१९७५ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ जाहीर झालं त्याला यंदा ५० वर्षं पूर्ण होत आहेत. या ५० वर्षांच्या दरम्यानच्या काळात स्त्रीच्या जाणीवजागृतीत खूप मोठा बदल घडत गेला. पुरुषप्रधान संस्कृतीला आव्हान देण्यात आलं, जाब विचारण्यात आले, ते करण्याचं धाडस स्त्रीमध्ये आलं. स्त्री म्हणून स्वत:चा शोध घ्यायला हवा याची जाणीव म्हणजे स्त्रीभान. ते भान स्त्रीला आलं आणि स्त्री अधिकारांवर बोलू लागली, वागू लागली. या ५० वर्षांत स्त्रीच्या जगण्यावर, विचारांवर पर्यायाने समाजावर काय परिणाम झाला हे सांगणारं सदर दर पंधरा दिवसांनी.
१९ ६० ते १९७० चा काळ जगभर विद्यार्थी आंदोलनाचे दशक ठरले. १९७५ पर्यंत फ्रान्स,जर्मनी, व्हिएतनाम, लॅटिन अमेरिका इत्यादी देशांमध्ये झालेल्या आंदोलनात स्त्रियांचा मोठा सहभाग होता. भांडवलशाही व्यवस्था आणि पुरुषप्रधानतेमुळे होणाऱ्या शोषणाची जाणीव झालेल्या स्त्रियांनी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करायला सुरुवात केली. परिणामी, ‘संयुक्त राष्ट्र संघा’ने १९७५ हे ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ आणि १९७५ ते १९८५ ‘आंतरराष्ट्रीय महिला दशक’ म्हणून घोषित केले. ८ मार्च हा ‘महिला दिन’ म्हणून जाहीर झाला. हा काळ स्त्रीमुक्ती चळवळीतील ‘सेकंड व्हेव फेमिनिझम’चा होता. यावर्षी या प्रक्रियेला ५० वर्षे होत आहेत.
हेही वाचा…विकलांगतेचा स्त्रीवादी विचार
त्या निमित्ताने आपण ही प्रक्रिया कशी घडली? गेल्या पन्नास वर्षांत काय बदल झाले? जगभरातील स्त्री चळवळीने कोणत्या मागण्या केल्या? त्याचे यश-अपयश, चळवळीमुळे बदललेले कायदे, स्त्री-पुरुषांची बदललेली मानसिकता, स्त्री-पुरुष नातेसंबंधात झालेले बदल, स्त्रियांचा राजकारणातील आणि सार्वजनिक जीवनातील वाढता सहभाग, स्त्रियांचा रोजगार, पर्यावरण आणि स्त्रिया, सांप्रदायिक राजकारणाचा स्त्रियांच्या चळवळीवर झालेला परिणाम इत्यादी विषयांवर संवाद साधणार आहोत. वैश्विक ते स्थानिक असा हा संवाद असणार आहे.
स्त्री-पुरुष विषमता जगभर आहे. पुरुषप्रधानता आहे. स्त्री-पुरुष भेदांचा स्त्रियांच्या सामाजिक, राजकीय स्थानावर परिणाम झालेला आहे. पुरुषप्रधानता आणि पितृसत्तेचा सामना वैचारिक पातळीवर करण्यासाठी स्त्रीवादाची निर्मिती झाली. पंधरावे शतक ते दुसऱ्या महायुद्धापर्यंतचा काळ स्त्रीवादी विचारसरणीसाठी भरभराटीचा ठरला. जगभर या काळात उदारमतवादी स्त्रीवाद, मार्क्सवादी स्त्रीवाद, जहाल स्त्रीवाद, समाजवादी स्त्रीवाद या चार विचारसरणी विकसित झाल्या. यातूनच पुढे पर्यावरणवादी, कृष्णवर्णीय आणि मनोविश्लेषणात्मक स्त्रीवादाचे उपप्रवाह निर्माण झाले.
भारतात १८व्या शतकापासून राजाराम मोहन रॉय, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा जोतिराव फुले, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, महर्षी धोंडो केशव कर्वे इत्यादींनी स्त्रीशिक्षणासाठी आणि बालविवाह प्रतिबंध, विधवा पुनर्विवाह बंदी, केशवपन व सती प्रथा इत्यादी विरोधात चळवळी केल्या. कळत- नकळत स्त्रीवादाचा प्रवाह वाहता झाला. पंडिता रमाबाई, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, फातिमा शेख, मुक्ता साळवे, रुकय्या सखावत हुसैन इत्यादी स्त्रियांनी पुरुषप्रधान व्यवस्थेला प्रश्न विचारले. ताराबाई शिंदे यांनी परखड भाषेत, ‘स्त्री पुरुष तुलना’ पुस्तक लिहून पितृसत्ताक व्यवस्थेलाच आव्हान दिले. जागतिक पातळीवर स्त्रियांच्या दुय्यमत्वाविषयी ‘सेकंड सेक्स’ हे पुस्तक स्त्रीवादी लेखिका सिमॉन-द-बोव्हार यांनी १९४९ मध्ये लिहिले. त्याच्या ६८ वर्षे आधी १८८२ मध्ये ताराबाईंनी स्त्रियांची बाजू मांडली होती. ताराबाई आद्या स्त्रीवादी लेखिका आहेत.
सर्व क्षेत्रांत स्त्रियांना समान संधी, हक्क मिळावे असा आग्रह स्त्रीवाद्यांनी धरला. स्त्रीकडे माणूस म्हणून पाहावे हा विचार दिला. पितृसत्ताक व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी स्त्रियांना मोठा संघर्ष करावा लागला. दरम्यानच्या काळात दोन महायुद्ध झाली. या काळात नागरी जीवन सांभाळण्याची जबाबदारी स्त्रियांवर आली. युद्ध संपल्यानंतर मात्र स्त्रिया पुन्हा घरात डांबल्या गेल्या. यातूनच नागरिक स्वातंत्र्यासाठी स्त्रियांच्या मतदानाच्या अधिकाराच्या चळवळी झाल्या. इंग्लंडमधील एमिलिन पॅनख्रास्ट (Emmeline Pankhurst) यांच्या नेतृत्वात झालेले सफ्रजेट आंदोलन व कृष्णवर्णीय स्त्रियांच्या नागरी हक्कांच्या चळवळींनी स्त्रियांच्या नागरिकत्वाचा आणि राजकीय हक्कांचा विचार पुढे नेला.
स्त्रियांना बुद्धी असते, त्या विचार करू शकतात, आपला विचार मांडू शकतात, हे मूल्य स्त्रीवादाने रुजवले. स्त्री स्वतंत्र व्यक्ती आहे याचे भान पुरुषप्रधान समाजाला दिले. स्त्रियांनाही स्त्रीभानाचा विचार दिला. आपण माणूस आहोत, व्यक्ती आहोत, स्त्रिया आहोत, स्त्री म्हणून स्वत:चा शोध घ्यायला हवा याची जाणीव म्हणजे स्त्रीभान. स्त्रीवादाने स्त्रियांच्या नजरेने जग बघण्याचा विचार दिला. ‘बाईचा जन्म नको देऊ सख्याहरी, परक्याची ताबेदारी’ असे म्हणणाऱ्या स्त्रियांना स्त्री जन्माचे दु:ख न करता पुरुषप्रधान व्यवस्थेची चिकित्सा करण्याचे सामर्थ्य दिले. संत जनाबाईंच्या शब्दात सांगायचे तर, ‘स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदास’ हा आत्मविश्वास स्त्रियांना दिला.
स्त्रीला नाकारली जाणारी समता, न्याय व सन्मान, स्त्रीचा कुटुंबात होणारा छळ, लैंगिक अत्याचार इत्यादी अनेक प्रश्न स्त्रीवादी आंदोलनामुळे पुढे आले. समाजातील स्त्रियांच्या दुय्यम स्थानाचा अभ्यास झाला पाहिजे, असा आग्रह स्त्रीवादी चळवळींनी धरला. स्त्रियांच्या चळवळीमुळे संयुक्त राष्ट्र संघाला स्त्रियांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागले. १९४५ची ‘युनायटेड नेशन्स’ची सनद स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाची पुष्टी करणारा पहिला आंतरराष्ट्रीय करार ठरला. त्याबाबतचे निर्णय मात्र अतिशय मंद गतीने झाले. ‘युनायटेड नेशन्स कमिशन ऑफ स्टेटस ऑफ वूमन’ (सीएसडब्ल्यू) ने १९६५ मध्ये स्त्रियांच्या मानवी हक्कांच्या संरक्षणाबाबत संशोधन सुरू केले. शिक्षण, रोजगार, वारसा हक्क, हिंसाचार, कायदा सुधारणा असे अनेक मुद्दे या संशोधनातून पुढे आले. स्त्री-पुरुष भेदभावाच्या विदारक दर्शनाने ‘संयुक्त राष्ट्र संघा’ला भूमिका घ्यावी लागली.
७ नोव्हेंबर १९६७ला स्त्रियांवरील भेदभाव दूर करण्याबाबतचा प्रस्ताव ‘संयुक्त राष्ट्र संघा’ने संमत केला. त्यानंतर पाच वर्षं काहीच हालचाल झाली नाही. स्त्रियांच्या चळवळींचा दबाव वाढत गेला. १९७२ मध्ये ‘विमेन इंटरनॅशनल डेमोक्रॅटिक फेडरेशन’च्या अधिवेशनात १९७५ हे ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ जाहीर करण्याची मागणी केली. तसा ठरावही संमत झाला.
‘संयुक्त राष्ट्र संघा’ने १८ डिसेंबर १९७२ च्या बैठकीत स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी १९७५ हे ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ जाहीर करण्याची सूचना आली. ‘युनायटेड नेशन्स कमिशन ऑफ स्टेटस ऑफ वूमन’च्या रुमानियाच्या सदस्याने तसा ठराव मांडला. फिनलंडच्या सदस्याने अनुमोदन दिले. ठराव सर्वांनुमते मंजूर झाला. जवळजवळ दहा वर्षं या प्रक्रियेला लागली. हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाचा तेरावा वर्धापन दिन होता.
या घोषणेने जगभरातील स्त्री-पुरुष समतेसाठी कार्य करणाऱ्या संस्था, संघटनांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जगातील स्त्रिया एकमेकींशी जोडल्या गेल्या. मैत्रिणी बनल्या. जगाला बंधुभाव माहीत होता. या घोषणेने ‘सिस्टरहूड-भगिनीभावा’ची ओळख जगाला झाली. १९ जून ते २ जुलै १९७५ या काळात मेक्सिकोला झालेल्या परिषदेसाठी जगभरातून हजारो प्रतिनिधी उपस्थित होते. परिषदेत या ‘महिला वर्षा’चा कृतीकार्यक्रम ठरविण्यात आला. स्त्रियांसाठी समानता आणि शांततेच्या विकासात स्त्रियांचे योगदान’, हे या परिषदेचे सूत्र होते. याच परिषदेत पुढील दहा वर्षं ‘महिला दशक’ म्हणून जाहीर झाले. ‘संयुक्त राष्ट्र संघा’च्या सभासद राष्ट्रांवर या सूत्रांप्रमाणे स्त्रियांसाठी कृतीकार्यक्रम आखण्याची जबाबदारी आली.
हेही वाचा…नव्या वर्षाचं स्वागत करताना…
‘संयुक्त राष्ट्र संघा’च्या सदस्य राष्ट्रांमध्ये स्त्रियांच्या स्थितीबाबतची विविध सर्वेक्षणे करण्यात आली. या सर्वेक्षणाच्या अहवालांमुळे स्त्रियांची विदारक स्थिती, स्त्रियांचे दुय्यमत्व तसेच स्त्रियांना मिळणारी भेदभावाची वागणूक समोर आली. स्त्री-पुरुष समानतेसाठी विविध राष्ट्रांनी कृतीकार्यक्रम जाहीर केले. स्त्रियांमधील जागृतीही वाढत गेली. स्त्रियांना वैश्विक भान आले. शिक्षण, रोजगार, समान कामाला समान वेतन, प्रजनन अधिकार, सत्तेतील सहभाग, संपत्तीचे वाटप, कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार अशा अनेक विषयांवर स्त्रियांच्या चळवळी जोरदार आवाजात आत्मविश्वासाने बोलू लागल्या. ‘आमच्या शरीरावर आमचा अधिकार’, ‘भगिनीभाव जिंदाबाद’, अशा विविध घोषणा जोशात ऐकू येऊ लागल्या. राष्ट्र, धर्म, वंश, जातीपलीकडे जाऊन जगातील स्त्रिया स्त्री मुक्तीच्या झेंड्याखाली एकत्र आल्या. स्त्रियांच्या दुय्यम स्थानाला विरोध करत असतानाच युद्ध विरोध, अण्वस्त्र विरोध आणि जागतिक शांततेच्या चळवळींशी जोडल्या गेल्या. ‘आतंरराष्ट्रीय महिला वर्षा’च्या घोषणेमुळे स्त्रियांचा प्रश्न मानवी हक्कांशी जोडला गेला. व्यक्तिगत ते सार्वजनिक, राजकीय बदलाचा हा व्यापक पट आहे. हे फार विलक्षण आहे. त्याचा शोध घ्यायला हवा.
एखाद्या कळीचे फुलात रूपांतर होताना सौंदर्य, रचना आणि संवेदशीलतेचे दर्शन होते. या पन्नास वर्षांतला प्रवास हाच अनुभव देतो. काही जखमाही झाल्या. त्यावर मलमपट्टी, औषधे शोधली गेली. संवाद, रचना आणि संघर्षाच्या सूत्रावर स्त्री चळवळ उभी आहे. हा सगळा प्रवास तुम्हा वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आपण या वर्षी करणार आहोत. पुन्हा एकदा या प्रवासात सामील होऊ या.
हेही वाचा…सांदीत सापडलेले…!: समारोप
लेखिका १९७५ पासून समाजवादी चळवळीतील क्रियाशील कार्यकर्ती असून राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन आणि समाजवादी जन परिषदेद्वारे लोकशाही समाजवादासाठी कार्यरत आहेत. सध्या त्या ‘समाजवादी जन परिषदे’च्या अखिल भारतीय अध्यक्षा आहेत. गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून स्त्रीमुक्ती चळवळीत त्यांचा कृतिशील सहभाग आहे. त्यांनी ‘हिमालय मोटर रॅली विरोध’, ‘मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन’, शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश आंदोलन, शेतकरी तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या विविध आंदोलनांत तुरुंगवासही भोगला आहे. त्यांची ‘लढा ‘टाकलेल्या’ स्त्रियांचा’, ‘स्त्रीस्वातंत्र्याची वाटसरू अक्कमहादेवी’, ‘महात्मा गांधी आणि स्त्रीपुरुष समता’,‘स्त्रियांवरील हिंसाचाराविरुद्ध संघर्ष’ आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.