ताणतणावांचे नियोजन

डॉ. मेधा ताडपत्रीकर

pradnya daya pawar
‘भय’भूती: भित्यंतराचे कल्लोळ
chaturang readers feedback marathi news
पडसाद: हे फक्त हिमनगाचे टोक
children, studies, loksatta news,
सांदीत सापडलेले…! : मदत?
family, old women, attention to old women,
मनातलं कागदावर: दुधातील साखर…
Special modak making classes for visually impaired women
हात जेव्हा डोळे होतात…
Descriptions of Lord Ganesha by various sants
बुद्धिदेवता ओंकारब्रह्म
Loksatta chaturang Friends friendship Express implicit relationship
माझी मैत्रीण: व्यक्त-अव्यक्त नातं
human personality mask
जिंकावे नि जगावेही: मुखवट्यांच्या आड
parental challenges, children s independence, generational tensions, family dynamics, emotional support, parent child relationship,
सांधा बदलताना : कळा ज्या लागल्या जीवा

मी गेल्या वर्षी काय काय केलं, काय काय करायचं राहिलं, याचे जमाखर्च मनात सतत घोळण्याचे सध्याचे दिवस आहेत. त्यामुळे ताण वाढतो आणि मन उदास होऊ लागतं. नवीन वर्ष काही दिवसांवर उभं आहे, त्यामुळे काय घडलं नाही, याचा ताणतणाव निर्माण करणारा विचार बाजूला ठेवून नवीन काय आणि कसं करता येईल याविषयी..

दिवाळीची सुट्टी संपल्यावर कामावर रुजू झालेल्या निशीचं कामात लक्षच लागत नव्हतं. कसली तरी हुरहुर मनाला लागली होती; पण आपल्याला नक्की काय होतंय ते तिला समजत नव्हतं. जेवण्याच्या सुट्टीत तिची तंद्री लागलेली बघून तिच्या मैत्रिणीनं काय झालंय ते विचारलं. घरात भांडण झालं नव्हतं, दिवाळीची सुट्टीही तशी ठीकच गेली होती, निशीच्या नवऱ्यानं पाडव्याला तिला न सांगता तिच्या आवडीच्या रंगाची साडीसुद्धा आणली होती! असं सर्व असतानाही आपल्याला हे काय होतंय, हे तिला शब्दांत मांडता येत नव्हतं.

ऑफिस संपल्यावर कॅबमध्ये बसल्यावर नेहमीची प्रवासातली मैत्रीण तिच्याशी बोलताना म्हणाली, ‘‘अगं, मला ना वर्षांचा शेवट जवळ आला ना, की खूप भीतीच वाटते! आयुष्यातलं एक वर्ष कमी झालं आहे, असं वाटत राहातं. मागे वळून बघितलं की, या वर्षी करायच्या म्हणून ठरवलेल्यांपैकी अनेक गोष्टी राहून गेलेल्या असतात. ‘काय कमावलं आणि काय गमावलं’मध्ये कायमच कमावल्याचं पारडं रिकामं वाटतं गं! हल्ली मला टेन्शनच येतं या सगळय़ाचं!’’ मैत्रिणीचं बोलणं ऐकून निशीलासुद्धा आपली दुखरी नस काय आहे, हे जाणवलं. कारण तिलादेखील अगदी असंच वाटत होतं.

 नवीन वर्षांची सुरुवात ही काहींसाठी स्वयंप्रेरणा जागृत करण्याची आणि संकल्प करण्याची वेळ असते; परंतु अनेकांसाठी नवीन वर्ष येण्याचा हा काळ खूप तणावपूर्ण ठरतो. अपेक्षा, गेल्या वर्षांतल्या कटू आठवणी आणि येणाऱ्या काळाबाबतची चिंता, असे हे दिवस असतात. मुख्य म्हणजे वेळ हाताशी लागतच नाही, ही अनेकांची खंत असते. करायचं तर खूप आहे, परंतु कधी करणार या विचारांत आणि नंतर चिंतेत दिवस जातच राहतात. गेलेल्या वर्षांतल्या अपयशाची, गाठू न शकलेल्या ध्येयांची टोचणी जास्त असते. म्हणूनच त्यांच्यासाठी नवीन वर्षांची सुरुवात ही आनंददायी नसून ती ताणतणावाची असू शकते.

   राहुल मात्र नवीन वर्षांची आतुरतेनं वाट बघतो. येणाऱ्या वर्षांत काय करायचं, आपलं काय ध्येय असेल, हे तो दोन महिने आधीच ठरवतो आणि पुढे वर्षभर त्यात गरजेनुसार सातत्यानं बदल करत असतो. त्याच्या या सवयीमुळे त्याला चिंता सतावत नाही. वर्षांच्या शेवटी नैराश्यदेखील येत नाही. अर्थात राहुलसारखे आधीपासून शिस्तबद्ध योजना आखणारे आणि ती पुढे प्रत्यक्ष पाळणारे लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतात.  जगभरात आपल्यासारखे अनेक लोक नवीन वर्षांचे संकल्प ठरवतात. त्यात ‘वजन कमी करीन’, ‘व्यायाम सुरू करीन’पासून पार ‘रागावर नियंत्रण ठेवीन’, ‘सिगारेट कमी ओढीन’ असं काहीही असू शकतं. मात्र त्यातले केवळ ४० टक्के लोकच नववर्षांत पहिले तीन महिने किंवा त्यापेक्षा थोडे जास्त दिवस ठरवल्यानुसार वागतात! बाकी लोक तर पहिल्या पंधरा दिवसांपलीकडे आपला निश्चय पाळत नाहीत. बरं आपण असे संकल्प पाळू शकत नाही, हे माहिती असूनदेखील दरवर्षी निश्चय करणारे काही कमी नाहीत; पण त्याचा ताण घेणं केव्हाही योग्य नाही. कोणत्याही स्वरूपातली चिंता ही कधीही आनंददायी भावना असू शकत नाही. करोनानंतरच्या काळात अनिश्चितता खूपच वाढल्यामुळेदेखील लोकांना नैराश्य येऊ लागलं आहे. त्यामुळेसुद्धा नवीन वर्ष काय घेऊन येणार याची धास्ती मनात असू शकते.  

सुट्टीमुळे मिळालेल्या वेळात तेच विचार करून निर्माण होणारा तणाव आणि समाज-माध्यमांतून फिरणारे ‘नवीन वर्ष-नवीन मी’ प्रकारचे संदेश मग चांगलेच त्रासदायक ठरू शकतात; पण अशी चिंता मनात येणाऱ्यांनी हेही बघायला हवं, की तुमच्या आजूबाजूला राहुलसारखे लोकही आहेत; जे उत्कृष्ट मानसिक स्थितीत आहेत, त्यांच्या जीवनात चांगलं काम करत आहेत, गेल्या वर्षभरात त्यांनी खूप काही साध्य केलं आहे आणि आगामी वर्षांसाठी त्यांच्याकडे भरपूर ऊर्जा आहे आणि वाटली थोडी भीती, तर त्यात गैर काहीच नाही. मुख्य म्हणजे असं वाटणारे तुम्ही एकटे नाही! अनेक जण त्याचाच सामना करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातले पुष्कळ जण ताणतणावांवर यशस्वी मात करून यशस्वी होत आहेत.     या तणावावर मात करण्यासाठीची प्राथमिक पायरी म्हणजे तुमच्या खऱ्या भावना जाणून घेणं आणि त्या मान्य करणं, जेणेकरून तुम्ही सक्रिय होण्याच्या दिशेनं पावलं उचलू शकाल आणि स्वत:त सकारात्मक बदल करू शकाल. त्यामुळे आपलं संपूर्ण मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्यही सुधारायला मदत होते; परंतु लहानसा आणि आवश्यक बदल करण्याआधी, एखाद्याला प्रथम आपल्या चिंतेचं कारण समजून घेणं आवश्यकच आहे. वर्ष लवकर संपलं, असं वाटत असताना तुमच्या वाढलेल्या चिंतेची अनेक कारणं असू शकतात. त्याविषयी थोडं पाहू या-   ‘नवीन वर्ष, नवीन मी’ हा एक अतिशय क्लिष्ट वाक्प्रचार आहे! प्रत्येक वर्षी वापरून वापरून तो गुळगुळीत झाला आहे. यात १२ महिन्यांच्या अल्प कालावधीत स्वत:पुढे प्रचंड उद्दिष्टं आणि अपेक्षांचं ओझं निर्माण केलं जातं. मग त्याचा एक सामाजिक दबाव व्यक्तीच्या मनावर निर्माण होतो. इथेच आपली चूक होते. कारण ही उद्दिष्टं गाठण्यात अयशस्वी झाल्यास चिंता आणि तणाव निर्माण होण्याव्यतिरिक्त काहीही होत नाही. त्याऐवजी आपल्या मनाचा ताण दूर करण्यासाठी वर्षभर साध्य करण्याजोगी छोटी-छोटी उद्दिष्टं तयार करावीत.

१ जानेवारीपासून तुम्ही पूर्णपणे नवीन व्यक्ती असाल, असं ठरवणं म्हणजे अगदी सोप्या सोप्या गोष्टींबद्दल आपल्यावरच दबाव निर्माण करणं. कारण आपण तेच असतो, आपला स्वभावही तोच असतो. त्यापेक्षा संकल्प आणि उद्दिष्टांचा विचार मॅरेथॉन म्हणून करावा. ती काही अल्प वेळात गाठायची ‘स्प्रिंट’ शर्यत नाही, हे ध्यानात ठेवावं. संकल्प पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागतो. तुमच्या व्यक्तिमत्त्वातल्या आणि तुमच्या जीवनातल्या बदलांची नीट कल्पना येण्यासाठी तुम्ही सातत्यानं त्यासंबंधी थोडं थोडं काम करत आहात याची खात्री करा. चटकन कोणत्याही निष्कर्षांपर्यंत पोहोचू नका.

   बदल घडवून आणणं कठीण होऊ शकतं; पण जर तुम्हाला काही साध्य करायचं असेल, कोणत्याही दिवसापासून तुम्ही याची सुरुवात करू शकता. फक्त नवीन वर्षांत नवीन सुरुवात करणं अनेकांसाठी स्फुर्तीदायक असू शकतं. फक्त त्यात नंतर सातत्य ठेवण्यासाठी आपल्या जीवनात विविध गोष्टींवर आपलं नियंत्रण ठेवणं आणि साधे बदल करणं, हे आपल्याला आपलं ध्येय जलद साध्य करण्यात मदत करू शकतं. बदल अपरिहार्य आहे आणि एकदा का तुम्ही ते मनापासून स्वीकारलं आणि तुमच्या दिनचर्येत छोटे बदल करून सुरुवात केलीत, की नंतर आयुष्यात मोठे बदल घडवून आणणं सोपं होईल.

  मला स्वत:ला जेव्हा ताण येतो, तेव्हा मी माझ्या आवडत्या छंदात मन रमवते, माझ्या आवडीचं काम करण्यात वेळ घालवते. असं करणं शिकायलादेखील अनेक वर्ष लागली; पण आता ते जमू लागलं आहे.  जसा आपण इतरांसाठी वेळ देतो, तसा तो आपल्यासाठी देतो का? हा विचार गरजेचा आहे.

आपण भारतीय स्वत:ला इतरांच्या तुलनेत प्राधान्य देत नाही. तणाव हा अनेक गोष्टींमुळे येऊ शकतो. तो येऊ नये यासाठी स्वत:ला निरोगी ठेवणं, पुरेशी विश्रांती घेणं, स्वत:करिता वेळ काढणं – तेही कोणत्याही प्रकारे अपराधी वाटू न देता, कलेद्वारे स्वत:ची अभिव्यक्ती घडवणं, महत्त्वाच्या लोकांबरोबरची मैत्री टिकवून ठेवणं किंवा योग आणि ध्यान यांसारख्या निरोगी क्रियाकलापांमध्ये गुंतणं, यांपैकी काहीही असू शकतं.

 नवीन वर्षांची सुरुवात हे ‘स्टॉक टेकिंग’ची आणि मागील वर्षांचा विचार करण्याची वेळ म्हणून पाहिलं जातं. तुम्हाला जे काही हवं होतं, ते तुम्ही साध्य केलं नाहीत, असं जर तुम्हाला नेहमीच वाटत असेल, तर दरवर्षी आपलं यश मोजण्याची ही प्रवृत्ती आणि नवीन उद्दिष्टं किंवा संकल्प ठरवण्याचा दबाव तुम्हाला अस्वस्थ करणारा असू शकतो. नवीन वर्षांत स्वत:ला नव्यानं शोधणं, ही एक सकारात्मक गोष्ट आहे; परंतु त्याचा अनाठायी ताण घेतल्यास मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.  खरं तर आयुष्यात कोणतेही ‘शॉर्टकट’ नाहीत आणि आपण आपल्या भावनांपासून कुठेही दूर पळून जाऊ शकत नाही. त्यामुळे नवीन वर्ष कठीण वाटणं यात काही ‘अबनॉर्मल’ नाही. तसंच दररोज, प्रत्येक मिनिटाला ठरवलेलं सर्व साध्य करता न येणंही सामान्य आहे. चुका करणं, त्यातून शिकणं आणि समरसून जगण्याचा प्रयत्न करणं, हेच आपल्याला माणूस बनवतं. तुम्हाला जर आताच्या या दिवसांत मानसिक ताण येत असेल, तर तुमचा विश्वास असलेल्या व्यक्तींशी बोला, मन मोकळं करा.

   मग यंदा नवीन वर्षांचं आगमन होताना ‘गतवर्षी काय केलं?.. काय नाही केलं?’ याबाबतच्या अटी-अपेक्षा मनात घोळवणं सोडून द्या. आज आपण काय आहोत, आज आपल्याला कसं वाटतंय, यावर मन केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला जे हवंय, ज्यानं तुम्हाला आनंद होतो, ते करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे.. स्वत:ला खूश ठेवा, आनंदी राहा!

 medhat235 @gmail.com