ्लॅशइतकं!   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजची व्यग्र स्त्री आणि अपराधभाव
 नोकरी-करिअरमध्ये व्यग्र असणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यात आपण आपल्या कुटुंबीयांकडे पुरेसं लक्ष देत नाही हा अपराधभाव एकदा तरी येतोच. पण काही वेळा तिथे थांबून चालत नाही. त्यातून मार्ग हा काढावाच लागतो. काय असतात आव्हानं एका नोकरदार वा व्यवसायात व्यग्र असणाऱ्या स्त्रियांची. घर आणि करिअर सांभाळताना होणारी तारांबळ, त्रेधातिरपीट आणि येणारा अपराधभाव यांची सांगड कशी घातलीत तुम्ही? कोणता शोधला सुवर्णमध्य? आम्हाला पाठवा तुमचे अनुभव. तुमची त्रेधातिरपीट कशी उडाली याचे विस्तृत वर्णन कृपया पाठवू नका तर तुम्ही त्यातून कसा मार्ग शोधलात ते प्रसिद्ध करायला आम्हाला आवडेल. तेव्हा पाठवा २०० शब्दांत तुमचा अनुभव. मात्र पाकिटावर विषयाचा स्पष्ट उल्लेख करायला विसरू नका.
आमचा पत्ता ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा.  chaturang@expressindia.com

आजची व्यग्र स्त्री आणि अपराधभाव
 नोकरी-करिअरमध्ये व्यग्र असणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यात आपण आपल्या कुटुंबीयांकडे पुरेसं लक्ष देत नाही हा अपराधभाव एकदा तरी येतोच. पण काही वेळा तिथे थांबून चालत नाही. त्यातून मार्ग हा काढावाच लागतो. काय असतात आव्हानं एका नोकरदार वा व्यवसायात व्यग्र असणाऱ्या स्त्रियांची. घर आणि करिअर सांभाळताना होणारी तारांबळ, त्रेधातिरपीट आणि येणारा अपराधभाव यांची सांगड कशी घातलीत तुम्ही? कोणता शोधला सुवर्णमध्य? आम्हाला पाठवा तुमचे अनुभव. तुमची त्रेधातिरपीट कशी उडाली याचे विस्तृत वर्णन कृपया पाठवू नका तर तुम्ही त्यातून कसा मार्ग शोधलात ते प्रसिद्ध करायला आम्हाला आवडेल. तेव्हा पाठवा २०० शब्दांत तुमचा अनुभव. मात्र पाकिटावर विषयाचा स्पष्ट उल्लेख करायला विसरू नका.
आमचा पत्ता ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा.  chaturang@expressindia.com