चित्रा वैद्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जेव्हा सगळय़ांच्या हातात स्मार्टफोन एखाद्या खेळण्यासारखा खुळखुळायला लागला, तेव्हा माझ्या हातीदेखील तो बळेबळेच कोंबला गेला. तोही वाढदिवसाची भेट वगैरे म्हणून नव्हे, तर यजमानांनी ‘लेटेस्ट मॉडेल’ स्वत:साठी घेतल्यामुळे! सेकंड हॅन्ड फोन असल्याचा एक फायदा मात्र नक्कीच झाला, ‘टच स्क्रीन’चं कुतूहल असल्यामुळे बरेचसे नेहमी लागणारे अ‍ॅप्स मी अगदी बिनधास्त उघडून बघू लागले. काही अडचण आली तर घरची मंडळी होतीच मदतीला.

 घडय़ाळाच्या अ‍ॅपमध्ये गजर कसा लावायचा, हवामानाच्या अ‍ॅपमध्ये परदेशी शहराचं तापमान किंवा नकाशात एखादं लोकेशन कसं बघायचं हे शिकता शिकता  स्मार्टफोन हाताळायचा सराव झाला. ‘आधीच म्हातारी त्यात रिकामटेकडी’ असल्यामुळे जसा व्हॉट्सअ‍ॅपनं माझ्या फोनमध्ये शिरकाव केला, तशी माझ्या छोटय़ाशा भावविश्वात जणू जादूच झाली! बघता बघता मैत्रिणींचे, नातेवाईकांचे ग्रुप्स तयार झाले. कविता, लेख, विनोद, ऑडिओ-व्हिडीओ क्लिप्सची नुसती लयलूट झाली. तरीसुद्धा आलेला मजकूर इतर ग्रुप्समध्ये फॉरवर्ड करणं आणि मेसेजेस पाठवणं, यापुढे माझी मजल गेली नव्हती.

 नेमेचि येणारा माझा वाढदिवस एका वर्षी मात्र प्रेरणादायी ठरला. सकाळीच माझ्या मुंबईच्या नातवानं ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर एक सुंदर केक आणि त्यावर चक्क माझं नाव- ‘चित्रा आजी’ असं लिहिलेलं शुभेच्छापत्र पाठवलं. त्याखाली एक व्हॉइस मेसेज होता. त्यावर क्लिक केल्यावर ‘हॅपी बर्थडे’ची धून वाजू लागली आणि त्यात गाणारी बाई माझं नाव घेऊन शुभेच्छा देऊ लागली. ते पाहून मला नातवाचं खूपच कौतुक वाटलं. हे तंत्रज्ञान शिकण्याची प्रबळ इच्छा उसळून आली. अकरा वर्षांच्या माझ्या या नातवाला लाडीगोडी लावल्यावर वाढदिवसाचं प्रत्येक व्यक्तीनुसार कार्ड कसं बनवायचं, ऑडिओ क्लिप्स कशा पाठवायच्या, वगैरे त्यानं आनंदानं शिकवलं. आता मी पाठवलेल्या दिवाळीच्या किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा वाचल्यानंतर माझ्या कल्पकतेचं सगळय़ांना खूप कौतुक वाटतं. काही वर्षांपूर्वी माझी लेक परदेशी गेल्यानंतर तिचा सेकंड हॅन्ड लॅपटॉप मला मिळाला. एव्हाना माझा आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याचा उत्साह बघून यजमानांनादेखील हुरूप आला होता.

लॅपटॉपवर बँक खातं उघडून त्यातला बॅलन्स चेक कसा करायचा, विजेच्या किंवा फोनच्या बिलाचं ऑनलाइन पेमेंट कसं करायचं, वगैरे त्यांनी दाखवलं. आता मी रेल्वेची, सिनेमा-नाटकांची तिकिटं क्रेडिट कार्डचा वापर करून काढू शकते. निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखकर होण्यासाठी अधिकाधिक टेक-सॅव्ही होण्याशिवाय पर्याय नाही, हे उमगल्यावर अ‍ॅप स्टोअरमधून बरीचशी अ‍ॅप्स डाऊनलोड करून घेतली. कॅब बुक करणं, किराणा माल, औषधं, कपडे, पुस्तकं यांची ऑनलाइन खरेदी सुरू झाली. एकदा मात्र गंमत झाली. सकाळी फोन उघडला तर सगळी अ‍ॅप्स जागच्या जागी थरथरत होती. लगेच मोबाइलच्या दुकानात गेले. मोबाइलमध्ये व्हायरस शिरला असावा असं समजल्यावर माझं धाबंच दणाणलं. त्यानंतर मात्र कानाला खडा लावला आणि मोजकीच अ‍ॅप्स फोनवर ठेवली.

अचानक उपटलेल्या करोनाकाळात आम्ही दोघं बरंच आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करू शकलो. ‘आरोग्य सेतू’चा वापर करून करोनाचा अपडेट घ्यायचो. सगळे दैनंदिन व्यवहार संपूर्णपणे डिजिटल माध्यमातून करू शकलो, ते अर्थातच  लॅपटॉप आणि स्मार्टफोन या ढवळय़ा-पवळय़ांच्या मदतीनं!  करोनाकाळात एकटेपणा, नैराश्य अशा  मानसिक समस्यांनी त्रस्त झालेल्या ओळखीच्या अनेक व्यक्तींची मी नियमितपणे ‘झूम’वरून संपर्क साधून विचारपूस करीत असे. मुंबईत राहणाऱ्या माझ्या लेकीची संपूर्ण इमारतच सील केल्यामुळे माझी नातवंडं बराच काळ १९ व्या मजल्यावर घरातच अडकली होती. त्या वेळी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून कधी गोष्टी सांगून, कधी गेम्स खेळून, कधी गृहपाठ करवून घेत मी त्यांना गुंतवून ठेवत असे. ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या माझ्या लेकीला त्यामुळे खूपच मदत झाली. आमच्या महिला मंडळाची मी एक उत्साही आणि सक्रिय सभासद असल्यानं इतर सभासदांच्या मदतीनं आपापल्या घरात बसूनच विविध कलागुणांचं ऑनलाइन स्नेहसंमेलनही आम्ही करू शकलो. मी सादर केलेला लेझीम डान्स भाव खाऊन गेला!  व्हॉटस्अ‍ॅप बघताना मी काळ-काम-वेगाचं बंधन घालून घेतलं आहे. आता नवीन आलेल्या ‘चॅट-जीपीटी’बरोबर ‘चॅट’ करण्यासाठी तितकीच उत्सुक आहे!