मला नेहमीच असं वाटतं, की किती भाग्यवान आहे मी!!
भारतीय संगीतातील स्वरगंधर्व सुधीर फडके आणि गाण्यात तेवढंच प्रावीण्य मिळवणारी माझी आई, ललिता फडके (पूर्वाश्रमीची देऊळकर) या सूरमयी दाम्पत्याच्या पोटी ईश्वराने मला जन्माला घातले.
मी सश्रद्ध आहे. माझ्या धमन्यांतून वाहणाऱ्या रक्तात बाबूजींचा सच्चा स्वर आहे आणि विचारात आईची सुरेल माया आहे. त्यामुळे गेल्या ४१ वर्षांत जे काही माझ्याकडून थोडं फार घडलं ती त्यांचीच तर फलश्रुती आहे.
मी तसा आय. टी. क्षेत्रातला. नुकतीच चार वष्रे झाली, नोकरीतून निवृत्त झालो. पण जी आवड महाविद्यालयीन जीवनात निर्माण झाली आहे, त्यातून निवृत्ती नाही. आई आणि अण्णा (बाबूजींना आम्ही घरी अण्णा म्हणत असू) संगीतातील दिग्गज होते, परंतु मी संगीताचं औपचारिक शिक्षण घेतलं नाही. पण घरातील संगीत विद्यापीठ न सांगता जे शिक्षण देत होतं ते काही औरच! बाबूजींकडे केवढे मोठे गायक, कवी, संगीतकार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक येत असत. त्यांचे विचार कानी पडत. तो संस्कार मोठा होता. बाबूजी जेव्हा गाणं समजावून सांगायचे, तेव्हा आग्रही असायचे ते सुराबाबत, शब्दाबाबत, त्यातून व्यक्त होणाऱ्या भावनांबाबत आणि त्या शब्दांच्या उच्चारांबाबत. बाबूजी गाणे समजावून सांगताना मोठे मोठे कलावंत किती तल्लिनतेनं आणि लीनतेनं ते समजावून घेत असत ते मी पाहात होतो.
बाबूजींनी मला शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवलं होतं. तिथे एकदा कॅम्लिनचे काकासाहेब दांडेकर आणि त्यांच्या पत्नी मालतीबाई दांडेकर आल्या होत्या. त्यांच्या कानावर होतं की मी चाली बांधतो. १९७२च्या २ ऑक्टोबरला मुंबई दूरदर्शन सुरू झालं आणि ९ ऑक्टोबरला ‘युवदर्शन’चा पहिला कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात मी, माझा मित्र उदय चित्रे, उदय परुळेकर आम्ही मिळून गाणी बांधली होती. राणी वर्मानं ती गाणी गायली होती. कॉलेजात असताना केशव केळकरांनी ‘युववाणी’साठी काही तयार करायला सांगितलं होतं आणि आमच्या वयाच्या तेविसाव्या वर्षी राणीनं गायलेली व आम्ही स्वरबद्ध केलेली शांताबाई शेळके आणि रामचंद्र सडेकर यांची गीतं असलेली एक ई.पी. रेकॉर्डही आली होती. हे सारं दांडेकर दाम्पत्याला माहीत असावं. त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचे हरिपाठाचे अभंग समोर ठेवले व म्हणाले, ‘‘यांना चाली कर.’’ पहिलाच अभंग – ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’. वाचत गेलो, विचार करत राहिलो, तो मनात झिरपत गेला. चाल सुचत गेली. कशी ते कळत नाही, सांगताही येत नाही. पण एक सांगता येतं की, समोरच्या शब्दांना सात स्वरातला नेमका कोणता स्वर लागतो, ते एकदा सापडलं की मग चाल घडत जाते. त्या अभंगातील ‘तेणे मुक्ती चारी साधियेल्या’ या ओळीतल्या ‘चारी’ शब्दाला नेमका स्वर सापडला आणि चाल घडत गेली. त्याच वेळी नेमके बाबूजी अमेरिकेत आले होते. आमच्या छोटय़ाशा स्टुडंट अपार्टमेंटमध्ये आले तेव्हा मी धीर एकवटून त्यांना विचारले, ‘‘तुमचा एक खासगी कार्यक्रम आहे, त्यात मी बांधलेला हा अभंग गाल का?’’ ते म्हणाले, ‘ऐकव.’ ते पलंगावर बसलेले आणि मी त्यांच्या पायाशी बसलेलो. मुखडा ऐकवला, बाबूजी डोळे मिटून ऐकत होते. मुखडा ऐकवून मी थांबलो. त्यांनी डोळे उघडले, त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य तरळताना दिसले, त्यांनी मला पूर्ण चाल ऐकवायला सांगितली आणि काय आश्चर्य! बाबूजी तो अभंग गायले. माझी साधीशी चाल; पण शास्त्रोक्त बठक असलेल्या आणि गंधर्व गायकीचं वरदान लाभलेल्या बाबूजींनी ती चाल अशा बहारीनं गायली की, श्रुती धन्य झाल्या. दुर्दैवानं त्या कार्यक्रमाचं तेव्हा ध्वनिमुद्रण झालं नाही. पण तो अभंग नंतर सुरेश वाडकरांनी गायला. माझा संगीत प्रवास सुरू झाला. बाबूजींना मी केलेली अनेक गाणी गायची होती. पण तो योग नव्हता. परंतु त्यांच्या अलौकिक स्वरांचा लाभ १९८० साली आलेल्या एका योगामुळे लाभला. एकदा बाबूजींकडे भोसले नावाचे निर्माते आले होते. एका चित्रपटाची बोलणी सुरू होती. बाबूजींनी त्या चित्रपटाला संगीत द्यायचं मान्य केलं. त्यावेळी मी बाजूला सुधीर मोघे यांच्या ‘फिटे अंधाराचे जाळे’ या कवितेला चाल लावत होतो. भोसले साहेबांनी ते गीत ऐकलं. ते बाबूजींना म्हणाले, ‘‘हे गीत आपल्या चित्रपटात घेऊ या का?’’, तर बाबूजींनी उत्तर दिलं, ‘‘ही चाल श्रीधरची आहे, त्यापेक्षा तुम्ही हा चित्रपट त्याला द्या.’’ मला नमूद करायला आनंद वाटतो की, माझा पहिला चित्रपट बाबूजींमुळे मला मिळाला. ‘लक्ष्मीची पावले’ हा तो चित्रपट होता. तत्त्वनिष्ठ बाबूजींनी स्वत:हून कोणालाही सांगितले नसते की माझ्या मुलाला संधी द्या, पण या वेळी त्या दिग्दर्शकांनी विचारल्यामुळे बाबूजींनी ती सूचना केली. तो त्यांचा कृपाप्रसाद होता.
मी प्रारंभीच सांगितलं की संगीताचं औपचारिक शिक्षण मला मिळालं नाही. पण मी सतत विचार करत असतो, तो संगीताचाच. सतत मनात सुरांचं रुंजन सुरू असतं. नवनवीन रचनांचा शोध सुरू असतो. हे नावीन्य सर्वसामान्य रसिकांच्या पचनी पडेल, त्यांना आनंद देईल. त्यांच्या डोळ्यातील आनंदाच्या छटा मला ईश्वराचे आशीर्वाद वाटतात. त्या आशीर्वादाच्या बळावरच कलाकाराची वाटचाल सुरू असते.
आनंदाच्या लाटा निर्माण करण्याचं फार मोठं सामथ्र्य संत कवितेत आहे. बाबूजींनी घरी ‘सकलसंतगाथा’ आणून ठेवली होती. माझा पुण्याचा मित्र अजित सोमण अभंग, कविता निवडताना मला मदत करायचा. एक दिवस मला असं वाटलं की, वेदांमधल्या ऋचा ‘नी सा रे’ या तीन स्वरांत गातात, तशा प्रकारची चाल एखाद्या अभंगाला मला लावता येईल का? आणि मनामध्ये काही स्वर उमटले, ‘प म रे सा’, ‘प म रे सा’, ‘प म रे सा’ असे तीन वेळा म्हणता येईल. त्या गाथेतील अभंग वाचताना मला संत एकनाथ महाराजांचा अभंग गवसला ज्याच्यात शब्द होते, ‘तुज नमो’. या शब्दांना मी ‘प म रे सा’ या शब्दांत बांधून कानाला कसं वाटतं याचा विचार करायला लागलो आणि लक्षात आलं की, आपल्याला अभिप्रेत असलेला सुरांचा आकृतिबंध मिळू शकेल. त्या अभंगाची पहिली ओळ होती ‘ॐकार स्वरूपा सद्गुरू समर्था, अनाथांच्या नाथा तुज नमो’. मग मी एक प्रयोग करायचं ठरविलं की, आता आपण या अभंगाची संपूर्ण चाल त्या आकृतिबंधात बांधू आणि तेदेखील एकतालात. ती रसिकांना आवडली असावी.
मी सर्व प्रकारचं संगीत ऐकतो. बंगाली कीर्तनाची एक वेगळी शैली आहे, तसं मराठीत काही करावंसं वाटलं. देस, तिलककामोद असा थाट, बंगाली शैली, खोळ नावाचं तालवाद्य आणि बंगाली एकतार वापरावी असा विचार सुचला आणि नाथमहाराजांच्या ‘माझ्या मना, लागो छंद, गोिवद, नित्य गोिवद’, या अभंगाची चाल त्या स्वरूपात बांधता आली. अनेक वेळेला काही तरी विलक्षण शब्दकळा अभंगांमधून मिळते. समर्थ रामदासांच्या अभंगातली पहिली ओळच मला अशी भावली की वाटलं या अभंगाला चाल लावावी. तो अभंग होता ‘ताने स्वर रंगवावा। मग तो रघुनाथ ध्यावा। साहित्यसंगती यावा । कथेचा प्रसंग बरा’. कारण समर्थ त्यात सांगतात, ‘असे गा, की सर्व वातावरण संगीतानं भारून गेलं पाहिजे.’
मला वाचायला आवडतं. काही कविता वाचताना अस्वस्थ व्हायला होतं. तिच्या दोन ओळींमधला अर्थ संगीतकाराला खुणावत राहतो. एकदा कुसुमाग्रजांची एक कविता माझ्या वाचनात आली, ती वाचून मी प्रचंड अस्वस्थ झालो. प्रत्येक दिवशी येणाऱ्या वर्तमानपत्रामध्ये शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांचे वर्णन वाचत होतोच, नेमका तोच भाव व तेच चित्र १९३४ मध्ये कुसुमाग्रजांच्या ‘लिलाव’ कवितेत मी पाहिले.- ‘उभा दारी कर लावुनी कपाळा, दीन शेतकरी दाबूनी उमाळा, दूत दाराशी पुकारी लिलाव, शब्द कसले ते घणाचेच घाव’. इतक्या वर्षांनंतर हीच अवस्था आजही शेतकऱ्यांच्या वाटय़ास येत असेल तर संगीताच्या माध्यमातून ती समोर आणण्याचे कर्तव्य मी बजावले पहिजे असे मला वाटले. संगीतकार म्हणून माझ्या लक्षात आले की, या कवितेच्या प्रारंभी चार ओळी मला तालविरहित स्वरूपाच्या मिळाल्या तर त्या कवितेला वेगळं परिमाण मिळेल. म्हणून मी आजचे कवी गुरू ठाकूर यांना विनंती केली व त्यांनी त्वरित एका दिवसात त्या मूळ कवितेस पूरक ठरतील अशा चार ओळी लिहूनही दिल्या- ‘लुटून गेले कुंपण साऱ्या कणसामधले मोती। कुणास मागील न्याय बापुडा बडवून झाली छाती। लचके तोडून गेली गिधाडे ठिबकत राही। घाव घाम गाळूनी बळिराजाच्या नशिबी उरे लिलाव.’
फक्त प्रेमकविता किंवा तत्सम भाव यांच्या व्यतिरिक्त काही वेगळा भाव आपल्या रचनांमधून देता यावा असा माझा प्रयत्न असतो. म्हणूनच समाजातील वाईट प्रथांवर उजेड टाकणारी अनिल कांबळे यांची ‘त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी’ ही गझल मला स्वरबद्ध करावीशी वाटली. शेकडो वर्षांच्या वाईट प्रथांची अस्वस्थता चालीतून आणण्याचा प्रयत्न मला करता आला. या गझलच्या मुखडय़ामध्ये व अंतऱ्याकडून मुखडय़ाकडे येणाऱ्या ओळीमध्ये मी हा शेवटचा शब्द आहे. हा प्रत्येक मी, ‘रे’ या स्वरावर थांबतो, जर मी तो ‘सा’ वर आणला असता तर हा प्रश्न सुटला असं दिसलं असतं. ‘रे’ या स्वरावर ठेवल्यामुळे तो प्रश्न तसाच आहे हे दाखविण्याचा माझा प्रयत्न होता.
माझा प्रयत्न नेहमी वेगळ्या विषयावरील कविता शोधण्यावर असतो. मला येथे सुधीर मोघे यांच्या ‘मन मनास उमगत नाही’, विमल लिमये यांच्या ‘घर असावे घरासारखे नकोत नुसत्या िभती’ किंवा ग्रेस यांच्या ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी’ या कवितांचा उल्लेख करावासा वाटतो. ‘घर असावे घरासारखे’ ही कविता सादर करताना मला मनात गलबलायला होतं किंवा अनेक जण मला विचारतात की तुम्हाला ग्रेसांच्या या कवितेचा अर्थ उलगडला का हो? मी त्यांना उत्तर देतो, ‘माझ्या चालीतून तुम्हाला तो उलगडतो का ते बघा.’ तिसऱ्या कडव्यात ग्रेस लिहितात, ‘अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून आकांत माझ्या उरी केवढा’. या ओळीला चाल लावताना नकळतपणे तो आकांत माझ्या चालीतून मला दाखवता आला. मला अनेकांनी येऊन सांगितले आहे की, तो आकांत आम्हाला जाणवला.
बाबूजी सांगायचे, ‘चाल साधी हवी, प्रासादिक हवी, तिचा मुखडा आकर्षक हवा, स्वर कानावर पडताच हृदयाचा ठाव घेता यावा. मुखडय़ानंतर अंतरा आणि अंतऱ्यानंतर मुखडय़ाकडे येणं तर्कशुद्ध हवं.’ संगीतातील प्रयोग करताना हेच सूत्र माझ्या मनात असतं. संगीत देताना मला अनेक प्रयोग करायला आवडतात. उदा. अनेक अभंग, भावगीतांच्या चाली मी एकतालात आणि झपतालात बांधलेल्या आहेत. ‘ॐकार स्वरूपा’, ‘ऋतु हिरवा’, ‘घन रानी’, ‘मी राधिका’, ‘गगना गंध आला’ याच्या चाली एकतालात बांधल्यानंतर रसिकांना त्या कशा भावल्या याचं उत्तर तेच देऊ शकतील. नुकत्याच प्रकाशित झालेले ‘साकार गंधार हा’ हे शीर्षकगीत आशा भोसले यांनी गायले आहे, ते मी झपतालात बांधलेलं आहे. याचा विषयही वेगळा आहे. स्वरेल गायकाच्या किंवा गायिकेच्या गळ्यात स्वयंभू गंधार असतो, असे आपले संगीतशास्त्र मानते, हाच विषय मी शांताबाई शेळके यांच्याकडे मांडला व त्यावर रचना लिहून देण्याची विनंती केली, त्यातून ‘साकार गंधार हा की मूर्त मंदार हा’ हे अप्रतिम काव्य जन्माला आलं. या गीतामध्ये मी आणखी एक प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. ध्रुपद धमार गायकीमध्ये नोम तोम हे शब्द गायले जातात. त्यावरून मी एक नोम तनन हा पाच मात्रांमध्ये बसणारा शब्द तयार केला आणि सुमारे शंभर गायकांच्या आवाजामध्ये ध्वनिमुद्रित केला. एखाद्या देवळाच्या गाभाऱ्यामधून शंभर जण नोम तनन गात आहेत आणि त्याच्यातून आशाबाईंचे ‘साकार गंधार हा’ हे दैवी स्वर उमटत आहेत असा सांगीतिक परिणाम साधण्याचा मी प्रयत्न केला आहे.
‘जय शारदे वागीश्वरी’ या गीताची आठवण मजेशीर आहे. ‘ऋतु हिरवा’च्या चर्चा सुरू होत्या. मी, माझ्या पत्नीसह शांताबाईंकडे गेलेलो होतो. तिथे बाजूलाच ‘जय शारदे’चा कागद होता. पत्नीनं तो पाहिला व मला दिला. शांताबाईंच्या अनुमतीने त्या गीताला चाल देण्यासाठी मी तो घेऊन आलो. भीमपलास रागामध्ये चाल करावी असं वाटलं, पण गाडी पुढे जाईना. आमच्या दादरच्या घराच्या बाजूला एक मंगल कार्यालय आहे, तिथे संध्याकाळी प्रभाकर कारेकरांचं गाणं सुरू होतं. ते भीमपलास गात होते. ते ऐकतच मी झोपलो. रात्री अडीच तीनच्या सुमारास जाग आली. मनात ‘जय शारदे वागीश्वरी’च्या ध्रुवपदाची चाल तयार झाली होती. मी पत्नीला उठवलं, तिला ती चाल ऐकवली, दुसऱ्या दिवशी गाणं पूर्ण झालं. असं फक्त या गीताच्या बाबत झालं. ‘ऋतु हिरवा’बद्दलचा एक वेगळा अनुभव सांगतो. एका अंध रसिकाने ती गाणी ऐकून मला सांगितलं की, ‘‘ऋतु हिरवा ऐकल्यानंतर रंग काय असतात, त्याचे अनुमान येते’’. अशा वेळी मला फार लाजल्यासारखं होतं. ही गाणी कशी घडतात, ते मला खरोखरंच कळत नाही, बाबूजी आणि आईचे आशीर्वाद व श्रोत्यांच्या शुभेच्छा हे घडवतात असं मला वाटतं. माझ्या आई वडिलांनी माझ्यावर उत्तम संस्कार केले असल्यामुळेच माझ्याकडून थोडंफार काम होऊ शकलं आहे.
१९९४ ची गोष्ट. मी पं. भीमसेन जोशी यांच्याकडे एका स्नेह्य़ाने लिहिलेल्या भक्तिरचना घेऊन गेलो होतो. पंडितजी म्हणाले, ‘‘मी फक्त संतांच्या रचना गातो. तू संतरचना घेऊन ये, मग पाहू’’. त्याप्रमाणे मी काही संतांच्या रचनांना चाली लावल्या व काही महिन्यांनी ते अभंग घेऊन भीमसेनजींकडे गेलो. त्यांना चाली ऐकवल्या. त्यांना त्या आवडल्या. आमच्या पाच तालमीही झाल्या. वत्सलामावशी म्हणाल्या, ‘‘आणखी तालमी झाल्यावर भीमसेनजी ध्वनिमुद्रण करतील.’’ आणि दुर्दैवाने पंडितजींची प्रकृती बरी नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना गायला मनाई केली. ते अभंग तसेच राहिले. मी सुमारे १७ वष्रे थांबलो आणि आता शंकर महादेवन, सुरेश वाडकर, उपेंद्र भट, जयतीर्थ मेहुंडी यांना घेऊन अभंगांचा अल्बम आता तयार होतोय.
गात असताना आणि चाल लावत असताना माझ्या मनात बाबूजींची मुद्रा सतत असते. ते कसे गात होते, हे मला सारखं जाणवतं. कुठल्या अक्षरावर केवढा जोर द्यायचा व तो शब्द कसा गायचा, ते भाव कसे आपण आणायचे, स्पष्ट उच्चार कसे करायचे याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे बाबूजी. तसंच माझी आई! जिने पाश्र्वसंगीतात मोठी कामगिरी केली, परंतु नंतर संपूर्ण आयुष्य संसारात वेचलं. बाबूजींच्या पाठी सर्व प्रसंगांमध्ये ती सावलीसारखी उभी राहिली. चाल केल्यानंतर मी तिला ऐकवायचो. आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव मला सांगून जायचे की, ती चाल उत्तम झाली आहे की नाही.
आईचं व बाबूजींचं, सांगणं असायचं की गाणी श्रोत्यांना भिडली पाहिजेत. त्यांच्या आशीर्वादाने आजवर असंख्य कार्यक्रम झाले आहेत. रंगमंचाला नमस्कार करताना तो रंगमंच माझ्यात पाझरत जातो, भिनत जातो. समोरच्या रसिकांना आपल्याजवळची उत्तमच गोष्ट द्यायची हा विचार असतो. त्यांना किती सांगू, किती गाऊन दाखवू अशी उत्कट भावना मनात असते, ही उत्कटता बाबूजींकडून आली. श्रोत्यांचं समाधान ज्ञानेश्वर माऊलींना महत्त्वाचं वाटतं, अनं बाबूजींनाही! श्रोत्यांना काही तरी नवीन द्यावं. नवनिर्मिती घडत राहावी असंच वाटतं. तो ईश्वराचाच आशीर्वाद असतो. रोज रात्री झोपताना मनात कृतज्ञ भाव असतो. देवाला विनम्रतेने विनवतो, माझ्याकडून खूप काम झालं नाही तरी चालेल, पण जे घडेल ते उत्तम असू दे!
शब्दांकन : प्रा. नितीन आरेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा