आई – बाबा तुमच्यासाठी
कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करणं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, पण अनेकदा अत्याचार करणारी घरातली मोठी व्यक्ती आहे, त्यांना ‘नाही कसं म्हणायचं’ म्हणून मुलं त्यांच्या अवास्तव मागण्यांना शरण गेल्याचं दिसून आलं आहे. हे टाळायचं असेल तर मोठय़ांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकायलाच हवी, असा आग्रह आई-बाबांनी न धरणंही फार आवश्यक आहे. याबाबतीत मुलांना तारतम्य शिकविणं अवघड आणि वेळखाऊ जरूर असलं तरी त्याला पर्याय नाही.
‘अनघड अवघड’ या सदरातून मुलांबरोबर लैंगिकतेशी संबंधित संवाद सुरू राहण्याबद्दल आपण बोलतो आहोत. या संवादाच्या अभावी होणाऱ्या अनेक परिणामांबद्दल आतापर्यंत आपण बोललो आहोत, पण या संवादाच्या अभावाचे सर्वात भयावह परिणाम दिसतात ते बाल लैंगिक शोषण (सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन) आणि लैंगिक अत्याचारांच्या (सेक्शुअल अब्यूज) संदर्भात.
‘लैंगिक अत्याचार’ या शब्दांनी अनेक जण चपापतात, बिचकून जातात. आमच्यासारख्यांच्या घरात असले प्रकार नाही हो होत किंवा सगळा वाईट विचार करायचाच कशाला आणि हे असं सगळं बोलायचंच कशाला, अशी पहिली प्रतिक्रिया बऱ्याचदा ऐकू येते.
एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक खासगीत्वाचा (सेक्शुअल प्रायव्हसी) आदर न होणं, त्यावर अतिक्रमण होणं म्हणजे लैंगिक अत्याचार. लैंगिक अत्याचाराची ही ढोबळ व्याख्या लक्षात घेतली, की आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या- घडणाऱ्या आणि आपल्याला त्रस्त करणाऱ्या अनेक गोष्टी त्यामध्ये येतात, हे लक्षात येईल. एखाद्याला लैंगिक मजकूर वाचायला आणि पाहायला लावणं (अशा स्वरूपाची पत्रं, ई-मेल्स आणि एसएमएसेस पाठविणंही त्यात आलं), अश्लाघ्य, अर्वाच्य बोलणं, अनुचित स्पर्श करणं, हाताळणं, एखाद्या व्यक्तीचे खासगी अवयव न्याहाळणं, तिला दुसऱ्याचे अवयव पाहायला भाग पाडणं, इथपासून ते बलात्कारापर्यंत अशा अनेक गोष्टी लैंगिक अत्याचारात मोडतात.
दुर्दैवाने लैंगिक अत्याचाराचे बळी असणाऱ्यांपैकी अनेक जण कायद्याने सज्ञान नसलेली मुलं आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (डब्ल्यूएचओ) एका सर्वेक्षणानुसार, दर चार मुलींपैकी एका मुलीला आणि दर सात मुलग्यांपैकी एका मुलग्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागलेलं असतं. अशी आकडेवारी बाहेर आली की, एक प्रतिक्रिया नेहमीच समोर येते- ‘‘हे असले प्रकार होत असतील पाश्चात्त्यांकडे. आमची भारतीय मूल्यव्यवस्था फार चोख आहे!’’ मात्र १९८५ साली ‘टाटा इन्स्टिटय़ूट फॉर सोशल सायन्सेस’ने भारतासाठी म्हणून केलेल्या केस स्टडीने याच्या जवळपास जाणारी आकडेवारीच समोर आणली होती. भारतातील बाललैंगिक अत्याचाराबाबत सोयीस्कर भूमिका घेणाऱ्यांच्या डोळ्यांत या केस स्टडीने झणझणीत अंजनच घातलं.
ही आकडेवारी पार जुनी आहे म्हणावं तर १९९६ साली बंगलोरमधल्या ‘संवादा’ या स्वयंसेवी (एनजीओ) संस्थेने केलेल्या पाहणीनुसार (ही पाहणी भारतीय लैंगिक अत्याचाराच्या आकडेवारीबद्दल मैलाचा दगड मानली जाते.) ८३ टक्के मुलींना कधी ना कधी रस्त्यावरच्या छेडछाडीला तोंड द्यावं लागलं आहे आणि ४७ टक्के मुलींवर तर अतिशय गंभीर स्वरूपाचे अत्याचार झाले आहेत आणि या अत्याचारांपैकी सुमारे ७५ टक्के अत्याचार हे कुटुंबातल्याच मोठय़ा माणसांकडून झालेले आहेत!
लैंगिक शोषणाला बाहेर वाचा न फुटण्याचं हेही एक महत्त्वाचं कारण आहे. शोषण करणारा माहितीचा, मोठा माणूस म्हणून घरातला आदरणीय असतो. मुलगी काही सांगायला गेली तर ‘असलं काही बोलू नकोस’ किंवा ‘ते इतके मोठे आहेत, ते कसे असे वागतील,’ असं त्यांना सांगितलं गेलं आहे. परिणाम काय, स्वत:चं घरही मुलींना आवश्यक ती सुरक्षितता देऊ शकलेलं नाही आणि स्वत:च्या लैंगिक अवयवांबद्दल आजपर्यंत कोणी त्यांच्याशी बोललेलंच नाही. काय बोलायचं? कसं बोलायचं? हे माहीतच नाही किंवा त्याबाबतचा अगदी छोटासा संदर्भही आतापर्यंत ‘शी! ते काही तरी घाणेरडं’ अशा उल्लेखाने झाला आहे. म्हणूनच कदाचित यापैकी अनेक मुलींनी (आणि मुलांनीही) ही गोष्ट कुणालाच सांगितलेली नाही आणि त्याचे कमी-अधिक प्रमाणातले ताण सोसतच त्यांनी अख्खं आयुष्य काढलेलं आहे. काहींच्या तर पुढच्या अख्ख्या आयुष्यावर त्याचे फार तीव्र स्वरूपाचे परिणाम झाले आहेत.
म्हणूनच आपल्या मुलांच्या एकंदर निकोप वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या पालकांनी या पैलूबाबतही त्या त्या वयाला योग्य अशी माहिती मुलांना देत राहणं फार गरजेचं आहे. आजचा लेख त्यासाठी.
अगदी लहान वयापासून मुलांशी बोलताना लैंगिकतेशी संबंधित विषय टाळत राहणं अनुचित आहे. अगदी लहान वयापासून शरीराचे वेगवेगळे भाग शिकविताना शिश्न (पेनिस) आणि योनी (व्हजायना) अशी स्पष्ट आणि नेमकी नावं शिकवणं आवश्यक आहे ते यासाठीच. त्यांची स्वच्छता कशी राखायची ते सांगणं, त्याबाबत मुलांनी विचारलेले प्रश्न न टाळणं अशा अनेक छोटय़ा-छोटय़ा प्रसंगांमधून या बाबतीतला आवश्यक तो मोकळेपणा मुलांना वाटायला हवा.
आपल्या शरीराचे काही भाग हे खासगी (प्रायव्हेट) आहेत, कुणालाही त्याला स्पर्श करू द्यायचा नाही, हे आपल्याला मुलांना लहान वयापासून सांगता येतं आणि एखाद्याने वेगळा, विचित्र असा स्पर्श केला तर त्याला तिथंच थांबवायचं. तसं झालं तर त्याबद्दल घरी येऊन सांगायचं, हेही जोडीनं सांगणं तितकंच आवश्यक.
बऱ्याचदा मुलांना एखाद्या व्यक्तीकडून झालेला स्पर्श ‘गुड टच’ आहे की ‘बॅड टच’ हे शिकविलं जातं. मधल्या काळात पाश्चात्त्य देशात हे तंत्र खूप वापरलं गेलं. आपल्याकडेही काही ठिकाणी आजही असं शिकविलं जातं. ‘बॅड टच’ असेल तर त्या व्यक्तीला तिथेच थांबविणं आणि आईवडिलांना सांगणं अशी ती शिकवण; पण काही काळाने असं लक्षात आलं की, अनेक मुलांना बॅड टच म्हणजे काही तरी इजा, दुखापत करणारा स्पर्श असं वाटतं. मग एखाद्या अनुचित, पण दुखापत न करणाऱ्या स्पर्शाला काय म्हणायचं, याबाबत त्यांच्या मनात गोंधळ उडू शकतो. काही वेळा पौगंडावस्थेतल्या किंवा त्याहून थोडय़ा मोठय़ा मुलांना असा स्पर्श सुखदही वाटतो. अशा वेळी मुलं त्याला ‘बॅड टच’ मानत नाहीत. पर्यायाने असे प्रसंग पालकांना सांगितले जातच नाहीत. म्हणून गुड टच, बॅड टच हे शब्द थोडे संभ्रम निर्माण करणारे आहेत. त्याऐवजी योग्य स्पर्श (ओके/ प्रॉपर टच), अयोग्य, विचित्र किंवा अनुचित स्पर्श (नॉट ओके/ इम्प्रॉपर टच) आहे, असे शब्द वापरणं इष्ट ठरतं. यात मग ‘ओके स्पर्श’ कुठले? तर टाळी देणे, पाठीवर थोपटणं, खांद्यावर हात ठेवणं, हे सांगता येतं. इथे मुलाला आईला किंवा बाबांना तू एखादा ‘ओके स्पर्श’ करून दाखव असंही सांगता येतं.
कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करणं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, पण अनेकदा अत्याचार करणारी घरातली मोठी व्यक्ती आहे, त्यांना ‘नाही कसं म्हणायचं’ म्हणून मुलं त्यांच्या अवास्तव मागण्यांना शरण गेल्याचं दिसून आलं आहे. हे टाळायचं असेल तर मोठय़ांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकायलाच हवी, असा आग्रह आई-बाबांनी न धरणंही फार आवश्यक आहे. याबाबतीत मुलांना तारतम्य शिकविणं अवघड आणि वेळखाऊ जरूर असलं तरी त्याला पर्याय नाही.
एखादी परिचित व्यक्ती आपल्या मुलाबरोबर खूप वेळ घालवीत असेल, मुलाला वारंवार भेटी, खाऊ आणत असेल, तर बऱ्याचदा आई-बाबांना मूल रमतं आहे, याने छानच वाटतं; पण अचानक जर मूल अशा व्यक्तीशी नाही खेळायचं, कंटाळा येतो, अशी तक्रार करू लागलं तर पालकांनी सावध होणं आवश्यक असतं. अशा वेळी बऱ्याचदा पालकांची प्रतिक्रिया असते, ‘इतके दिवस तर तुला मजा येत होती त्यांच्याबरोबर, आताच काय झालं!’ किंवा ‘ते तर तुझे इतके लाड करतात, मग कसली तुझी कुरकुर!’ पण एखाद्या व्यक्तीबद्दल अचानक मूल कुरकुर करू लागलं तर मुळात मूल जे सांगतं आहे ते पुरेशा गांभीर्यानं ऐकून घेणं अगदी आवश्यक आहे. मुलाने न बोलून दाखवलेलं, पण त्याला ठसठसणारं काही आहे का आणि असेल तर काय, याचा शोध घेणं, ही त्याच्या पुढची पायरी आणि गरज पडली तर ठामपणे मुलाच्या पाठीशी उभं राहणं हे तर सर्वात महत्त्वाचं.
अचानकपणे मूल एकटं राहू लागणं, ते प्रचंड ताणाखाली, अस्वस्थ असणं, त्याची भूक जाणं, कशाची तरी त्याला भयंकर भीती वाटणं, वारंवार अंथरूण ओलं होणं, वरकरणी काही कारण दिसत असताना सारखं आजारी पडणं, अशी लक्षणं बऱ्याचदा धोक्याचे झेंडेच फडकवत देत असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं किंवा त्यासाठी मुलांनाच ओरडणं हे फार घातक ठरू शकतं. असे प्रसंग पुरेशा संवेदनशीलतेने हाताळले जायला हवेत, नाही तर मुलांना त्याचा आणखीनच जाच होऊ शकतो.
परिचित व्यक्तीकडून होणाऱ्या लैंगिक शोषणात मूल आपल्या आईवडिलांना त्याबाबत काही सांगायची हिंमत करणार नाही, असं गृहीत धरून बहुतेक वेळा शोषण करणारी व्यक्ती आपला कार्यभाग साधून घेत असते. त्यामुळे बऱ्याचदा अशी व्यक्ती मुलांना ते ‘आपल्या-आपल्यातलं खास सीक्रेट आहे,’ असं सांगत असते. अशा वेळी मुलांना जर घरच्यांचा भक्कम पाठिंबा असेल तर पुन्हा ती धजावत नाही; किंबहुना अस्थिर, अशांत पाश्र्वभूमी असणाऱ्या घरातली मुलं लैंगिक शोषणाला बळी जाण्याची शक्यता जास्त असते. बऱ्याचदा हे सीक्रेट राखण्यासाठी मुलांना भेटी दिल्या जातात. मुलाला एखाद्याकडून वाजवीपेक्षा जास्त भेटी मिळत असतील तर हाही आईवडिलांसाठी एक धोक्याचा सिग्नल असू शकतो. खास करून चॉकलेट्स हे असं एक खास आमिष आहे; किंबहुना या विषयावरच्या २००० साली प्रकाशित झालेल्या पिंकी विरानींच्या बहुचर्चित पुस्तकाचं नावही ‘बिटर चॉकलेट’ असं आहे.
अपरिचित व्यक्तींकडून मिळणाऱ्या खाऊ, चॉकलेट्सना नाही म्हणायला शिकणं, अपरिचित व्यक्तीशी बोलायचं टाळणं, याबाबत मुलांना नीट माहिती असणंही फार गरजेचं.
पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे काहीही अनुचित, अयोग्य घडलं तर ते मुलांनी घरी सांगणं, हा संस्कार मुलांवर होणं आणि हा संस्कार होण्यासाठी आई-वडिलांनी संवादाची दारं कायम उघडी राखण्याचं भान ठेवणं खूप महत्त्वाचं.
लैंगिक शोषणाला सामोरं जायला लागणाऱ्या मुलांची बहुसंख्य वेळा त्यात काही चूक नसते, पण एकंदर परिस्थिती त्यांना अपराधी वाटायला लावत जाते. अशा वेळी ‘माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि यात तुझी काही चूक नाही,’ हा दिलासा मुलांना पालकांकडून मिळणं, हा फार कळीचा मुद्दा असतो.
संवादाचे सगळेच पूल प्रेम आणि विश्वासाच्या आधारावर बनतात. आपल्या आजूबाजूच्या अवघड परिस्थितीला तोंड द्यायचं बळ त्यातूनच येतं. लैंगिकतेच्या बाबतीतले संवादही याला अपवाद नाहीत. ते मात्र थोडे जास्त किचकट, परीक्षा पाहणारे असू शकतात. तरीही आपल्या मुलाच्या निकोप वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या सगळ्या आईबाबांनी आपल्या या संवादाच्या पुलाचे आधार पक्के आहेत ना, हे स्वत:शीच तपासून पाहायला हवं. त्यासाठी हे सगळं बोलायलाच हवं!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा