युद्ध असो वा स्पर्धा, त्यांना जिंकण्यासाठी क्रिया-प्रतिक्रिया, हल्ले-प्रतिहल्ले केलेच पाहिजेत असे नाही, तर असीम शांतपणा, धर्य हेदेखील जिंकण्याचे कौशल्य आहे आणि युद्ध टाळण्याचा मुत्सद्दीपणा दाखवणे हेच खरे जीवनमूल्य आहे. जीवनमूल्य शिकवणाऱ्या या काही बोधकथा.
जपानमधील टोकिओ शहराजवळ एक वृद्ध झेन गुरू आपल्या आश्रमामध्ये शिष्यांना युद्धकलेचे शिक्षण देत असत. खिलाडू वृत्तीचे, युद्धकला पारंगत व निपुण शिष्य घडवण्याचा संकल्प त्यांनी सोडला होता. शहरात एक नवयुवक आला. तो युद्धकलेमधे इतका तरबेज होता की युद्धकलेच्या स्पर्धामध्ये त्याने कधीही हार मानली नव्हती. शहरात तो यासाठीच आला होता की जवळच्या आश्रमातील झेन गुरूला खिजवून त्यांना लढायला प्रवृत्त करून पराभूत करायचे. म्हणजे अजिंक्य म्हणून त्याची ख्याती सर्वदूर पसरेल.
एक दिवस तो नवयुवक योद्धा आश्रमात दाखल झाला. आल्या आल्या तो गुरूंना ललकारू लागला, खिजवू लागला. त्याचा आरडाओरडा ऐकून आश्रमातील सर्व शिष्य जमा झाले. त्याचे खिजवणे ऐकून प्रत्येकाच्या मुठी रागाने आवळू लागल्या होत्या. शिष्यांनी गुरूंकडे धाव घेतली. गुरू व तो युवायोद्धा समोरासमोर उभे ठाकले. त्यांना समोर पाहून युवायोद्धा त्वेषाने अपशब्द उच्चारत त्या गुरूंना अपमानित करू लागला. सर्वजण गुरूंकडे पाहू लागले. त्यांना वाटले गुरू आपल्याला त्याचा समाचार घेण्याची आज्ञा देतील; पण गुरू अगदी शांतपणे उभे होते. त्यांचा शांतपणा, धीरगंभीरपणा पाहून युवायोद्धा मनातून घाबरला. असा शांतपणा त्याला अपेक्षित नव्हता. गोंधळल्याने त्याच्या तोंडून अधिकच अपशब्द बाहेर पडू लागले. तरीही गुरू अतिशय शांत होते. तो शांतपणा असह्य़ होऊन तो युवायोद्धा न लढता निघून गेला.
तो युवायोद्धा निघून गेल्यानंतर सारे शिष्य गुरूंजवळ आले आणि नाराजीने विचारू लागले, ‘तुम्ही त्या दुष्टाला शासन का केले नाही? निदान आम्हाला आज्ञा तरी द्यायची होती.’ शिष्यांच्या आपल्याविषयीच्या भावना ऐकून गुरू म्हणाले, ‘हे पहा, जर एखादा तुमच्याकडे काही सामान घेऊन आला आणि ते तुमच्या गळ्यात मारू लागला, आग्रह करू लागला. परंतु त्याच्या अपेक्षेप्रमाणे तुम्ही जर प्रतिसाद दिला नाही तर काय होईल? तो त्याचे सामान घेऊन परत जाईल. मग हेच तर मी या युवकाच्या बाबतीत केले. त्याने आणलेल्या ईर्षां, अपमान, आव्हान या गोष्टी मी घेतल्याच नाहीत. त्यामुळे त्याला त्या परत न्याव्या लागल्या नाइलाजास्तव. म्हणजे त्या त्याच्याकडेच राहिल्या, म्हणजेच एका अर्थाने तो पराभूत झाला.’
युद्ध असो वा स्पर्धा, त्यांना जिंकण्यासाठी क्रिया-प्रतिक्रिया, हल्ले-प्रतिहल्ले केलेच पाहिजेत असे नाही, तर असीम शांतपणा, धर्य हेदेखील जिंकण्याचे कौशल्य आहे आणि युद्ध टाळण्याचा मुत्सद्दीपणा दाखवणे हेच खरे जीवनमूल्य आहे.

गुरू कासव
एका शहराच्या नदीकिनारी एक म्हातारा एकटाच झोपडी बांधून राहत असे. जवळपासच्या शेतामधून मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत असे. त्याने आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या होत्या. त्याने एक कासव पाळले होते, त्याच्याशी त्याचा चांगलाच स्नेह होता. शेतावरून घरी आल्यावर जेव्हा तो स्वत:साठी भाकरी बनवायला घेई, तेव्हा कासवासाठी तो चणे भिजवत असे. कासवाविषयी म्हाताऱ्याचे असे प्रेम पाहून आसपासचे लोक त्याची खिल्ली उडवत. पण म्हाताऱ्याला त्याचे वाईट वाटत नसे.
एक दिवस म्हाताऱ्याचा एक परिचित त्याला भेटण्यास आला. काही वेळ म्हाताऱ्याशी गप्पा केल्यावर कासवाला पाहून तो त्याला म्हणाला,‘ हा कसला घाणेरडा प्राणी घरात पाळला आहे? बाहेर नेऊन टाक त्याला.’ ते ऐकून म्हाताऱ्याला खूप वाईट वाटले, तो म्हणाला,‘ तुम्ही असे म्हणून माझ्या गुरूचा अपमान करत आहात.’ हे ऐकून परिचित आश्चर्याने म्हणाला, ‘हा कसा काय गुरू बुवा?’ म्हातारा त्याला समजावत म्हणाला, ‘हे पाहा, जराशी कसलीशी चाहूल लागली तर हे कासव आपले अवयव आखडून घेते. याच्या प्रत्येक वेळी असे करण्यामधून मला शिकता येते की, जगामध्ये पसरलेल्या कसल्याही दुर्वृत्ती तुम्हाला ग्रासू लागतात तेव्हा या कासवाप्रमाणे आपण आपले विचार व कृती विवेकाने संकोचल्या गेल्या पाहिजेत आणि दुष्ट प्रवृत्तींपासून परावृत्त झाले पाहिजे. अशी एवढी मोठी शिकवण यापासून मिळत आहे तर हा माझा गुरू नाही का?’
खरंतर ईश्वराने या जगाची रचना अशी केली आहे की, प्रत्येक प्राणी दुसऱ्यापासून काहीतरी प्रेरणा घेऊ शकतो आणि जर सकारात्मक दृष्टिकोनाने अशा प्रेरणा घेतल्या तर आयुष्य सुखी बनवता येऊ शकते.

मनावरचे डाग
एकदा एका गुरुमाउलींकडे एक व्यक्ती आली. त्याच्या अंगावरील कपडे चिखलाने माखले होते. तो खूप थकलाभागला होता. गुरूंनी विचारले, ‘काय रे, फार थकला आहेस, काय झाले थकायला?’ तो म्हणाला, ‘काय सांगू? माझ्या मनावर व डोक्यावर खूप तणाव आहे. आणि माझी अडचण समजण्याऐवजी सगळे माझ्या अवस्थेकडे पाहून माझी टिंगल करत आहेत. त्याचा मला अतिशय त्रास होतोय.’ गुरूंनी कारण विचारल्यावर त्याने सांगितले, ‘सकाळी कामावर जात असताना घाईगडबडीत चिखलामध्ये पडलो, तेव्हापासून ज्याला मी हे सांगत आलो, तो प्रत्येकजण मला हसला. पडण्याच्या त्रासाबद्दल कुणी विचारलेसुद्धा नाही.’
तेव्हा गुरू त्याला समजावत म्हणाले, ‘मित्रा, या एवढय़ाशा गोष्टी मनाला लावून घेऊ नकोस. चिखलाचा शरीरावर पडलेला डाग पाण्याने स्वच्छ धुवून जाईल, पण मनावरचे अपमानाचे डाग, त्यामुळे होणारा त्रास याचे काय? लोक माझा सारखा अपमान करतात, असा संभ्रम एकसारखा मनात राहिला तर तो उत्तरोत्तर वाढत राहील. त्यापेक्षा जर तू सुरुवातीच्या व्यक्तीसोबतच तुझ्या स्थितीवर हसला असतास तर तुझ्या मनावर असे दडपण आले नसते आणि शरीराचा त्रासही जाणवला नसता. आले लक्षात?

अहंकाराचे फळ
एका राजाला दोन पुत्र होते. थोरला अहंकारी व लोभी होता, तर धाकटा दयाळू व परोपकारी होता. राजाच्या मृत्यूनंतर थोरला राजगादीवर विराजमान झाला. तो प्रजेवर खूप अत्याचार व जुलूम करू लागला. लहान राजपुत्र दयाळू असल्याने तो नागरिकांना मदत करत असे. यामुळे प्रजा त्याला सन्मान देत असे. ही गोष्ट राजाच्या कानावर गेल्यानंतर त्याने धाकटय़ा राजपुत्राला बोलावून सुनावले की ‘मी राजा आहे, माझ्या परवानगीशिवाय तू कुणाला मदत करू शकत नाहीस.’ ते ऐकून धाकटा पुत्र म्हणाला, ‘दादा! प्रजेला मदत करणे हे माझे कर्तव्य व जबाबदारी समजतो.’ ते ऐकून राजा क्रोधित झाला व त्याने राजधानीपासून दूरवर एक छोटीशी जमीन देऊन त्याला राजमहल सोडण्याचा आदेश दिला. लहान भावाने तो स्वीकारला.
धाकटय़ा राजपुत्राने त्या जमिनीवर एक छोटेसे घर बांधले आणि उरलेल्या जागेत आंब्यांची बाग लावली. रोपांना परिश्रमपूर्वक वाढविले, काही काळातच त्याला रसाळ आंबे आले. घराजवळून जाणाऱ्या प्रत्येकाचं राजपुत्र आंबे देऊन आदरातिथ्य करत असे. त्याची अशी नि:स्वार्थ सेवा पाहून त्याच्या लोकप्रियतेत अधिकच भर पडली. त्याच्या राजा असलेल्या अहंकारी भावाला हे सहन झाले नाही. त्यानेदेखील आंब्यांची रोपे लावली, त्यांच्या देखरेखीसाठी अनेक माळी ठेवले. पण त्याच्या झाडांना अनेक दिवस झाले तरी आंबे काही आले नाहीत. एकदा त्याच्याकडे कुणी साधू आला असता त्याने झाडांना आंबे आले नसल्याची खंत बोलून दाखवली. तेव्हा साधूने समजावले, ‘तुझ्या झाडावर तुझ्या अहंकाराची सावली पडली असल्याने झाडे फळे धारण करत नाहीत. तू अहंकारापासून जोपर्यंत मुक्त होत नाहीस तोपर्यंत आंबे येणार नाहीत.’ साधूच्या सांगण्यातील मर्म त्या राजाने जाणले आणि त्याने अहंकारापासून मुक्त होण्याचे ठरवून धाकटय़ा दयाळू भावासह सर्व प्रजेची क्षमा मागितली आणि प्रजेची सेवा करू लागला.
आपल्या कर्माला सद्भावाची जोड असेल तर ते सफल होते, मात्र केवळ अहंकाराच्या संतोषासाठी केलेले कर्म फलप्राप्तीमध्ये विफल होते.