योगेश शेजवलकर – yogeshshejwalkar@gmail.com
‘‘अपेक्षित कोणतीही अपेक्षा मी पूर्ण करत नाही म्हणून माझं लग्न ठरत नाही ही वस्तुस्थिती आहे; पण हेही खरं आहे, की त्या तसल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कधीच प्रयत्न करणार नाही. या असल्या अपेक्षांमुळे आणि त्या पूर्ण करण्याच्या अट्टहासामुळे आपल्याकडे अनेकदा ‘लग्न’ हा आनंदसोहळा होण्याऐवजी न्यूनगंड वाढवण्याचा खेळ होतो. त्यांच्या नादी लागून कित्येक लग्नं मोडली.. अनेकांच्या संसाराची माती झाली.. माणूस म्हणून संतुलित असलेली असंख्य मुलं आणि मुली आयुष्यभराचा न्यूनगंड उराशी बाळगून बसली. हे माझं अपयश नाही. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत मला या खेळातलं खेळणं व्हायचं नाही.’’ लग्नाच्या बाजारात दोन र्वष असूनही त्याची भूमिका ठाम होती.
‘‘दोन वर्षांपूर्वी तू आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलं होतंस तेव्हापासून तुझं प्रोफाइल आमच्या फाइलमध्ये आणि आमच्या वेबसाइटवरही आहे; पण इतके दिवस होऊनही अजून विषय पुढे गेलेला नाही म्हणून परवा मी तुझ्या आईला फोन केला होता. तुझ्याशीही बोलायचं होतं, पण फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून बोलणं बरं पडतं म्हणून आज इथे बोलावलं. शिवाय वेबसाइटवर स्थळं शोधताना काही अडचणी येत असतील तर त्याबद्दलही आपल्याला बोलता येईल.’’ गेली अनेक र्वष वधूवर सूचक मंडळ चालवणाऱ्या आणि आज जवळजवळ पन्नाशीच्या पुढे असलेल्या संचालिका तिशीत पदार्पण केलेल्या त्या तरुणाचा अंदाज घेत त्याच्याशी बोलत होत्या.
‘‘हो, खरं आहे. फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून बोलणं कधीही चांगलं असतं. सविस्तर बोलता येतं. तसं मी दर दोन—तीन दिवसांनी तुमची वेबसाइट बघत असतो. स्थळं शोधताना, त्यांची माहिती मिळवताना काही त्रास होत नाही. जी स्थळं चांगली वाटतात, त्यांच्याशी तुमच्या वेबसाइटच्या माध्यमातून संपर्क साधण्याचीही चांगली सोय आहे. गोष्टी जेवढय़ा सोप्या करता येतील तेवढय़ा तुम्ही तुमच्या बाजूने केलेल्या आहेत. तेव्हा त्याबद्दल काहीच तक्रार नाही; पण आजपर्यंतचा माझा अनुभव असा आहे, की बहुतेक वेळा मी पाठवलेल्या मेसेजचं उत्तर देण्याची तसदीही कोणी घेत नाही. नकार कळवण्याचं सौजन्यही कोणी दाखवत नाही. थोडक्यात, होकार सोडाच, पण साधा नकारही मला नीट मिळत नाही.’’ आपलं बोलणं संपवताना विनोदाचा एक माफक प्रयत्न करून तो थोडा हसला; पण संचालिका हसल्या नाहीत. त्याला न मिळणारा प्रतिसाद त्यांनाही अस्वस्थ करत होता. वरकरणी जरी तो निवांत दिसत असला तरी त्याच्या मनात बरीच खळबळ उडालेली असणार, हे त्यांच्या अनुभवी नजरेनं ओळखलं होतं.
थोडा विचार करून त्या म्हणाल्या, ‘‘मला असं वाटतं की, तुझी माहिती जरा वेगळ्या पद्धतीनं लिहिणं गरजेचं आहे. स्पष्टच बोलायचं तर गेल्या दोन वर्षांत तुझा पगार फारसा वाढलेला नाही; पण वेगवेगळ्या गुंतवणुकीतून जे उत्पन्न तुला मिळत असेल, ते आपण दाखवलं तर कदाचित आता असलेला मिळकतीचा आकडा बदलता येईल. सध्या तू तुझ्या वडिलांच्या घरी राहतोस; पण समजा, स्वत:चं घर घेण्याचा तुझा काही बेत असेल तर त्याबद्दलही थोडी माहिती आपण देऊ शकतो. म्हणजे मग कसं होईल, जेव्हा तुझं प्रोफाइल बघितलं जाईल..’’ त्यांचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच तो म्हणाला, ‘‘तेव्हा समोरच्याला वाटेल की, इथे आपल्या इन्व्हेस्टमेंटचे चांगले रिटर्न्स मिळतील, असंच ना?’’
त्याच्या बोलण्याचा रोख त्यांना समजला. ‘‘तू माझं म्हणणं वेगळ्या अर्थानं घेऊ नकोस; पण हल्ली लग्न ठरवताना ज्या गोष्टी बघितल्या जातात, त्या अनुषंगानं मी सांगते. शेवटी मुलीकडचे लोक तिच्या भविष्याचा, सुरक्षिततेचा, स्थिरतेचा विचार करणारच ना?’’
त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत तो म्हणाला, ‘‘बरोबर आहे. त्यांनी तसा विचार करणं योग्यच आहे. त्याचबरोबर तुमच्या बाजूनंही सगळ्या गोष्टींची खातरजमा होणंही गरजेचं आहे. लग्न जमवत असताना तुम्ही अनेक प्रकारच्या माणसांना भेटत असता. सगळी माणसं सारखी नसतात. पूर्णपणे खरी माहिती देणारी नसतात. काही वेळा तर कमालीची लपवाछपवी होते आणि मग गोष्टी निस्तरताना नाकीनऊ येतात याची मला पूर्ण कल्पना आहे. त्याचबरोबर असा एखादा प्रसंग घडल्यावर सर्वात जास्त मनस्ताप हा मुलीकडच्या मंडळींना सहन करावा लागतो याचीही मला जाणीव आहे. तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार हा झालाच पाहिजे.’’
आपला मुद्दा त्याला समजला या समाधानात त्या म्हणाल्या, ‘‘..आणि कसं आहे ना, आमच्याकडे एकदा नाव नोंदवलं, की साधारणपणे आठ ते दहा महिन्यांत लग्न ठरतं. तेव्हा हे असं दोन र्वष काहीही न होणं थोडंसं वेगळं आहे.’’ त्यावर क्षणभर विचार करून तो म्हणाला, ‘‘या सगळ्यात मला फक्त एक समजलं नाही. ते म्हणजे नाव नोंदवून दोन र्वष उलटून गेल्यावरही माझं लग्न झालं नाही, हे तुमचं अपयश समजायचं की माझं?’’
त्याच्याकडून इतक्या थेट प्रश्नाची त्यांना अपेक्षा नव्हती. तेव्हा दीर्घ श्वास घेत त्या म्हणाल्या, ‘‘कदाचित हे आमचंच अपयश आहे, पण हेही खरं आहे, की तुझ्या प्रोफाइलमध्ये तशा मर्यादित गोष्टी आहेत. त्यामुळेही वेळ लागतो आहे.’’
‘‘.. पण मर्यादित गोष्टी कोणाच्या दृष्टिकोनातून? तुमच्या की नकार कळवण्याचीही तसदी न घेणाऱ्यांच्या?’’ त्याचा प्रश्न तयार होता.
‘‘हे बघ, मला कोणताही वाद घालायचा नाही. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की खूप जास्त वेळ लागतो आहे, तेव्हा काही तरी करण्याची गरज आहे. तू एकदा नीट विचार कर. गेल्या दोन वर्षांत असं काही तरी तू नक्कीच केलं असशील जे आपल्याला लिहिता येईल. नोकरीच्या निमित्तानं केलेला एखादा परदेश दौरा किंवा निदान व्हिसा फायलिंग, नवीन फोर व्हीलरची किंवा टू व्हीलरची खरेदी किंवा एखाद्या नामांकित क्लबची मेंबरशिप असं काहीही असेल तरी ते सांग. आपण ते नेमक्या शब्दांत तुझ्या प्रोफाइलमध्ये लिहू.’’
त्यांच्या या बोलण्यावर समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास त्यानं उचलला आणि थोडं पाणी पिऊन म्हणाला, ‘‘यापेक्षा आई-वडिलांच्या म्हातारपणात त्यांची सोय व्हावी म्हणून त्यांच्यासाठी एक पेन्शन प्लान घेतला आहे, हे लिहिलं तर?.. किंवा आजी-आजोबांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी दोन गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च मी एका संस्थेला देतो, ते सांगितलं तर?.. किंवा जुन्या झालेल्या घराची रंगरंगोटी आणि दुरुस्ती करून ते सर्वाना एकत्र राहण्यासाठी लख्ख केलं आहे हे स्पष्टपणे मांडलं तर? म्हणजे मला वाटतं याही गोष्टी तितक्याच सांगण्यासारख्या आहेत, नाही का? अर्थात तुम्हाला अपेक्षित असलेलं ‘ग्लॅमर’ यात नाही हे मात्र नक्की.’’
त्याच्या या बोलण्यावर त्या शांतपणे म्हणाल्या, ‘‘तू माझाही मुद्दा जरा समजून घे. माझ्या प्रयत्नांनाही मर्यादा आहेत. सध्या लोक ज्या गोष्टी विचारात घेतात आणि ज्या पद्धतीने विचार करून निर्णय घेतात, त्याला अनुसरूनच मी हे सुचवते आहे. मी कोणत्याही प्रकारची फसवाफसवी करायला किंवा खोटी माहिती द्यायला सांगत नाही. किती तरी वेळेला आपण काही गोष्टी अशा करतो, ज्याचा उल्लेख करायचा राहून जातो किंवा लग्नाच्या प्रोफाइलमध्ये त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे, हे आपल्या लक्षातच येत नाही. मी फक्त अशा गोष्टी समजून घेण्याचा आणि योग्य पद्धतीनं मांडण्याचा सल्ला देते आहे.’’
‘‘तुम्हाला या विषयातलं जास्त माहिती आहे. तेव्हा मी उगाचच वाद घालणार नाही. फक्त तुम्ही मला जे विचारता आहात त्यावर माझं उत्तर हेच आहे, की गेली तीन र्वष आपल्या बाजारपेठेची स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे आमच्याकडेही काही विशेष पगारवाढ झालेली नाही. तेव्हा कोणती मोठी नवीन खरेदी करण्याचा प्रसंगच आलेला नाही. शिवाय मी जिथे काम करतो तिथं माझं काम मला आवडतं. त्यात शिकण्यासारखं खूप आहे. तिथले लोक आणि वातावरणही चांगलं आहे. तेव्हा मी नोकरी बदलण्याचीही काही शक्यता नाही. मग अशा परिस्थितीत काय लिहायचं?’’
त्याच्या या प्रश्नाचं कोणतंही उत्तर त्यांच्याकडे नसल्यामुळे त्या काहीच बोलू शकल्या नाहीत. तेव्हा तोच म्हणाला, ‘‘माझ्यामुळे तुमचा ट्रॅक रेकॉर्ड खराब होत असेल याची मला कल्पना आहे; पण खरंच एक गोष्ट सांगा, की माझ्यासारखे आज किती तरी जण तुमच्या वेबसाइटवर असतीलच ना, ज्यांना गेल्या काही वर्षांत फार पगारवाढ मिळालेली नाही, ज्यांच्याकडे स्वत:चं घर नाही. ते काम करतात ती कंपनी तेवढी ग्लॅमरस नाही. स्वत:ची चारचाकी घेण्यासाठी त्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.. मग अशा लोकांचं काय होतं? त्यांचं सदस्यत्व संपलं, की नूतनीकरण करण्यासाठी त्यांच्या मागे न लागता तुम्ही त्यांचं प्रोफाइल काढून टाकता, की वैतागून तेच लोक ते काढून टाकतात?’’
‘‘काही वेळा गोष्टी इतक्या टोकालाही जातात; पण तसं तुझ्या बाबतीत काहीही घडू नये म्हणून तर आपण इथे भेटलोय ना?’’ त्या जरा स्पष्टपणे त्याला म्हणाल्या.
त्यांच्या या बोलण्यावर विचार करण्यासाठी थोडा वेळ घेऊन तो म्हणाला, ‘‘इतक्या वेळात तुमच्याकडचं कोणतंही पॅकेज विकत घेण्यासाठी तुम्ही मला गळ घातली नाहीत, की कोणती स्कीम सांगितली नाहीत. तेव्हा काळजीपोटीच तुम्ही बोलत आहात हे नक्की आहे. तेव्हा मग माझ्या मनातले प्रश्नही मी मोकळेपणाने विचारतो.. सध्या लग्न जुळवताना असलेल्या अपेक्षांबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे मला सांगा.. तिसाव्या वर्षी प्रत्येकाचं स्वत:चं घर कसं असणार? प्रत्येकाला सात आकडी पगार कसा मिळणार? प्रत्येकालाच परदेशी जाण्याची संधी कशी मिळणार? शिवाय ज्या वयात खरं तर घराची जबाबदारी तुमच्या खांद्यांवर येते, त्या वयात ‘आम्हाला आमची स्पेस पाहिजे,’ असं म्हणत कोणत्या तोंडाने त्यापासून दूर पळण्याची तयारी करणार?..’’
‘‘तू म्हणतोस ते खरं आहे; पण बहुतेकांच्या अशाच अपेक्षा असतात.’’ त्या काहीशा खेदानं म्हणाल्या.
‘‘यातली कोणतीही अपेक्षा मी पूर्ण करत नाही म्हणून माझं लग्न ठरत नाही ही वस्तुस्थिती आहे; पण हेही खरं आहे, की त्या तसल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कधीच प्रयत्न करणार नाही. या असल्या अपेक्षांमुळे आणि त्या पूर्ण करण्याच्या अट्टहासामुळे आपल्याकडे अनेकदा ‘लग्न’ हा आनंदसोहळा होण्याऐवजी न्यूनगंड वाढवण्याचा खेळ होतो. ‘मुलगी गोरीपानच हवी’ आणि ‘मुलाची सॅलरी देखणी हवी’ या सौंदर्याच्या बुरसटलेल्या व्याख्या या खेळाच्या मुख्य सूत्रधार आहेत. त्यांच्या नादी लागून कित्येक लग्नं मोडली.. अनेकांच्या संसाराची माती झाली.. माणूस म्हणून संतुलित असलेली असंख्य मुलं आणि मुली आयुष्यभराचा न्यूनगंड उराशी बाळगून बसली; पण त्याच्याशी कोणालाही काही देणंघेणं नाही. खरं तर बहुतेक सर्वाच्या घरात, नातेवाईकांत किंवा शेजारीपाजारी अशा घटना घडलेल्या असतात; पण थोडे अपवाद वगळता आपल्याकडची परिस्थिती फार बदलत नाही. न्यूनगंड वाढवण्याचा हा खेळ सुरूच राहतो. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत मला या खेळातलं खेळणं व्हायचं नाही.’’
त्याच्या या बोलण्यावर नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हे त्यांना समजेना. खरं तर बऱ्याच दिवसांनी कोणी तरी त्यांच्या मनात रोजच येणारे हे विचार बोलून दाखवले होते. काही क्षण विचार करून त्या म्हणाल्या, ‘‘लोकांची ही मानसिकता बदलण्याचा आम्ही आमच्या परीनं आटोकाट प्रयत्न करत असतो; पण शेवटी आम्हालाही मर्यादा आहेत. काहीही झालं तरी आम्ही फक्त एक माध्यम आहोत. कोणाच्याही निर्णयावर आमचं नियंत्रण नाही.’’
‘‘ते मी समजू शकतो,’’ त्यांच्या म्हणण्याला त्यानं दुजोरा दिला. मग त्या म्हणाल्या, ‘‘फक्त या सगळ्यात एकच गोष्ट जाणवते, की शास्त्रीय दृष्टीने विचार केला तर काही गोष्टी या त्या वयातच होणं गरजेचं असतं.’’
‘‘मान्य आहे; पण म्हणून त्या उरकून टाकण्यात काहीच अर्थ नसतो. कोणत्याही नात्याची पायाभरणी जितकी तकलादू असते, तितक्या प्रमाणात त्याचे परिणाम पुढे भोगावे लागतात.’’ त्याचं उत्तर तयार होतं.
‘‘खरं आहे.. आता आपण ज्यासाठी भेटलो आहोत त्या विषयावर येते. आपण नक्की काय करावं असं तुला वाटतं?’’ त्याच्या उत्तराचं आता त्यांनाही कुतूहल वाटत होतं.
‘‘जे लिहिलं आहे ते तसंच ठेवू. सध्या माझ्याकडे मुबलक असलेली एकच गोष्ट आहे, ती म्हणजे वेळ. तेव्हा मी वाट बघेन; पण कोणतीही न पटणारी तडजोड करणार नाही. शिवाय या विषयात आजवर मिळलेलं अपयश हे तुमचंही नाही आणि माझंही नाही. हे अपयश आपल्याकडे ‘मटेरियलिस्टिक’ गोष्टींच्या आधारावर लग्न ठरवणाऱ्या वृत्तीचं आहे. तेव्हा त्याचा ताण तुम्ही घेऊ नका. तो मीही घेतलेला नाही. माझ्यासारखा विचार करणारं कोणी तरी भेटेपर्यंत जो काही वेळ लागेल तो लागेल. चला, आता निघतो. सहा महिन्यांनी सदस्यत्वाच्या नूतनीकरणाची वेळ येईल, तेव्हा पुन्हा भेट होईलच,’’ असं म्हणून तो हसला आणि शांतपणे तिथून बाहेर पडला.