विवाहेच्छुक मुला-मुलींना मला नेहमी असे सांगावेसे वाटते की, आपल्या नियंत्रणातील  गोष्टी कोणत्या आणि आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्टी कोणत्या याचे भान सतत ठेवायला हवे. नियंत्रणाबाहेरील गोष्टींचा बाऊ करण्यात काय अर्थ? कोणत्याही स्थळामध्ये थोडीही कमतरता या मुलामुलींना सहन होत नाही. मग त्यांना ते स्थळच नको वाटते. मग पुढचे स्थळ पाहू, अजून स्थळे पाहू असा विचार होतो आणि लग्न लांबणीवर पडते.
गेली कित्येक वर्षे मुलीचं लग्न आणि चिंता हे समीकरणच होतं. पण गेल्या काही वर्षांपासून त्यात मुलाचं लग्न आणि चिंता याचीही भर पडली आहे. मुलामुलींच्या लग्नाच्या चिंतेमुळे पालक हतबल झाल्याचं चित्रं मोठय़ा प्रमाणावर दिसतंय. वर्षांनुर्वष पालक मुलांच्या/ मुलींच्या लग्नाची नेमकी चिंता कशाची करत असावेत?
त्यांच्या लग्नाच्या बाबतीत पालकांची झोप उडावी असं आता असं नेमकं काय घडलंय? या चिंता का वाटत असाव्यात? सध्या एकूणच समाजात अस्थिरता आहे. असुरक्षितता वाढीला लागली आहे. लग्नाच्या बाबतीत तर हा संक्रमणाचा काळ आहे. या भीतीतून मुक्त होण्यासाठी वस्तुस्थितीला धरून विचार करण्याची सवय लावून घेणे खूप गरजेचे आहे. त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक वेळा इतरांच्या अनुभवावर या चिंता आधारित असतात. आपल्या गाठीला जे काही इतरांचे ऐकीव अनुभव असतात, ते सगळे अनुभव आपल्याच वाटय़ाला येणार असा पक्का ग्रह कितीतरी पालकांचा झालेला दिसतो.
वर्तमानपत्रात, मासिकात, साप्ताहिकातसुद्धा अनेकदा निरनिराळ्या बातम्या छापून येत असतात, त्याचाही परिणाम होत असतो. त्यातून माणसांना वाटणारी असुरक्षितता वाढीला लागते. नुकतंच मी कुठल्यातरी वर्तमानपत्रात वाचलं की, ‘वेबसाइटवरून लग्न जमवणं धोकादायक. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार वाढले.’ बातमी एखाद दुसरीच येते, पण अशा प्रकारच्या बातम्या समाजात फार खोल परिणाम साधत असतात. त्यामुळे जुनी, वहीतून स्थळं उतरविण्याची पद्धतच चांगली, असं पालकांना वाटू लागतं. वेबसाइट नकोच, असा ग्रह होतो. कुणाकडून तरी ऐकलेलं असतं की, परदेशात राहणाऱ्या कुणातरी मुलाने तिकडे एक लग्न आधीच केलं होतं. मग अशा मुलांची खात्री कशी करायची? याची चिंता वाटू लागते. एखादा अनुभव असा ऐकला की परदेशातली सगळीच मुलं तसं वागतात की काय, अशीही शंका वाटायला लागते. र्मचट नेव्हीमधील मुलांना ड्रिंक्सची सवय असतेच, हा त्यातलाच एक गरसमज. या शंकांचं पर्यवसान भीतीमध्ये होतं. आणि सगळ्याच अशा स्थळांवर नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होते.
मीडिया आणि गॉसिप या गोष्टी प्रत्येक बाबतीत आपल्या मनात पूर्वग्रह निर्माण करत असतात, आणि पूर्वग्रह इतके तीव्र असतात की, साध्या साध्या गोष्टीतसुद्धा मन साशंक होतं. सारासार विचार करणे बाजूला राहते आणि एक महत्त्वाची गोष्ट विसरायला होतं की एखादी गोष्ट समाजमान्य नसेल किंवा विपरीत असेल तरच त्याची बातमी होते. हे लक्षात न् घेतल्यामुळे आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या जीवनात काहीतरी तसेच घडेल अशी काल्पनिक भीती वाटू लागते.
आता हेच बघा ना- सुवर्णाताई म्हणाल्या, ‘‘आमच्या नात्यात दोन घटस्फोट झाले. त्या दोघांनीही लग्नाच्या वेळी पत्रिका पाहिलेल्या नव्हत्या. त्यामुळे आता माझ्या मुलाचं लग्न आम्हाला पत्रिका पाहिल्याशिवाय करायचंच नाही.’’ मी त्यांना म्हणाले, ‘‘अहो सगळी लग्नं पत्रिका बघून थोडीच होतात? आणि पत्रिका पाहून झालेल्या सर्व लग्नातले नवरा-बायको सुखेनव संसार करतात, असे थोडेच आहे?’’
पालकांनी लहानपणापासून आपल्या मुलांचे/ मुलींचे संगोपन अगदी निराळ्या पद्धतीने केले असते. पूर्वी मुलीला लग्नासाठी तयार केलं जायचं, संसारासाठी आवश्यक गोष्टी तिला मुद्दाम शिकविल्या जायच्या. पण काळाच्या ओघात आपण मुलींना मुलांसारखं वाढवलं आणि मुलांना मात्र परंपरेप्रमाणे मुलांसारखंच वाढवलं. मुलांना शिक्षणाची, स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याची परवानगी दिली. मुलींना मुलांच्या बरोबरीने शिक्षण दिले. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. मुलींची स्वत:ची अस्मिता जागृत झाली. त्या निर्भयपणे स्वत:ची मते मांडू लागल्या. घरातल्या निर्णयप्रक्रियेत सामावून घेतले गेले पाहिजे यावर त्या ठाम आहेत. पण मुलींचे हे बदललेले विश्व मुलांच्या परिचयाचे नाही. त्यामुळे मुलींवर आगाऊपणाचा शिक्का बसला आहे. त्यांच्या लग्नाच्या बाबतीतल्या अपेक्षांबद्दल सगळीकडे चवीचवीने बोलले जाऊ लागले. अनेक घरांमध्ये एक किंवा दोन  मुले-मुली आहेत, आणि ती कामात व्यग्र आहेत. त्यामुळे त्यांना जोडीदार मिळवून द्यायची जबाबदारी आपलीच अशी पालकांची ठाम समजूत आहे. मुले आणि मुली त्यांच्या सोयीप्रमाणे या समजुतीला खतपाणी घालत असतात आणि पालकांमध्येही मुलांबाबत स्वामित्वाची भावना आहे.
आणि त्यामुळे मुलं लग्नाच्या वयात आली की पालकांच्या चिंतेला सुरुवात होते. कारण मुलांचे/ मुलींचे विचार पालकांपेक्षा स्वाभाविकच वेगळे आहेत. मुलांना/ मुलींना लग्नाची अजिबातच घाई नाही, आणि पालकांना मात्र सगळं त्यांचं वेळेवर व्हावं असं वाटतं. पालकांनी मुलांना/मुलींना त्यांना हवं ते लहानपणापासून सगळं उपलब्ध करून दिलं.
‘टंचाई’ या शब्दाचीही त्यांना जाणीव करून दिली जात नाही. कोणत्याही बाबतीत कमतरता याची मुलामुलींना सवयच नसल्याचं दिसून येतं.  त्यांचे पालक त्यांच्या कोणत्याही गोष्टीला ‘नाही’ म्हणताना दिसत नाहीत, त्यामुळे मुलांना काय किंवा मुलींना, जर कुणी नकार दिला तर ते स्वीकारताना जड जाते आहे. सर्वसाधारणपणे समाजात हीच परिस्थिती सध्या दिसून येते. याचा परिणाम असा  झाला आहे की, मुलगा असू दे वा मुलगी, ते त्यांच्या अपेक्षांबद्दल आग्रही आहेत आणि त्यांच्यात वैचारिक लवचिकता कमी दिसून येते. थोडासा आग्रही हट्टीपणा हा मुला-मुलींचे समान लक्षण दिसून येते.
त्यामुळे पालकांनी एखादे स्थळ चांगले आहे असे सांगितले तर ते मुले-मुली स्वीकारायला तयार नाहीत. अगदी कालची गोष्ट. एका मुलीची आई मुलीसह मला भेटायला आली होती. मला एक स्थळ अगदी योग्य वाटलं. मी मुलीला म्हटलं, ‘असं स्थळ शोधून सापडणार नाही.’ पण त्यात ती काहीतरी उगाचच खुसपटे काढीत होती, ‘म्हणे मुलाच्या डोक्यावर केस कमी आहेत.’ मी तिला खूप आग्रह केला, सांगितलं आता तुझेही वय २८ झाले आहे तेव्हा या गोष्टीकडे दुर्लक्ष कर आणि दुसरा खूप केस असलेला मुलगा समजा भेटला आणि लग्नानंतर लगेचच काही कारणाने गेले तर?’’
मी खूप वेगवेगळ्या प्रकाराने तिला समजून सांगितले. तर ती मलाच म्हणाली, ‘‘तू म्हणतेस तर करेन मी लग्न या मुलाशी, पण महिन्याभरात सामान घेऊन घरी परत आले तर मग तुझी जबाबदारी.’’ आता सांगा या मुलीपुढे मी काय बोलणार?
म्हणून मला मुलांना आणि मुलींना नेहमी सांगावेसे वाटते, आपल्या नियंत्रणातील गोष्टी कोणत्या आणि आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्टी कोणत्या याचे भान सतत ठेवायला हवे. नियंत्रणाबाहेरील गोष्टींचा बाऊ करण्यात अर्थ नाही. एक मुलगा मला म्हणाला, ‘‘मुलगी बाकी उत्तम आहे. रूप, रंग, शिक्षण बुद्धिमत्ता, तिचा स्वभाव सगळं आवडलंय; पण जाडी आहे हो ती ..’’
मी त्याला म्हटलं, ‘‘अरे सगळ्या गोष्टी पसंत आहेत ना. राहता राहिला प्रश्न तिच्या वजनाचा. ते जसे वाढू शकते तसे प्रयत्नपूर्वक कमी होऊ शकते. ही गोष्ट तिच्या हातात आहे ना! मग बाकी सगळे योग्य वाटत असताना केवळ या गोष्टीकरता नकार कसला देतोस?’’
कोणत्याही स्थळामध्ये थोडीही कमतरता मुला-मुलींना सहन होत नाही. मग त्यांना ते स्थळ नकोच वाटते. मग पुढचे स्थळ पाहू, अजून स्थळे पाहू असा विचार होतो, आणि लग्न लांबणीवर पडते.
आणखी एक मुद्दा मुलांच्या बाबतीत खूप गंभीर होत चालला आहे. कारण करिअर निवडीचं स्वातंत्र्य आपण आपल्या मुला मुलींना दिलं त्या वेळी लग्न ठरवताना त्याचा असा विचार केला जाईल हे लक्षात आले नव्हते.
सुजय म्हणाला, ‘‘मी आयटीमध्ये नाही हा माझा गुन्हा आहे का? प्रत्येक मुलगी आणि तिचे पालक विचारतात की तो आयटीमध्ये आहे का? आयटीशिवाय जगात काही महत्त्वाचे नाहीये का? आणि ज्यांना पन्नास हजार व त्याहून जास्त मिळत नाहीत त्यांना जगता येतच नाही का?’’
पालकांनी आपल्या मुलांना त्यांचे त्यांचे जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य द्यायला हवे. ही जबाबदारी मुला-मुलींवरच सोपवायला हवी. शिवाय त्यांना सगळं रेडीमेडच द्यायला पाहिजे, हा हट्टही सोडून द्यायला हवा. बहुतांशी पालकांनीही  त्यांच्या संसाराची सुरुवात शून्यापासून केल्याची उदाहरणे आहेत. आमच्या संसारातला चमचासुद्धा आम्ही आमच्या कमाईतून घेतला असं पालक अभिमानाने सांगतातच ना? मग ही अपूर्वाईची गंमत आपल्या मुला-मुलींना घेऊन द्यायला हवी.
असे काही उपाय केले तर काही प्रमाणात तरी पालकांची चिंता कमी होण्याची शक्यता वाढते. अन्यथा..   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wedding tension